देशाला लाभलेला वारसा; राजस्थानचे किल्ले

प्रत्येक किल्ला तेथील विशिष्ट भूप्रदेशाने प्रदान केलेल्या नैसर्गिक संरक्षणाचा पुरेपूर वापर करून बांधलेला आहे.
Rajasthan Fort
Rajasthan Fort Dainik Gomantak
Published on
Updated on

राजस्थानमध्ये स्थित असलेल्या अनेक किल्ल्यांपैकी निवडक सहा किल्ले युनेस्कोच्या यादीत सूचीबद्ध झाले आहेत. चितोडगढ, कुंभलगड, सवाई माधोपूर (रणथंभोर), झालावार (गाग्रोन), जयपूर (आमेर) आणि जेसलमेर, अशा सहा किल्ल्यांची 2013मध्ये युनेस्कोच्या यादीत नोंद झाली. हे किल्ले आठव्या शतकापासून ते अठराव्या शतकापर्यंत राजस्थानमध्ये प्रस्थापित झालेल्या सत्तांच्या, विशेषतः रजपूत (आताचे राजपूत) सत्तांच्या, सामर्थ्याची साक्ष देतात. केवळ स्थापत्याच्या दृष्टीने हे किल्ले अद्वितीय नसले तरी ज्या विशिष्ट पद्धतीने आणि विविध प्रकारांनी हे किल्ले बांधले गेले त्यामुळे दुर्गस्थापत्याच्या विकासाचा एक महत्वाचा टप्पा म्हणून ह्या गिरीदुर्गमालेचे (किल्ल्यांच्या मालिकेचे) महत्व अनन्यसाधारण आहे. प्रत्येक किल्ला तेथील विशिष्ट भूप्रदेशाने प्रदान केलेल्या नैसर्गिक संरक्षणाचा पुरेपूर वापर करून बांधलेला आहे. चितोडगढ आणि कुंभलगड हे गिरीदुर्ग आहेत, सवाई माधोपूर (रणथंभोर) हा वनदुर्ग आहे, झालावार (गाग्रोन) हा जलदुर्ग आहे, आमेर (किंवा आंबेर) हा भुईकोट किल्ला मानला जातो आणि जेसलमेर हा मरुदुर्ग आहे.

Rajasthan Fort
चला...गोव्याचे करूया नवनिर्माण

किल्ल्यांच्या सरंक्षणात्मक तटबंदीच्या आत प्रमुख शासकीय इमारती, मंदिरे, राजवाडे, बाजारपेठा, रहिवाश्यांची घरे अशा अनेक इमारती आहेत. येथील बऱ्याच इमारती तटबंदीच्या आधी येथे स्थित होत्या असे इतिहासात वर्णन आहे. ह्या किल्ल्यांचे अनुकरण करून भारतात नंतर अनेक किल्ले बांधले गेले आणि दुर्गस्थापत्याची एक वेगळी परंपरा भारतात निर्माण झाली. राजस्थान बघायचे ठरवले तर तेथील किल्ल्यांची, इतिहासाची थोडीतरी माहिती करून घेतली पाहिजे. नाहीतरी वाचन करून थोड्याशा तयारीने आपण प्रवासाला गेलो तर आपल्याला जास्त आनंद मिळतो. एखादे ठिकाण पूर्ण माहिती करून घेऊन बघितले की त्याचा एक वेगळाच सुखद अनुभव आपल्याला येतो. राजस्थानच्या भूगोल-इतिहासाची माहिती असेल तर आपल्याला राजस्थान पाहिल्याचा खरा आनंद लुटता येईल. पण हा इतिहास ठाऊक नसेल तरीही तेथील ध्वनी आणि प्रकाश संयोजन कार्यक्रम इतके सुंदर आहेत की आपल्याला अतिशय मनोरंजक रितीने इतिहास समजून घेता येतो.

आम्ही जयपूरला गेलो आणि ‘पिंक सिटी’ बघायची इच्छा पूर्ण करून घेतली. संध्याकाळी आमेर किल्ल्याचे दर्शन घेतले. काळोख झाल्यावर सात वाजता ध्वनी आणि प्रकाश संयोजन कार्यक्रम सुरू झाला. मीणा समाजाच्या लोकांनी पाया घातलेला हा किल्ला! भगवान विष्णुच्या मत्स्यावताराशी (मत्स्य = मीन) कुळाच्या उत्पत्तीचा संबंध असल्याचा दावा करणाऱ्या मीणा लोकांनी अनेक शतके अरवली पर्वतरांगांत आपले वर्चस्व स्थापन केले होते. राजपूतांनी मीणा लोकांवर आक्रमण करून राजपुतान्यात आपली सत्ता प्रस्थापित केली, असे इतिहास सांगतो. अकराव्या शतकात कछवाह वंशाच्या मानसिंगानी आमेर येथे आपले राज्य उभारले. मिर्झा राजे जयसिंग (पहिला जयसिंग, 1611-1667) यांनी किल्ल्याच्या बांधकामात भर घातली. स्वतःला प्रभु रामचंद्रांचा मुलगा कुश याचे वंशज म्हणवणाऱ्या कछवाह घराण्याची सत्ता येथे अनेक वर्षे राहिली. अठराव्या शतकात मात्र (1727मध्ये) सवाई जयसिंगांनी आपली राजधानी आमेरहून जयपूर येथे हलवली.

