Lord krishna कृष्ण

भारतीय संस्कृतीने कृष्णाला सात्विकतेचे श्र्वेतवस्त्र नेसवले नाही. कृष्णाचे वस्त्र राजस आहे. रंगीत आहे.
Lord krishna
Lord krishna Dainik Gomantak

दत्ता दामोदर नायक

उत्तर व दक्षिण भारताच्या तुलनेत पश्चिम व पूर्व भारतात कृष्णाला अधिक आराध्य मानले आहे.

कृष्णाला कोणत्या मापाने मोजायचे? कृष्ण कुठल्याच चौकटीत बसत नाही. कृष्ण सगळ्या चौकटीत मोडतो. कृष्ण मर्यादांच्या सीमा उल्लंघताना मोठ्या अक्कलहुशारीने मर्यादांचे वर्तुळच वाढवतो आणि आपण त्या वर्तुळाच्या केंद्रबिंदूत जाऊन बसतो.

आपण रामासारखा मर्यादापुरूषोत्तम नाही याचे कृष्णाला भान आहे. कृष्णाने आपल्या जीवनात साधनशुचिता मानली नाही. कृष्णाने नेहमी साध्य विवेक पाहिला.

आजही कृष्णनीतीचाच अतिरेकी अवलंब केल्यामुळे भारतीय राजकारणाची शोकांतिका झालेली आहे.

कृष्णाची कृष्णनीती काळी असली तरी कृष्णाचे एकूण व्यक्तिमत्त्व एकाच रंगात रंगवता येणार नाही. कृष्ण बहुरंगी आहे. बहुआयामी आहे. कृष्णाचे एकूण व्यक्तिमत्व मोठे लोभस व विलोभनीय आहे. कृष्णाचा स्वभाव लोहचुंबकी आहे. लिंग, वय, जात, पात यांच्या भिंती मोडून कृष्ण दुसऱ्याशी मैत्री जोडतो. या मैत्रीच्या नात्याला कृष्ण आमरण जपतो. जागतो.

आकर्षण, आसक्ती, प्रीती, शृंगार, अभिसार, सख्य, स्नेह, विरह, त्याग, अनासक्ती आणि विरक्ती ह्या स्त्रीपुरूष संबंधांच्या नातेचक्रावर कृष्ण बसला आहे. ज्या ज्या स्त्रियांच्या जीवनात कृष्ण पुत्र, बंधु, मित्र, प्रियकर, पती, सखा म्हणून आला आहे त्या सर्व स्त्रियांनी कृष्णावर अमाप प्रेम केले आहे.

भारतीय संस्कृतीने कृष्णाला सात्विकतेचे श्र्वेतवस्त्र नेसवले नाही. कृष्णाचे वस्त्र राजस आहे. रंगीत आहे. प्रकृतीपुरूषाच्या मीलनाची खोटारडी आध्यात्मिक भाषा बोलणाऱ्या समाजाच्या समूहमनात वखवखलेल्या कामभावनेला कृष्ण वाट करून देतो. कृष्णाच्या रूपावर संस्कृतीने अतृप्त भावनांचे आरोपण आणि विरेचन केले आहे. राधेची मिथक कथा त्यातूनच जन्मलेली आहे.

कृष्णाने काहीच नाकारले नाही. लोकांनी जे जे कृष्णाला चिकटवले ते ते ''इति मम'' म्हणून कृष्णाने स्वीकारले.

मथुरेच्या, मगधाच्या, प्राग् ज्योतिषपूरच्या राजांचा पराभव करून यादव, पांचाल आणि कुरूवंशीय पांडव यांचे राजकीय स्वरूप घडवून आणणाऱ्या कृष्णाचे राजकारण पांडवांच्या राजसूय यज्ञापर्यंत शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे वृद्धिंगत होत राहिले. त्यानंतर मात्र कृष्णाच्या राजकारणाचा आलेख घसरत गेला. जीवनाच्या शेवटी कौरव - पांडव, पांचाल आणि यादवांचा कुलक्षय झाल्याचे कृष्णाला पहावे लागले.

पण कृष्णाने कधी आपल्या पुण्याची मोजणी केली नाही. कधी त्याला त्याच्या पापाची टोचणी झाली.

लोकसंस्कृतीने देवपदास पोचवलेल्या कृष्णाचे पाय मातीचे होते.

कृष्णाला लोकांनी देव मानला. स्वतः कृष्णानेही आपण देव असल्याचे सांगितले. पण आपल्या अंतर्मनात आपण मनुष्य असल्याची जाणीव कृष्णाला सतत होती.

सत्य आणि असत्य, शिव आणि अशिव, सुंदर आणि असुंदर यांचे संमिश्रण असलेला कृष्ण मानवी स्वभावाचा कॅलिडोस्कोप होता.

कृष्ण आपल्याला आवडतो असे म्हणता येणार नाही. कृष्ण आपल्याला नावडतो असेही म्हणता येणार नाही.

कृष्ण आहे तसा समजून घेणे आणि त्यातून बोध घेणे एवढेच आपल्या हाती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com