गोव्याचा बार्सिलोना होतोय का?
प्रसन्न शिवराम बर्वे
गेल्या शनिवारी बार्सिलोनामधील शेकडो स्थानिकांनी पर्यटकांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवून प्रमाणाबाहेर होत असलेल्या पर्यटनाचा निषेध नोंदवला. आदरातिथ्याची परंपरा असलेले व आईच्या मायेने साळीचा भात वाढणारे सोनकेवड्याचे हात आलेल्या पाहुण्यांवर पाणी फवारून निषेध व्यक्त करणार नाहीत.
पण, त्याच बरोबर बार्सिलोनातील नागरिकांना हे का करावे लागले? बार्सिलोनाने जे भोगले त्या वाटेने गोवा, गोमंतकीय जात आहेत का, याची पडताळणी, चिंतन होणे आवश्यक आहे.
भूमध्य समुद्राच्या काठावर वसलेले, विस्तीर्ण समुद्रकिनारा, उत्तम हवामान, डोंगररांगा, वैभवशाली वास्तुकला, द्राक्षांची वाईन, मुबलक मासे आणि आधुनिक फॅशन विश्वाचे माहेर असलेले एक सुंदर शहर म्हणजे बार्सिलोना! पर्यटकांना आकर्षित करण्याचे सर्व गुण या शहरात होते. तरीही बार्सिलोनाने १९९२च्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करेपर्यंत हे शहर खरोखरच पर्यटकांच्या नकाशावर तसे ठळकपणे दिसत नव्हते. नाही म्हणायला १९६० आणि ७०च्या दशकात कोस्टासच्या बाजूने हॉटेल्स आणि रिसॉर्टस् उगवण्यास सुरुवात झाली होती. ऑलिम्पिकच्या निमित्ताने औद्योगिक बंदर असलेल्या या शहराचा चेहरामोहरा बदलण्यात आला. नवीन समुद्रकिनारे तयार करण्यासाठी अक्षरश: वाळू आयात करण्यात आली. पर्यटक आकर्षित होऊ लागले. करता करता बारमाही पर्यटक इतके वाढले की, स्थानिकांना राहणे नकोसे होऊ लागले.
१९९०मध्ये फक्त १,१५,००० क्रूझ प्रवासी, व्यापारी बार्सिलोनामध्ये आले. २०१७पर्यंत हा आकडा २७ लाख इतका वाढला. अंदाजे १६ लाख २० हजार लोकसंख्या असलेल्या या भूभागात २०२३ साली भेट दिलेल्या एकूण पर्यटकांची संख्या चक्क २ कोटी ६० लाख इतकी होती. उपलब्ध साधनसुविधा, क्षमता यांच्या कितीतरी पट अधिक बोजा शहरावर पडला. इतक्या वर्षांच्या कालखंडात महसुलांत वाढ झाली पण त्याचबरोबर राजवाडे, चर्च यांसारख्या भव्य वास्तूंचे रूपांतर शाळा, वाचनालये, संग्रहालये, सरकारी कचेर्या असे झाले.
दूध, वर्तमानपत्रे मिळण्याची ठिकाणे कमी होऊन त्यांची सेकंड होम, बार, उपाहारगृहे, नाइट क्लब यांनी घेतली. भाड्याने खोली घेण्याच्या किमती इतक्या वाढल्या की, त्या सामान्यांच्या हाताबाहेर जाऊ लागल्या. साध्या साध्या वस्तूही परवडेनाशा होऊ लागल्या.
वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण इतके वाढले की, २०१९ साली बार्सिलोना (पाल्मासह) हे युरोपमधील सर्वांत प्रदूषित बंदर ठरले. वागण्याच्या व जगण्याच्या अनेक पद्धतींची, संस्कृतीची सरमिसळ झाल्याने मूळ संस्कृती, भाषा यांची ओळख धूसर झाली. ज्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर झाला. लोक अस्वस्थ झाले.
बार्सिलोना हे शहर तसे लहान आहे. माणसांचे वहन करण्याची त्याची क्षमता मर्यादित आहे. या शहराची रचना कधीही मोठ्या संख्येने लोकांच्या रस्त्यावर दररोज येण्यासाठी केली गेली नव्हती. या गर्दीमुळे स्थानिकांसाठी मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. विशेषत: सग्रादा फॅमिलियानजीक असलेल्या पर्यटन क्षेत्रात पदपथांवर चालण्यासाठी जागाच शिल्लक नाही. लोकांचा पूर वाहतोय.
