गुण गाईन आवडी : नरकासुराचे स्तोम वाढवणारे अज्ञानी कोण?

हल्लीच गोव्यातील एका सत्ताधारी मंत्र्याने गोव्यात नरकासुराचे स्तोम वाढविण्यास विरोधी पक्षाला जबाबदार धरल्याचे वृत्त वर्तमानपत्रांत वाचून हसू आले.
Narkasur In Goa
Narkasur In Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

सखाराम शेणवी बोरकर

Narkasur In Goa: हल्लीच गोव्यातील एका सत्ताधारी मंत्र्याने गोव्यात नरकासुराचे स्तोम वाढविण्यास विरोधी पक्षाला जबाबदार धरल्याचे वृत्त वर्तमानपत्रांत वाचून हसू आले. खरे तर याला गोव्यातील सर्वच पक्ष आणि राजकारणावर डोळा ठेवून असणारे तथाकथित समाजसेवक कारणीभूत आहेत.

काही कवड्या, लाचाऱ्यांसमोर फेकून तरुणाईचे हात बिनकामाच्या व्यापात गुंतवून, गुंगवून त्यांना वास्तवापासून दूर ठेवण्याचा डाव कैक वर्षे म्हणजे गोवा मुक्त झाल्यापासून चालू आहे. दुर्दैवाने युवक त्याला बळी पडत आहेत.

गोव्यातील हिंदूंचे प्रमुख सण दोनच - गणेश चतुर्थी आणि शिमगा. गडगंज प्रमाणात साजरे होणारे. यात कुठेतरी अंग चोरून दिवाळी उभी आहे. दिवाळी जशी महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात साजरी होते, तो जोश आणि चैतन्य गोव्यात दिवाळीला दिसत नाही.

दिवाळी म्हणजे प्रकाश पर्व, वाइटाने चांगल्यावर मिळविलेला विजय, दिवाळीच्या मागे कैक आख्यायिका प्रचलित आहेत. नरकासुर नावाचा एक राक्षस जनतेला त्रास द्यायचा, त्याचा श्रीकृष्णाने वध केला.

या विजयाच्या जल्लोषासाठी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी केली. दुसरी आख्यायिका म्हणजे श्रीविष्णूने वामन अवतार घेऊन बळी राजाला पाताळात पाठविले तो दिवस. तिसरी आख्यायिका म्हणजे रावणाचा वध करून श्रीराम चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले, तो दिवस म्हणजे दिवाळी. ही आख्यायिका उत्तर भारतात प्रसिद्ध आहे.

Narkasur In Goa
Bhandari Community Goa: कोणता झेंडा घेऊ हाती? भंडारी समाज

गोव्यात दिवाळी आश्विन वद्य चतुर्दशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत साजरी केली जाते. चतुर्दशी अथवा धाकटी दिवाळी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे सण ओळीने साजरे केले जातात.

लक्ष्मीपूजन हा उत्सव पूर्वी काही दुकानदार आणि सोनारांच्या आस्थापनात साजरा केला जात असे. तसेच गोव्यातल्या काही कुटुंबांत लक्ष्मीपूजन व्हायचे. आता त्याचा आकडा वाढला आहे. भाऊबीज सुद्धा पूर्वी गोव्यात फार प्रसिद्ध नव्हती. त्याचे लोण आज घरोघरी पोहोचले आहे.

गोव्यात जास्त उत्साहाने साजरी होत होती ती ‘नरकचतुर्दशी’ अथवा ‘धाकटी दिवाळी’ आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजे ‘गोरवां पाडवो’ आणि ‘धेंडलो’.

नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी घरातल्या स्त्रिया पाणी भरण्याची सर्व भांडी घासून पुसून स्वच्छ करायच्या आणि त्यांना चंदनाचे आणि चुन्याचे टिळे लावायच्या आणि मग या सर्व भांड्यांना झेंडू, कारीट आणि आंब्याच्या पानाच्या माळा घालायच्या.

नरकचतुर्दशीला पहाटे उठून तरुण मुले नरकासुराची एक लहानशीच प्रतिमा नाचवायचे. एक जण कृष्णाची वेशभूषा करायचा आणि नरकासुर-कृष्ण युद्धाचा खेळ व्हायचा.

