रशियन चवीच्या शोधात

सेंट पीटर्सबर्गच्या बाजारात एका पाव विकणाऱ्या महिलेनं मला ‘प्रियानिक’ बद्दल माहिती दिली. तिने मला यातली सगळी पारंपरिक डिझाइन्स दाखवली. हे सगळं दाखवताना तिच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असे हावभाव होते.
Priyanik
Priyanik Dainik Gomantak

लहानपणापासून रशियाबद्दल मनात उत्सुकता होती. माझे वडील ऐंशीच्या दशकात ‘असिधारा’ नावाचं मासिक काढायचे. ‘असिधारा’ मासिक केंद्रीय स्तरावर नोंदणीकृत मासिक होतं. त्यामुळे पत्रकार-संपादक यांसोबत वेगवेगळ्या दौऱ्यात जाताना बाबांना देखील आमंत्रण यायचं. याच काळात बाबांना रशिया दौऱ्याचे आमंत्रण होते.

Priyanik
Hyderabad To Goa: एक प्रवास बारा भानगडी! कोणाची मुलाखत, कोणाचे महत्वाचे काम, 25 जणांची समस्याग्रस्त गोवा ट्रीप

बाबा जाऊ शकले नाहीत पण त्यानंतर ‘सोव्हियत रशिया’ आणि ‘स्पुटनिक’ नावाची दोन मासिकं दर महिन्याला आमच्या घरी येऊ लागली. या मासिकांच्या निमित्ताने रशियाबद्दल आम्हाला समजू लागलं. ‘सोव्हियत रशिया’ आणि ‘स्पुटनिक’आलं कि त्यातील रंगीत फोटो डोळे भरून बघणं हे आवडीचं काम असायचं. रशियाला न जाताच आम्हाला घर बसल्या रशियाचं दर्शन घडत होतं. ‘सोव्हियत रशिया’ आणि ‘स्पुटनिक’ मुळे रशियाला समजून घेणं सोपं गेलं.

नुकतीच रशियाला जाऊन आले आणि ‘आपलं जेवण त्यांचं जेवण’ अशी तुलना आपोआप झालीच. पण या तुलनेत आपलंच जेवण, आपलेच पदार्थ कसे चांगले आणि ते खातात ते कसं वाईट आहे असा विचार केला नाही. नवा देश, नवे लोक, नवा समाज, त्याचं राहणीमान - खाण्यापिण्याची पद्धत एकदम वेगळी. तिथलं हवामान आपल्या हवामानापेक्षा अगदी विरुद्ध. मग अशा वातावरणात ‘आपल्या सारखं’ जेवण कसं असू शकेल ना?

तशी मी मूळची पक्की शाकाहारी. आता मासे खायला शिकले असले तरी गोव्याबाहेर शक्यतो मासळी खाणं टाळते. प्रवासात पोटाची काळजी घेतलेली बरी असते. यामुळेच रशियाला गेल्यावर तुझ्या जेवणाचं काय? असा प्रश्न माझ्यापेक्षा बाकीच्यांना प्रश्न पडला होता. 'ब्रेड - बटर' मिळालं तरी मला ठीक होतं. प्रत्यक्षात यापेक्षा बरंच काही मिळालं. अनेकांच्या बोलण्यावरून एक गोष्ट लक्षात आली होती कि परदेशात गेल्यावर शाकाहारी लोकांना जुळवून घेणं अवघड जातं. आमच्यासोबत सर्व मासळी आणि चिकनप्रेमी मंडळी होती.

यांची खाण्यातली उडी तेवढीच होती. अलीकडे सर्वच हॉटेल्समध्ये सकाळी ‘बुफे’ पद्धतीचा नाश्ता मांडलेला असतो. त्यात तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ ठेवलेले असतात. याच एक फायदा असतो कि आपल्याला त्यातलं नेमकं काय हवं आहे तेवढंच निवडून खाता येतं. मॉस्कोला ‘पाना व्हाईट’ नावाच्या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. यापूर्ण प्रवासात ‘पाना व्हाईट’ मधला सकाळचा नाश्ता आणि काही निवडक पदार्थ मला फार आवडले.

रशियाच्या ग्रामीण भागात अतिशय चांगल्या दर्जाचे 'चीज' तयार होतं. स्थानिक बाजारात देखील आम्ही चीजचे असंख्य प्रकार बघितले. सकाळच्या नाश्त्यात वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेड आणि चीज, पॅन केक, ताजी फळं, ज्यूस, दूध, अंडी, उकडलेल्या ताज्या भाज्या होत्या. एवढं सारं भरपूर होतं. आमच्या लोकल गाइडने जवळच असलेल्या रशियन रेस्टोरंटमध्ये आवर्जून जा असं सांगून ठेवलं होतं. मास्को सोडण्यापूर्वी आम्ही तिथं जाऊन आलो.

