Typewriting : टंकलेखनातील लयकारी व संगीत

Typewriting त्यात कैक स्मरणरंजनात्मक स्मृती दडलेल्या होत्या.
Typewriting
TypewritingDainik Gomantak
Published on
Updated on

मुकेश थळी

इंग्रजी २६ अक्षरं टाईप करायची जगभर एक ठराविक शास्त्रीय पध्दत आहे. दहाही बोटांचा वापर करून वेगवान गतीत टंकलेखन त्यामुळे शक्य असतं.

मित्र दुबईवरून आला होता. त्यानं मला नेहमीप्रमाणे एक गिफ्ट बॉक्स दिलं. मी ते उघडलं. आत एक इवलासा टाईपरायटर होता. खेळणेवजा. वा! त्याची एक कळ (बटण) दाबली, तर अरे बाप रे.... मंजुळ संगीत वाजायला लागलं. गंमत वाटली. मित्राचं कौतुक वाटलं. मला काय आवडतं व काय आवडत होतं याची आठवण त्यानं गाठीला बांधून ठेवली होती.

माझ्यासाठी हा टाईपरायटर हे मुलांचं खेळणं नव्हतं. त्यात कैक स्मरणरंजनात्मक स्मृती दडलेल्या होत्या. गोड जुन्याही स्मृती जपल्या पाहिजेत, ही मित्राची संकेतमय कृती मला आवडली. ते संगीतमय खेळणं माझ्यासाठी खोल सिम्बॉलीझम असलेली एक कविता ठरली.

आपण सहज घेऊन जाऊ शकतो त्याला इंग्रजी शब्द - पोर्टेबल. पोर्टेबल टाईपरायटर सुंदर दिसायचे. ऑफिसमध्ये भलेमोठे टाईपरायटर असायचे. उचलायला दम लागायचा. सिलिंडरचं वजन आहे की काय असं वाटायचं. रेमिंग्टन या कंपनीचा टाईपरायटर प्रसिध्द होता.

टाईपरायटर हा विषय अकरावी एसएससीच्या अभ्यासक्रमात होता. बोर्ड परीक्षेत टंकलेखन विषय घेण्याची मुभा होती. अऩेक जण निवडत होते. टाईपिंग प्रशिक्षण संस्था होत्या. आजच्या मुलांना या गोष्टी आश्चर्यकारकच वाटतील.

टाईपिंग रिबिनं, मेकानिक, सर्विसिंग करणारे तंत्रज्ञ, कार्बन पेपर असे अनेक व्यवसाय त्यावर चालत. टाईपरायटरला एक वर्तुळाकार खोडरबर लावून ठेवत. टाईपिस्ट हा ऑफिसातील एक हुद्दा होता.

काही टाईपिस्ट इतक्या जलद गतीने टंकलेखन करत की ती द्रूत गती पाहून अचंबा वाटे. पणजीत ज्युलीयस नांवाचा एक टाईपिस्ट होता. वकील बोलत व हा पठ्ठा फक्त अप्पा जळगांवकर पेटी वाजवत तसा झुळूझुळू विजेच्या प्रवाहासारखा टाईप करत जायचा.

शंभर टक्के अचूक. दहाही बोटांचा वापर करून हे इंग्रजी टंकलेखन पाहताना गंमत वाटे, आश्चर्य वाटे. शहरात पासपोर्ट, आरटीओ व इतर काही खात्यांबाहेर टाईपरायटर घेऊन काही लोक बसत. अर्ज वगैरे टाईप करून देत. हाही व्यवसाय मस्त चाले.

कालांतराने हळू हळू देवनागरी टाईपरायटरचा प्रवेश झाला. हे यंत्र मोठं होतं. कारण अक्षरं जास्त. आकार, उकार, ईकार, अनुस्वार वगैरे. इंग्रजी की बोर्ड फक्त २६ अक्षरात समाविष्ट होता. देवनागरी टाईपिस्ट औषधाला मिळत नसत.

कुणाला काही मजकूर टंकलिखित करून घ्यायचाच असेल तर त्यांना शोधत जावे लागे. नंतर ते भाव खात. या इतक्या फायल्स पडून आहेत, ते काम आहे, हा प्रबंध आहे.

दुबईहून येणारे गोवेकर येताना सुंदर पोर्टेबल टाईपरायटर आणत. माझ्या एका वर्गमित्राच्या घरी असा क्रिम रंगाचा टाईपरायटर होता. त्याच्या घरी गेल्यावर मला तो उघडून टाईप करावंसं वाटे.

इंग्रजी २६ अक्षरं टाईप करायची जगभर एक ठराविक शास्त्रीय पध्दत आहे. दहाही बोटांचा वापर करून वेगवान गतीत टंकलेखन त्यामुळे शक्य असतं. एसएससीची परीक्षा दिल्यावर दोन महिने बेकारच होतो.

