लोकसभा निवडणूकांचे भूसत्य

भाजपाचा प्रचार जोरदार आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी, महिलांची उपस्थिती, जोशपूर्ण जमाव आणि प्रचारातील उत्स्फूर्तता पाहिली तर गोव्यातील दोन्ही जागा ते सहज खिशात टाकतील, अशीच परिस्थिती आहे. परंतु राजकीय निरीक्षक ग्राउंड रिॲलिटीचा उल्लेख करतात. काय असते हे भूसत्य? ते केवळ आभासी तर नव्हे? हे भूसत्य स्वप्ने भुईसपाट करू शकते का?
Loksabha
Loksabha Dainik Gomatnak

राजू नायक

आम्ही जेथे-जेथे जातो, तेथे लोक आम्हाला सांगतात, ग्राउंड रिॲलिटी वेगळी आहे. म्हणजे बाहेर दिसते, तेच सत्य आहे असे वाटून घेऊ नका.

सध्या भारतीय राजकारणात या ‘जमीन परिस्थिती’ला महत्त्व आलेय. लोक बोलत नाहीत, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत नाहीत. जाहीरपणे व्यक्त होत नाहीत. याचे कारण लोकांना भीती वाटते. आपणाविरोधात डुख धरला जाईल, आपणाची सतावणूक केली जाईल. प्रस्थापितांना तर कारवाई होण्याची अधिक भीती आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रातीलच नव्हे तर कार्यकर्तेही फारसे काही बोलत नाहीत.

कार्यकर्तेच कशाला, काँग्रेस पक्षातील अनेकांची दातखिळी बसली आहे. एक ज्येष्ठ नेता ज्या आक्रमकपणे बोलायला हवा, तसे बोलत नाही. प्रचारसभांमध्ये लांबची लांब भाषणे करतो, त्यात नेमकेपणा नाही. घटक पक्षातील काहीजण मात्र कठोर बोलतात. विशेषतः आम आदमी पक्षातील नेत्यांना सरकारविरोधात विशेष राग आहे, त्यांचे प्रमुख नेते तुरुंगात आहेत. त्यांना झालेली अटक कार्यकर्त्यांना आवडलेली नाही. त्यामुळे ते तिखट बोलतात. किंबहुना प्रचार सभा, पत्रकार परिषद, कोपरा बैठका सगळीकडे त्यांची उपस्थिती आहे. काँग्रेसपेक्षाही या मंडळीचे कार्य नजरेस भरते.

या लोकसभा निवडणुकीची खुबी काय? निवडणूक जाहीर होण्याच्यापूर्वीच भाजपाने प्रचाराला सुरुवात केली. त्यांचे फलक झळकवायला सुरुवात झाली. त्यांच्या बैठका सुरू झाल्या. गटसमित्यांपासून ते पन्ना कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण गांभीर्याने काम करीत होते. वास्तविक गोव्यात उमेदवार महत्त्वाचा असतो.

आम्ही पाहिलेय, गोव्यात २५-३० टक्के मते उमेदवाराला पाहून पडतात. परंतु ही निवडणूक वेगळीच आहे. भाजपा मोदींचे नाव पुढे करते, मोदींना पाहून मतदान करा. मोदींची गॅरंटी असे स्वतः मोदी सांगतात. उमेदवार जाहीर व्हायला गोव्यात उशीर झाला होता. तेव्हा भाजप नेते सांगत, उमेदवार योग्यवेळी जाहीर करण्यात येईल. त्याची चिंता तुम्हाला नको. तुम्ही चिन्हाकडे पाहून मतदान करायचे आहे.

त्या तुलनेने काँग्रेसचे काहीच धड नाही. त्या पक्षातील साऱ्या गटसमित्या त्यांच्या नेत्यांनी अपहृत केल्या आहेत. जे आठजण भाजपात गेले, ते स्वतःबरोबर समित्याही घेऊन गेले. केंद्रातही या पक्षाचे नेते गांगरले आहेत. त्यांची यंत्रणा संपूर्णतः ढेपाळलेली आहे. त्यांचा निधीही गोठवण्यात आला आहे. आता तर काँग्रेसचे उमेदवारही ऐन धामधुमीत सत्ताधारी तंबूत पळून जाऊ लागले आहेत. त्यांच्यापैकी ज्यांच्यावर काही गुन्हे नोंद आहेत, त्यांना सत्ताधारी छावण्यामध्ये आश्रय घेण्याशिवाय पर्याय नाही.