रशियन राष्ट्रीय पदार्थ - पेलमेनी

स्थानिक पदर्थांबद्दल आमच्या गाईडशी बोलत असताना त्याने 'पेलमेनी' बद्दल सांगितलं. पेलमेनी हा सूपचा प्रकार आहे. हा पदार्थ त्यांचा राष्ट्रीय पदार्थ आहे हे ऐकून आणि आश्चर्य वाटलं. पेलमेनी हे बिट पासून बनवलेलं सूप ज्यामध्ये वेगवेगळ्या मांसचे डम्पलिंग्ज आणि चीज, कोबी -टोमॅटो, कांदा घालतात. बिटमुळे या सूपला आकर्षक रंग आणि वेगळीच चव मिळते. आम्ही ज्या रशियन रेस्टोरंटमध्ये गेलो होतो तिथं सुदैवाने मला शाकाहारी पेलमेनी मिळालं.

मांस घातलेल्या डम्पलिंग्ज ऐवजी चीज भरून केलेले डम्पलिंग्ज घालून मला इथं पेलमेनी मिळालं. हे पेलमेनी सूप फार चविष्ट होतं. बिट सोबत कोबी, टोमॅटो - कांदा आणि चीज डम्पलिंग्ज यांची एकत्रित चव म्हणजे आंबट गोड चवीला चीजनं समतोल ठेवलं होतं. छान थंडगार वातावरणात पेलमेनी सूप पिणं उबदार वाटलं. आपण हे सूप घरी देखील बनवू शकतो. डम्पलिंग्ज म्हणलं कि आपण त्याला 'चायनीज', 'जापनीज' पदार्थांशी जोडतो. पण रशियातील स्थानिक पदार्थांमध्ये 'डम्पलिंग्ज' देखील आहेत. सूप सोबत डम्पलिंग्ज खाणं हा इथला आवडता प्रकार आहे.

आम्ही उतरलो होतो त्या हॉटेलमध्ये 'पमकिन सूप विथ श्रीम्स' मिळत होतं. थोडक्यात काय तर लाल भोपळ्याचं प्रॉन्स घातलेलं सूप. उकडलेला लाल भोपळाचं चीज -क्रीम घालून केलेल्या सूपमध्ये तीन चार प्रॉन्स घालून दिले. काय सुंदर चव होती. मी प्रॉन्स वगळून फक्त भोपळ्याचं सूप पिऊ शकले असते पण मला यात प्रॉन्स घालून कसं लागतं याची चव घेऊन बघायची होती. हे एक सूप रात्रीच्या जेवणासाठी पुरेसं ठरलं.

पारंपरिक ''प्रियानिक'' पाव

गोवेकरांना इथला आणखी एक प्रकार आवडेल तो म्हणजे पाव. असंख्य प्रकारचे पाव इथं मिळतात. बाजारात गेल्यावर मी मुद्दाम पाव मिळणाऱ्या स्टॉल्सवर थांबत होते. इथले पाव म्हणजे कलाकुसर केल्यासारखे. पावावर केलेली कलाकुसर बघून मी अचंबित झाले. प्रियानिक नावाचा गोड पाव इथल्या बाजारपेठेची शान आहे. हा एक रशियन गोड ब्रेड किंवा कुकी आहे जी दालचिनी, आले, वेलची, जायफळ, जिरे आणि बडीशेप यांसारख्या मसाल्यांनी चवीनुसार बनवतात. हे बऱ्याचदा विविध फळांचे जाम आणि कॅरमेलाइज्ड किंवा कंडेन्स्ड दुधाने भरलेलं असतं.

पहिलं प्रियानिक फक्त गव्हाचे पीठ, मध आणि बेरीच्या रसाने बनवलं गेलं होतं, १५ व्या शतकानंतर यात वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर सुरु झाला. 'तूला' नावाचा प्रियानिक पाव फारच वेगळा होता. हा पाव फळांचे तुकडे आणि आलं घालून शिवाय त्यावर आकर्षक नक्षीकाम करून बनवला जातो. बाजारात हे प्रियानिक लक्ष वेधून घेतात. चहा सोबत हा पाव खाल्ला जातो. 'प्रियानिक ब्रेड' इथं भेटवस्तू देण्यासाठी वापरला जातो. प्रियानिक ब्रेडसाठी पारंपरिक डिझाइन्स जतन केलेल्या आहेत. हि पाव बनवण्याची इथली पारंपरिक पद्धत आहे. कधी मध घालून, तर कधी ताजी फळं घालून बनवतात.

विशेषतः ख्रिसमसच्या दिवसात याला जास्त मागणी असते. सेंट पीटर्सबर्गच्या बाजारात एका पाव विकणाऱ्या महिलेनं मला 'प्रियानिक' बद्दल माहिती दिली. तिने मला यातली सगळी पारंपरिक डिझाइन्स दाखवली. हे सगळं दाखवताना तिच्या चेहऱ्यावर अतिशय सुंदर असे हावभाव होते. फक्त रशियन भाषा येणारी हि महिला खूप काही सांगून गेली.

माझ्यासारख्या लोकांना इथं जेवणात फार कमी पर्याय असले तरी आपण नक्कीच उपाशी राहणार नाही याची तजवीज करणारे असंख्य पर्याय इथं आहेत. तुम्ही मटण आणि चिकन खात असाल तर तुमच्यासाठी रशियामध्ये वेगळ्याप्रकारची मेजवानी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com