New Lalit Book Gondankhuna : नवीन ललीत पुस्तक - गोंदणखुणा

New Lalit Book Gondankhuna : गोंदणखुणा हा पुस्तकाचा मथळाच लक्षवेधी. यातील काही निबंधांचे मथळेही कवितेच्या ओळीतील शब्द घेऊन वा शब्दखेळ करून दिले आहेत.
New Lalit Book Gondankhuna
New Lalit Book GondankhunaDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

साहित्याच्या पसाऱ्यात ललीत पीक खूप येतं. पण चांगलं, वाचनीय शोधणं हा एक वेगळा स्वाध्याय ठरतो. पुण्याच्या डॉ प्रिया निघोजकर यांचं गोंदणखुणा हे लघुनिबंधांचं पुस्तक हे भावनाट्य, ह्दगत अशा अनेक आयामांची स्मरणी ठरावी.

मानकुराद किंवा हापूस आंबे जसे गोड, मांसल, रसपूर्ण असतात तसे आशयसमृध्द आणि विषय वैविध्याने नटलेल्या ललीत रसांचा हा लघुनिबंध संग्रह. विषयांचे वैविध्य हे वैशिष्ट्य.

पुणेच्या राजहंस प्रकाशनाच्या या पुस्तकाची मांडणी आखीव रेखीव आहे. शब्दांची रचना सुबक आकर्षक फॉंटमध्ये आहे. शेताच्या कुणग्या (दालनं) असतात तसे हे ललीत शेत विषयवार वर्गीकरण करून चार कुणग्यांनी विभागलेलं आहे. प्रेमपूर्ण मधु बाल्य अहा ते, सौंदर्याच्या नव नव लिला, मानवतेचे महन्मंगल गाणे, स्वानंदाच्या ‘त्या’ रानात, असे हे चार विभाग होत.

डॉ प्रिया निघोजकर या सोलापूरला सेवासदन प्रशाला माध्यमिक शाळेत अध्यापन करतात. त्यांची डॉक्टरेट त्र्यं वि सरदेशमुख यांचं साहित्य या विषयावर आहे. त्यांच्या प्रबंधाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे. संशोधनात्मक डूब असलेलं लेखन रूक्ष, शुष्क असू शकतं. कारण त्यात लालित्य व काव्य रस ओतायला वावच नसतो.

तो प्रांतच वेगळा. पण असं वजनदार, सखोल, संशोधनात्मक लेखन केलेल्या प्रियाताईंची ललीत लेखन शैली रसाळ, व भावस्पर्शी आहे हा गुण निरखून सुखद आश्चर्य वाटतं. चहा आणि बरंच काही, हा वरकरणी पाहायला अगदी साधा विषय. आम्ही कोंकणीत च्या मारूया रे चल... असं म्हणतो.

घरी आलेल्याला चहा घे म्हणून आग्रह करतो. त्या अनुषंगाने लेखिका चहाच्या अनौपचारीक बैठकीचं मर्म सांगून जातात. जपानात चहा मेजवानीचा जो थाट (कोंकणीत थातोमातो) असतो, त्या विषयावर एक डोक्युमेंटरी पाहिली होती, त्याची आठवण झाली. स्वामी विवेकानंदाना चहा फार आवडायचा. ही गोष्ट आनंद या बंगाली लेखकाने अज्ञात विवेकानंद (राजहंस प्रकाशन) या पुस्तकात सविस्तरपणे लिहिली आहे. या अनुवादीत पुस्तकाचीही आठवण झाली.

New Lalit Book Gondankhuna
Goa Murder Case: गोव्यात आणखी एक खून, तेरेखोल नदीत आढळला झारखंडच्या कामगाराचा मृतदेह

गोंदणखुणा हा पुस्तकाचा मथळाच लक्षवेधी. यातील काही निबंधांचे मथळेही कवितेच्या ओळीतील शब्द घेऊन वा शब्दखेळ करून दिले आहेत. त्या फुलांच्या गंधकोशी, पराधीन आहे जगती, माझिया दारात चिमण्या आल्या, झाकोळ.... असे अनेक.

शांता शेळके यांचं एक पानी आणि दुर्गा भागवत यांचं दुपानी पुस्तक ललीत तारांगणातली चमचमती नक्षत्रे आहेत. प्रियाजींच्या या पुस्तकात प्रत्येक निबंध हा दोन पानांपेक्षा लहान असल्याने त्याला दीड पानी प्रकृतीचा पोत आहे असे म्हणू शकतो.

हेमकिरण पत्की यांनी आरंभी पुस्तकाविषयी गोंदणखुणा निरखताना ह्या मथळ्याखाली अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली आहे. हाच एक रसमय निबंध ठरावा.