गोव्यात काँग्रेसच्या उत्तर आणि दक्षिण समित्या नावाला आहेत. त्यापैकी ज्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न केले, ते दुसरीकडे तोंड वळवून बसले आहेत. या पक्षाने ज्यांना राजकारणात आणले, अस्तित्व दिले, ते सुद्धा उमेदवारी नाकारल्यानंतर घरी बसून आहेत. त्यात एक फ्रान्सिस सार्दिन आहेत. सार्दिन यांनी गेल्या पाच वर्षांत काय दिवे लावलेत हे सर्वश्रुत आहे. यावेळी तिकीट मिळवून ते जिंकून आले असते तरी ‘बसून' राहिले असते.

लोक त्यांच्यावर नाराज होते. दक्षिणेत कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांना जो काही प्रतिसाद मिळतोय, तो खात्रीने सार्दिन यांना मिळाला नसता. परंतु विरियातो यांच्या मागे प्रभाव दिसतो, तो अल्पसंख्याकांचा वरचष्मा आहे त्याच भागात. हिंदुबहुल भागात ते एकतर पोहोचलेले नाहीत किंवा तेथे त्यांना लोकपाठिंब्याची प्रचिती आलेली नाही.

अंत्रूज महाल, सांगे, सावर्डे या भागांत भाजपा खूपच बळकट आहे. तेथील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात भाजपाला पंधरा हजारांचे मताधिक्य मिळाले तर सासष्टी तालुक्यातील ख्रिस्ती प्राबल्य सहज ओलांडणे भाजपाला शक्य होणार आहे. मगोपने आपली शक्ती भाजपच्या मागे उभी केली आहे. किमान मडकई मतदारसंघात त्याचा प्रभाव दिसून येईल. सासष्टी तालुक्यात आलेक्स रेजिनाल्ड, आलेक्स सिक्वेरा आदींची कसोटी लागेल. सासष्टीतील आठ मतदारसंघांत दक्षिण गोव्यातील ४५ टक्के मतदार स्थानापन्न आहेत. त्यादृष्टीने सासष्टीचा हा रेटा अडविण्याची जबाबदारी दिगंबर कामत यांच्यावर आहे. दिगंबर कामत कधी नव्हे ते दमदार काम करताना दिसतात. सारस्वत समाजाने आपले पाठबळ भाजपच्या पल्लवी धेंपे यांच्यामागे उभे केले आहे. श्रीनिवास धेंपे यांचाही करिष्मा आहे. कुडचडे येथे त्यांच्याचमुळे सारस्वत समाजाने आपली वेगळी बैठक घेतली. दुसऱ्या बाजूला भाजपाने साऱ्या नेत्यांना वेसण घालून व्यक्त होण्यास भाग पाडले. जे नेते काही कुरघोडी करण्याची शक्यता होती, त्यांना जाहीर बैठकांमधून भाग घेण्यास लावलेच, शिवाय पत्रकार परिषद घेऊन प्रश्‍नांच्या सरबत्तीला तोंड देण्यास सांगण्यात आले.

त्यामुळे जे-जे नेते नाखूष म्हणून गणले जात होते, त्यांना भूमिका घ्यावी लागली. त्यांना पक्षाच्या उमेदवाराचे नाव घेऊन जाहीर पाठिंबा द्यायला लागलाच, शिवाय सर्वांनी भाजपा, मोदी यांचे गोडवे गायिले. भाजपाचे हे तंत्र आक्रमक राजकीय पक्षाला साजेसे आहे. या पक्षात महत्त्वाचे केवळ दोन नेते. इतर सारे समान, त्या सर्वांना पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानावा लागतो. केंद्रातील नेतेही गोव्यावर लक्ष ठेवून आहेत.

कोणलाही मातता-उतता येत नाही. नेते नाखूष, प्रचारापासून दूर वगैरे असला प्रकार नाही. तो केवळ काँग्रेसमध्ये. काँग्रेसने तिकीट नाकारलेले सार्दिन, विजय भिके, एल्विस गोम्स वगैरे ज्या पद्धतीने शांत आहेत, तसला प्रकार नाही. येथे निलेश काब्राल यांना अत्यंत अपमानास्पदरित्या मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आले. बिचाऱ्या काब्राल यांना स्वतःचे मतही व्यक्त करता आले नाही. आज त्यांनी प्रचारात जुंपून घेतले आहे.

दक्षिण गोव्यात उमेदवारीसाठी कित्येकजण रांगेत होते. त्या सर्वांना उमेदवारी का नाकारण्यात आली, हे सांगण्यातही आले नाही. पक्षश्रेष्ठींनी उमेदवार निश्‍चित केला आहे. तुम्ही काम करायचे आहे, एवढेच त्यांना सांगण्यात आले. त्यापैकी प्रत्येकजण कामात गुंतला आहे की नाही, तो पोटतिडकीने काम करतो आहे की नाही, हयगय तर करीत नाही, यावर लक्ष ठेवले जातेय.

