झळके सतेज, ढगांवर वीज

वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह होय. वीज म्हणजे ढगांत (गर्जन्मेघात) असलेले बर्फाचे कण एकमेकांवर आदळून वादळी ढगांमध्ये होणारे विद्युत-उत्सर्जन.
GOA
GOADainik Gomantak

डॉ संगीता सोनक

उकाड्याचे दिवस संपत आलेत. पावसाळा सुरू होण्याची तिष्ठतेने वाट पाहतो आहोत. ग्रीष्म ऋतूला निरोप देऊन आतुरतेने वर्षा ऋतूच्या आगमनाची प्रतीक्षा चालली आहे. तप्त भूमी पर्जन्यसरींसाठी आसुसली आहे. अशातच ‘रेमल’ चक्रीवादळ बांगलादेश आणि भारतात, खास करून ईशान्य भारतात, घोंगावत आहे,

सगळीकडे थैमान घालत आहे. ‘रेमल’ हे नाव ओमानने दिले असून हा अरबी शब्द आहे, याचा अर्थ वाळू असा होतो. सद्या गोव्यातही सुसाट वारा आणि विजांचा कडकडाट अधून मधून चालू आहे. हल्ली ही वादळे, विजेचे आघात, पूर फारच ऐकू येत आहेत. हवामानबदलाचे परिणाम. आमची पिढी तशी हसत खेळत लहानाची मोठी झाली.

मोठयाने आलेला म्हातारीच्या दळणाचा आवाज ऐकला की लहान मुले घाबरून जायची. तेव्हा गडगडाट झाला की ‘म्हातारी दळता’ असे आजी सांगायची. ‘म्हातारीचे दळण’ ही कल्पना म्हणायला आवडली तरी हा ढगांचा गडगडाट आहे हे माहीत असायचे. खाली गरम हवा आणि वर अतिथंड असलेली हवा, यामुळे अस्थिर झालेले वातावरण. पृष्ठभागाजवळील गरम हवा वर जाते, वरच्या थंड हवेत आदळते तेव्हा गडगडाट होतो, मेघगर्जना होते. निरभ्र आकाशात ढग जमू लागतात नि हळूहळू पर्जन्यवृष्टी सुरू होऊ लागते.

पर्जन्य, वर्षण हा जलचक्राचा एक महत्वाचा भाग आहे. समुद्राचे पाणी सूर्याच्या उन्हाने तापले की त्याचे बाष्पीकरण होते. हे ढग आकाशात जातात आणि तिथे थंड हवा लागली की पावसाच्या स्वरुपात पृथ्वीवर येतात हे आपण सगळेच शाळेत शिकलो. पण आता समजायला लागले आहे की ढगांचेही अनेक प्रकार असतात.

सगळेच ढग काही पाऊस पाडत नाहीत. या वेगवेगळ्या ढगांपैकी गर्जन्मेघ किंवा क्यूम्युलोनिम्बस ढग हा एक बहु-स्तरीय ढग आहे. हा ढग गडगडाट, पर्जन्यवृष्टी, गारा, विजा निर्माण करू शकतो. उष्ण आणि आर्द्र हवेच्या अभिसारी (वातचक्राच्या केंद्रीय प्रदेशाकडे जाणाऱ्या) प्रवाहांमुळे गर्जन्मेघ निर्माण होतात. याच्या खालच्या भागात जलबिन्दू तर वरच्या भागात हिमकण असतात.

एकावर एक रचलेल्या मेघपुंजामुळे हा उंच वाढतो. वरील भाग ऐरणीप्रमाणे दिसल्यामुळे याला ऐरणीमेघही म्हणतात. घनदाट, काळे दिसणारे हे ढग अस्थिर हवेचे निदर्शक मानले जातात. बऱ्याचदा ह्या ढगांना जोरदार वादळवारे, गडगडाट, विजा, गारा आणि वृष्टी सोबत करतात. असे वारे व जोरदार वृष्टी ही काही वेळा विध्वंसक ठरू शकते. मात्र हे ढग फार काळ टिकत नाहीत. बहुतेक वेळा हे ढग पावसाळ्याच्या आधी किंवा शेवटी आकाशात प्रकटतात.

