पंख

साम्यवादाचे पंख छाटल्यानंतर रशिया कशी भरारी घेईल, याची उत्सुकता अनेकांना होती. त्यात कोविड, त्यानंतर युक्रेन युद्ध; परंतु युद्धाचा कोणताही आभास आम्हांला मॉस्को किंवा दुसरे महत्त्वाचे शहर सेंट पीटर्सबर्ग येथे दिसला नाही. दोन्ही शहरे आपल्याच धुंदीत मस्त होती. ही शहरे श्रीमंतीची ऐट मिरवीत, उंची गाड्या, ब्रँडेड मालाची प्रदर्शने मांडणारी दुकाने व मॉल यांमुळे दिमाखात उभी असली तरी या देशाच्या अंतरंगात दडलेय काय, याचा आम्हांला शोध घ्यायचा होता...
Russia
RussiaDainik Gomantak

कोणालाही रशियाला का जावेसे वाटेल?

आम्ही विचार करीत होतो. सोव्हिएतपासून विभक्त झालेले अनेक देश आता पर्यटकांना आकृष्ट करू लागले आहेत.

परंतु तेव्हाच माझा मित्र अमर धुमटकर - जो रशियाच्या चार्टर व्यवस्थेसाठी येथे काम करतो - तिचे नाव कॅपर ट्रॅव्हल कंपनी - त्याने रशियाचे नाव सुचविले. तेथील पहिले आकर्षण होते थंड वातावरण व स्वस्ताई, जे भारतीयांना मानवणारे होते. तेथील १७ अंश तापमान सध्याच्या येथील तप्त वातावरणात आम्हांला भुरळ घालणारेच होते. दुसरी गोष्ट म्हणजे, रशियात जाण्यासाठी ई-व्हिसाची व्यवस्था आहे व केवळ तीन दिवसांत कोणत्याही कटकटीविना तो आम्हांला मिळाला. तिसरे महत्त्व तेथील लोक, इतिहास आणि राजकीय परिस्थिती.

गेल्याच आठवड्यात आम्ही ‘नेटफ्लिक्स’वर ‘द लास्ट झार’ पाहिल्यापासून तर रशियाचा रक्तलांच्छित इतिहास, तेथील सम्राटांचे विलासी जीवन, त्यात भरडली गेलेली जनता, त्या राजवटीतील दहशतवादी कृत्ये, त्यात कम्युनिस्ट चळवळीचा उदय व लॅनिनने रोमानोवा शाही राजवटीतील शेवटचा सम्राट निकोलस दुसरा याची १९१८मध्ये केलेली क्रूर हत्या, हे सारे डोळ्यांसमोर तरळत होते. एक गोष्ट खरी आहे की, ‘नेटफिल्क्स’ला रशियात जाऊन त्या घटनेचे प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यास मान्यता मिळालीच नसती.

परंतु मालिका निर्मात्याने त्याचे हुबेहूब चित्रण केल्याबद्दल त्यांची जगभर वाखाणणी झालेली आहे. सम्राट निकोलस यांच्या कारकिर्दीत लोकांसमोर प्रचंड आर्थिक विवंचना निर्माण झाली. अन्नाची कमतरता होती, राजवट भ्रष्टाचाराने माखलेली होती. त्यातून रशियात क्रांती झाली - ‘बॉल्सेविक राज्यक्रांती’ असे तिला संबोधले जाते - तिचे नेतृत्व अनेक छोट्या चळवळी, हिंसक कारवाया, सैन्यांच्या स्वतःच्या चाली यामधून डावे क्रांतिकारी ब्लादिमीर लॅनिनच्या हातात अलगद येते व सत्तेवर कब्जा करून ते झार राजवटीच्या परंपरेला उलथवून टाकतात.

त्यामुळे मालिकेचे चित्रीकरण रशियातील कोंदट राजकीय वातावरणामध्ये शक्य होणार नाही, याची कल्पना निर्मात्यांना होतीच. त्यामुळे त्यांनी पॉलिश राजवटीतील गणराज्य असलेल्या मध्ययुगीन इमारतींची रचना असलेल्या मिनियसची निवड केली. पूर्वीच्या सोव्हिएत गणराज्यातील अनेक भागांना सध्याचे वेगळे अस्तित्व जोपासत स्वतंत्र होण्याची आस लागली आहे. युक्रेन त्यातलेच एक. ते ज्या त्वेषाने रशियाबरोबर लढतेय, याचे कौतुक होते.