जमलेले लोक आनंदाने नाचायचे आणि मग कृष्ण नरकासुराचा वध करायचा. नंतर नरकासुराच्या प्रतिमेला अग्नी देऊन सर्व घरी परतायचे. मग उटणे लावून आंघोळ व्हायची. दारात पणत्या पेटवायच्या, आकाशकंदील लावायचे.

तिकडे स्वयंपाकघरात पोह्यांपासून वेगवेगळे पदार्थ करण्यात गृहिणी मग्न असायच्या. वेगवेगळे पदार्थ शिजायचे.

नारळाच्या दुधातील पोहे, दूधपोहे, बटाटपोहे, ताकातले पोहे आणि सोबतीला आंबाड्यांची चटणी, चण्याची उसळी आणि मंयडोळ्या केळ्यांचा हलवा आदी.

घरातील सर्व मंडळी स्नान करून नवीन कपडे परिधान करून देवाला नमस्कार करायची. घरच्या सुवासिनी, पुरुष आणि मुलांना राट-दिवा दाखवून ओवाळायची.

पायाच्या अंगठ्याने कारीट फोडायचे आणि देवाला आणि घरातल्या सर्व मोठ्या मंडळींना नमस्कार करून पोह्यांवर ताव मारायचा.

शेजाऱ्यांच्या आणि मित्रांच्या घरी जाऊन पोहे खायची पद्धत होती. ही झाली दिवाळीची पूर्वीची गोव्यातील पारंपरिक प्रथा, अजूनही काही ठिकाणी ही प्रथा गोव्यात हिंदू कुटुंबांत सुरू आहे.

पूर्वी मडगाव, पणजी आणि म्हापसा या शहरात सार्वजनिक स्वरूपात नरकासुर वधाचे कार्यक्रम होत असत. गोवा मुक्तीनंतर कार्निव्हल आणि शिमगा यांच्या सरकारी पातळीवर स्पर्धा घेण्याचे लोण गोव्यात पसरले.

पर्यटनाला प्रोत्साहन देण्याकरिता अशी पोकळ सबब देण्यात आली. दुर्दैवाने कुणाच्या तरी ‘सुपीक’ डोक्यातून नरकासुराच्या स्पर्धा घेण्याचा विचार आला. या स्पर्धेला ‘नरकासुर वधाची स्पर्धा’, ‘श्रीकृष्णाची स्पर्धा’ असे न म्हणता ‘नरकासुराची स्पर्धा’ असे म्हटले जाते.

मोठमोठ्या बक्षिसांची खैरात सुरू झाली. ती देण्यासाठी राजकारणी आणि तथाकथित समाजसेवक एका पायावर तयार झाले. घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यात येऊ लागली.

काही जणांचा ही नरकासुर स्पर्धा म्हणजे पैसे कमविण्याचा जोडधंदाच झाला. सध्या नरकासुर स्पर्धेचे प्रस्थ व स्तोम खूपच माजले आहे. आज आमच्या सर्व सणांचे आणि उत्सवांचे व्यापारीकरण झाले आहे.

आता दिवाळी म्हटली की, सर्वांत आधी दिसतो तो नरकासुर. दसरा संपताच तरुण मंडळी आणि मुले नरकासुराच्या प्रतिमा बनविण्यात दंग होतात. प्रतिमा जितकी मोठी आणि भयानक तितके त्याला बक्षीस मिळण्याची शक्यता जास्त.

रात्रभर नरकासुराची प्रतिमा नाचवत धिंगाणा घालतात. मग घरी आल्यावर ते अभ्यंगस्नान, ओवाळणी, पोहे खाणे कुठे? रात्रभर जागरण करून आलेला तरुण दिवसभर झोपतो आणि त्यातच त्याची दिवाळी उरकते.

नरकासुर हे असत्याचे प्रतीक आणि श्रीकृष्ण हे सत्याचे, हे मूळ तत्त्वच आम्ही विसरलो आहोत. काळोखाचे अज्ञानाचे प्रतीक असलेला नरकासुर लोकांना भावतो, ही मुळात विसंगती व विकृती आहे.

अंधाराची पूजा, अज्ञानाची अर्चना, नरकारासुराचे उदात्तीकरण हा पतनाच्या मार्गाचा प्रवास होय! दिवाळी आमच्या जीवनात प्रकाश घेऊन येते. महत्त्व कोणाला द्यायचे? श्रीकृष्णाला की नरकासुराला? या दिवाळीला तरी निष्कर्षाप्रति येऊया.

Narkasur In Goa
मर्मवेध : कसोटी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com