लोकशाही जिंदाबाद

त्यांची वृद्ध आणि आजारी आई व बहीण यांच्याबद्दलचा त्यांचा उत्स्फूर्त स्नेहही अनेकांच्या हृदयाला भिडला. ट्रेडमार्क बनलेला पांढरा टी-शर्ट घालणार्‍या या माणसाने ‘पप्पू कॅन डान्स साला!’ हे सिद्ध केले.
goa
goaDainik Gomantak

डॉ. मनोज सुमती बोरकर

इथे प्रारंभीच एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे की, मी कुणी राजकीय विश्लेषक किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचारक नाही! मी मांडत असलेला विमर्श (नॅरेटिव्ह) माझ्या आकलनावर आणि अनुभवांवर आधारित आहे. निवडणुकीचे निकाल लागले आहेत; ज्यांनी निवडणूक लढवली आणि मतदान केले त्यांच्यासाठी हा धक्का आणि आश्चर्य यांचे अनोखे मिश्रण आहे.

त्यांनी मतदान पंडितांनी व्यक्त केलेले सर्व एक्झिट पोलचे अंदाज आणि गणिते चुकीची ठरवली आहेत. निवडणुका व मतदारांच्या निवडणूकविषयक वर्तनाचे काही अभ्यासक (सेफोलॉजिस्ट) वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होणाऱ्या चर्चेत उघड उघड रडताना दिसले.

सत्ताधारी कारभाराचा ‘चारसौ पार’बद्दलचा अतिआत्मविश्वास डळमळीत झाला आहे आणि आता त्यांना चंद्राबाबू आणि नितीशबाबूंनी केलेली कुचंबणा सहन करावी लागणार आहे. विजयाचे भाषण एकसुरी होते आणि चेहऱ्यावर निराशा मोठ्या प्रमाणात स्पष्ट दिसत होती. अर्थात, कार्यकर्त्यांचे आणि पक्षाच्या निष्ठावंतांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी तेथे धाडसी असल्याचे दाखवणे आवश्यक होते.

२००९च्या पराभवानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांना ‘न भूतो न भविष्यति’ असे यश प्राप्त झाले आहे. राहुल गांधी यांना देशाची नाडी ओळखता येत नाही, ते स्वत:च्या घराण्यातील ‘शहजादे’ आहेत, ‘पप्पू’ आहे व हा स्वपक्षातील राजकीय संकटाच्या वेळी विदेशात जाणारा एक अर्धवेळ राजकारणी आहे, आरोप करणाऱ्यांची दातखीळ आता रायबरेली आणि वायनाडमधील दोन्ही जागा भरघोस फरकाने जिंकल्यामुळे बसली आहे.

भाजपच्या सायबर टीमने या राजकीय वृत्तीच्या माणसातील विक्षिप्तपणाच्या आणि मूर्खपणाच्या छटा दाखवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. मार्च २०२३मध्ये लोकसभा सदस्य म्हणून त्यांची अपात्रता, पक्षाची बँक खाती गोठवणे, यंत्रणांचा वापर करून धमकावणे यामुळे ते विचलित झाले नाहीत. त्यांनी आपल्या ‘भारत जोडो’ आणि ‘न्याय यात्रां’च्या माध्यमातून देशभरातील जनतेशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला; तोही त्यांच्या जिवाला धोका असताना. ते सामान्य लोकांमध्ये त्यांना मिठी मारत, हस्तांदोलन करत, चहाचे घोट घेत आणि बिनधास्त हसत मोकळेपणाने मिसळले. प्रमाणात आयोजित केले गेलेले त्यांचे रोड शो अवाजवी नव्हते.

ज्यांना ते भेटू इच्छित होते त्यांच्यामध्ये आणि स्वत:मध्ये त्यांनी कोणतेही अंतर ठेवले नाही. त्यांची वृद्ध आणि आजारी आई व बहीण प्रियांका यांच्याबद्दलचा त्यांचा उत्स्फूर्त स्नेहही अनेकांच्या हृदयाला भिडला. अजिंक्यतेचा दावा करणाऱ्या संघटित आस्थापनाशी लढण्याचा तो कोवळा बाणा, पितृछत्र हरवल्याने राजकीय अनाथ असण्याची त्यांची अमिट ओळख आणि आनंददायी व प्रेमळ वागणूक सर्वसामान्यांच्या मनाला भिडली. ट्रेडमार्क बनलेला पांढरा टी-शर्ट घालणाऱ्या या माणसाने ‘पप्पू कॅन डान्स साला!’ हे सिद्ध केले.