रशियाला जाताना युक्रेन युद्धाचे सावट तर आपल्यावर नसेल ना, याची प्राथमिक चिंता होतीच. कारण ‘गुगल’वर रशियाला जाणे टाळा, अशीच सूचना देण्यात येत आहे. दुसरे म्हणजे, पुण्याच्या एका ओळखीच्या पर्यटन कंपनीने तुम्ही तेथे जाऊ नकाच, आम्ही आमचे सर्व टूर रद्द केल्याची ताकीदही दिली होती; परंतु माझा मित्र अमर धुमटकर म्हणाला, तुम्ही ज्या मॉस्को व सेंट पीटर्सबर्गला जाणार आहात, तेथे तुम्हांला युद्धाचा यत्किंचितही सुगावा लागणार नाही, तसेच घडले. या दोन्ही शहरांतील लोक आपल्याच धुंदीत मस्त, दंग आहेत.

तेथील युक्रेनी नागरिकांना जरूर झळ लागलीय. विमानतळावर बऱ्याच युक्रेनी नागरिकांना बाजूला बसवून ठेवलेले दृश्य आम्ही पाहिले. रशियातील युक्रेनी नागरिक आपल्या अस्मितेबद्दल तीव्र भावना व्यक्त करीत असल्याने व स्वाभाविकरीत्या युद्धाला विरोध केल्याने सरकारच्या निगराणीखाली आले आहेत; परंतु मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्ग आपल्याच मस्त जीवनात दंग आहेत. दोन गोष्टी या युद्धामध्ये जाणवल्या. रशियातील पर्यटकांची संख्या कमी झाली आहे.

सेंट पीटरबर्ग तर आपला ऐतिहासिक वारसा मिरवत जगणारे, पर्यटनावर आधारलेले शहर. तेथेही विदेशी पर्यटक कमालीचे रोडावले; परंतु स्थानिक पर्यटक - ज्यांना उन्हाळी वातावरण भुरळ घालते. मोठ्या प्रमाणात आपल्या मुला-बाळांसह उष्ण वातावरण उपभोगत आहेत. दुसरी बाब म्हणजे, चिनी पर्यटकांची लागलेली रीघ. आमचे स्थानिक गाइड अमेरिकी प्रवृत्तीची थट्टा करीत होते. युक्रेन युद्धामुळे अमेरिकेने रशियाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे. त्यांनी रशियाविरोधात आर्थिक निर्बंध लादले.

त्या परिणामातून अनेक अमेरिकन कंपन्या - कोकपासून मॅकडोनाल्डपर्यंत रशियातून निघून गेल्या. सुपर मार्केटच्या चेन बंद झाल्या. त्याची जागा चिनी उत्पादकांनी घेतली आहे. आम्ही नावे न ऐकलेल्या चिनी मोटारी विदेशी कंपन्यांशी स्पर्धा करीत रस्त्यावरून धावताना पाहिल्या.

त्यामुळे चीन आपली विचारधारा बाजूला ठेवून आर्थिक विकासाकडे किती चटकन झेप घेते व त्यामुळेच जगातील एक बलाढ्य शक्ती बनला आहे, याचीही चुणूक जाणवली. त्याचा त्वरित परिणाम म्हणजे रशियन भाषेला आत्यंतिक महत्त्व देणारा हा देश - जेथे इंग्रजी भाषा फारच दुर्मीळ आहे - आता विमानतळावर रशियन भाषेबरोबर चिनी भाषेला महत्त्व देतो. प्रत्येक सूचना रशियन भाषेबरोबर चिनी भाषेतही लिहिली आहे.

