
राजेंद्र केरकर
इसवी सनाच्या तिसऱ्या ते चौथ्या शतकात ख्रिस्ती धर्मियांत येशूच्या चित्रांचे आणि मूर्तीचे पूजन करण्याला प्रारंभ झाला आणि त्यातून नाताळाच्या प्रसंगी त्याची माता मेरी, पिता जोसेफ यांच्यासह बाल येशूच्या रूपाला चित्रित करण्यात येऊ लागले.
ख्रिस्ती धर्म परंपरेत जिझस म्हणजे येशू ख्रिस्ताला मुक्तीदाता म्हणून स्थान लाभलेले असून, गोव्यात ख्रिस्ती धर्माचे आणि तत्वांचे अवलंबन करणाऱ्या लोकमानसाने पवित्र क्रॉस तसेच विविध प्रकारच्या प्रतिमांच्या पूजनाला पूर्वापार प्राधान्य दिलेले आहे. मुक्तीदाता म्हणजे मसिहा असणारा येशू ख्रिस्त भगवंताचे रुप मानला गेला.
येशूची माता मेरी आपल्या नाझारेथ गावातून बेथलेहेम शहरात राजाज्ञेनुसार खाने सुमारीसाठी जातेवेळी गरोदर असल्याने तिला कुणाच्याच घरात प्रवेश मिळाला नाही आणि त्यामुळे एका गुरांच्या गोठ्याचा आश्रय घ्यावा लागला. तेथेच दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. बाराव्या शतकापर्यंत जगभर विखुरलेले ख्रिस्ती धर्माचे अनुयायी प्रत्यक्ष बेथलेहेम ख्रिस्ताच्या जन्मस्थळाच्या दर्शनार्थ भेट देण्यास जात असत.
परंतु तेराव्या शतकात प्रारंभी बेथलेहेम मुस्लिम राजवटीच्या ताब्यात आल्याने ख्रिस्ती धर्मीयांना तेथे जाण्यास प्रतिबंध आले आणि त्यामुळे इटली देशातल्या असिसि प्रांतातल्या फ्रान्सिस या संत पुरुषाने आपल्या साथीदारांच्या मदतीने १२३३ साली बेथलेहेममधील गोठ्याची प्रतिकृती निर्माण करण्यात यश मिळवले आणि तेव्हापासून ख्रिस्त जन्माच्या सोहळ्याप्रित्यर्थ माता मेरी आणि बाल येशूच्या प्रतिमा गोठ्यात गुरांसमवेत ठेवण्याची परंपरा सुरू झाली.
येशूने तत्कालीन समाजात नवीन विचार रुजवण्याचे प्रयत्न केले. परंतु त्याचे हे क्रांतिकारी विचार रुचले नाही आणि त्यामुळे धर्ममार्तंडानी राजाशी संगनमत करून येशूला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यास भाग पाडले. राजाच्या महालापासून टेकडीपर्यंत ख्रिस्ताला क्रॉस वाहिल्यावरती, शेवटी त्याच्यावरती खिळे ठोकून मारले.
मानवी समाजाला पापातून मुक्त करण्यासाठी क्रॉसच्या वध स्तंभावरती येशू अजरामर झाल्याकारणाने ख्रिस्ती धर्मियांसाठी क्रॉस पावित्र्याचा आणि त्यागाचा मानबिंदू ठरला. तेव्हापासून ख्रिस्ती धर्मियांत आपल्या गळ्यात सोन्याचांदीचे क्रॉस धारण करण्याला, ख्रिस्ती प्रार्थना मंदिराच्या मनोऱ्यावरती त्याचप्रमाणे ख्रिस्ती राजेघराण्यांच्या मुकुटावरती हिऱ्यारत्नांनी मढविलेले क्रॉस लावण्याची परंपरा रूढ झाली. येशू ख्रिस्ताला ज्या शुक्रवारी वध स्तंभावरती चढवले त्याला गुडफ्रायडे म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली.
जांभळ्या रंगाच्या वस्त्राने आच्छादलेला क्रॉस वेदीवर आणून क्रॉसचे हे लाकूड पहा, ख्रिस्त त्याच्यावरती टांगला अशा आयशाची प्रार्थना धर्मगुरु गातागाताना जांभळे वस्त्र सोडवतात आणि शेवटी उपस्थित भाविक क्रॉससमोर गुडघे टेकून, त्याचे चुंबन घेतात.
