History Of Goa: इतिहास शिका, बोध घ्या!

History Of Goa: आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय हे स्वप्न साकार करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी गोव्याचा इतिहास शिकणं उचित होय. आत्मनिर्भर व्हायला गोव्यात स्वयंरोजगार करायला खूप वाव आहेत.
History Of Goa
History Of GoaDainik Gomantak

History Of Goa: गोव्याच्या विविध पैलूंविषयी क्वीझ घेताना मी मुलांना हे दोन प्रश्न हमखास विचारतो. राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्ती संग्रामाचे रणशिंग फुंकले 18 जून 1946 रोजी, मडगांवहून. तो दिवस कोणता होता? (आठवड्याचा) जांबावलीचा गुलालोत्सव दर वर्षी याच दिवशी येतो. दोन्ही प्रश्नांचं उत्तर मंगळवार असं आहे.

History Of Goa
Goans Surrender Passport: गोव्यातील 2000 हून अधिक जणांनी भारतीय पासपोर्ट केला परत; काय आहे कारण? जाणून घ्या...

बाकीबाब बोरकर यांनी त्रिवार मंगळवार ही कविता रचून गोवेकरांना मुक्तीसाठी लढण्याची प्रेरणा दिली. हा सुध्दा छान प्रश्न आहे. आज गोवा मुक्ती दिन. मुक्ती दिनाचं महत्व आज मुलांना, युवकांना समजावं म्हणून त्यांना अनेक माध्यमातून, कार्यक्रमातून, स्पर्धेतून प्रेरीत करता येणं शक्य आहे. क्वीज म्हणजेच प्रश्नमंच स्पर्धा हे एक शिकण्याचं सशक्त माध्यम.

स्वातंत्र्यसैनिक स्व विश्वनाथ लवंदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गोवा मुक्ती लढा या विषयावरील एक क्वीज स्पर्धा कॉलेज विद्यार्थ्यांसाठी पर्वरी येथे व्हायची. त्यांच्या कुटुंबियांच्या आग्रहास्तव अनेक वर्षं ही स्पर्धा मी आयोजित केली. क्वीज मास्टर म्हणून एक वेगळंच आव्हान स्वीकारावं लागलं. यंदा जे प्रश्न विचारले जात ते प्रश्न व उत्तर मुलं व प्राध्यापक टिपून घेत.

म्हणून पुढील वर्षी नवे प्रश्न पुस्तकातून हुडकून काढून निवडणे हेच आव्हान होतं. पण त्या निमित्त अनेक पुस्तकं धुंडाळणं, अभ्यासणं हा स्वाध्याय घडला. मुळातच क्वीज स्पर्धेत एक जबरदस्त चैतन्य असतं. चुकलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं जातं व स्पर्धक मुलं तसंच प्रेक्षकवर्ग ती विसरत नाही, कधीच.

गोवा मुक्ती दिना निमित्त अशा प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जाव्या व त्यात नवकल्पना आणून, नवीन प्रश्न समाविष्ट करून ते आयोजन शक्य आहे, हे स्पष्ट करण्याचा हा हेतू.

गोवा सरकारने स्वातंत्र्यसैनिकांची थोडक्यात माहिती देणारे दोन खंडी ग्रंथ प्रकाशित केले आहेत. हूज हू या नावाने ते उपलब्ध आहेत. मनोहर हि सरदेसाई यांचेही दोन खंडी मराठी ग्रंथ गोवा सरकारने प्रकाशित केले आहेत. अनेक इंग्रजी ग्रंथ आहेत. डॉ टी बी कुन्हा यांचं डिनॅशनलायझेशन ऑफ गोअन्स हे पुस्तक आहे. इतर इंग्रजी पुस्तके आहेत.

1946 च्या पुर्वीचा गोव्याचा इतिहासही फार रंजक आहे. वेगवेगळ्या कालखंडाप्रमाणे तो शिकावा लागेल. पिंटोचं बंड, राणेंचं बंड असे अनेक टप्पे त्यात आहेत. पाठ्यपुस्तकात मुलांना गोव्याचा इतिहास आहेच. पण अवांतर वाचनात तपशीलवार समजून घेता येईल. त्यासाठी गोवा मुक्ती इतिहासावर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, एकांकीका स्पर्धा घेण्यास वाव आहे. त्यातून हा इतिहास ठळकपणे, उठावदारपणे बिंबवला जाऊ शकतो.

या संस्कारातून आजच्या पिढीला गोवा मुक्तीचं महत्व कळेल. 450 वर्षांची ही जुलमी वसाहतवाद्यांची सत्ता होती. या इतिहासातील कालखंडामुळे जे परीवर्तन समाजजीवनाच्या व गोमंतकीयांच्या एकंदर जीवनचक्रात झाले ते विद्यार्थ्यांना कळून चुकेल. खास करून कोकणी भाषेवर जो पोर्तुगीजचा प्रभाव आहे तो सुध्दा शिकून घ्यावा लागेल.

