Kojagari Pournima 2022 : अन्य ठिकाणी ‘कोजागरी’ म्हणून साजरी होणारी पौर्णिमेची रात्र पेडणे येथे मात्र ‘पेडण्याची पुनाव’ बनते. तिथल्या भगवती आणि रवळनाथ मंदिरात पौर्णिमेदिवशीच सकाळपासून भाविकतेने आणि जल्लोषाने या ‘पुनवे’च्या साजरी करण्यास सुरुवात होते. पुनाव साजरी करण्यासाठी मंदिरात जय्यत तयारीही सुरू झालेली आहे. देव भूतनाथाची, रवळनाथाची दोन तरंगे आणि देवी भगवतीची मूर्ती सजून तयार आहेत.
‘पेडणेची पुनव’ साजरी करण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली हे नेमके सांगणे कठीण आहे. पेडणे महालातल्या राजघराण्याच्या किर्तीचा हा सण जरी आठवण करून देत असला तरी असे मानले जाते की, हे राजघराणे अस्तित्वात यायच्या आधीही हा सण साजरा केला जायचा. मात्र राजघराण्याच्या सहभागातून या सणाला वैभवी उत्साहाची जोड लाभली.
गोव्यात फार पूर्वीच्या काळात प्रचलित असलेल्या गांवकरी व्यवस्थेत असलेल्या बलुतेदारीच्या खुणा अजूनही या सणात दिसतात. तेथील कोटकर मंडळी तोरण तयार करतात, तरंगांना कापड (साड्या) नेसवण्याचे काम गुरव, कुंभार आणि सुतार बांधवांकडे असते तर महार बांधवांकडे ढोल वाजवण्याची जबाबदारी असते. उत्सवात दोन तरंगे नाचतात. एक रवळनाथ देवाचे तर दुसरे देव भूतनाथाचे. भूतनाथाचे स्थान जवळच असलेल्या डोंगरावर आहे मात्र त्याला स्वत:चे मंदिर नाही. स्वतःचे मंदिर नसल्यामुळे त्याचा निवास भगवती मंदिरातच असतो.
असे मानले जाते की देव भूतनाथाच्या तरंगात वाईट शक्तींनी पछाडलेल्यांना, त्या शक्तीपासून मुक्त करण्याची दैवी ताकद असते. या श्रध्देवर विश्वास ठेवणारे आणि न ठेवणारेदेखील पुनवेच्या रात्री घडणारा हा विधी पाहण्यासाठी उत्सुकतेने हजर असतात. हजारोंच्या संख्येने तिथे उपस्थित असलेल्या भाविकांच्या मुखातून, जोषात वाजणाऱ्या ढोलाच्या तालावर ‘हर हर महादेव’ हा घोष नकळतपणेच उमटतो. देव भूतनाथाला स्वतःचे मंदिर नसल्याने तो याप्रसंगी आपल्यासाठी मंदिराची मागणी करतो. मंदिर ‘एका रात्रीत व एका वातीत’ बांधले जायला हवे अशी त्याची अट असते. याबाबतीत फार आग्रही असतो. भाविक जसजसा त्याला शांत करायचा प्रयत्न करतात तसतसा तो अधिकच क्रोधित होत जातो.
भूतनाथाला शांत करण्याच्या प्रयासात शेवटी ‘बांदतु’ हे शब्द भाविकांच्या तोंडून उमटतात. या ‘बांदतू’ या शब्दांमध्ये एक विशेष चलाखी असते. पेडणे भाषेच्या शैलीत उच्चारात उद्गारलेल्या या शब्दाचा ‘आम्ही बांधू’ असा अर्थ तयार होतो, तसाच ‘बांध तू’ असा दुसराही त्याचा अर्थ होतो. अशा शाब्दिक विभ्रमात देव भूतनाथाला अडकवले जाते. मात्र आपले देऊळ आपल्याला हवे त्या पध्दतीने बांधले जाईल ही हमी मिळाल्यामुळे देव भूतनाथ शांत होतो व या पुनवेचा जल्लोष समाप्त होतो.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.