डॉ. संगीता साेनक
Global Warming बिपोरजॉय आले. वाजत गाजत, गडगडत बिपोरजॉय आले. पण आपल्या सुदैवाने गोव्यात कुणाला काही इजा, हानी न करता गोव्यातून निघूनही गेले. गुजरात, राजस्थानमध्ये मात्र हैदोस घातला.
हल्ली आपण वादळ, पूर अशा नैसर्गिक आपत्तींबद्दल खूप ऐकतो. याचे कारण म्हणजे जागतिक तापमानबदल. अमेरिकेच्या नासा या संस्थेच्या मते गेल्या एका शतकात पृथ्वीचे तापमान २.२° फॅरेनहाइट किंवा सुमारे १.२° सेल्सियसने वाढले आहे.
मुख्य म्हणजे ही वाढ पृथ्वीवर सगळीकडे समान नाही, कुठे जास्त, कुठे कमी आहे. वरवर पाहता सामान्य माणसांना हा मोठा बदल वाटत नाही. पण या छोट्याश्या बदलाचे परिणाम मात्र अनेक आहेत आणि अतिशय गंभीर आहेत.
अनेक ठिकाणी उष्णतेच्या तीव्र लाटा, दीर्घ दुष्काळी हंगाम, अवेळी नद्यांना येणारे पूर, अधिक आक्रमक चक्रीवादळे, अनियमित होऊन कोसळणारा पाऊस, त्यामुळे झालेले अनियंत्रित ऋतुमान हे सगळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ह्या छोट्याश्या तापमान वाढीचे दुष्परिणाम आहेत.
हल्लीच्या काळात कधीकधी एखाद्या वर्षी पाऊस वर्षभर चालू राहतो. तर कधी पावसाची डोळ्यात प्राण आणून वाट बघावी लागते. हल्ली नरक चतुर्थीच्या दिवशी आपला नरकासूर जाळून मरण्याऐवजी पावसाच्या पुरात डुबतो. श्रावण रविवारसाठी लागणारी पत्री, गणेश चतुर्थीला लागणाऱ्या भाज्या, माटोळीची फळे त्या दिवसांत मिळत नाहीत.
तर अनेक फळे, भाज्या, खास करून विदेशी, बाराही महिने बाजारात दिसतात. हल्ली आंब्याचा हंगाम उशिरा सुरू होतो का? फुलांच्या बहरात बदल झालाय का? या लेखाच्या वाचकांना असा काहीही ऋतुमानातील बदल लक्षात आला असेल तर मला माझ्या मोबिलवर (८६०५०८४८४८) कळवावे ही विनंती. हे सगळे हवामान बदलाचे, तापमान वाढीचे परिणाम आहेत. सागरी पृष्ठभागावर व सागरांतर्गत झालेली तापमानवाढ तुफानी वादळाची तीव्रता आणि संहारक शक्ती वाढवते.
हल्लीच्या काळात पृथ्वीवर वाढलेले हरितगृह वायूंचे (ग्रीनहाऊस गॅस) प्रमाण हे हवामानबदलाचे प्रमुख कारण आहे. सामान्यता सौर ऊर्जा म्हणजेच सूर्याकडून पृथ्वीवर येणारी उष्णता पृथ्वीच्या पृष्ठभागावर शोषली जाते आणि ती परत वातावरणात परावर्तित (रिफ्लेक्ट) होते.
जसजशी ही उष्णता अवकाशात जाते तसतशी हे वायू ती उष्णता काही प्रमाणात शोषून घेतात. काही अंशाने ही उष्णता पृथ्वीवर परत पाठवली जाते. या प्रक्रियेमुळे आपल्या पृथ्वीवर वातावरण उबदार राहाते. म्हणूनच पृथ्वीवर सजीवसृष्टी विकसित होऊ शकली.
पण गेल्या काही वर्षांत आपल्या पृथ्वीवर या हरितगृह वायूंचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. त्यामुळे पृथ्वीवर येणारी उष्णताही अतिशय वाढलेली आहे. या वायूंत कार्बन डायऑक्साइड, मिथेन, नायट्रस ऑक्साइड, ओझोन, फ्लोरोकार्बन असे अनेक वायू समाविष्ट आहेत.
