Janmashtami 2021: आस्वाद घ्या गोपाळकाल्याचा

गोपींच्या माथ्यावरचे ताकाचे डेरे खडे मारून फोडताना गोपबाळांना आणि कान्हाला मजा यायची.
Janmashtami 2021
Janmashtami 2021Dainik Gomantak

‘अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम’ असं गीतेत म्हटलं असलं तरी, कृष्ण म्हटलं की माझ्या डोळ्यांसमोर नेहमी लोण्यानं माखलेला गोपालकृष्णच येतो! दूध, दही, लोणी यांच्या आगरात म्हणजे गोकुळातच वाढला तो. तिथले सगळे बाळगोपाळ सुदृढ, चपळ आणि उत्साही अन् आनंदी. दही, ताक, लोणी हे पदार्थ असतातच आरोग्यवर्धक आणि रुची वाढवणारे. तसे कृष्णाला आवडणारे सर्वच पदार्थ पौष्टिक आहेत. सकाळी लवकर दुधाला जरासं आंबट विरजण लावलं, की जेवणाच्या वेळेपर्यंत छान अदमुरं दही लागतं. मग भाकरी, थालीपीठ, पराठा, चकली, वडे कशाबरोबरही खाता येतं. सायीच्या दह्यात साखर घालून ते पोळीबरोबर खाता येतं. नुसती साय-साखर आणि पुरीही फारच छान लागते. ते एका देशाचं पक्वान्न आहे म्हणे. शिळी भाकरी दह्यात कुस्करून भाकरीचा काला खाता येतो. दही-पोहे, दही-वडा, दही-अप्पे... अशी व्हेरिएशन्स करता येतात. दही-मेतकूट, दही-चटणी, दही घालून केलेली कोणतीही कोशिंबीर किंवा भरीत छानच लागते. जेवणाच्या शेवटी घेतला जाणारा दही-दूध-भात, दही-बुत्ती तर सगळ्यांनाच प्रिय! ‘दध्योदन’ हा तर कृष्णाचा आहारच होता. दही-पोहे हाही असाच आवडीचा पदार्थ. प्रत्येक देवाच्या विसर्जनाबरोबर त्याला दही-पोह्यांची शिदोरी दिली जाते. गंतव्य स्थानापर्यंत जाताना भूक भागवणारा आणि जीव थंडावणारा पदार्थ म्हणून. किती चांगला विचार आहे या मागं!

Janmashtami 2021
Janmashtami 2021Dainik Gomantak

दह्यानंतर येतं ताक. लहानपणी मी भीषगरत्न दादा परांजप्यांचं ‘ताक व आरोग्य’ हे पुस्तक वाचलं होतं. मिक्सरपेक्षा रवीनं घुसळून केलेलं ताक चांगलं लागतं. माझ्या आजीकडं कोल्हापूरला घुसळखांब होता. माझ्या आईची काकू म्हणजे वेणूताई, जरीची साडी नेसून, नथ घालून, अंबाड्यावर अग्रफूल घालून ताकमेढीशी उंच रवीने दोरी ओढत एका लयीत ताक घुसळताना पाहत राहावीशी वाटायची. लोणी आलं की सगळ्या नातवंडांना ‘कृष्णकवळ’ म्हणजे लोण्याचा घास मिळायचा. लहानपण आणि आजोळ फार सुंदर असतं. ताक जरासं गोडसरच बरं वाटतं. ताकात हिंग, जिरेपूड आणि मीठ घातलं की चव येते. सायीच्या दह्याच्या ताकात मध्ये मध्ये येणारे सायीचे तुकडे मजा आणतात. ताकाला दिलेली साजूक तुपाची हिंग-जिऱ्याची फोडणी चव वाढवते. कोथिंबीर, आलं, मिरची वाटून लावून केलेला मट्ठा किंवा कढी तर फारच रुचकर लागते. गोपींच्या माथ्यावरचे ताकाचे डेरे खडे मारून फोडताना गोपबाळांना आणि कान्हाला मजा यायची. पण ताक पिताना येणारी मजा काही औरच आहे.

Janmashtami 2021
Janmashtami 2021Dainik Gomantak

ताकानंतरची पायरी लोणी. ‘नवनीत’ या एका शब्दातच त्याचं मऊपण कळतं. सायीला विरजण लावून त्या दह्याचं ताक घुसळून काढलेलं लोणी हे संस्कारित असतं, असं म्हणतात. हे लोणी नुसतं खडीसाखर घालून, भाकरी-पोळी-थालीपीठ यांबरोबर खाता येतं. गरम डोशावर, इडलीवर, मऊ भातावर घातलेलं लोणीसुद्धा फार छान लागतं. लोणी ब्रेडला लावलं, पावभाजीच्या भाजीत घातलं, टोमॅटो सुपात घातलं की रुची वाढते. भाकरीचा पापुद्रा बाजूला करून त्यावर लोणी, शेंगदाण्याची चटणी घालून पुन्हा वर पापुद्रा लावून सँडवीच करता येतं. लोणी-चकली किंवा लोणी आणि भाजणीचा वडा हे कॉम्बिनेशन तर परफेक्टच!