आम्ही रशियात होतो, तेव्हा रशियाचे अध्यक्ष पुतीन चीन दौऱ्यावर होते व दोन्ही देशांचे अध्यक्ष परस्पर हितसंबंधांवर सहजतेने भाष्य करीत होते. युक्रेन युद्धात रशियाला शस्त्रसज्ज करण्यात चीन आघाडीवर असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. चीन, रशिया व्यापार सध्या २४० अब्ज डॉलरवर गेला असून, ही व्यापारवृद्धी दोन वर्षांत ७० टक्के इतकी वाढली आहे. रशिया व चीन हे दोन्ही एकाधिकारशाहीचा पुरस्कार करणारे देश. अमेरिका दोघांशी पंगा घेऊन आहे; परंतु या बिघडलेल्या आंतरराष्ट्रीय संबंधातही चीनने आर्थिक उन्नतीत घेतलेली झेप निश्चितच त्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीची प्रचिती आणून देते.

अमेरिकेच्या प्रवृत्तीविरोधात चीनमध्ये नाराजी आहे. परिणामी रशियाच्या युक्रेनमधील विस्तारवादाला जनसमूहाचा स्वाभाविक पाठिंबा निर्माण झाला आहे.

‘ईझम’पेक्षा प्रगतीची ओढ आहे, असे बाह्य स्वरूपात तरी दाखविले जातेय. ते किती खरे आहे? मॉस्को व सेंट पीटर्सबर्गमधील रहिवासी आता संपूर्णतः फॅशनेबल बनले आहेत. येथील तरुणी आधुनिक बनल्या आहेत आणि आपल्या फॅशनेबल कपड्यात मिरवताना त्या अमेरिकन तरुणींनाही मागे टाकतील. मॉस्कोपेक्षा सेंट पीटर्सबर्ग, जे एकेकाळी वारसास्थळ मानले गेले व लोकांना या शहरातील राजे-रजवाडे, किल्ले, वारसा प्रतीके यांच्यात रस होता, आता त्या नगरीला संपूर्णतः युरोपियन बनायची ओढ, लागली आहे. नव्या मॉडेलच्या मोटारी, आधुनिक पोषाख, झपाट्याने बदलणारा फॅशन उद्योग, कॉस्मेटिक वस्तूंची रेलचेल, त्यातून बाहेरून तरी रशियाने आपला रंग-ढंग बदलण्याच्या दिशेने कूच केली आहे, असे दिसते.

लोकांना कम्युनिस्ट राजवटीचा उबग आलाच होता. जग बदलले, तेव्हा बंदिस्त रशियाही किती काळ आपल्या जोखडात राहणार होती? पुतीनच्या भांडवली एकाधिकारशाहीचा लोक आदर करतात का? परंतु युवकांना नवीन अद्ययावत शिक्षण हवे आहे. व्यापार उदिमात वाढ होऊन नवीन राजकीय, सामाजिक कल्पनांचा स्वीकार करायचा आहे.

रशियन क्रांतीने जुन्या सत्तेला उखडून टाकले. सध्या पुतीन यांनी नवीन राजवट आणली, जी चीनप्रमाणेच भांडवलशाहीचा जोरदार पुरस्कार करते. तरीही इतर विकसित देशांपेक्षा येथील असमानता नजरेस भरते. येथे मोफत शिक्षण, वैद्यकीय सुविधा आहेत. लोकसंख्या वाढीसाठी सरकारने अनेक योजना पुढे आणल्या आहेत. रशियातील प्रचंड नैसर्गिक संसाधनांमुळे प्रगतीच्या मोठ्या संधी आहेत; परंतु पुतीनच्या एकाधिकारशाहीविरोधात लोक बोलत नाहीत का? अनेक लेखक-कलावंत यांना परागंदा व्हावे लागले. पुतीन राजवटीने आपल्यावर युद्ध लादल्याचा आरोप करून हजारो जण तुरुंगातही गेले आहेत.

पुतीनना एक जागतिक प्रभावी नेता म्हणून स्वतःला असे शाबीत करायचे आहे. इतिहासकालीन सम्राटही सत्तेवर येताच नवे प्रांत रशियाला जोडून स्वतःच्या पराक्रमाची ग्वाही देत. पुतीन यांनाही भांडवलशाही रशियात नवे प्रांत जोडून विजयी, ताकदवान रशियाची ग्वाही द्यावयाची आहे.