दुसरी प्रमुख समस्या म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये पर्यटनाच्या वाढीमुळे होत असलेला सांस्कृतिक ऱ्हास. बार्सिलोनाला एकेकाळी स्पॅनिश इतिहासाचे आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जात असे. शहरी भागातील पारंपरिक व्यवसायांची जागा फास्ट फूड रेस्टॉरंट्स आणि पर्यटन-मार्गदर्शक पुस्तिकांच्या दुकानांनी घेतली. बार व नाईट क्लब यांची रेलचेल सुरू झाली. येथील उपाहारगृहांमध्ये स्पॅनिश खाद्यपदार्थांऐवजी ‘मेक्सिकन सोम्ब्रेरोस’ सर्वांत लोकप्रिय आहे. बार्सिलोनाची ओळख सर्व स्तरावर पुसली जात आहे. ‘आमचा बार्सिलोना’ असे अभिमानाने मिरवणारे नागरिक खाली मान घालून फिरत आहेत.
. स्वत:ची ओळख, रुची आणि अभिरुचीही घालवून बसलेल्या बार्सिलोनातील स्थानिकांनी सोवळे सोडवून ठेवले आहे आणि त्यांना ओवळे सापडेनासे झाले आहे. ते रस्त्यावर आरामात फिरू शकत नाहीत किंवा त्यांच्या गावी त्यांच्या पारंपरिक जेवणाचा आणि खरेदीचा आनंद घेऊ शकत नाहीत. पर्यटनाच्या वाढीमुळे घरांच्या किमतीही वाढल्या आहेत ज्यामुळे नंतर शहरात राहणे परवडत नसलेल्या बहुतेक तरुण स्थानिकांना शहराने चक्क बाहेर हाकलले आहे. शहराच्या दैनंदिन कमाईमध्ये पर्यटनाचा वाटा जवळपास २ कोटी डॉलर आहे आणि १ लाखाहून अधिक लोकांना रोजगार मिळतो, तरीही वाढत्या राहणीमानाचा खर्च परवडेनासा झाला आहे. राहण्याची साध्या खोलीचे भाडे दीड हजार युरो झाले आहे.
वाढत्या महागाईविरोधात जवळपास १५०हून अधिक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये हजारो लोक सामील झाले होते. दोन आठवड्यांआधी ‘मयोका बेट विक्रीसाठी नाही’, असे फलक दाखवीत लोक रस्त्यावर उतरले होते. ही लहानसहान आंदोलने, लोकांचा विरोध गेल्या दहा पंधरा वर्षांपासून हळूहळू तीव्र होत चालला आहे.
गेल्या शनिवारी बार्सिलोनामध्ये जवळपास २८०० लोकांनी आंदोलन करून देशातील अतिपर्यटनाच्या विरोधात निषेध नोंदवला. ‘आता पर्यटनावर मर्यादा आणा’, अशा आशयाच्या घोषणा आंदोलकांनी दिल्या. गेल्या काही वर्षांमध्ये बार्सिलोना हे पूर्णपणे पर्यटकांचे शहर झाले आहे. यात स्थानिकांना वाव उरला नाही.
पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झालेल्या गोव्याची प्रतिमा ‘चर्च व समुद्रकिनारे असलेले राज्य’ अशी बनली होती आणि ‘दारुडे आणि आळशी (खरे म्हणजे ‘सुशेगाद’ याचा अर्थ आळशी असा नव्हे तर समाधानी असा होतो)’, अशी गोमंतकीयांची प्रतिमा होती. जेवणाला चव आणणारे मीठ निर्यात करणारे अशी एकेकाळी ओळख असलेल्या गोमंतकीयांच्या ओळखीचे पतन मुक्तीनंतर मोठ्या प्रमाणावर झाले आणि आता तर त्याची परिसीमा गाठली गेली आहे. फार मनाला लावून घेऊ नका, पण आपली ओळख ‘ड्रग्ज व मुली पुरवणारे’, अशी होत आहे.
शहरांत, शहरांलगतच्या गावांत जमीन घेणे सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहे. असलेली जमीन परप्रांतीयांना विकण्याकडे कल वाढला आहे. उर्वरित भारतातले गर्भश्रीमंत गोव्याला आपले ‘सेकंड होम’ बनवत आहेत. त्यामुळे, जमिनी रास्त किमतीपेक्षाही कितीतरी पट अधिक दराने विक्रीस जात आहेत. गोमंतकीयाला विकणे सोपे व विकत घेणे कठीण झाले आहे. ज्यांनी भूमीचे नियंत्रण व रक्षण करायचे तेच मोठमोठे गोमंतकीय अधिकारी गोमंतकीयांच्याच जमिनी लाटू लागले आहेत. भू-माफियांचा दबदबा व दबाव वाढत आहे.