गेल्या आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष गोव्यात आले. त्यांनी उमेदवारांनाही कडक सूचना केल्या. या सूचना विशेषत्वाने श्रीपाद नाईक यांच्याबाबत होत्या. वास्तविक श्रीपाद नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत. गोव्यात पक्ष रुजविण्यासाठी त्यांनी खस्ता खाल्ल्यात. मंत्री म्हणूनही ते संतोष यांनाही ज्येष्ठ आहेत.

संतोष यांनी कर्नाटकाच्या राजकारणात घोळ घातला. श्रीपाद नाईक यांच्या कारकिर्दीवर तसा डाग नाही. श्रीपाद नाईक यांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तर गोव्यात कसे जिंकून यायचे, हे त्यांना संतोष यांनी सांगणे म्हणजे अतिच झाले. कारण श्रीपाद नाईक यांचे राजकीय कर्तृत्व कसेही असो, त्यांचा चांगूलपणा ही त्यांची शिदोरी आहे.

स्वच्छ चारित्र्य, प्रामाणिकपणा हा गुण एकेकाळी भाजपची कळसूत्री होती, ती त्या पक्षाने बाळगलीय, (काँग्रेसजनांना त्या पक्षात प्रवेश दिलाय, त्यांचे चारित्र्य पहा) किती सोडून दिलाय, हे येथे सांगण्याची आवश्‍यकता नाही. परंतु ज्यावेळी लोक वाजपेयी, अडवाणी यांच्या व्यक्तिमत्त्वाची गोष्ट करायचे, तेव्हा गोव्यात श्रीपाद नाईक यांचेही नाव तेवढ्याच आदराने घेतले जात असे.

कालौघात भाजपा बदलला, आज तो कार्पोरेट स्टाईलने चालतो. पक्षाला कुणाबद्दल आपुलकी नाही, त्यात भाऊंच्या कार्याचे मोल किती व कसे लावणार? त्यामुळेच या निवडणुकीत सहाव्यांदा भाऊंना उमेदवारी मिळणार की नाही, याची चर्चा सुरू झाली. त्यातून भाऊंचा नम्रपणा हा त्यांचा नकारार्थी मुद्दा बनला. बिचारे भाऊ गोव्यात निरीक्षक म्हणून येणाऱ्या हौशा-गौशांपुढे आर्जवे करतानाचे चित्र कार्यकर्त्यांना पहावे लागले.

बी. एल. संतोष यांनी श्रीपाद नाईक यांना आणखी कठोर होण्यास सांगितले. विरोधकांना तुम्ही शिंगावर घेतले पाहिजे, असे त्यांना सुनावण्यात आले. त्यामुळे श्रीपाद भाऊंनी काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांची ‘कॅप्टन'शीप उचकून काढली. कारगिलमध्ये समुद्र कुठे आहे? तुम्ही तेथे कसे काय होता? असा एक कोणाच्याही सामान्य मनात उपस्थित होऊ शकतो, असा प्रश्‍न श्रीपादभाऊंनी विचारला.

परंतु त्यामुळे विरियातोंना आपल्या कामगिरीची माहिती आयतीच प्रसारमाध्यमांना देण्याची संधी उपलब्ध झाली. महत्त्वाचे काय तर चावता येईल, तेवढेच खावे. परंतु पक्षश्रेष्ठींनी श्रीपादभाऊंना भरीस घातले.

श्रीपादभाऊंचे वैशिष्ट्य त्यांच्या चारित्र्यात आहे. ते जुन्या पठडीतील नेते. सध्या भाजपचे तंत्र विरोधकांना उखडून फेकायचे आहे. पूर्वी एकमेकांचा-विरोधी नेत्याचाही आदर मान ठेवला जायचा. काँग्रेसनेच अटलबिहारी वाजपेयींना संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास पाठविले.

सध्या तसा विचारही केला जाऊ शकत नाही. त्यामुळे श्रीपादभाऊंना यापुढे अंग चोरून काम करावे लागेल.

