निकोला टेस्लाचा क्रोएशिया

अनोळखीपणाचे एक वेगळेच सुख असते. ओळखीच्या जगाचा कंटाळा आला की अशा जाग्रेबसारख्या अनोळखी शहरात जावे.
Croatia
CroatiaDainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

जा ग्रेबमध्ये मला एक पक्षमित्र धर्मगुरू भेटला. सकाळी, संध्याकाळी हातात दाण्यांचे भांडे घेऊन तो अष्टदिशांतून येणाऱ्या पक्ष्यांना दाणे भरवायचा. हे पक्षी त्याच्या डोक्यावर, खांद्यावर, हातावर बसायचे. संत तुकारामही शेतात ईश्वरचिंतनात बुडून उभा राही तेव्हा छोटे, मोठे पक्षी त्याच्या अंगाखांद्यावर बसत.

प्राण्यांच्या शिकारीवर बंदी आणणे कठीण आहे पण पक्ष्यांच्या शिकारीवर तर बंदी आणता येईल. रेव्हरंड टिळकांच्या स्वभावोक्ती समासातील कवितेतले ते शोकांत कडवे कोण विसरेल?

मातीत ते पसरले अतिरम्य पंख,

केले वरी उदर पांडुर निष्कलंक

चंचु तशीच उघडी, पद लांबविले

निष्प्राण देह पडला, श्रमही निमाले

आणि काममग्न पक्षिणीचा वेध घेणाऱ्या व्याध्याला उद्देशून उत्स्फूर्तपणे अनुष्ठुभ वृत्तांत वाल्मीकीला सुचलेला श्लोक -

मा निषाद प्रतिष्ठा त्वमगमः शाश्वतीः समः

यत्क्रौंचमिथुनादेकमवधीः काममोहितम्

पक्ष्यांना कोकणीत ''शेवणी'' म्हणतात. शेवणी ही पाहण्यासाठी नसतात तर ऐकण्यासाठी असतात असे ज्येष्ठ कोकणी लेखक रवींद्र केळेकर म्हणत.

टी. एन. शेषन यांनी आपल्या आत्मचरित्रात एक प्रसंग सांगितला आहे. शेषन आपल्या पत्नीसह उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या पत्नीला एका झाडावरचे पक्ष्यांचे घरटे दिसले. "हे घरटे माझ्या दिवाणखान्यात छान दिसेल." शेषनची पत्नी त्यांना म्हणाली. शेषनने ड्रायव्हरला गाडी थांबवायला लावली. ड्रायव्हरने तिथून जाणाऱ्या धनगराच्या एका लहान मुलाला दहा रुपये देऊ केले व ते पक्ष्याचे घरटे काढण्यास सांगितले.

तो मुलगा घरटे काढायला तयार होईना. तेव्हा स्वतः शेषन खाली उतरले. त्यांनी त्या मुलास पन्नास रुपये देऊ केले. धनगराचा तो छोटा मुलगा म्हणाला, "तुम्ही कितीही पैसे दिले तरी मी ते घरटे काढणार नाही. त्या घरट्यात पक्ष्याची छोटी पिले आहेत. संध्याकाळी चारा घेऊन येणाऱ्या आईची ती वाट पाहतात. घरटे काढून तुम्हाला दिले तर पक्ष्याची ती छोटी मुले भुकेने मरतील. त्यांना चारा घेऊन येणारी त्यांची आई आपल्या पिल्लांना शोधत राहील."

आपले सारे शिक्षण त्या छोट्या अनाडी मुलाच्या निसर्गभानापुढे व्यर्थ आहे याची शेषन यांना जाणीव झाली.

पक्ष्यांसाठी आपण आपल्या परसात दाणे असलेली एक आणि पाणी असलेली एक ताटली अशा दोन ताटल्या ठेवल्या पाहिजेत. उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी आणि पाण्यात आंघोळ करण्यासाठी चिमण्या येतात. साळोऱ्या येतात. छोटे छोटे पक्षी पाणी पिण्यासाठी व दाणे खाण्यासाठी येतात.