Janmashtami 2021
Janmashtami 2021Dainik Gomantak

लोणी कढवलं की तूप होतं. ते नीट कढलं आहे की नाही हे बघण्यासाठी, कढताना वर फेस आला की चार पाण्याचे शिंतोडे मारायचे. कडकड आवाज येतो. हा आवाज, खमंग वास आणि हलकासा चॉकलेटी रंग, हे चांगल्या कढलेल्या तुपाचे ठोकताळे शेजारच्या कुंटे वहिनींनी मला शिकवले. तूप-मेतकूट-भात, तूप-साखर- पोळीचा रोल, तूप-चटणी-भाकरी अशी यादी कितीही लांबवता येते.

Janmashtami 2021
Janmashtami 2021Dainik Gomantak

वेगवेगळ्या ‘लाह्या’ याही कृष्णाच्या पसंतीच्या. श्रावणात पचायला हलक्या अशा या लाह्या मिळतात. माझ्या लहानपणी ‘यल्गर’ नावाचे जोंधळे ओलवून लोखंडी बुट्टीत रवीला फडके गुंडाळून लाह्या फोडल्या जायच्या. आता भट्टीत फोडून मिळत असल्यानं काम सोपं झालं आहे. दिव्याच्या अमावास्येपासून लाह्यांच्या नैवेद्याला सुरुवात होते. नागाला दूध-लाह्या दाखवतात. फोडणीच्या लाह्या, तूप, मीठ, मेतकूट लावलेल्या लाह्या, दूध लाह्या, लाह्यांच्या भरडीचं उप्पीट, दूध-गूळ-लाहीपीठ, ताक-मीठ-जिरे, हिंग-लाहीपीठ असे प्रकारही छान लागतात. लाहीपिठाचे किंवा नुस्त्या लाह्यांचे लाडूही चांगले होतात. साळीच्या लाह्या, मक्याच्या लाह्या म्हणजे ‘पॉपकॉर्न’ही चांगले लागतात. विशेषत: चीजी पॉपकॉर्न फारच स्वादिष्ट लागतात.

Janmashtami 2021
Janmashtami 2021Dainik Gomantak

वर वर्णन केलेले सगळे कान्ह्याच्या आवडीचे पदार्थ गोपाळकाल्यात येतात. गाईगुरांना चारायला गेलेले कृष्ण, बलराम, पेंद्या आणि बाळगोपाळ दुपारच्या वेळी आपापल्या शिदोऱ्या सोडून बसत. यशोदामातेने लोटकी भरून दही-लोणी दिलेलं असे. कोणाकडे मीठ-भाकरी, कोणाकडे भात, कोणाकडे चणे-फुटाणे तर कोणाकडे गूळ-शेंगदाणे असत. गरिबांना गरिबीची जाणीव होऊ नये आणि श्रीमंतांना श्रीमंतीचा गर्व वाटू नये म्हणून कृष्ण सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करी. त्यावर आपल्याकडचे दही-लोणी घालून सगळे मिसळून प्रत्येकाला वाटून देई. असा हा गोपाळकाला सगळे आवडीनं खात.

Janmashtami 2021
Janmashtami 2021: उपवास आणि नैवैद्याचे महत्व

समरसता, एकरूपता, सामाजिक सौहार्दाची जाणीव, भेदाभेदरहित भावना, सामान्यांबद्दलचं प्रेम आणि कोणी लहान नाही की कोणी मोठा नाही ही समानतेची भावना... असे कितीतरी अर्थ गोपाळकाल्यातून समजतात. सगळं एकत्र करूनही यातल्या प्रत्येक पदार्थाला स्वतंत्र अस्तित्व आहे, स्वत:ची वेगळी चव आहे. ‘काला’ या शब्दामागे ‘गोपाळ’ या शब्दाचा दैवी स्पर्श आहे. म्हणून तर त्याचा स्वाद अप्रतिम आहे. हा गोपाळकाला प्रोटीन्स, व्हिटॅमीन्सनी परिपूर्ण आहे. माझ्या सासूबाई आमच्या घराजवळच्या विठ्ठल मंदिरात काकड्याला, जन्माष्टमीला जात. त्यावेळी लाह्या, चुरमुरे, फुटाणे, खडीसाखर, पोहे, बत्तासे, दही आणि लोणी एकत्र मिसळून प्रसाद दिला जाई. माझ्या मुलांप्रमाणेच मीसुद्धा तो प्रसाद मागून मागून खात असे. ती चव आणि त्याबरोबर येणारा बुक्क्याचा वास मी विसरू शकत नाही. मोठेपणी ‘युगंधर’ वाचताना दध्योदन, दही-पोह्यांची शिदोरी, दह्या-लोण्यानं माखलेलं कृष्णाचं ध्यान, आणि त्याचा चवदार गोपाळकाला मला पानोपानी भेटत गेला. कृष्णही मला नव्यानं समजत गेला आणि गोपाळकालाही वेगवेगळ्या अर्थानं उमजत गेला.

-मानसी काणे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com