बाउन्सर आणून घरे पाडली जात आहेत. समुद्रकिनाऱ्यांवर ड्रग्ज मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. गोव्यात अमली पदार्थांचे ‘पार्किंग’ होते; इथे आणले जातात व परस्पर बाहेर नेले जातात, असे अधिकारी काही वर्षांपूर्वी मुलाखतीत सांगायचे. आज स्थानिक लोक गाड्यांवर ड्रग्जची विक्री करत आहेत आणि सहावी-सातवीत शिकणारी गोमंतकीय पोरे चॉकलेट खावे तसे ड्रग्जचे सेवन करत आहेत.
देशोदेशीच्या कोवळ्या मुलींचा बाजार भरत आहे. बारचा परवाना मिळवून केलेल्या डान्सबारमध्ये या पोरी नाचवल्या जात आहेत व शरीरविक्रयही राजरोस सुरू आहे. ‘बाहेरून आणलेल्या मुली’, असे स्वत:चे समाधान करून घेण्यात काहीच अर्थ नाही. त्यांची जागा गोमंतकीय मुलींनी कधी घेतली, हे आम्हां परिटघडीच्या लोकांना कळणारही नाही.
‘गोमंतकीय’, अशी ओळख पटवणारे खास खाद्यपदार्थ आमच्या ताटातून कधीच गायब झाले आहेत. व्यवसायही आपल्या हाती उरले नाहीत. महोत्सवांत नाचून दाखवण्याइतपत संस्कृती आहे आणि एकमेकांना शिव्या घालण्यासाठी का होईना, ती जिवंत आहे. जे बार्सिलोना भोगत आहे त्याच भोगावळीच्या वाटेवर गोव्याने चालायला सुरुवात केली आहे.
अतिपर्यटन म्हणजे पर्यटकांचे प्रमाणाबाहेर येणे एवढाच मर्यादित अर्थ घेणे चुकीचे ठरेल. व्यवस्थेच्या, स्थानिकांच्या क्षमतेबाहेर एकाच वेळी, एकाच जागी पर्यटकांचे एकत्र येणे म्हणजे अतिपर्यटन. आपल्या घरी एखाद्या कार्यक्रमास निमंत्रण द्यायचे तरी आपण किती विचार करतो! वेळ, जागा, खर्चाचे परवडणे, अशा असंख्य बाबींचा सखोल विचार करतो व त्याप्रमाणातच निमंत्रण देतो. केवळ किती पर्यटक आले, या संख्येवर पर्यटनाची मोजमापे मिरवण्यात काहीच अर्थ नाही.
किती पर्यटक, कुठल्या वेळेत, कुठल्या मोसमात, कुठल्या स्थानी, किती काळासाठी आले याचा तरी निदान सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्यातून सरकारी तिजोरीत जमा होणारा महसूल. जेव्हा पर्यटन अनिर्बंध, अनियोजित आणि अति होते तेव्हा सरकारच्या महसुलात वाढ होत नाही. पर्यटन व त्याच्याशी संलग्न अन्य व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या खिशात हा पैसा जातो.
त्याचबरोबर अशा बांडगुळांनी पोसलेली गुंडगिरी, वेश्याव्यवसाय आणि अन्य उद्योगधंदे यांनी केलेले सामाजिक, सांस्कृतिक नुकसान, कितीही पैसे मोजले तरी भरून निघत नाही. पर्यटनाकडे अर्थकारण म्हणून पाहताना त्यातून निर्माण होणारे अनर्थ आणि हानी जमेस धरूनच ‘जितम् मया’ म्हणणे योग्य ठरते. तसे केले नाही तर पर्यटनावर पोट भरणाऱ्यांना व स्थानिकांनाच ते नकोसे होते. बार्सिलोनात जे नकोसे झाले आहे, ते गोव्यातही नकोसेच होईल.
कुळागरात जसे आपण पाटाचे पाणी बांध घालून शिंपण्यासाठी वळवतो तसे पर्यटकांना वळवणे अत्यंत आवश्यक आहे. ‘पर्यटनवृक्षा’ची सकस वाढ व्हावी यासाठी त्यावर उगवलेली बांडगुळे मुळासकट निष्ठूरपणे उपटून काढणे गरजेचे आहे.
‘पर्यटन व पर्यटक नकोच’, असे म्हणणे ‘अतिथी देवो भव’ मानणाऱ्या आतिथ्यशील गोमंतकीय माणसाच्या रक्तात नाही. पण, रक्त ओकेपर्यंत त्यांना सोसणेही परवडणारे नाही. गोव्याचा बार्सिलोना होऊ नये, यासाठी योग्य पावले वेळेत उचलणे ही सरकारची, प्रशासनाची आणि आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.