मगोपचे पाऊल कोणत्या दिशेने?

मगोपने तृणमुलशी (TMC) केलेली युतीही त्यांना जड जात आहे असे चित्र दिसते.
MGP

MGP

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मगो पक्षाने आत्मसंशोधन करण्याची वेळ आलेली आहे. निवडणूकीपूर्वीच जर दोन संभाव्य उमेदवार पळतात, तर मग निवडणूकीनंतर कोणते ‘महाभारत’ होऊ शकेल याचा विचार पक्षाने आतापासूनच करायला हवा.

<div class="paragraphs"><p>MGP</p></div>
Indian politics: भाषा आणि राजकीय सीमांच्या मर्यादा

मगोपचे (MGP) आणखी एक संभाव्य उमेदवार प्रवीण आर्लेकर (Pravin Arlekar) हे भाजपच्या गळाला लागले. पेडणे मतदारसंघाच्या सर्वेक्षणात‌ चाचणीत आर्लेकर हे तसे आघाडीवर असल्याचे तर उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे ‘डेंजर झोन मध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पेडण्यात आर्लेकरांचे पारडे जड झाल्यासारखे वाटत होते. मगोपचे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सुदिन ढवळीकरानंतर आर्लेकरांचे नाव घेतले जात होते. पण अशी सगळी समीकरणे बनत असताना आर्लेकरांनी भाजपात उडी घेतलीच. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा बरेच दिवस सुरु होती. पण दोनच दिवसापूर्वी त्यांनी व मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन या चर्चेचा इन्कार केला होता. पण शेवटी ती चर्चा खरी ठरली व आर्लेकरांनी भाजपशी घरोबा केलाच. मगोने तृणमुलशी केलेली युती न पटल्यामुळे पक्ष सोडावा लागला असे वक्तव्य त्यांनी केले असले तरी पडद्यामागे वेगळेच राजकारण असल्याचे दिसत आहे. भाजपच्या सर्वेक्षणाप्रमाणे बाबूंना पेडण्याची उमेदवारी दिल्यास हा मतदारसंघ हातातून जाण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. भाजप फक्त विजयाची भाषाच जाणतो हे सर्वश्रूत आहे. या सर्वेक्षणात तराजूचा कल आर्लेकरांच्या बाजूने झुकत असल्याचे दिसल्याने भाजपने (BJP) आर्लेकरांना आपल्या गोटात सामील करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. त्याप्रमाणे आर्लेकर भाजपच्या संपर्कातही होते. आणि आता ते खरेच भाजपवासी झाले आहे.

मात्र, आर्लेकरांनी मगोपचा राजीनामा दिल्यावर पक्षाचे सर्वेसर्वा सुदिन ढवळीकर (Sudin Dhavalikar) यांनी ‘सुंठीवाचून खोकला गेला’ अशी जी प्रतिक्रिया दिली आहे ती न पटण्यासारखीच. आर्लेकर हे निश्चितच नगण्य उमेदवार नव्हते. गेली दीड-दोन वर्षे ते मगोपचे कार्य सातत्याने करीत होते. या काळात त्यांनी आपली पेडण्यातील राजकीय शक्ती बरीच वाढविली होती. असा उमेदवार मगोपच्या हातातून निसटणे हा पक्षाला बसलेला एक धक्काच म्हणावा लागेल. म्हणूनच सुदिनांची प्रतिक्रिया म्हणजे ‘ताकाला जाऊन गाडगे’ लपविण्यासारखेच वाटते.

आता पेडण्याचे दुसरे इच्छुक उमेदवार राजन कोरगावकर हे जरी मगोपक्षात प्रवेश करणार असले तरी ही शुन्यातून सुरुवात केल्यासारखेच वाटते. काही दिवसांपूर्वी मगोपचे मयेचे संभाव्य उमेदवार प्रेमेंद्र शेट यांनीही मगो त्यागला होता. तिथेही सर्वेक्षणाप्रमाणे प्रेमेंद्र हे विद्यमान आमदार प्रवीण झांट्येपेक्षा ‘वजनदार’ असल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच भाजपला प्रेमेंद्र हवेहवेसे वाटायला लागले. आणि त्यातूनच प्रेमेंद्र भाजपच्या गळाला लागले. जिंकून येण्याची क्षमता हाच निकष सध्या भाजप लावत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. आर्लेकरांना तर मगोपतून जाण्यापासून परावृत्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले. पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर तर आर्लेकर मगो सोडणार नाही असे शेवटपर्यंत सांगताना दिसत होते. पण शेवटी ‘सत्तेपुढे शहाणपण चालत नाही’ हेच खरे. भाजपने मगोपची वाताहात केली यात संशयच नाही.