आमेर गिरीदुर्गाला ‘आमेर’ हे नाव कसे पडले यावर खूप आख्यायिका प्रसिद्ध आहेत. पण अधिकतर लोक असे मानतात की हे नाव शिव (अंबरीश, अंबेश्वर) किंवा पार्वती (अंबा, काली) या दैवतांवरून पडले असावे. आंबेरचा अपभ्रंश होऊन आमेर झाले असावे. जयगड किल्ल्याच्या खाली वसलेला हा दुर्ग जयगडला आतून सुरंग मार्गाने जोडलेला आहे. त्यामुळे दोन्ही दुर्गाना जोडून केलेली सामायिक तटबंदी संरक्षणाच्या दृष्टीने मोक्याची आहे. चारही दिशांनी चार दरवाजे गडांवर उघडतात.

आमेर दुर्गाच्या समोर मावठा सरोवर आहे. पूर्ण दुर्गाला पाणी उपलब्ध करून देण्यात मावठा सरोवराचा मोठा वाटा आहे. दुर्गावर जाताना आम्हाला या मावठा सरोवरावरून जावे लागले. एका छोट्या रस्त्याने आम्हाला ‘सूरज पोळ’ या पूर्वाभिमुख असलेल्या मुख्य द्वाराजवळ सोडले. रस्त्यावरून येताना किल्ल्याची भव्य, मजबूत तटबंदी नजरेत भरत होती. हा दुर्ग लाल वालुकाश्म आणि संगमरवरानी बांधलेला आहे. सतराव्या शतकातल्या एका महत्वाच्या टप्प्याचे दर्शन आपल्याला हा किल्ला घडवतो.

राजपूत-मोगल संयुक्त दरबारी शैलीच्या विकासाचे दर्शन! मिर्जा राजे जयसिंगांनी बनवलेले मोगल शैलीतील बगीचे आणि मोगल स्थापत्याचा प्रभाव असलेल्या इमारती! जोडीला मात्र हिंदू वास्तुशैलीने केलेले कलात्मक नक्षीकाम! मुख्य शासकीय इमारती पूर्व बाजूला आणि इतर इमारती पश्चिमाभिमुख आहेत. सूरज पोळ दरवाजा मुख्य प्रांगणात उघडतो. येथेच जलेब चौक आहे, जलेब ह्या अरबी शब्दाचा अर्थ आहे सैन्याची एकत्रित होण्याची जागा. युद्धातल्या विजयाचे जुलूस येथे काढले जायचे. महाराज सैन्याकडून सलामी येथेच घेत. जवळच्याच दुसऱ्या प्रांगणात दिवान-ए-आम आहे. येथे सामान्य जनांसाठी दरबार भरवला जायचा, सामान्य जनांच्या भेटी घेतल्या जायच्या, तक्रारी ऐकल्या जायच्या. जलेब चौकात एका बाजूला शीलादेवीचे मंदिर आहे. हे येथल्या प्रमुख मंदिरांपैकी एक आहे.

दिवान-ए-खास, महाराजांचे खाजगी महाल आणि राजवाडे तिसऱ्या प्रांगणात आहेत. ‘गणेश पोळ’ हा दरवाजा थेट या प्रांगणात उघडतो. सुशोभित आणि अलंकृत असा दिवान-ए-खास हा राजकीय घडामोडींसाठी महत्वाचा महाल होता. तसेच या तिसऱ्या प्रांगणात असलेला महाराजा मानसिंगांनी सोळाव्या शतकात बांधलेला शीशमहालही (आरसेमहाल) सगळ्यांना आकर्षित करतो. उत्कृष्ट मीनाकारी, पर्चिनकारी आणि आरशांनी सजवलेला हा महाल अतिशय सुंदर दिसतो. छतावरील आरशात दिसणाऱ्या माझ्या मुलाच्या प्रतिबिंबाचा त्याच्या नकळत फोटो घेण्याचा मोह मला काही आवरता आला नाही.

हे छायाचित्र माझ्यासाठी आजही त्या शीशमहालाची सुंदर आठवण आहे. सुखनिवास आणि जसमंदिर या येथल्या इतर इमारतीही अप्रतिम आहेत. या तिसऱ्या प्रांगणात महाराजा मानसिंगांनी चार बाग पद्धतीने बांधलेला मोगल शैलीचा बगीचा मन हरपून टाकतो. या नंदनवनात फिरायचा अनुभव खरोखर स्वर्गीय आहे. चौथ्या प्रांगणात महाराजांचा जनानखाना आणि राजपरिवारातील इतर स्त्रियांसाठी राहायची सोय होती. येथील ‘सुहाग मंदिर’ मधून या स्त्रियांना दिवान-ए-खासमध्ये चालणारे कार्यक्रम बघता येत होते.

Rajasthan Fort
इतिहासाच्या पाऊलखुणा: राजा प्रथम जयकेशी

या किल्ल्यातील सगळ्यांत महत्वाची योजना म्हणजे मावठा सरोवरात साचणारे पावसाचे पाणी उचलून दुर्गावर राहणाऱ्या लोकांना पुरवणे. पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव स्रोत असल्यामुळे हे सरोवर मजबूत तटबंदीच्या आत घेतले गेले होते. ह्या दुर्गाचे वैभव आजही टिकून आहे. आमेरची राजकुमारी जोधा हिचा विवाह अकबराशी झाल्यानंतर आमेर आणि मोगल यांच्यात सख्य झाल्यामुळे येथे जास्त विध्वंस झालेला दिसत नाही.

राजपूत-मोगल संयुक्त दरबारी शैलीची उत्कृष्ट झलक दाखवणारा हा दुर्ग 2013 मध्ये इतर पाच किल्ल्यांसोबत युनेस्कोच्या यादीत सूचीबद्ध झाला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com