‘माती आणि माणसं’: ग्रामीण संस्कृतीमधील बंधांचे शब्दरूप

एखाद्या व्यक्तीची अशी खास बोलण्याची पध्दत असे, त्या व्यक्तीचा असा एक खास शब्द असतो, जो शब्द कधीही कुठेही ऐकला तरी आपल्याला त्या विशिष्ट व्यक्तीची आठवण होत असते.
goa
goaDainik Gomantak

गौरी नाडकर्णी प्रभू वेळगेकर

‘बागीतलं घर’ या लेखसंग्रहाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर प्रा. विनायक उर्फ विनय लक्ष्मण बापट यांचा ‘माती आणि माणसं’ हा २५ लेखांचा दुसरा संग्रह प्रकाशित होत आहे.

‘बागीतलं घर’ वाचून माझ्यासारख्या ज्या असंख्य वाचकांची भूक अधिक चाळवली होती. त्या वाचकांसाठी हा संग्रह मेजवानीच ठरेल.

‘माती आणि माणसं’ या ललित लेख संग्रहातील लेखांचे साधारणतः ३ प्रकारांत वर्गीकरण करता येईल. पहिले ३ लेख वृक्षांशी निगडीत आहेत. ग्रामीण जीवनात केवळ माणसांना महत्त्व नसते तर त्या जीवनात वृक्ष आणि प्राणी यांनासुध्दा अनन्य साधारण महत्त्व असते. ग्रामीण जीवन जगलेल्या माणसाचे झाडांबरोबरही एक विशिष्ट नाते असते, अनेक आठवणी जोडलेल्या असतात.

याच नात्याला शब्दरूप देण्याचा प्रयत्न लेखकांनी ‘दोन आंबे’, ‘सातवीण’ आणि ‘कुमया’ या लेखांमधून केली आहे. गावगाड्यात पाळले जाणारे विविध समज-गैरसमज आठवणींच्या माध्यमातून व्यक्त करताना लेखक त्या-त्या झाडांचे गुणदोषही सहजपणे वाचकांसमोर मांडतात.

पुढचे ११ लेख विविध विषयांशी निगडीत गतकालीन आठवणींवर आधारित आहेत. या आठवणी वाचत असताना वाचकांच्या होऊन जातात. कारण ग्रामजीवनात वाढलेल्या माणसाला अपरिचित वाटेल असा एकही विषय मला या संग्रहात आढळलेला नाही.

‘वाटा’ हा लेख वाचताना धावे परिसर अजिबात माहिती नसलेल्या माणसाला सुध्दा तिथल्या पायवाटा परिचित वाटाव्यात असे प्रदेशाचे हुबेहूब आणि सजीव चित्रण करण्यात लेखक पुरेपूर यशस्वी झाले आहेत.

लेखांमधले संवाद गोमंतकीय ग्रामीण बोलीत दिले असल्यामुळे कृत्रिमतेपासून हे लेख दूर राहतात. कुळागर-संस्कृतीमधल्या ‘पाट’, ‘दांडे’, ‘माग’, ‘करली’ या संकल्पना वाचकाला खरोखर कुळागराचे दर्शन घडवितात.

‘पायऱ्या’ या लेखात पायऱ्यांशी निगडीत विविध आठवणी सांगून शेवटी पायऱ्यांच्या माध्यमातून जीवनाचे तत्त्वज्ञान ते विशद करतात. आणि हीच या लेखसंग्रहाची खासियत म्हणून नमूद करता येते. एखाद्या विषयावर सहज भाष्य करून शेवटी चिंतनात्मक पध्दतीने जीवनाशी तो विषय जोडण्याचे कसब लेखकाला प्राप्त झाले आहे. “ज्याला आपली पायरी आणि आपली झेप कुठे ती समजली, त्याला आपलं जगणं समजलंच म्हणून समजा.” असा गहन विचार ‘पायऱ्या’ या लेखाच्या शेवटी त्यांनी मांडलेला आहे.

कृषी-संस्कृतीशी निगडीत विविध कामांच्या संपूर्ण प्रक्रिया त्यांनी ओघात मांडलेल्या आहेत. इथे गावकऱ्यांच्या कष्टाळू वृत्तीचे घडणारे दर्शन विलोभनीय आहे . गरजेनुसार लोककथांचे, इतर कादंबऱ्यांचे संदर्भ त्यांनी वेळोवेळी दिले आहेत. इथे त्यांची अभ्यासू वृत्ती ठळकपणे दिसते. ‘हॉस्पिटल मधील पन्नाशी’ हा लेख प्रसिध्द साहित्यिक बा. भ. बोरकरांच्या ‘अनासक्त कुतूहल’ या लेखाशी साम्य दर्शविणारा आहे. जीवन आणि मृत्यूमधील धुसर रेषेची जाणीव त्यांना कशी झाली हे त्यांनी खूप चिंतनात्मक आणि सखोलपणे मांडलेले आहे. पन्नाशीतल्या वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद या लेखात आहे.