<div class="paragraphs"><p>MGP</p></div>
नमो वैकुंठराणिये स्वामिनी। सकळा रचिलेचा वस्तु होवोनी।

2017 साली मगोपचे तीन आमदार निवडून आले होते. आता त्यातला सुदिन ढवळीकरांच्या रुपाने एकच आमदार शिल्लक राहिलेला आहे. आपले उमेदवार पळविले असा गळा काढण्यातही अर्थ नाही. ‘जो जीता वही सिंकदर’ हा आजच्या राजकारणातला परवलीचा शब्द बनला आहे. सध्याचे राजकारण हे प्रामाणिक राहिलेले नाही हे कोणीही सांगू शकेल आता पेडण्याच्या मगो कार्यकर्त्यांचे उदाहरण घ्या. ज्या आजगावकरांनी अडीच वर्षांपूर्वी मगोपला दगा दिला होता त्यांना परत उमेदवारी देण्याचा त्यांनी जो निर्णय घेतलाय, तो खरोखरच विस्मयाजनकच आहे. यात मगोपशी प्रामाणिक असलेले आपा तेली सारखे माजी पोलिस अधिक्षक सामील होतात याचा तर अधिकच विषाद वाटतो. हे कार्यकर्ते पक्षांतराला कायदेशीर ‘परवानगी’ देत नाही ना असेच त्यांचा निर्णय बघून वाटायला लागते. असले निर्णय पक्षाला घातक ठरू शकतात याची जाणीव या कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे होते. तरी बरे, पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी हा निर्णय धुडकावून लावलाय. खरे तर आता पक्षाने आत्मसंशोधन करण्याची वेळ आलेली आहे. निवडणूकीपूर्वीच जर दोन संभाव्य उमेदवार पळतात तर मग निवडणूकीनंतर कोणते ‘महाभारत’ होऊ शकेल याचा विचार पक्षाने आतापासूनच करायला हवा. मगोपचे संभाव्य उमेदवार म्हणून गणती असलेल्यांपैकी ढवळीकर बंधू व हळदोणेचे महेश साटलेकर यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार 2017च्या निवडणूकीच्या वेळी मगोपत नव्हता. त्यामुळे त्यांचा पक्षाच्या ध्येयधोरणांशी संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. याचेच रुपांतर फुटीरवृत्तीत होत असते.

मगोपने तृणमुलशी (TMC) केलेली युतीही त्यांना जड जात आहे असे चित्र दिसते. आर्लेकर व शेट यांनी हेच कारण दिले आहे. हळदोणेचे संभाव्य उमेदवार महेश साटलेकर हे ही विशेष खुश नसल्याचे दिसत आहे. तिथे तृणमुलतर्फे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आधीच ‘डेरा’ घातल्यामुळे मगोपचे साटलेकर यांची उमेदवारी ‘कट’ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एरव्ही सुध्दा लोक या युतीबाबत नाराजी व्यक्त करताना दिसताहेत. 2002 पासून मगोचे दोन वा तीन आमदारच निवडून येत आहेत. यावेळीही त्यात विशेष फरक पडेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. त्यामुळे तृणमुलशी युती करून यात फरक पडणार आहे का असा सवाल विचारला जात आहे. आर्थिकदृष्ट्या ही युती मगोपला फायदेशीर ठरण्याची शक्यता असली तरी तांत्रिक व वैचारिक दृष्ट्या ही युती कोणत्याही ‘अँगल’ ने संयुक्तिक दिसत नाही. युती केल्यामुळे मगो पक्षासमोर अनेक आव्हाने उभी राहिल्यासारखी वाटायला लागली आहेत. ‘बना बनाया खेल’ बिघडल्यावर कसे वाटते तसेच या युतीमुळे मगोप बाबत वाटायला लागले आहे. यातूनच पक्षाशी पाऊले थोडी मागे पडल्यासारखी दिसायला लागली आहेत.आता यातून मगो पक्ष कशी वाट काढतो व येणाऱ्या आव्हानाला किती समर्थपणे तोंड देतो याचे उत्तर येणारा काळच देईल.

- मिलिंद म्हाडगुत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com