पुर्वी सुमारे चाळीस टक्के पोर्तुगीज शब्द कोकणीत होते. म्हणजे माझे आईवडील वापरत. हळूहळू ते प्रमाण कमी झाले. आताची युवा पिढी फक्त 10 टक्के पोर्तुगीज शब्द असलेली भाषा वापरते. ते सुध्दा कोकणी भाषेत रूतून व रूढ होऊन एकरूप झालेले हे शब्द आहेत. उदाहरणार्थ – फोग, जनेल. पोर्तुगीज प्रभावामुळे रूढ झालेले कोकणीतील हे शब्द कोणते हे भाषाभ्यास करणाऱ्या पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवावे लागेल.

प्रा एडवर्ड डिलिमा यांनी या विषयावर छान कोशवजा पुस्तक लिहिलं आहे. स्टेटीक काहीच नसतं. सगळंच म्हणजे भाषाही परीवर्तनशील असते. अभ्यासकानं साक्षीरूपानं त्याकडे पाहावं. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोंय हे स्वप्न साकार करायचं असेल तर विद्यार्थ्यांनी गोव्याचा इतिहास शिकणं उचित होय. आत्मनिर्भर व्हायला गोव्यात स्वयंरोजगार करायला खूप वाव आहेत. तसे अनेक प्रयत्न होत आहेत.

History Of Goa
Goa Accident Death: मृत्यू अपघाती की घातपात!

उद्योग, शेती धरून इतर क्षेत्रात युवक उत्साहाने उतरत आहेत. कोविडनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेपुढं आव्हानं निर्माण झाली. अर्थचक्राची घडी पुर्णपणे सुरळीत करण्यासाठी आज युवकांचा हातभार मोलाचा आहे. गोव्यात दुग्ध व्यवसायासाठी अजूनही आपण आपल्या पायावर सक्षमपणे उभे झालो नाहीत.

त्यासाठी युवकांनी या दुग्ध व्यवसायाकडे वळून राज्याला आत्मनिर्भर करायला प्रयत्नशील व्हावं लागेल. फुलं, भाजीपाला व इतर अऩेक उत्पादनांसाठी अजून राज्याला इतर शेजारी राज्यांवर अवलंबून राहावं लागत आहे. ही लागव़ड शेतीबागायतीतून करण्यासाठी उपक्रम सुरू झाले पाहिजेत.

तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कौशल्य क्षमता वाढवण्यास कार्यरत राहिलं पाहिजे. कृत्रिम बुध्दीमत्ता म्हणजे ए-आय येत आहे. त्याचेही आपले असे फायदे व तोटे आहेत. ते समजून घेतले पाहिजे. अनेक कामं यंत्राद्वारे केली जाणार आहेत. साहजिकच, मोठ्या प्रमाणात नोकऱ्या जाणार आहेत, असे भाकीत अर्थतज्ञ व इतर जाणकार करत आहेत. नव्या बदलांना सामोरे जाण्यास सज्ज राहण्याची गरज आहे.

गोव्यातही पुस्तकांचा गांव व्हावा या विषयावरचा एक लेख हल्लीच मी लिहिला होता. महाराष्ट्रात, केरळात असे गांव आहेत. ज्ञानवृध्दी, रोजगारवृध्दी, पर्यटनवृध्दी असे अनेक फायदे त्यात समाविष्ट आहेत. गोव्यातील साक्षरता प्रमाण देशात फार उच्च आहे. त्यामुळे पुस्तक ग्राम हा गोव्यातील एक प्रकल्प स्वप्न न उरता तो साकार व्हायला पाहिजे.

तीन पूल पणजीत मांडवी नदीवर असूनही अधूनमधून रहदारीची कोंडी पणजीत वा पर्वरी मार्गावर होते. ती लक्षात घेऊन राज्याच्या एकंदर रहदारीचं दूरदृष्टी ठेऊन सांगोपांग नियोजन व्हावं. अपघातांचं, भीषणतेचं व त्यात मृत्यू येण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्याला आळा घालण्याचे संघटीत प्रयत्न हवेत.

स्वातंत्र्यसैनिकांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरो. त्यांनी ज्या खस्ता खाल्ल्या, कैदेत अमानुष जाचाला तोंड दिलं जे आमच्या पिढीनं स्वातंत्र्यसैनिकांच्या तोंडून ऐकलं, ते फारच ह्रदयद्रावक होतं. गोव्याने कर्तृत्वक्षेत्राच्या प्रत्येक आघाडीवर उंच उंच मुक्त भरारी मारण्यासाठी आमचा पाठिंबा देऊ. मुक्ती दिनाच्या शुभेच्छा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com