शहरातील पक्ष्यांची तळमळ

आपल्या पणजीला ‘स्मार्ट सिटी’ बनवणार्‍यांनी शहरी पक्ष्यांची तळमळ समजून घेणे गरजेचे आहे.
Bird
Bird Dainik Gomantak

डॉ . मनोज सुमती बोरकर

पक्षी हा असा एक निसर्गसेवक आहे जो आपले जीवन रंगांनी आणि स्वरांनी भारून टाकतो. बिया विखुरणे, परागीकरण करणे, कुजलेल्याची विल्हेवाट लावणे, कीटक नष्ट करणे, अशी अनेक कामे पक्षी करत असतात.

सागरी पक्ष्यांच्या विष्ठेपासून बनवलेले खत माती समृद्ध करते. त्यांची अंडी व मांस यातून मिळणारी प्रथिने माणसाला पुष्ट करतात.

या ग्रहावर वर्चस्व गाजवण्याच्या नादात आम्ही अभियांत्रिकी मालमत्ता आणि आमच्या वस्ती, रस्ते, पीक-शेते, खाणकाम आणि कारखानदारांसाठी केलेल्या झाडांच्या कत्तलीमुळे, हे पंख असलेले आमचे जीवलग आमच्यापासून दुरावले. आमच्या जीवनातील त्यांची भूमिकाच आम्ही विसरलो.

आता, आमच्या व्हरांड्यावर लटकलेल्या फॅन्सी पिंजर्‍यांमध्ये पाळीव प्राणी म्हणून ठेवलेल्या आणि पक्षीपालनात प्रदर्शित केलेल्या काही प्रजाती त्यांच्या अस्तित्वाची एक भयानक आठवण करून देत फडफडत आहेत.

एकेकाळी विविध वनस्पतींनी भरलेल्या त्यांचा हरित अधिवास, घरटे बांधण्याची जागा आणि हिवाळ्यातील आश्रयस्थान शहरीकरणामुळे नष्ट झाले. उंच इमारती, प्रदूषण ओकणारी उंच औद्योगिक चिमणी, दूरसंचार पायाभूत सुविधा, पवन टर्बाइन, अविश्रांत हवाई वाहतूक आणि विमानांचे उत्सर्जन यामुळे पक्ष्यांचे हवाई स्थलांतरणाचे मार्ग आता अधिकाधिक कठीण होत आहेत.

आपल्या तांत्रिक प्रगतीने त्यांच्यावर केलेले आक्रमण सहन करणे पक्ष्यांसाठी सोपे नाही. त्यामुळे, अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. शहरी वातावरणात दिसणाऱ्या किंवा ऐकू येणाऱ्या पक्ष्यांकडे आपले अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. शहरी पक्षी, आपल्या ग्रामीण भागातील बांधवांपेक्षा ‘हुशार’ असल्याचे अलीकडील संशोधनातून स्पष्टपणे समोर आले आहे! पॅसेरीन किंवा पर्चिंग पक्ष्यांच्या ८२ प्रजातींवर १२ युरोपियन शहरांमध्ये केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की या ‘शहरी पक्षीकुळा’चा मेंदू मोठा आहे, जो बुद्धिमत्तेचा द्योतक आहे.

शहरातील कावळ्यांवरील २०००साली केलेल्या माझ्या स्वतःच्या संशोधनात असे दिसून आले आहे की ते घरटे बांधण्यासाठी धातूच्या तारा निवडतात. ज्याचा परिणाम अंड्यांचे उष्मायन कमाल राखण्यात त्यांना मदत मिळते. हे उष्मागतिक शास्त्र त्यांनी आत्मसात केले आहे.

संशोधकांनी असे दाखवून दिले आहे की मेक्सिको सिटीमधील चिमण्या त्यांची घरटी परजीवी जंतूंपासून मुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या घरट्यांमध्ये निकोटीन असलेली सिगारेटची थोटके गोळा करून ठेवतात. आम्हाला आता हे देखील माहित आहे की शहरी पक्षी शहरी आवाजाचा सामना करण्यासाठी उच्चरवात गातात. रात्रीच्या प्रकाशामुळे त्यांच्या दैनंदिन कामकाजात व्यत्यय येतो.

स्थानिक नैसर्गिक अधिवासाच्या पर्यावरणीय निरंतरतेच्या विपरीत, पक्ष्यांचे निवासस्थान म्हणून शहर हे मानवनिर्मित अडथळ्यांनी वेढलेला एक चक्रव्यूह आहे, जेथे विखंडन हा नियम आहे. मानवी लोकसंख्येचा स्फोट, औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे पक्ष्यांची त्रिस्थळी यात्रा सुरू आहे.

इमारतींच्या उंच उंच संरचना, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, शहरी आवाजाची तीव्रता, रात्रीच्या वेळी कृत्रिम प्रकाश आणि वाढलेली मानवी वर्दळ ही पाच आव्हाने शहरांमधील पक्ष्यांसमोर ‘आ’ वासून उभी आहेत. हिवाळ्यात ऊब आणि अन्न शोधण्यासाठी शहरी भागांत येणाऱ्या पक्ष्यांना या टोलेजंग इमारती विस्मयचकित करतात. उंच इमारतींवरील काचेवरून परावर्तीत होणारे प्रकाशकिरण या पक्ष्यांना गोंधळात टाकतात व त्यापासून वाचण्यासाठी उडण्याचा प्रयत्न करताना ते जखमी होतात, मृत्युमुखी पडतात.

