गुळेतला ‘संसार पाडवा’

निसर्गात ऋतुमानाप्रमाणे होणारे बदल साजरे करण्यासाठी उपलब्ध रानपल्लव व फुलांनी गुढी नाचवण्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेला आपण जपले. गुळे येथील हा ‘संसार पाडवा’, आदिम काळापासून आपल्या संसाराशी असलेले निसर्गाचे नाते अधोरेखित करतो.
'Sansara Padwa' in Guleli
'Sansara Padwa' in Guleli Dainik Gomantak

राजेंद्र पां. केरकर

कर्नाटक राज्यातल्या उत्तर कन्नड जिल्ह्याशी सीमा भिडणाऱ्या दक्षिण गोव्यातल्या काणकोण तालुक्यात श्रीमल्लिकार्जुन देवस्थानाशी संबंधित जो श्रीस्थळ गाव आहे, तो पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या कुशीत वसलेला आहे. त्यामुळे या गावाल सह्याद्रीची उंची आणि सागराची अथांगता गाठलेल्या मानवी संस्कृतीच्या खुणा विभिन्न कालखंडात कशा प्रभावीपणे अधोरेखित झाल्या त्याचे विलोभनीय दर्शन इथल्या लोकधर्माची कुळे आणि मुळे शोधताना दृष्टीस पडतात.

आंध्र प्रदेशातल्या श्रीशैल पर्वतावरच्या श्रीमल्लिकार्जुनाची उपासना श्रीस्थळातल्या सह्याद्रीच्या पर्वत माथ्यावर ती आणि सागराच्या किनारपट्टीवरती वास्तव्य पूर्वापार करणाऱ्या लोकमानसाच्या रीतीरिवाज, परंपरा, लोकगीत, सण-उत्सव यातून प्रकर्षाने दृष्टीस पडते.

केपे, काणकोण तालुक्यावरच्या सीमेवरती वसलेल्या श्रीस्थळ गावातला गूळ आजही आपल्या सांस्कृतिक संचितांच्या विभिन्न पैलूंचे दर्शन घडवताना, इथल्या डोंगर उतारावरती जीवन जगत असताना आदिम धर्म- संस्कृतीचा समृद्ध वारसा जपत आहे. फाल्गुन पौर्णिमेला येणारा तप्त तापमानाचा ग्रीष्मकाल आल्हाददायक व्हावा आणि आकाशातल्या मेघराजाने सृजनत्वाला जगवणारी पर्जन्यवृष्टी करावी म्हणून धरित्रीच्या मातृशक्तीसमेार कष्टकरी नाना विधी, परंपरांनी नतमस्तक होतो.

शिशिराचा निरोप घेऊन, नव पल्लवांचे वृक्षवेलींवरती वैभव मिरवण्यास सिद्ध झालेल्या वसंत ऋतूच्या स्वागताप्रीत्यर्थ इथला कष्टकरी देहभान विसरून सामोरा जातो. आज मातीत सोने, मोती कष्टाच्या माध्यमातून शरीरातला घाम गाळून पिकवणारा इथला पुरुष त्याचमुळे सण-उत्सवाच्यावेळी बेभान होऊन आपणाला संजीवक असणाऱ्या गिरिराजाचे रूप असणाऱ्या मल्लिकार्जुन देवतत्वाशी असीम समर्पण करण्यास तत्पर राहतो.

आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाद्वारे माणसाने प्रगतीचे विलक्षण टप्पे गाठलेले असले तरी ग्रामीण भारतातल्या आदिम वसाहतकाराने सनातन काळापासून पंचमहाभूतांशी असलेले आपले नाते अतूट ठेवलेले आहे आणि त्याचेच दर्शन महाशिवरात्रीपासून ढोलावरती काठी तालबद्धतेेत मारून नृत्य, नाट्य, गायन आणि वादनाचा अनुपम असा आविष्कार घडवतो. गुळे ही ग्रामनाम उत्पत्ती इथे उसापासून पूर्वापार तयार केलेल्या जाणाऱ्या गुळामुळे की गोलाकार आणि अगम्य असणाऱ्या तसेच वार्षिक उत्सवात मर्दातल्या प्रचंड ताकदीची प्रचिती देणाऱ्या दगडी गोळ्यांमुळे झाली हे ठामपणे सांगणे कठीण आहे. येणाऱ्या सह्याद्रीतल्या जंगलात अन्न साखळीच्या शिखरस्थानी असणाऱ्या पट्टेरी वाघाला लोकधर्माने देवाच्या रूपात पाहिलेले आहे.

देवी पर्वताची परीक्षा जुवारी तीरावरती वाघाच्या रूपात घेतल्यावरती मांगिरिश म्हणून परिचित झालेल्या सह्याद्रीच्या जंगल सम्राटला आदिम काळापासून मल्लिकार्जुनाचे सुरक्षा कवच लाभल्याचे मानले जाते. त्यामुळे, मल्लिकाशनपुष्पांचा सुगंधाचा आणि अर्जुन वृक्षाच्या वैभवाचा वारसा जपणाऱ्या वाघाचे अस्तित्व इथल्या ‘सिद्धामड्डी’, ‘वाघाहन्न’च्या ठिकाणी असल्याचे मानले जाते. अदृश्य रूपात जंगलाचे रक्षण करणाऱ्या नासाला घोड्याच्या गतीने चोहो सीमांचे रक्षण करता यावे म्हणून भगताकडून लाभलेला मृण्मयी घोडा अर्पण केला जातो. अकाली, अपघाती मृतांच्या आत्म्यांचे अपहरण व्हावे म्हणून त्यांचे स्मरण केले जाते.

