लाचार विश्वगुरू?

महागाईमुळे अमेरिकेप्रमाणेच भारतही पोळत आहे. अमेरिकनांच्या पीडानिवारणासाठी फेडरल रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर वाढवले. मात्र, भारतीय रिझर्व्ह बॅंकेला तसे करण्याचे स्वातंत्र्य नाही.
Money
MoneyDainik Gomantak

राजेंद्र काकोडकर

जगातील दिग्गज आर्थिक व्यवस्थापन संस्था गोल्डमन साक्सचे अध्यक्ष लॉयड ब्लँकफेन यांनी कंपन्यांना आणि ग्राहकांना अमेरिकेतील मंदीसाठी तयार राहण्याचे सोमवारी आवाहन केले. ते म्हणाले की अमेरिकेला मंदीचा खूप धोका आहे व मंदी टाळण्याचे मार्ग फार अरुंद आहेत.

(Inflation is having a serious impact on India)

Money
लोणावळ्यातील ‘मम्मीज होमली फूड’

महागाई कमी करणे ही फेडरल रिझर्व्ह बॅंकेची प्राथमिकता असायला हवी; झपाट्याने वाढवलेले व्याजदर प्रतिसाद पण देत आहेत. उत्पादन व पुरवठा कमी करून भाव वाढवणाऱ्या उद्योगांमुळे आणि इंधनाच्या चढ्या किमतीमुळे अमेरिकन ग्राहक फार अस्वस्थ झाले आहेत. व्याजदर वाढवल्यामुळे महागाईचा जोर थोडा कमी झाला; परंतु तो अजून दशकातील सर्वात वेगवान दरांपैकी एक आहे.

जागतिकीकरणामुळे अमेरिकन लोकांना बराच फायदा झाला. परदेशातील स्वस्त मजुरीमुळे अमेरिकी लोकांना वस्तू व सेवा स्वस्त मिळाल्या. परंतु आता त्याच स्वस्त पुरवठा साखळ्या अमेरिकेचा गळा घोटत आहेत. अमेरिकेत होत नसलेली उत्पादने अमेरिका नियंत्रित करू शकत नाही व अशा पुरवठा साखळ्यांवरचे अवलंबन आता अमेरिकेची प्रमुख चिंता बनली आहे. सर्व सेमीकंडक्टर तैवान व चीनमधून येतात व त्यांचा पुरवठा अमेरिकेतील गाड्यांचे उत्पादन नियंत्रित करतो.

ज्या महागाईचे त्रास अमेरिकी लोकांना होत आहेत त्याच महागाईचे चटके भारतीयही झेलत आहेत. अमेरिकी ग्राहकांच्या पीडानिवारणासाठी त्यांच्या फेडरल रिझर्व बॅंकेने व्याजदर झपाट्याने वाढवून महागाई काही अंशी कमी केली. भारतीय रिझर्व बॅंकेला तसे करण्याचे स्वातंत्र्य नाही. व्यवसायिक अर्थतज्ज्ञाऐवजी “आज्ञाधारक” सनदी अधिकाऱ्याला गव्हर्नर बनवल्याने रिझर्व बॅंक सरकारचीच एक कळसूत्री बनली आहे. सरकारने वाकायला सांगितल्यावर रांगणारे अधिकारी महागाई रोखू शकतील?

भारतातील गाड्यांचे उत्पादनही चीनकडून होणारा सेमीकंडक्टर पुरवठा ठरवतो. कोविड काळांतसुद्धा स्वतःचा फायदा करून घेण्याचे मार्ग शोधावे असे अमित शाह यांनी म्हटले होते. सत्ताधारी भाजपा नेत्यांनी त्यांची ही शिकवण पटकन उचलून धरली. पोलिसांचा धाक दाखवून दुकाने बंद करा, रेशन साठी जाणाऱ्या लोकांना दंडुक्याने बदडा व घरपोच माल पुरवठा करण्याच्या बहाण्याखाली नफेखोरी करा. दोन लाखांचे व्हेंटिलेटर आठ-आठ लाखांना खरिदा. अर्धेच भरलेले ऑक्सिजन सिलिंडर आणून रोग्यांना गुदमरून मारा. मढ्याच्या टाळूवरचे लोणी ते लोणीच ना?

