- डॉ. प्रकाश पर्येंकर
नदी ही जीवदायीनी असते. तिच्या सानिध्यात राहून मानव आपले जीवन समृद्ध करतो. तिचा प्रवाह प्रेरणादायी असतो. वेगवेगळ्या ऋतूत तिची असंख्य रुपे मन मोहून टाकतात.
खानापूर – कर्नाटकातल्या देगांव गांवांत उगम पावलेली आणि महादेवी म्हणून लोकमानसात महत्व असलेली ‘म्हदई’ नदीही याला अपवाद नाही. या नदीच्या काठावर माझा जन्म झाला. तिच्याच सहवासात माझ बालपण गेल.
नदी (River) आणि माणूस तसा कधी वेगळा नव्हताच. सहजीवन होत ते. नदीचं “देवणें” गजबजलेलं असायचे. गांवचे लोक सकाळी सकाळी तिचं पाणी आणायचे. कपडे धुणे, भांडी घांसणे, गाई-म्हशीना पाणी पाजणं, आंघोळीसाठी तर पुर्ण गांव नदीवर लोटायचे.
रात्रीची दिपकावणीला जाऊन मासे पकडणं, तासन तास नदीच्या पात्रात गळ टाकून बसणं, हे तर नित्याचेच असायचे. कळत नकळत ही महादई नदी माझ्या ह्रदयात विराजमान झाली. पुढ मी म्हादई आणि तिच्या उपनद्यांचा शोध घेतला. दऱ्याखोऱ्यात भ्रमंती केली. छोट्या मोट्या गोष्ठीच निरिक्षण केलं.
नदीच्या तिरावर पारंपारीक तंत्रज्ञानाचा वापर करून केल्या जाणाऱ्या पुरण शेतीचे वैभव, तिथल्या समृध्द जीवनाचा वारसा सांगणारे होते. पुढे 1999 वर्षी मी 33 गांवांतल्या पुरण शेतीचं सर्वेक्षण केलं होत. या गोष्टीमुळे सेंद्रीय पुरण शेतीसंदर्भात मला कुतुहल निर्माण झालं.
यात जमेची बाजू म्हणजे, मी पुरण शेतकऱ्याचा मुलगा असल्याने या शेतीत मी स्वत: काम केल होतं. पावसाळ्यात (Rain) नदीला आलेल्या पुरामुळे रेती, दगड (चाळचे गुणें), कुशारें (झाडाच्या पानांचा गाळ) आणि काळी माती प्रवाहाबरोबर वाहत खाली येते. नदीच्या तिरावर असलेल्या विशिष्ट ठिकाणी हे सगळं साचल जात.
पुरण शेती कामाच्या प्रक्रियेत हे सगळ काढल जात. तळ सपाट केला जातो. हे काम जिकिरीचं असत. घरातील सगळीच माणसं या कामाला जुपतात. महिना-दिड महिना हा गाळ काढायला लागतो.
डिसेंबर महिन्यात सुरू झालेलं हे काम पुढ जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत चालत. या पुरण शेतीला मोठा धोका असतो तो ऐनवेळी पडणाऱ्या पवसाचा. शेतात पीक तयार झालेल असताना मे महिन्यात पाऊस न थांबता कोसळायला लागला तर बघता बघता नदी भरून वाहते आणि सारी पुरण शेती वाहून जाते.
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत शासनाने नदीच्या पात्रात कॉंक्रिटचे बांध उभे केले आहेत. पांच मिटर उंचीच्या या बंधाऱ्यामुळे डिसेंबर ते मे पर्यंतही पुरण शेतीची जमीन पाण्याखाली असते.
तात्पर्य आता शेती करता येत नाही. सत्तरीच (Satari) कृषीवैभव असलेली ही शेती सतरा वर्षांपुर्वीच इतिहासजमा झालेली आहे. परंपरेन जोपासलेलं स्वदेशी ज्ञान लोप पावल आहे. त्या संबंधितले हजारो शब्द नामषेश झालेले आहेत.
आजच्या आधुनीक काळांत नदीच्या पात्रातील रेती बेकायदेशीररित्या उत्खनन केली जाते. त्याचे दुष्यपरिणाम म्हणजे महादई नदीचे मोठ मोठे डोह उध्वस्त झालेले आहेत. नदीच्या तिरावर असलेल्या जमनीवर स्थानीक लोकानी केलेल्या अतिक्रमणामुळे पर्यावरणाचे असंख्य प्रस्न तयार झालेले आहेत.
या साऱ्या गोष्टीनी मला ‘पुरण’ कादंबरी लिहीण्यास प्रवृत्त केलं. नदीच्या तिरावरची अदीम समाजव्यवस्था, लोकसंस्कृती, लोकजीवन आणि बदलत्या काळांत झालेली स्थित्यंतरे या कादंबरीत मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
पुरण शेतीच्या कामाची प्रक्रिया, शेतकऱ्यांची जीवनशैली, त्यांचे परस्परसंबंध, शेतीबरोबर गोपालन आणि इतर तत्कालीन परंपारीक व्यवसाय यांच्यावर मी प्रकाश टाकला आहे. पर्यावरण आणि परिस्थितीसंबंधीचे एक अंत:सुत्र या कादंबरीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.