गुळे डोंगरावरच्या उतारात मातीशी अनुबंध घट्ट राखून पूर्वी गावकर जमातीतले कष्टकरी वरी, कांगु, गोणो (नाचणी) तूर आदी धान्यांची पालापाचोळा जाळून सेंद्रिय खतांद्वारे पैदासी करायचे. केळी, वांगी, भोपळा, चवळी, कुळीथ, उडीद आणि रानातून मौसमानुसार उपलब्ध होणाऱ्या रानभाज्या आणि घोंटीग कुसुंब, वृक्षावरच्या मधमाश्यांच्या मधुरसाचा शाश्‍वतपणे आस्वाद घेणाऱ्या कष्टकऱ्यांचे जीवन निसर्गावर अवलंबून होते.

त्यामुळे अवकाळी पाऊस, वादळवारे, भूकंप आदी नैसर्गिक प्रकोपांमुळे उद्ध्वस्त होणाऱ्या संसाराला सावरण्यासाठी निसर्गाच्या कणाकणात वास करणाऱ्या शक्तीचा प्रत्यय त्याला आला आणि त्यासाठी चैत्र महिन्यातल्या पहिल्या दिवशी दिंडा (गजकर्णी) झुडपाच्या काठ्यावरती सुरेख कलाकुसर करून, त्यांच्या टोकावरती अशोकाच्या भगव्या रंगाच्या तुऱ्याबरोबर कुसुंब वृक्षाची तांबूस, पोपटी, पानांत उक्षीच्या जंगल पुष्पांबरोबर झेंडू, शेवंती आणि अन्य जंगल पुष्पांनी अलंकृत केले जाते. त्यानंतर अविवाहित बाल, कुमार युवक मंडळी घरवय, साठा पुरवा, खुटी, नास आदी दैवीशक्तीच्या सांनिध्यात ढोल, ताशांच्या वादनात भारावल्यागत उत्कट नृत्याचा आविष्कार करतात.

फाल्गुनात शिशिर ऋतू निरोप घेण्यासाठी सिद्ध झालेला असताना, पानगळतीच्या वृक्षवनस्पतींवरती पोपटी, तांबूस, हिरवाईच्या रंगाचा पर्वसंभार कष्टकऱ्यांला पुढे येणाऱ्या दाहक ग्रीष्माची जाणीव करून देतो आणि म्हणून हिरवाईची स्पंदने आपल्या तनामनात लेवून हाती गुढ्या घेऊन तो निसर्गातल्या दिव्यत्वाला आपणाला भीष्म सुखकर व्हावा यासाठी भावपूर्णतेने साकडे घालतो.

गुळे येथील गावकर वेळीप समाजाने आदिम काळापासून निसर्ग आणि पर्यावरणीय संस्कृतीशी जे नाते निर्माण केले होते. ते संक्रमणाच्या काळातदेखील अतूट राखले आणि त्यासाठी आजसुद्धा परंपरेने चालत आलेले सण-उत्सव साजरे करताना परिसरात आढळणाऱ्या वृक्षवेलींशी शाश्वत नाते ठेवण्याला त्याने जगण्याची असीम श्रद्धा मानले.

भूगर्भात जलस्रोत सुरक्षित राहावे म्हणून तृणपाने, पालापाचोळा यांनी शाकारणी केलेल्या घराच्या सभोवताली वृक्षच्छादन त्याने राखून ठेवले आणि म्हणून नववर्षाला सामोरे जाताना अशोकाद्वारे वेदनारहित, तर कुसुंब वृक्षातून जगण्याचे चैतन्य आणि उक्षीच्या वेलातून प्रतिकूल परिस्थितीतून जलसंचय करण्याची वृत्ती आपल्या अंगी वृद्धिंगत व्हावी म्हणून दिंडा अविवाहितांनी धारण करताना गृहस्थाश्रमाला पूरक ठरणारे तंत्र आणि मंत्र जोपासण्याच्या विचाराला प्राधान्य दिलेले आहे.

कष्टाने पिकवलेल्या धान्याला सुरक्षित ठेवण्यासाठी विविध साधने त्याने विकसित केली. कंदमुळांसाठी गवताची मुडी, कांद्यासाठी छपराला लटकवलेला उतोव, धान्याची मोजमाप करण्यास आठवो, पायली, धान्य साठवण्यासाठी वल्ली, कुडातर, पाले, दळणासाठी घिरट, जाते, कांडणासाठी मुसळ, दैनंदिन वापरासाठी कोटमो, दोण, कुरपुल, कळशी वस्के, माळटी यांचा उपयोग केला.

आज डांबरी रस्ता गुळेला महामार्गाशी जोडत असला तरी इथल्या गावकर येळिपाने आपल्या लोकधर्माशी असलेले रेशमी बंध कायम ठेवलेले आहेत. त्यामुळे निसर्गात होणाऱ्या बदलांना आणि येणाऱ्या परिस्थितीताला सामोरे जाण्यासाठी गावकर येळिपाने डोंगर उताराशी, माळरानाशी आणि सखल भागातल्या जमिनीत धान्याची पैदासी करण्यात दुधदुभत्या जनावरांना चारापाण्याची सोय व्हावी म्हणून श्रीस्थळातल्या मल्लिकार्जुन देवाबरोबर खुटी, साठ पुरवा, सिद्धा, नास या देवदेवतांसहित देवीपान्न, वघ्रो पान्, पायकापान्न आदी देवराईतल्या शक्तीला अभिवादन करण्यात धन्यता मानली. दिव्यत्वाची प्रचिती आल्याने संसार पाडव्याला रानपल्लव, पुष्पांची गुढी नाचवण्याच्या परंपरेचे अव्याहतपणे पालन केलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com