आपत्तीतही नफेखोरी कशी करावी हे आता उद्योगपतीही शिकले आहेत. सेमीकंडक्टर तुटवड्याचे ते नफ्यांत रूपांतर करत आहेत. गाड्यांचे उत्पादन कमी करून फक्त "टॉप एन्ड" व्हेरिएन्ट उपलब्ध केले जात आहेत. "लो एन्ड व्हेरिएन्ट” ची किंमत ६ लाख; परंतु फक्त १० लाखांचा "टॉप एन्ड व्हेरिएन्ट" उपलब्ध करा व ग्राहकांना चार लाखांची टोपी घाला. सरकारच्या दबावाखाली "कॉम्पिटिशन कमिशन" कारवाई करत नाही.

ज्या ज्या वेळी अमेरिकेत मंदी आली त्या त्या वेळी भारतालाही तिची झळ बसली. २००७ मध्ये अमेरिकेत मंदी आली त्यावेळी भारतीय शेअर मार्केटमधील दलालांनी "डी-कपलिंग" हा शब्दजाल वापरून रिटेल गुंतवणूकदारांची दिशाभूल केली होती. ऑक्टोबर २००७ पासून अमेरिकी बाजार कोसळू लागला त्यावेळी भारतीय बाजारही घटू लागला. त्यावेळी भारत विश्वगुरू बनला आहे व त्यामुळे भारत अमेरिकेवर अवलंबून नाही, असा दलालांचा दावा होता. जसे रेलगाडीचे डबे इंजिनपासून वेगळे करण्यासाठी "जी-कपल" केले जातात तसाच भारत अमेरिकेपासून "डी-कपल" झालेला आहे असे दलाल म्हणू लागले. या शब्दजालाने भोळे गुंतवणूकदार फसले. अमेरिकेत पतन चालूच होते; परंतु फसगतीमुळे भारतीय बाजार परत तेजीत आला. त्यादरम्यान ज्यांनी शब्दजाल पसरविला होता त्या लोकांनी आपली गुंतवणूक विकून टाकली. दोन महिन्यांनी "डी-कपलिंग" हे सफेद झूट असल्याचे निष्पन्न झाले व त्यानंतर भारतीय बाजारांत अक्षरशः कडेलोट झाला.

Money
करपली पोळी! देशात गहू निर्यातीचा मुद्दा बनला गहन

२००७ च्या बुडीत-कर्ज व २०२० च्या कोविड संकटांवर मात करण्यासाठी अमेरिकेने "क्वांटिटेटिव्ह ईझिंग" वा "क्यू-ई" हे किनेशियन अर्थशास्त्रातील अपरंपरागत अस्त्र वापरून आपल्या देशांत आर्थिक स्थैर्य आणले. देशांत मालाची मागणी घटल्यावर आर्थिक वाढ खुंटते व उद्योगपती तोट्यांत जातात. त्यावर उपाय म्हणून त्या देशाची रिजर्व बॅंक व्याजदर कमी करत जाते; परंतु व्याजदर शून्यावर आल्यावर पुढे तो मार्ग बंद होतो. अशावेळी क्यू-ईचा मार्ग वापरला जातो. रिजर्व बॅंक सरकारी रोखे विकत घेते व त्यामुळे बॅंकिंग सिस्टीममध्ये पैशांची भरती येते.

या आर्थिक तरलतेमुळे वस्तूंची मागणी वाढत जाते व उद्योगपती नफ्यांत येतात. नोटा छापण्यासारखाच हा प्रकार आहे व महागाई त्याचा साईड इफेक्ट आहे. कोविड काळांत बऱ्याच देशांनी "क्यू-ई" चा मार्ग चोखाळला; त्याचीच निष्पत्ती म्हणजे सध्याची महागाई. आपले अर्थकारण सावरण्यासाठी दुसरे देश ज्या उपाययोजना करतात त्यांच्या दुष्परिणामांपासून भारतास वाचवण्यास आपले सरकार असमर्थ आहे. रुपया गडगडत आहे तर सेन्सेक्स कोसळत आहे. शेजाऱ्यांनी सिगारेट फुंकावी व त्यांच्या धुराने आपण लाचारपणे गुदमरावें. विश्वगुरुपद तर क्षितिजापलीकडे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com