त्यासाठी दुसऱ्या महायुद्धाची आठवण करून देत नाझी भस्मासुराचा खात्मा रशियामुळे शक्य झाला, हे पुन्हा-पुन्हा येथे लोकांच्या मनावर बिंबविले जात आहे. आम्हांलाही या दोन्ही शहरांमध्ये युद्धातील विजयाच्या तसबिरी सजविलेल्या दिसल्या. काही ठिकाणी एकटी-दुकटी माणसे हातात फलक घेऊन पुतीनना आणखी सत्ता द्या, असे दर्शवीत होती.

दुर्दैवाने दुसऱ्या महायुद्धात रशियाला सर्वांत मोठी झळ बसली होती. इतर देशांच्या तुलनेने रशियाचे २७ दशलक्ष सैनिक ठार झाले. त्यानंतर जरी रशियाने या युद्धातील स्वतःच्या कर्तृत्वाचे सतत गोडवे गायले - सध्या पुतीनच्या राज्यात हा जयजयकार अधिकच चालतो. जो रशियन नागरिकांच्या देशप्रेमाला भरते यावे व पुतीनच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष व्हावे, याचसाठी चालविला आहे. - तरी सत्य वेगळेच आहे.

ज्याचा येथील विचारवंतांना विसर पडलेला नाही. १९३९मध्ये नाझी-सोव्हिएत समझोता झाला. त्यातून १९३९मध्ये पोलंड आणि फिनलँड किंवा १९४०मध्ये बाल्टिक देशांवर कब्जा करण्यासारखे घृणास्पद प्रकारही घडले आहेत. या पार्श्वभूमीवर जर्मनीने हल्ला केल्यामुळेच रशिया युद्धात सामील झाली, हे कटू सत्य आहे.

युक्रेन युद्धापासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच चुकीचा इतिहास लोकांवर थोपवण्याचा प्रयत्न चालविला असला, तरी युद्धाचे परिणाम दीर्घकालीन असतात व नेते वगळता जनतेच्या वाट्याला त्याचे वाईट परिणामच येत असतात, अशा युद्धामुळे नागरिकांचे जीवन असह्य होते. (हजारो युवकांना सक्तीने युद्धभूमीवर पाठविल्याचा सर्रास आरोप होतो.) परंतु राष्ट्रवादासारख्या कल्पना बोकाळल्याने राजकीय अधिकारही आकुंचित होत जाणार आहेत, याची कल्पना बुद्धिवाद्यांना आली आहे.

आम्ही आधुनिक आणि फॅशनेबल रशियाचे जे चित्र या देशातील दोन प्रमुख शहरांत पाहिले, तो काहीसा युद्धाची झळ न दाखविण्याचा प्रयत्न होता. त्यातून सेंट पीटर्सबर्गची नवी उभारणीही जोमाने सुरू आहे. परंतु येथील ब्रँडेड दुकानांत लोक नाहीत. सेंट पीटर्सबर्गमधील मॉलमध्ये जरूर गर्दी होती, पर्यटक फिरत आहेत, त्यातही चिनी जास्त आहेत.

रशियात स्थानिक पर्यटनाला वाव देण्यात आल्याने ते सेंट पीटर्सबर्गमधील जुन्या वारसा भागामध्ये गर्दी करीत असल्याचे दृश्य पाहता आले. राजमहालांची बडदास्त व देखभाल उत्कृष्ट आहे. ही वारसास्थळे योग्य पद्धतीने सांभाळली व पर्यटकांना खुली केली. कम्युनिस्ट राजवटीत वारसास्थळे, राजमहाल, कॅथेड्रेलमधील चौथरे व घुमटांवरील सोने कापून नेण्यात आले होते. काही चर्चेस पाडण्यात आल्या, काही पुन्हा उभारल्या. पुतीन यांना चर्च धर्मसंस्थेबरोबर चांगले संबंध निर्माण करायचे आहेत. सेंट पीटर्सबर्ग पर्यटनासाठी पूर्वीही नावाजलेले होते.