ख्रिस्तीधर्मीय बहुसंख्य असलेल्या गावी बऱ्याचदा सीमेवरती क्रॉस उभारून, वर्षातून एकदा खासकरून त्या पवित्र क्रॉसला विविधरंगी फुलांनी अलंकृत करून, त्याच्यावर रोषणाई करून प्रार्थना म्हणतात. त्यावेळी उपस्थित भाविकांना उकडलेले चणे प्रसाद म्हणून वाटले जातात. पवित्र क्रॉस हा ख्रिस्ती लोकमानसासाठी सांस्कृतिक आणि धार्मिक संचित ठरलेला आहे आणि त्यासाठी कौटुंबिक आणि सामूहिक प्रार्थनेच्या वेळी क्रॉससमोर आदरांजली अर्पण केली जाते.
लॅटिन भाषेतील ‘दियेस नातालीस’ म्हणजे जन्माचा दिवस असा अर्थ असून, ख्रिस्ती धर्मियांत तो येशू ख्रिस्ताच्या जन्माचा दिवस म्हणून २४ डिसेंबरच्या उत्तर रात्री नाताळ सण साजरा करण्याची जी परंपरा प्रचलित झालेली आहे तिचा गोमंतकीय ख्रिस्ती समाजाने स्वीकार केला.
नाताळाच्या सणात येशू ख्रिस्त आणि माता मेरीच्या पूजनाला प्राधान्य लाभलेले असून त्यात प्रामुख्याने बाल येशूच्या प्रतिमांचे पूजन केले जाते. नवागत येशू ते बारा वर्षांपर्यंतच्या प्रतिमांना बाल येशू किंवा पोर्तुगीज भाषेत मेनिनो जिझस म्हटले जाते. डिसेंबर २५ रोजी येशूच्या जन्माचा आनंदोत्सव नाताळ म्हणून गोवाभर उत्साहाने त्याचप्रमाणे विविध प्रथा, परंपरांचे श्रध्देनं पालन करून साजरा केला जातो.
इसवीसनाच्या तिसऱ्या ते चौथ्या शतकात ख्रिस्तीधर्मियांत येशूच्या चित्रांचे आणि मूर्तीचे पूजन करण्याला प्रारंभ झाला आणि त्यातून नाताळाच्या प्रसंगी त्याची माता मेरी, पिता जोसेफ यांच्यासह बाल येशूच्या रूपाला चित्रित करण्यात येऊ लागले. काही चित्रांत संत जोसेफ, पदुआचा अँथोनी आणि संत ख्रिस्तोफर यांच्या कुशीत बाल येशू दाखवलेला होता.
भाविकांसमोर बालक येशूची मूर्ती प्रेरणा आणि भावभक्तीची निर्मिती करण्यास प्रवृत्त ठरावी म्हणून तिची स्थापना करण्याला प्राधान्य दिले गेले. आजच्या झेक गणतंत्र देशातल्या प्राग राजधानी शहरात सोळाव्या शतकापासून बालयेशूची जी प्रतिमा पूज्यनीय मानलेली आहे त्यातून प्रेरणा घेऊन गोव्यातही त्याच धर्तीवरती लाकूड, मेण, माती, धातू, हस्तीदंत आदीपासून सुरेख प्रतिमा निर्माण करण्याची परंपरा रूढ झाल्याची मानली जाते.
सोळाव्या शतकापासून एकोणिसाव्या शतकापर्यंत डच आणि पोर्तुगीज व्यापारी पूर्व आफ्रिका, मोझांबिका आणि भारतातून हस्तिदंताची निर्यात स्पॅनिश आणि पोर्तुगीज वसाहतीत करायचे आणि अशा मूल्यवान हस्तिदंतात कारागिर अत्यंत कौशल्याने कलाकुसरीचा आविष्कार घडवत. बाल येशूच्या मूर्तीची निर्मिती करत असे.
गोव्यात आणि भारतात ज्या बालकृष्णाच्या एकापेक्षा एक रेखीव आणि सुंदर मूर्तीची निर्मिती मंदिरात त्याचप्रमाणे घरात पूजेसाठी करण्यात आल्या होत्या, त्यातून प्रेरणा घेऊन गोव्यातल्या ख्रिस्तीधर्मियांतही बाल येशूच्या मूर्तीची निर्मिती करण्यात आली होती, त्याची प्रचिती अशा मूर्तीतून विविध ठिकाणच्या प्रदर्शनातून दृष्टीस पडते.