संपूर्ण एककल्ली सत्तेची बढाई विरुद्ध मतमतांतराच्या हक्कासाठी लढाई, म्हणजे ही निवडणूक होती. बौद्धिक स्वातंत्र्याचे विखुरलेले, कमकुवत आवाज आणि एकसंध हुकूमशाही राजवटीच्या दरम्यान हे युद्ध होते.

दीर्घकालीन दृष्टिकोनातून विकास, अंतर्गत सुरक्षा, आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि धोरणात्मक सुधारणा या क्षेत्रांत निश्चितच उल्लेखनीय प्रगती करणाऱ्या आणि जागतिक दृष्टिकोनातून आपली भारताची प्रतिमा उंचावणाऱ्या दशकभराच्या सत्ताधारी कारभाराचा अनुभव या देशाने घेतला. परंतु त्याचबरोबर सार्वजनिक सल्लामसलत, प्रशासकीय सुधारणांमधील पारदर्शकता, पर्यावरणाचे रक्षण, विरोधकांची गळचेपी आणि सर्वांत वाईट गोष्ट म्हणजे विचारवंतांना बाजूला सारणे हेही देशाने अनुभवले. एका नेत्याच्या लोकप्रियतेचा प्रचंड अहंकार, त्यांच्या सत्ताधारी अधिकारापेक्षा मोठ्याने गर्जना करत होता; लोकशाहीतील विरोध जवळजवळ पुसून टाकण्याची धमकी देत होता.

गळ्यात पट्टे घातलेल्या नोकरशाहीने आणि प्रशासकीय यंत्रणांनी त्यांच्या बॉसकडून आलेल्या आदेशांचे पालन इमानेइतबारे केले.

निवडणुकीच्या उद्देशाने धार्मिक राष्ट्रवादाच्या वेशात हिंदू भावना एकवटल्या गेल्या. अयोध्या हा सरकारने धार्मिक बहुसंख्याकांच्या बाजूने झुकण्याचा पुरावा होता. ३१ मे २०२४ रोजी अयोध्येला भेट दिल्यावर मला जाणवले की शंकराचार्यांचा विरोध असूनही आणि काम पूर्ण होण्याच्या जवळपास कुठेही नसतानाही, निवडणुकीत लाभ मिळावा म्हणून भाविकांना संतुष्ट करण्यासाठी भव्य उद्घाटन आयोजित केले गेले होते.

पण धक्कादायक म्हणजे ‘बुलडोझर बाबा’ आणि पक्षासाठी प्रतिष्ठेची असलेली अयोध्येची जागा ५४,००० मतांच्या स्पष्ट फरकाने गमावणे हा राजकीय आघात आणि पेच यांचा संगम आहे. याचा भाजपला दीर्घकाळ सामना करावा लागेल. उपजीविकेची हमी, निवारा व अन्नसुरक्षा या बाबी धार्मिक विश्वास आणि राजकीय निष्ठा यांच्या आधी येतात, असा स्पष्ट संदेश यातून सत्ताधारी ‘चाणक्यां’ना दिला आहे.

नवीन सरकारला आपल्या गर्विष्ठ पूर्ववर्तींचीच आवृत्ती बनणे परवडणारे नाही, त्याला आपल्या मित्रपक्षांना सामावून घ्यावे लागेल आणि त्यांच्या अजेंड्याला पाठिंबा द्यावा लागेल. बहुतेक सर्व सभागृहात यावेळी बधिर करणारी गर्जना आणि विरोधाचा प्रतिध्वनी असेल, ज्याला दाबता येणार नाही. पंतप्रधान त्यांच्या सलगच्या दोन कार्यकाळांत मिळालेल्या राजकीय विवेकबुद्धीने संतुलित कृती करतील, नोकरशाहीला सामान्य नागरिकांचा आदर ठेवण्याविषयी व तितकेच संवेदनशील होण्यास बजावतील, अशी आशा करूया.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com