वाहनांच्या उत्सर्जनाने भरलेली प्रदूषित हवा त्यांना विषारी धातूंच्या संपर्कात आणू शकते ज्यामुळे त्यांच्या जीवन प्रक्रियेस, पुनरुत्पादनाच्या क्षमतेस धोका निर्माण होतो. वाहनांचा कर्णकर्कश आवाज, सायरन, बांधकामाचा आवाज यामुळे वाढलेली डेसिबलची पातळी चिंताजनक आहे. खरे तर हा यंत्रनिर्मित तीव्र आवाज, पक्ष्यांना वीणीच्या हंगामात जोडीदार मिळवण्यासाठी त्रासदायक ठरतो.

कृत्रिम प्रकाशासाठी भारताचे शहरी भाग जगाच्या नकाशावर चमकत आहेत. रात्रीच्या वेळीही पक्ष्यांना ‘प्रकाशझोतात’ आणणारा हा मानवी उपद्रव त्यांचे जैविक घड्याळ बदलतो. त्यांचे नैसर्गिक संतुलन बिघडते. शहरांमध्ये पक्षी लोकांसोबत जागा सामायिक करतात आणि त्यामुळे संघर्ष निर्माण होऊ शकतो. सामान्यत: पक्ष्यांना मानवी निवासस्थानावर घरटे बनवण्यापासून दूर ठेवले जाते कारण ते त्यांच्या दुर्गंधीयुक्त विष्ठेने बाहेरील भाग खराब करतात आणि रोगजनकांच्या संक्रमणाचे स्रोतदेखील बनू शकतात.

विणीच्या हंगामात वाढलेली मानवी दखल पक्ष्यांना आपल्यावरील अतिक्रमण वाटते. अर्थात, पक्ष्यांना मानवी निवासस्थानाजवळ राहण्याचा फायदाही होतो. कारण त्यांना अन्नाचा नियमित पुरवठा होतो. याव्यतिरिक्त, ते अन्न शोधण्यात कमी वेळ घालवतात आणि नैसर्गिक कमतरता भासते तेव्हा त्यांना सहज अन्न मिळू शकते.

आपल्या मीठ आणि साखरयुक्त अन्नाचे पक्ष्यांवर गंभीर परिणाम होण्याव्यतिरिक्त पाळीव प्राणी, मांजर आणि कुत्र्यांसारख्या जंगली प्रजातींद्वारे शिकार होण्याचा धोकाही संभवतो. तसेच, अन्नासाठी अशा शहरी पक्ष्यांमधील रोगजनकांच्या जलद प्रसारावर परिणाम होऊ शकतो. बदललेल्या आतड्यांतील मायक्रोबायोममुळे शहरी पक्ष्यांचे आकार बदलतात आणि त्यांच्या शारीरिक गुणवैशिष्ट्यांतदेखील तफावत होऊ शकते.

पुराणमतवादी अंदाजानुसार सर्व ज्ञात पक्ष्यांच्या प्रजातींपैकी २०% शहरांमध्ये आढळतात. यांतील सर्व पक्षी शहरी वातावरणाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे झपाट्याने शहरीकरण होत असताना, स्थानिक वनस्पतींची लागवड होणेही अत्यंत आवश्यक आहे.

सिंगापूरमध्ये अशा काही जागा स्थानिक वनस्पतींसाठी मुद्दाम राखून ठेवण्यात आल्या आहेत. ही झाडे पक्ष्यांच्या जीवनाला समृद्ध बनवतात. २०१९साली जेव्हा मी सिंगापूरच्या राष्ट्रीय विद्यापीठाच्या निमंत्रणावरून माझ्या विद्यार्थ्यांसमवेत सिंगापूरला भेट दिली तेव्हा आम्ही ‘विंडसर नेचर पार्क’ आणि ‘सुंगेई बुलोह वेटलँड रिझर्व्ह’ला भेट दिली.

दोन्ही स्थाने शहरी वातावरणाच्या अगदी मध्यभागी आणि तरीही समृद्ध पक्षी जीवनाचे निवासस्थान आहेत. येथे आढळलेल्या पक्ष्यांच्या प्रजाती ‘आययूसीएन’ रेड लिस्टमध्ये आहेत. अशा जाणीवपूर्वक केलेल्या पक्षी संवर्धनामध्ये शहरी नियोजन आणि संवर्धनाचा संगम दिसून येतो. शहरी वातावरणाचा ताण प्रभावीपणे कमी करण्याव्यतिरिक्त प्रजातींचे एकसंधीकरण टाळण्यास मदतही होते.

पणजीला ‘स्मार्ट सिटी’ बनवु पहाणाऱ्यांनी शहरी पक्ष्यांची तळमळ समजून घेणे गरजेचे आहे. पक्ष्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावले उचलणेही तितकेच गरजेचे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com