लहानपणी पावसात भिजण्यात आणि जागोजागी साचलेल्या पावसाच्या पाण्यात पाय बुडवून नाचण्यात काय मजा यायची. आमच्या चिरंजीवांनीही पावसाच्या डबक्यांत थयथय नाचण्याची मजा मनसोक्त लुटली आहे. आजही लहान मुलांना पावसात भिजताना, नाचताना बघणे हे एक नयनरम्य दृश्य आहे. त्यांच्या चेहर्‍यावर दिसून येणारा आनंद मोलाचा आहे. पण अनेक कारणांमुळे पृथ्वीवर वर्षण सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही.

विषववृताजवळ याचे प्रमाण जास्त असते. भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशातही पावसाचे प्रमाण जास्त असते. तसेच गर्जन्मेघ, वीजा, यांचे प्रमाणही येथे जास्त आहे. सोसाट्याचा वारा, मेघगर्जना, तडिताघात, पर्जन्य आणि/किंवा गारांची वृष्टी, भूपृष्ठावरील हवेच्या तापमानात झपाट्याने पडणारा उतार यांमुळे गडगडाटी वादळाला काही तज्ज्ञ एक लक्षणीय आविष्कार मानतात. गडगडाटी वादळात प्रचंड शक्ती मुक्त केली जाते.

हा गडगडाट आणि वादळ जवळचे आहे की दूरवरचे ते विजांचा लखलखाट आणि आवाज यातील वेळेच्या फरकावरून कळून येते. आपल्यापर्यंत येणार्‍या ढगांतील प्रकाशाचा वेग आणि ध्वनीचा वेग यांच्यात फरक असतो. ध्वनीवेगापेक्षा प्रकाशवेग जास्त असल्यामुळे ध्वनीला आपल्यापर्यंत पोहोचायला थोडा जास्त वेळ लागतो.

प्रकाशवेग प्रतिसेकंदास ३ लक्ष कि.मी. आहे तर ध्वनिवेग प्रतिसेकंदास सुमारे ३३० मी. एवढा फरक असल्यामुळे ढगात वीज चमकली की आपल्याला लगेच दिसते. पण गडगडाटाचा आवाज नंतर ऐकू येतो. सहसा आकाशात वीज चमकलेली दिसणे आणि मेघगर्जना ऐकू येणे यांमध्ये १० सेकंदांपेक्षा कमी काळ लोटत असला की, ते गडगडाटी वादळ स्थानिक आहे असे मानले जाते. मात्र कधी कधी गर्जनमेघ जास्त अंतरावर असला तर वीज चमकलेली दिसते पण मेघगर्जना ऐकू येत नाही.

वीज म्हणजे पृथ्वीच्या वातावरणात असणारा प्रचंड भाराचा विद्युत प्रवाह होय. वीज म्हणजे ढगांत (गर्जन्मेघात) असलेले बर्फाचे कण एकमेकांवर आदळून वादळी ढगांमध्ये होणारे विद्युत-उत्सर्जन. हे उत्सर्जन एखाद्या ढगाच्या आत होऊ शकते, दोन ढगांमध्ये असू शकते, अथवा एखादा विद्युत ढग आणि जमीन यांच्यामध्ये होऊ शकते.

हा तिसरा प्रकार म्हणजे वीज कोसळणे किंवा वीज पडणे अर्थात तडिताघात. भारतासारख्या उष्णकटिबंधीयप्रदेशात अशा तडिताघातांचे प्रमाण इतर देशांच्या मानाने जास्त असते. या तडिताघातामुळे प्रखर उष्णता आणि प्रचंड दाब निर्माण होतो. यामुळे जीवितहानी होऊ शकते. म्हणून मेघगर्जना चालू असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे जरूरी आहे. झाडाखाली थांबू नये, झाडांपासून लांब राहावे.

घरात राहणे अधिक सुरक्षित आहे. दारे, खिडक्या बंद असलेल्या इमारती जरा जास्त सुरक्षित मानल्या जातात. घराबाहेर चारचाकी वाहने मोकळ्या मैदानापेक्षा जास्त सुरक्षित मानली जातात. जनावरानांही सुरक्षित ठिकाणी ठेवावे. जवळ कुठलीही धातूची वस्तू ठेवू नये. शक्यतो जवळील आणि घरातील सर्व विद्युत उपकरणे बंद ठेवावीत. तडिताघात, चक्रीवादळ आणि जोरदार पर्जन्यवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पूर्ण सावधगिरी बाळगणे जरूरी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com