इतिहासजमा झालेली पुरण शेती....

पुरण शेतात काम करणाऱ्यांची म्हादईच्या तिरांवर वर्दळ असायची.
पुरण शेती
पुरण शेतीDainik Gomantak

गोवा: डिसेंबर- जानेवारी महिन्यात पुरण शेतात काम करणाऱ्यांची म्हादईच्या तिरांवर वर्दळ असायची. काम करणार्या सगळ्यांची तोंडे नदीच्या दिशेने. वरचे कजवळी ते खाली गांजेपर्यंत एकूण 33 गांवातले शेकडो कष्टकरी लोक भात शेती करण्यासाठी राबायचे. काम जिकिरीचं. अजब पध्दतीच्या या कामाला घरातली सगळीच मंडळी जुंपायची. सेंद्रीय खतावर पिकणारी गोव्यातील ही एकेकाळची अफलातून शेती होती.

पावसाळ्यात म्हादई नदी दुतोंडी वाहते. पुरामुळे रेती, दगड (चाळचे गुणें), कुसारें (झाडाच्या पानांचा गाळ) आणि काळी माती प्रवाहाबरोबर वाहत खाली येते. नदीच्या तिरावर जागोजागी यांचे ढीग तयार होतात. स्थानिक भाषेत त्याला “हुडे” म्हणतात. हा गाळ काढायला दीड महिना लागायचा. दुपारच्या उन्हाचा मार अंगावर घेत ही लोकं न थकता काम करायची. वायंगणी पुरणीत साठलेली शेकडो ट्रक रेती बांधाचं पाणी आत घेऊन पारंपरिक तंत्र वापरून काढली जात असे.

पुरण शेती
मनोरुग्णांविषयीचे औदासिन्य कधी सरेल?

पुरण शेतीचा तळ (सपाटीकरण) तयार केला जातो. `वायंगणी’ पुरणीची नांगरणी केली जाते, तर ‘झोती’च्या पुरणीच्या जागेत झाडाच्या छोट्या फांद्या पसरल्या जातात आणि मग त्याच्यावर बाहेरची सुपीक माती आणून जमीन तयार केली जाते. नदीच्या बाजूने शितारी लावली जाते. या कल्पकतेला तोड नाही. शितारी नदीच्या पात्रात उभी राहते. त्यासाठी जंगलांत जाऊन खुंटे आणि आडवी लांब लाकडं (आडीं) आणली जातात. शितारी बांधण्यासाठी झाडाच्या फांद्यांचा वापर केला जातो. उर्वरित तिन्ही बाजूंना कांटेरी कुंपण उभे केले जात असे. जानेवारी महिन्याच्या अखेरीस पुरण शेताची रोपणी व्हायची. पुढे तीन महिने पक्षी आणि जंगली जनावरांपासून शेताची राखण आणि नंतर मे महिन्यात कापणी आणि मळणी.

पुरण शेती
नाट्यशिबिर केवळ नाटकासंबंधी नसते तर...

पावसाळा सुरू झाला की नदीचं पात्र परत भरून वाहायची. शेतजमीन पाण्याखाली जायची. तिचं अस्तित्व मिटून जायचे. या पुरण शेतीला धोका असतो तो ऐनवेळी पडणाऱ्या पावसाचा. सुगीच्या दिवसात धो धो पाऊस कोसळायला लागल्यावर नदी भरून वाहते. पाण्याच्या प्रवाहाला गती मिळते. आणि बघता बघता पुरण शेत वाहून जाते. ऐनवेळी आलेल्या पावसामुळे सगळे कष्ट पाण्याखाली गेल्यावर कष्टकरी लोकांचा आक्रोश सुरू व्हायचा. आणि पहिला प्रश्न उभा राहयचा “माणूस कसाही जगेल पण आतां गुरानी काय खावं?”

‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनेअंतर्गत गोवा शासनाने नदीच्या पात्रात कॉंक्रिटचे बांध उभे केले आणि पुरण शेतीची जमीनच कायमची पाण्याखाली गेली. पुरण शेतीचे अस्तित्वच आता संपले आहे. सत्तरीचे वैभव असलेली ही शेती 2005 पासून इतिहासजमा झालेली आहे. परंपरेने जोपासलेले लोकज्ञान लोप पावल्यामुळे सत्तरीतल्या बोलीतील हजारो शब्द नामशेष झालेले आहेत.

- प्रकाश पर्येकर

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com