एका बाजूला श्रीपाद भाऊंचे असे व्यक्तित्व, तर दुसऱ्या बाजूला विरियातो यांची पद्धती. विरियातो हे हाडाचे कार्यकर्ते, त्यांनी काँग्रेसमध्ये येऊन उमेदवारी मिळविली. परंतु त्यांचा मूळ कार्यकर्ता स्वभाव स्वस्थ बसेना, ते सतत बडबड करीत सुटले आहेत. त्यामुळे त्यांचा अनेकदा मुखभंग झाला, स्वतःचेच वक्तव्य मागे घेण्याची पाळी आली. दुसऱ्या बाजूला दिगंबर कामत यांच्याकडे पहा, त्यांना दुर्बुद्धी झाली, देवापुढे जाऊन शपथ घेण्याची. आता ही शपथ भूत होऊन त्यांच्या मानगुटीवर बसली आहे. परंतु तेथेही आपण प्रसाद घेतला होता व योग्य पाकळी, कौल आपल्याला मिळाला होता, हे त्यांनी बिनदिक्कतपणे एका हिंदी पत्रकाराला सांगितले, तेव्हा त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता.

सांगायचा मुद्दा हा की भाजपकडे हे असली व नकली चेहरे अनेक आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठींना या सर्वांची पार्श्‍वभूमी माहीत आहे. त्यातील कितीजण पक्षात कायमचे मुक्कामाला आले आहेत, कितीजण स्थलांतरित पक्षी आहेत, हे त्यांनी पक्के जाणून घेतले आहे. उद्या केंद्रात सत्ता बदलली, तर त्यातील अनेकजण देवापुढे कौल घ्यायला जातील आणि देवसुद्धा अनुकूल पाकळी देईल, हे जसे पक्षश्रेष्ठींना माहीत आहे, तसे मतदारांनाही! किंबहुना देवाला मानणारा हा रामभक्त पक्ष मतदारांपुढे खरा नतमस्तक होतो. म्हणूनच या पक्षाने जिंकून येण्याचा निकष महत्त्वाचा मानला व अनेक काँग्रेस नेत्यांना- त्यांच्या विरोधात अनेक आरोप असतानाही पक्षाची दारे सताड उघडी केली. असे करताना आपल्या नेत्यांचा अपमान केला, त्यांना नेमके बाजूला केले, काहींना उमेदवाऱ्याही नाकारल्या. तुम्ही म्हणता, ते भ्रष्ट आहेत, चारित्र्यवान नाहीत. पण मतदार त्यांना सतत जिंकून देतात, हा निकष देशभर लागू करण्यात आला. तसा तो गोव्यातही लागू झाला.

एवढे आठजण काँग्रेसमधून भाजपात आले, त्याआधी आणखी तिघेजण आले होते. त्यातील काही नेते तर दोन-दोन मतदारसंघात लीलया विजय खेचून आणतात. तेथे बदल करण्याचा प्रयत्न पक्षाचे सर्वात मोठे नेते मनोहर पर्रीकर यांनीही करून पाहिला. त्यांना जे जमले नाही, ते आणखी कोणाला जमणार? गोव्यात तरी तसे नेतृत्व आजच्या घडीला नाही.

विश्‍वजीत राणे हे त्यापैकीच एक अजिंक्य नेते. आपण आता रास्वसंघाचा विचार स्वीकारला आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. मागे भागवत गोव्यात आले होते, तेव्हा हे पक्षबदलू नेते संघाचा गणवेश घालून मैदानात बसले होतेच की!

गम्मत ही की संघाचे राष्ट्रीय नेतेही गोव्याला हसतात. गोव्यात ज्या पद्धतीने संघ फुटला व देशभर चेष्टेचा विषय बनला आहे. राजकारण्यांनी कपडे बदलावेत, त्या सहजपणे पक्ष बदलावेत हे समजू शकते. परंतु संघाच्या येथील कार्यकर्त्यांनी एका रात्रीत संघाचे कार्यालय बंद करून आपली वेगळी संघटना स्थापन केली. देशात संघाशी फारकत घेणारे अनेक नेते होते, ते निमूट संघाबाहेर गेले. गोव्यात मात्र असंतुष्टांनी सर्व संघ ताब्यात घेतला. आता केवळ त्याचे शेपूट राहिले आहे.

नेहरूंचे एक वाक्य नेहमी उद्‍धृत केले जाते, अजीब है गोवा के लोग! ते काँग्रेस आणि गोव्याला उद्देशून म्हणाले होते. येथे त्या पक्षाचे पुरुषोत्तम काकोडकरांसारखे आत्मकेंद्रित नेते होते. स्वतःपुढे न पाहणाऱ्या या नेत्यांना लोकांनी पहिल्या निवडणुकीत धडा शिकवला. अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या अनामत रकमा जप्त झाल्या.

पुढे या पक्षाला जिंकून येण्यासाठी युनायटेड गोवन्स व मगोप नेत्यांशी हातमिळवणी करावी लागली. म्हणजे काँग्रेस पक्ष प्रादेशिक पक्ष बनला, तेव्हाच लोकांनी स्वीकारला. भाजपालाही याच तत्त्वानं भुरळ पडली असावी.