त्यामुळे येथील बरेचजण पर्यटन क्षेत्रात गुंतले आहेत. कोविडनंतर अनेकांची रोजी-रोटी संपली. आजही पर्यटन कोविडपूर्वीच्या काळाएवढी भरारी घेऊ शकलेले नाही. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील लोकांना बांधकामासारख्या क्षेत्रात जावे लागले आहे. रशियाच्या पुनर्निर्माणाचे व आर्थिक भरारीचे जे स्वप्न पुतीन दाखवीत आहेत, त्यातून रोजगार निर्माण होईल का? अजूनही रशियाच्या गणराज्यांमधून वेश्या व्यवसायासाठी कोवळ्या मुलींची निर्यात करण्यात येत असल्याचा आरोप केला जातो. ग्रामीण भागांतून गुलामी नष्ट झाली असली तरी माणसांचे दैन्य संपले आहे काय? या प्रश्नांची उत्तरे गुंतागुंतीची आहेत.

एक गोष्ट खरी आहे, रशिया एक अजस्र व वैविध्यपूर्ण देश आहे. १९२२ ते १९९१पर्यंत सोव्हिएत युनियन हे जगातील सर्वांत मोठे संघराज्य होते. हा शीतयुद्धाचाही काळ होता. त्या काळात सत्ता, राजकीय हितसंबंधी व्यक्तींनाच अधिकार प्राप्त झाले. मोठ्या शहरांमध्ये इमारतीची बांधणी झाली; परंतु तेथे लागेबांधे असलेले लोकच राहू शकत. कम्युनिस्ट रशियात भ्रष्टाचार, अनागोंदी यासारखे प्रकारही घडले. आज लोकांना अधिक स्वातंत्र्य, परंतु स्थैर्यही हवे आहे.

हा एक विरोधाभासही आहे. विदेशींच्या संपर्कात येणारा माणूस बोलत नाही; परंतु कलाकार, निदर्शक व स्पष्ट बोलणाऱ्या बुद्धिवाद्यांना तुरुंगात डांबले आहे. लोकांमध्ये भीती आहे, पुतीन राजवटीबद्दल संशय वाढत चाललाय, युद्धामुळे तर राज्यसत्तेचा दबाव वाढत जाईल, असेच वातावरण आहे. पुतीन यांची राजकीय शैली, ताकदवान हुकूमशहाला शोभेशीच आहे. त्यांनी राजकीय हितसंबंध निर्माण केले, व्यापारी व अभिजनवर्गाला आपल्या बाजूने उभे करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. पुतीनच्या रूपाने उद्योगात प्रगती करणाऱ्या व श्रीमंत बनू इच्छिणाऱ्यांना नवा मित्र लाभलाय. ‘माझ्या बाजूने उभे राहा व अधिक श्रीमंत बना’, असाच त्यांचा सल्ला आहे.

अमेरिकी हस्तक्षेपानंतर अनेक कंपन्या देश सोडून गेल्या. क्रॅमलिनने देशातील अभिजनवर्गाला पुढे येण्याचे व संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले. देशाची ऐतिहासिक संपत्ती तुम्ही ताब्यात घ्या. रशियामध्ये नैसर्गिक संपत्तीची रेलचेल आहे.

ती अवघ्याच लोकांना उपलब्ध करून देऊन, त्यांना आणखी श्रीमंत बनविण्याचा संकल्प सोडण्यात आला. त्यातून एक नवी उद्योगनीती तयार होऊ लागली आहे. सरकारला निकट असलेले लोक, अमेरिकी कंपन्या विकत घेताहेत, नवे मॉल उभारले जात आहेत. मॉस्को व सेंट पीटर्सबर्गमध्ये असलेल्या साऱ्या सरकारी इमारतींचा मुखवटा बदलण्यात येत आहे.

अर्थव्यवस्था नव्याने वेग घेत असल्याचा माहोल त्यांनी निर्माण केला आहे. तरुणांनाही नवे आधुनिक गॅझेट प्राप्त होतात. नव्या मोटारी, नवे ऐश्वर्य, नवे विलासी जीवन असा हा नवीन रशिया लोकांना दाखविला जातोय; परंतु हा केवळ भास आहे.

दुसऱ्या बाजूला युक्रेनमध्ये कोण लढतोय, कोण मरतोय, याची मोजदाद नाही. पुतीन रशियाला देत असलेले नवे पंख लोकांना नवे स्वातंत्र्य बहाल करेल, उंच भरारी घेण्याची ताकद देईल काय, हे काळच निश्चित करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com