निसर्गाच्या चित्रलिपीतील ही पक्ष्यांची विरामचिन्हे आपण सांभाळून ठेवायला हवीत! जाग्रेबला दोन तीन दिवस निरुद्देश फिरलो. अनोळखी शहर, अनोळखी माणसे, मीही अनोळखी - स्वतःची ओळख विसरू पाहणारा. अनोळखीपणाचे एक वेगळेच सुख असते. ओळखीच्या जगाचा कंटाळा आला की अशा जाग्रेबसारख्या अनोळखी शहरात जावे. अशा शहरातली दुपार मला आवडते. दुपार होईतो सकाळचे धारोष्ण उन्ह शतदलानी फुलू लागते. रसरसून पिकू लागते. सरत्या दुपारी उन्हे आटू लागतात. आटीव केशरी होऊ लागतात.

दुपारी शहर शांत असते. मख्ख मोने. अबोल. अशब्द. पक्षीही कुठे दिसत नाहीत. वाराही आपल्या घरट्यात सुस्त झोपलेला असतो.

दुपारी जाग्रेबमधल्या वास्तुंच्या खिडक्या बंद असतात. मला वास्तुशिल्पातील खिडकी आवडते.

गुहांना खिडक्या नसत. खिडक्या नसलेल्या गुहांपासून खिडक्या असलेल्या घरापर्यंत मानवी संस्कृती येऊन ठेपली. खिडक्यांमुळे वास्तु भरजरी होतात. वास्तुंना श्रीमंती येते. त्या पोक्त, भारदस्त वाटू लागतात.

खिडकी घराला सभोवतालच्या परिसराशी जोडते. खिडकी हा घराचा डोळा असतो. मायक्रोसॉफ्टने आपल्या सॉफ्टवेअरला windows हे सार्थ नाव दिले.

एका सायंकाळी मी जाग्रेबमधल्या मिरोगॅस स्मशानभूमीला भेट दिली. सगळी निद्रासीन थडगी. पूर्ण शांतीत बुडालेली. त्याखाली मृत देहांचे आत्मे पहुडलेले. चिरशांतीत. स्मशानाचा हा मौन राग गूढ गंभीर असतो. स्मशानातल्या एका कोनाड्यात बसून तो कानसपणे ऐकावा. स्मशानात फुलझाडे आहेत. पण रंगीबेरंगी फुलांचे एकही फुलझाड नाही. सर्व पांढऱ्या रंगाच्या फुलांची फुलझाडे. चिवचिवाट करणारे पक्षीही इथे शांत आहेत. अंधार पडेपर्यंत ह्या जाग्रेबच्या निवांत स्मशानात बसून राहिलो. तिन्हीसांजेच्या पागोळ्यांतून गळणारा अंधार आणि मळभभर पसरलेली शांती! मन निवांत झाल्यावरच उठलो.

स्मशानाबाहेर एक कॅफे होती. कॅफेत कोणी नव्हते. कडू कडक कावा कॉफीचे घोट रिजवत बसलो.

झडार हे क्रोएशियातले एक अनोखे शहर आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यावर स्थानिक आर्किटेक्ट निकोला बेसिक याने समुद्र ऑर्गन बसवले आहे. समुद्रकाठाच्या दगडांच्या पायऱ्यांत त्याने धातूच्या पोकळीत नळ्या बसवल्या आहेत. समुद्रलाटा त्यावरून आल्या की मधुर संगीत खाली उमटते. पाश्चात्य संगीताला संगीतातील हार्मनी आवडते. भारतीय संगीताला संगीतातली मेलडी आवडते.

ह्या सी ऑर्गन जवळच सन सॅल्युटेशन नावाचे सूर्यांजली वाहणारे शिल्प आहे. हे देखील आर्किटेक्ट निकोला बेसिकच्या संकल्पनेतून जन्मलेले शिल्प आहे. यात 22 मीटर्स व्यासाच्या वर्तुळात 300 काचा लावलेल्या आहेत. ह्या काचा उगवत्या, मावळत्या आणि मध्यान्हीच्या सूर्याचे उन्ह परावर्तीत करतात.