भाजपा जो इतरांहून वेगळा पक्ष होता, तोही याच दिशेने चालला आहे. मधल्या काळात मनोहर पर्रीकरांचा प्रयोग इतका यशस्वी झाला, की मूळ भाजपावासीयांपेक्षा ख्रिस्ती आमदारांची संख्या अधिक होती. आज मूळ काँग्रेसजनांची संख्या अधिक आहे. गोव्यातील निष्ठावान संघ कार्यकर्ते अस्वस्थ बनले असतील. परंतु पक्षश्रेष्ठी म्हणतात, वेळ येईल तेव्हा पाहू. ही वेळ कधी येणारच नाही, असे मोदी-शहांना वाटते.

त्यांना काँग्रेस नव्हे, संपूर्ण विरोधी पक्ष संपवायचे आहेत. आणखी २० वर्षे हा पक्ष सत्तेवर राहिला तरच तसे होऊ शकेल. तरीही एक भीती आहेच, त्यांनी आपणाबरोबर सर्व काँग्रेस तत्त्वे भाजपात आणली आहेत. पहिले तत्त्व कुटुंबराज, भाजपा सतत काँग्रेसच्या परिवारवादावर प्रहार करीत आला.

गोव्याने ज्या परिवारांचे विलक्षण लाडकौतुक केले, ते परिवार आपल्या बायका मुलांसह भाजपात आले आहेत. सत्ता त्यांच्या घरी पाणी भरते. त्यापैकी अनेकांना काँग्रेसने लहानाचे मोठे केले, तरीही मुख्यमंत्रिपदावर राहून त्यातील अनेकांनी काँग्रेसशी गद्दारी केली, हे आपण नुकतेच त्यांच्या युवराजांकडून ऐकले.

जमीन रूपांतरे, भ्रष्टाचार, गैरव्यवहार, सामाजिक प्रदूषण, गोव्याच्या मूळ तत्त्वांना हरताळ, बाहेरच्यांचे लोंढे... या साऱ्या नष्टचक्रासाठी एकेकाळी काँग्रेसला दोष दिला जायचा. आज ही सारी परंपरा भाजपने आपल्या गळ्यात घालून घेतली आहे.

काँग्रेस पक्षाने कितीही चुका केल्या तरी मतदार एकेकाळी त्यांना उदारपणे माफ करून त्या पक्षाच्या पदरात भरभरून मते टाकायचा. ख्रिस्ती मतदार हा त्या पक्षाचा भरवशाचा होता. हमखास सत्तेवर आणणारा घटक, आज हिंदू मतदार भाजपचा पाठिराखा आहे.

ख्रिस्ती मतदार तावातावाने एकेकाळी काँग्रेसचा पाठराखण करायचा, जाहीर सभामध्ये गर्दी करायचा, जोषपूर्ण असायचा. आज हिंदू मतदार, व्यासपीठावरचे नेते सांगतात तसे करतो. टाळ्या वाजवतो, घोषणा देतो, दोन्ही हात वर काढतो...या दिवसांतील पक्षाच्या सभा पहा. जोषपूर्ण गर्दी, महिलांची उपस्थिती, प्रतिक्रियाशील मतदार. पंतप्रधानांच्या सांकवाळ सभेला ५० हजार कार्यकर्ते-मतदार उपस्थित होते. ते केवळ दक्षिण गोव्यातील होते म्हणतात, याचा अर्थ त्या प्रत्येकाच्या मागे आणखी पाच मतदार असणार, ही संख्या दक्षिणेत त्या पक्षाला विजयी करण्यास पुरेशी आहे.

परंतु आम्हाला सांगण्यात येते, ‘सायलंट व्हेव' आहे. ग्राऊंड रिॲलिटी. लोक बोलत नाहीत, ते भयाच्या सावटाखाली आहेत. असे वातावरण असते, तेव्हा बहुतांश लोक बोलत नाहीत. प्रतिक्रिया देत नाहीत, परंतु गुपचूप मतदान केंद्रापर्यंत येऊन आपला राग काढतात.

परंतु गोव्यातील परिस्थिती मला वेगळी वाटते.

असंतुष्ट असतात, नाराज असतात, ते मतदान केंद्रांपर्यंत येण्याचेही कष्ट घेत नाहीत. ते मुकाट घरी बसून राहतात. कष्ट झेपत नाही म्हणून सांगतात, उन्हाची रखरख असल्याचे कारण देतात...

गोव्यातील ‘ग्राउंड रिअ‍ॅलिटी‘ ही या प्रकारची आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com