खेळ, वाचन असं चालायचं. माई म्हणाली, तू टाईपिंग संस्थेमध्ये रूजू हो आणि ती कला शिकून घे. मी बरेच आढेवेढे घेतले. अग, मी काय क्लार्क थोडाच होणार... टाईपिस्ट... कसलीही कला कायम उपयोगी येते. माईने इशारा दिला. माईच्या आज्ञेचे पालन करून मी मंगेशीला एका संस्थेत जायला लागलो. आम्हाला दुपारची वेळ होती.

एक तास. त्या वेळी तिथे मालक कम शिक्षक नसायचा. आज ही अक्षरे टाईप करा असं सांगून तो जायचा. शिक्षक नसल्याने मी व माझा मित्र थट्टामस्करी मौजमजा विनोद करत टंकलेखन करत. मी दोनच महिने दहा बोटांचा वापर करून टाईप करायची ती कला शिकलो.

कालांतराने संगणक अवतरले. संगणकाला जोडलेला की बोर्ड म्हणजे टाईपरायटर सारखीच अक्षरे. टाईपिंग शिकल्याने मी इंग्रजी जबरदस्त वेगाने कंपोज करू लागलो. मित्रांना आश्चर्यच वाटू लागलं. हळू हळू देवनागरी आलं.

दहाही बोटांनी कंपोजिंग कला आत्मसात केल्याने ती देवनागरी अक्षरेही मी वेगवान पध्दतीने टाईप करू शकलो. संगणकमध्ये अक्षर चुकलं तर क्षणात सुधारू शकतो. वाक्य फिरवू शकतो. वर खाली करू शकतो. त्याच मजकूरावर संपादन करणं शक्य असतं.

पणजीत आम्ही कॉलेजात शिकत असताना, हाय कोर्ट नव्हता. ज्युडिशियल कमिशनर्स कोर्ट हा गोव्यातील उच्च कोर्ट होता. मी माझ्या काकांसोबत अधूनमधून जाऊन कोर्टांत बसे. युक्तीवाद कसे चालतात ते बघण्यात एक खुमारी असे.

ते ऐकल्यावर न्यायाधीश निवाडा डिक्टेट करत. स्टेनोग्राफर लघुलिपित ते लिहून घेत. नंतर दुसऱ्या कक्षात कितीतरी स्टेनो ते इतक्या जोरदारपणे लयीत वेगात टाईप करत, की अनेक संवादिनी वादकांची झुळूझुळू जुगलबंदी चालू आहे असं वाटे. खडखड खडखड असा नुसता नादांचा अनुनाद कॉरीडोरमध्ये निनादे. डोळे मिटून स्थिरचित्त होऊन ती लयकारी ऐकाविशी वाटे.

मी गोवा विद्यापीठात कोंकणी विश्वकोश विभागात संशोधक सहाय्यक म्हणून होतो. ज्ञानकोशीय नोंदी आम्ही हाताने लिहून काढत. नंतर मजकूर प्रेसमध्ये जात. संगणक नुकतेच लॅंडींग करू लागले होते. सुळसुळाट नव्हता.

प्रमुख संपादक बहुभाषाकोविद कवी डॉ मनोहरराय सरदेसाय. त्यांच्याकडे एक सुंदर पोर्टेबल टाईपरायटर होता. त्यांनी फ्रान्सवरून आणला असावा. सरांना त्याच्याविषयी व एकंदर टाईपिंग प्रक्रियेविषयी प्रेम होतं. एकदा त्यांच्या घरी गेलो होतो. बोलता बोलता ते म्हणाले – अरे, माझा टाईपरायटर नादुरूस्त झाला आहे. मेकानिक कुठे तरी मिळाला तर पाठव. ओके सर, मी म्हणालो.

मेरशीहून एक मेकानिक वकीलांकडे वगैरे पणजीत यायचा. वयस्कर. कायम संतोषी. ओ अक्षर रिबनची शाई भरल्यावर काळाच ठिपका कसा यायचा. तो ब्रश घेऊन स्वच्छ करायचा. मधला रोल लाटणी सारखा काढून स्वच्छ करायचा. शोधूनही तो मेकानिक भेटला नाही.

या आठवणी दुबईहून आलेल्या त्या इवल्याशा टाईपरायटरने चित्रफितीसारख्या मनाच्या पडद्यावर सरकत ठेवल्या. टाईपरायटरचं ते खेळणं करतलावर हळूवार ठेवलं. चुकून करंगळी बटणाला लागली मात्र... संगीत वाजू लागलं. इवलासा काळा रोल धडधडत पुढे जाऊ लागला.

टंक रागाच्या सोनेरी स्मृतींचे इतिहासजमा झालेले टकक टक्क टक टक... हे तराण्यासारखे सूर कान गोड करू लागले. डोळे अलगद मिटले गेले.

दुसऱ्या कक्षात कितीतरी स्टेनो ते इतक्या जोरदारपणे लयीत वेगात टाईप करत, की अनेक संवादिनी वादकांची झुळूझुळू जुगलबंदी चालू आहे असं वाटे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com