झाडरचा हा sound and light show श्रावणीय आहे तशा दर्शनीयही आहे. Sound and light show ची कल्पना फ्रान्समध्ये जन्मली. फ्रेंचमध्ये त्याला son et lumiere म्हटले जाते. भारतात आपण sound and show चा करावा तेवढा वापर केला नाही. केवळ खजुराहोत मी sound and light show पाहिला आहे. खजुराहोतल्या कामुक देवळांच्या पार्श्वभूमीवर सरत्या संध्याकाळी अमिताभ बच्चनच्या पहाडी आवाजात हा son et lumiere होतो. दिल्लीतल्या हुमायून कबरीजवळ असा sound and light show होतो पण तो पाहण्याची संधी मला मिळाली नाही.

स्प्लिट हे समुद्राकाठचे शहर तिथल्या प्राचीन समुद्राभिमुख राजवाड्यासाठी प्रसिद्ध आहे. रोमचा सम्राट डायोक्लेशियन याने उतारवयात राहण्यासाठी हा राजवाडा बांधला. त्या राजवाड्यात धर्मगुरू इवान मॅस्ट्रोविकचा पुतळा आहे. धर्मगुरू इवानने चर्चच्या व्यवहारात क्रोएशियन भाषेचा वापर व्हावा यासाठी यशस्वी चळवळ उभारली.

स्प्लिटमधल्या रेस्टाॅरंटना कोनोबा म्हणतात. कोनोबामध्ये आम्ही दुपारी व्हाईट वायनचे घोट घेत ताज्या कोळंबीचा सूप, ग्लील्ड श्रीम्पस् आणि लोबस्टर सॅलडचा स्वाद घेतला. रात्री तळलेला ट्रावट मासा व आंबवलेला सामन मासा ह्यांचे स्वादिष्ट जेवण घेतले.

श्रिम्प हे ताज्या पाण्यात मिळतात. प्रॉन्स हा खाऱ्या पाण्यातला मासा तर लोबस्टर गढूळ, खाऱ्या पाण्यात मिळतो. युरोपमध्ये वर्षाकाठी दर माणशी २० किलो मासे फस्त केले जातात. पोर्तुगालमध्ये हे प्रमाण सर्वाधिक म्हणजे वर्षाकाठी प्रति माणशी ६० किलो आहे. भारताला ७५०० किलोमीटर्सचा समुद्रकिनारा व असंख्य नद्याचे जाळे असूनही भारतात वर्षाकाठी प्रति माणशी केवळ १० किलो माशांचे सेवन केले जाते.

क्रोएशियामध्ये आणि एकूण युरोपमध्ये आईस्क्रीमही मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाते. दर तिसऱ्या माणसाच्या हातात आईस्क्रीम कोन असतो. युरोपमध्ये प्रति वर्षी दर माणशी २० किलो आईस्क्रीम फस्त केले जाते तर भारतात हे प्रमाण ४०० किलोमीटर्स इतके अत्यल्प आहे.

दिब्रोवनिक हे क्रोएशियातले सर्वांगसुंदर शहर आहे. निळ्या समुद्रावरील काळ्या डोंगर उतारावर हे शहर वसले आहे.

दिब्रोवनिक शहराच्या चतुर्दिशांना भक्कम भिंत आहे. ह्या भिंतीच्या आवारात दिब्रोवनिकचे नागरिक राहतात. दिब्रोवनिकची लोकसंख्या केवळ ४0,000 आहे. दिब्रोवनिकला दर दिवशी किमान ४ लाख पर्यटक भेट देतात असे धरले तर स्थानिक व पर्यटक यांचे प्रमाण एकास दहा असे आहे.

दिब्रोवनिकला je ne sais qusi असा अनुभव येतो. म्हणजे I don''t know - what? नेमके काय होते ते कळत नाही. दिब्रोवनिकचा अनुभव indefinable अवर्णनीय मानला जातो. त्याला La Dolce म्हणजे गोड, सुखद अनुभव म्हणतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com