शेवटचे ११ लेख व्यक्तिचित्रणात्मक स्वरूपाचे आहेत. यापैकी काही लेख आप्तेष्टांवर आधारित आहेत तर काही लेख कष्टकरी समाजातील व्यक्तींवर आधारित आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या स्वतंत्र वैशिष्ट्याचे हुबेहूब चित्रण लेखकांनी या लेखांमधून केले आहे. लेखकांना आपल्या आईबद्दल असलेला जिव्हाळा आणि प्रेम ‘आई’ या लेखात ओतप्रोत भरलेला दिसतो.

आईबद्दलच्या त्यांच्या भावना, तसेच खंबीरपणा, जिद्द हे त्यांच्या आईंचे गुण इतर लेखांमधूनही प्रभावीपणे दिसून येतात. ‘शशीताई’, ‘संजू’ या आते/चुलत भावंडांच्या आठवणीने लेखक सद्‍गदित होतात.

एखाद्या व्यक्तीची अशी खास बोलण्याची पध्दत असे, त्या व्यक्तीचा असा एक खास शब्द असतो, जो शब्द कधीही कुठेही ऐकला तरी आपल्याला त्या विशिष्ट व्यक्तीची आठवण होत असते. ‘That is, there you are’ हे वाक्य यापुढे कुठेही ऐकल्यास ‘मणेरीकर काका’च बोलत आहेत की काय असा भास वाचकांना झाल्याशिवाय राहणार नाही.

“माणूस किती जगला याला जास्त महत्त्व नसतं, तो कसा जगला याला जास्त महत्त्व असतं, पण एखादा अर्थपूर्ण जीवनही बरीच वर्षे जगला तर त्यालाही विशेष महत्त्व असतं” असे म्हणत असताना नकळतपणे जीवनाचे सार लेखकांने मांडले आहे. त्यांच्या गहन चिंतनाचे इथे वाचकांना दर्शन घडते.

कष्टकरी समाजातील अशिक्षित, साध्या-भोळ्या व्यक्तींचा कष्टाळू, प्रामाणिक, निरागस, श्रध्दाळू स्वभाव लेखकांनी नेमकेपणाने नोंदविला आहे. या समाजाशी एकरूप होऊन त्यांचे वर्णन करताना लेखकांची सामाजिक बांधिलकी दृष्टिक्षेपात येते. ‘ती’ या लेखात भागेल्याच्या बायकोची व्यथा सांगताना ते म्हणतात, “’स्त्री’ असण्याची वेदना माझा सारा अवकाश व्यापून टाकते.” पुरूष असून ‘स्त्री’च्या व्यथा-वेदनेची जाणीव त्यांच्या संवेदनशील हृदयाला आहे.

पणजीसारख्या स्मार्ट सिटीत राहत असताना, धावेसारख्या अत्यंत दुर्गम अशा भागाचा लेखकामध्ये जो अंश आहे, तो टिकवून ठेवण्याचा प्रयत्न ते या लेखसंग्रहाच्या माध्यमातून करताना दिसतात. गतकालीन स्मृतींना उजाळा देताना, त्या गोष्टी आता परत कधीच घडणार नाहीत, दिसणार नाहीत याची खंत त्यांच्या लेखनातून जाणवते आणि प्रगतीपथावर मार्गक्रमण करणाऱ्या ग्रामीण संस्कृतीचा होणारा ऱ्हास त्यांना अस्वस्थ करतो.

शहरात राहूनही मन खेड्यातल्या घरी असलेल्या कित्येक गोमंतकियांच्या भावनांचे शब्दरूप म्हणून हा लेखसंग्रह नक्की नावलौकिक कमवेल यात तीळमात्र शंका नाही. एकूणच हे पुस्तक आपणाला गाव जीवनाचा अत्यंत समृद्ध अनुभव देते. गोमंतकीय ग्रामीण जीवनाचा हा दस्तऐवज आहे असेही म्हणता येईल. प्रत्येकाच्या संग्रही असावे‌ असे हे पुस्तक आहे.

‘हॉस्पिटल मधील पन्नाशी’ हा लेख प्रसिध्द साहित्यिक बा. भ. बोरकरांच्या ‘अनासक्त कुतूहल’ या लेखाशी साम्य दर्शविणारा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com