प्राग येथील मेणाचा गिलावा दिलेली बाल येशूची प्रतिमा लाकडाची असून, तिची स्थापना अवरलेडी व्हिक्टोरियसच्या चर्चमध्ये करण्यात आलेली आहे. गोव्यात ज्या बाल येशूच्या मूर्तीची ख्रिस्ती प्रार्थना मंदिरात स्थापना करण्यात आलेली आहे, त्यात विविध परंपरा आणि वैशिष्ट्यपूर्ण पैलूंचे दर्शन घडते.
दक्षिण गोव्यात कोलवा येथील अवरलेडी ऑफ मर्सीच्या चर्चमध्ये जी बाल येशूची प्रतिमा आहे ती मेनिनो जिझस म्हणून ओळखली जाते आणि तिच्याशी चमत्कारांचे वलय निर्माण झाल्याची लोकश्रध्दा रूढ आहे. पवित्र वेदीवरून बाल येशूची ही प्रतिमा वार्षिक फेस्ताच्या वेळी खाली आणली जाते आणि भाविकांना आशीर्वाद देण्यासाठी उपलब्ध केली जाते.
१६४८ साली ही प्रतिमा जेझुईत पंथाचा धर्मगुरू फादर बेंटो फर्रेरा यांनी स्थापन केल्याची मानले जाते. बाल येशूची ही मूर्ती नवसाला पावते, भाविकांना संकटांतून मुक्त करते अशी धारणा असल्याकारणाने कोलवा येथे दरवर्षी संपन्न होणाऱ्या ऑक्टोबर महिन्यातल्या दुसऱ्या सोमवारी फामा द मेनिनो फेस्ताला भाविक उपस्थित रहातात आणि तेथील बाल येशूच्या मूर्तीचे चुंबन घेऊन अथवा तिच्यासमोर नतमस्तक होऊन आपला आदरभाव व्यक्त करतात.
जुन्या गोव्यातल्या ख्रिश्चन आर्ट गॅलरीत बाल येशूच्या कोरीव कलाकुसरीने युक्त सुंदर मूर्ती हस्तीदंतापासून कोरलेल्या पहायला मिळतात. गोव्यात बऱ्याच ठिकाणी जुन्या सरदारांची, जमीनदारांची तीनशे वर्षांपेक्षा जी प्रासादतुल्य घरे आहेत त्यातल्या खास तयार केलेल्या पवित्र वेदीवरती बाल येशूची काष्ठशिल्पे आजही सुरक्षित ठेवलेली पहायला मिळतात.
या काष्ठशिल्पातल्या बाल येशूच्या मूर्तीत निरागसता, प्रसन्नता आणि दिव्यत्वाचे भाव दाखविण्यात स्थानिक कारागीर यशस्वी ठरलेले आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेली जुन्या गोव्यातील ऐतिहासिक बासिलिका ऑफ बॉम जिझसची वास्तू ही खरेतर बाल येशूच्या उपासनेचे महत्त्वाचे केंद्र आहे.
येथील बालक येशूची मूर्ती जगभर विखुरलेल्या ख्रिस्ती भाविकांना वात्सल्य, भक्तीभावाचे प्रतिक म्हणून परिचित आहे. पूर्वापार येथील गोमंतकीय लोकमानस चोडण बेटावरच्या देवकीकृष्णाच्या माता- पुत्राच्या एकत्रित मूर्तीचे मनोभावे पूजन करायचे,
जेव्हा सोळाव्या शतकात त्यांचे सक्तीने ख्रिस्तीकरण केले तेव्हा त्यांच्या ध्यानीमनी असलेल्या देवकी आणि बालकृष्णाच्या रूपाला ख्रिस्ती धर्म, परंपरेने बाल येशू आणि मातामेरीचा पर्याय उपलब्ध करून दिला आणि त्यामुळेच करुणासिंधू बाल येशूच्या विविध शैलीतल्या, विविध स्वरूपातल्या एकापेक्षा एक सुंदर मूर्तीचे समृध्द वैभव गोवाभर पहायला मिळते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.