यापैकी कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यांचे योगदान तापमानवाढीत जास्त आहे. गेल्या काही वर्षांत (कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन) यांचे प्रमाण भयंकर वाढले आहे. या सर्व वायूंच्या वाढत्या प्रमाणामुळे आपल्या वातावरणाचे सरासरी तापमानही वाढले आहे.
या तापमानवाढीत विकसित देशांचा वाटा जास्त आहे. विकसित देशांकडून झालेला अनिर्बंध ऊर्जावापर आणि हरितगृह वायूंचे अनिर्बंध उत्सर्जन यामुळे या तापमानवाढीचा वेग वाढला आहे. याचे परिणाम मात्र जगात सगळीकडे दिसत आहेत.
आपल्या गोव्यातही याचे परिणाम जाणवत आहेत. आमच्या बागेतील पारिजातक गेल्या वर्षी वर्षभर बहरत होता. आंबा मात्र या वर्षी मोहोरलाच नाही. दूरदूरच्या देशातून स्थलांतर करून येणारे पक्षी, आपले पाहुणे पण नेहमीच्या वेळी आले नाहीत. या वर्षी पाऊसही उशिरा आला. अरबी समुद्रात वादळे वाढली आहेत. हे सगळे हवामानबदलाचे परिणाम आहेत.
औध्योगिक क्रांतीची सुरुवात जगात झाल्यापासून मानवाने खनिज तेल, कोळसा, इतर जीवाश्म इंधन याचा वापर सुरू केल्याने काही वायू, ज्यांना आपण हरितगृह वायू म्हणतो, त्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढायला लागले.
गेल्या काही दशकात हा वापर जास्त वाढल्यामुळे हे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढले. भारतासारख्या कृषीप्रधान देशात हरितक्रांतीमुळे रासायनिक खतांचा वापर सुरू झाला.
हळूहळू वाढू लागला. उत्पन्न वाढले तसे आपले राहणीमान वाढले. वेगवेगळ्या गोष्टींचा वापर वाढला. आज आपल्याकडे वैयक्तिक स्तरावर अनेक वाहने आहेत.
दरडोई वाहनांचा वापर वाढला आहे. आपला विमानप्रवास वाढला आहे. हवाई वाहतुकीचा वेगाने झालेला विस्तार हे या तापमानवाढीचे एक प्रमुख कारण आहे. तसेच आपला वैयक्तिक स्तरावर वाढलेला प्रवास हेही. शिवाय खनिजतेल वापरून केलेले प्लास्टिकचे उत्पादन वाढले.
आपण घरात शीतकपाट (फ्रिज), वातानुकूलित व्यवस्था (ए.सी.) इत्यादी वस्तू वापरू लागलो. तापमानवाढीमुळे आपण सगळीकडे एसीचा जास्त वापर करू लागलो. त्यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण अधिक वाढले. परिणामी तापमान वाढले. असे हे चक्र सुरू झाले आहे.
तापमानवाढीला आळा घालायचा तर वातावरणातील कार्बन डायऑक्साईड वायू कमी करण्यासाठी किंवा त्याचे संचयन करण्यासाठी उपाय करावे लागतील. कार्बन डायऑक्साईड वायू कमी करायचा तर आपल्याला विजेचा वापर शक्य तेवढा कमी करावा लागेल. जेव्हा गरज नसेल तेव्हा कंटाळा न करता बटणे बंद करणे आपण सहज करू शकतो.
झालेल्या अमाप जंगलतोडीमुळे झाडांत होणारा कार्बनचा साठा कमी होत आहे. त्यामुळे वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढते आहे. झाडे लावून आपण हा साठा वाढवू शकतो.
नवीन प्रकारची इंधने वापरणे, रासायनिक खते न वापरता सेंद्रिय खते किंवा नैसर्गिक खते वापरणे, शक्य तेवढा सौरउर्जेचा वापर करणे, गरज नसताना अतिप्रवास (म्हणजे आवश्यक सुट्टी न घेणे नाही);
खास करून, हवाई वाहतूक टाळणे अशा कितीतरी छोट्या वाटणाऱ्या पण परिणामकारक अशा गोष्टी आपण करू शकतो. शेवटी तापमानवाढ आणि हवामानबदल याच्याशी तडजोड करणे आपल्याला भागच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.