सकाळचा अभ्यास या निबंधाला कथाबीजाचं कोंदण आहे. कृष्णाबाई या वेडसर बाईच्या जीवनाची फरफट, अगतिकता, असहायता, कमालीचं दु:ख शब्दांमधून स्रवलं आणि काळीज पिळवटून गेलं. आईला विचारल्यावर तिनं कृष्णाबाईच्या वेडाचं कारण सांगितलं, जे भयाण होतं, असं लेखिका लिहिते.

आम्हा मुलांमध्ये कृष्णाबाई तिची लेकरं पाहत असावी हे सुंदर वाक्य कोंकणी कथाकार गजानन जोग यांच्या झबाझब या कथेतल्या पराकोटीच्या वेदनेची आठवण करून गेलं. पाषाणाला सुध्दा पाझर फुटेल अशा कृष्णाबाईच्या ह्द्य शोकात्मिकेवर कल्पक प्रतिभावान लेखक, कलाकार टेलिफिल्म सुध्दा निर्मू शकतील.

निसर्गसखा या निबंधात कन्नड महाकवी द रा बेंद्रे यांनी बेळगावच्या साहित्य संमेलनात उडणाऱ्या पक्ष्यावर एक गीत गायलं होतं असा उल्लेख आलेला आहे. ते वाचल्यावर मला आठवण झाली ती ज्ञानपीठकार कन्नड साहित्यिक यू आर अनंतमूर्ती यांची.

विलियम ब्लेक आणि कवी बेंद्रे यांच्या कवितेतील गेयता ही छुमछुमणाऱ्या पैंजणासारखी कानात गुंजन करणारी आहे असे लंडनमध्ये अभ्यास करताना दिसून आले असं त्यांनी लिहिलं आहे. बेंद्रेंचा उल्लेख विहग पोचू शकणार नाही अशी एक उंची आख्ख्या निबंधाला देत आहे.

झाडांविषयी...या दोन पानी निबंधाचा शेवट पहा – “पाडगांवकरांच्या एका कवितेतली अर्थपूर्ण ओळ आहे... ज्यांची ह्दयं झाडाची, त्यांनाच फक्त फुलं येतात... या ओळीतच झाडाच्या असण्याचं आणि आपल्याही जगण्याचं पृथ्वीमोल सामावलेलं आहे.” कवडशातून स्वच्छ प्रकाशाची तिरीप यावी, तसं अचानक मला खलील जिब्रानचं एक कवन आठवलं – झाडं म्हणजे पृथ्वीने आकाशावर लिहिलेल्या कविता.

पुलंकीत स्वप्न, या लेखात मात्र किंचित अपुरेपण जाणवलं. कारण दीड पानाच्या मापाच्या साच्यात हा विषय मावणंच कठीण. मुळात लेखिकेनं वृत्तपत्रासाठी स्तंभलेखन केलेले हे लेख असल्याने अशा काही लेखांना मर्यादा पडल्याचं जाणवतं.

तथापि, ललीत लेखन, जगाकडे व्यापक आणि समग्र दृष्टीने पाहण्यास मदत करतं. प्रियाताईंचं बालपण ग्रामीण भागात गेलं. नंतर त्यांनी पुणे शहर कवटाळलं, स्विकार केलं. गड्या आमुचा गाव बरा, किंवा शहरच बरं असला कसलाही भेदभाव त्यांच्या नजरेत नाही.

जे जे चांगलं, मंगल आहे तो क्षण कण मधाच्या थेंबासारखा चाटण्याच्या अनुभवावर त्यांचा भर आहे. लहान जीव असलेल्या ह्या ललीत लघुनिबंधातील निसर्ग दर्शन, संस्कृतीची मनावर उमटणारी स्पंदनं, साहित्य, विचार या सर्वातून खुलून उठून दिसतं ते त्यांचं जीवन उत्सवांत रममाण झालेलं विनम्र, लोभस व्यक्तिमत्व.

ललित गद्यात लेखक आपले स्वतःचे अनुभव, विचार, भावना आणि निरीक्षणं व्यक्त करतो. विषय कुठलाही असेना का. जसे की निसर्ग वर्णन, व्यक्तिचित्रे, प्रवासवर्णन, आठवणी, संस्मरण, समाजिक विषय, कलाकृतींचे विश्लेषण इत्यादी.

प्रियाताईंनी आपल्या ललित गद्यात भावभावनांचे विभ्रम व अनुभवांचे हिंदोळे जिवंतपणे रसरशीतपणे व्यक्त केले आहेत. जीवनावर जितक्या उत्कटतेने, उत्स्फूर्ततेने, उदंड, विपुल, दिव्य प्रेम कराल तितका ललीत लेखनाचा प्रभाव व परीणाम आपल्या मनात ह्दयात कायम खोलवर खुणा करून जातो. गोंदणखुणा सारखा!

आज जागतिक पुस्‍तकदिन. त्‍यानिमित्त ‘गोंदणखुणा’ या नव्‍या कोऱ्या करकरीत पुस्‍तकाचा घेतलेला अल्‍पाक्षरी परंतु प्रत्‍ययकारी आढावा...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com