Goa Rain : धुवाँधार पावसाचे सततचे आव्हान

Goa Rain : यंदाच्या पावसात गोव्यात प्रथमच पाच मानवी बळी गेले आहेत. गोव्यात तसे पाहिले तर जून ते ऑगस्ट व सप्टेंबरचा पहिला पंधरवडा असा पाऊस पडत होता.पण हल्ली त्याचा मुक्काम ऑक्टोबरपर्यंत असतो. अनेकदा नोव्हेंबर व डिसेंबरातही तो पडताना आढळतो.
Goa Weather Update: शाळेसह घरादारांत घुसले पाणी!
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

प्रमोद प्रभुगावकर

गोव्यात यंदा मॅान्सून नाही म्हटले तरी पंधरा वीस दिवस उशीरा दाखल झाला. त्याने जूनच्या शेवटच्या टप्प्यात सलामी दिली व त्यामुळे यंदा तो हवामान खात्याला खोटे पाडतो की काय अशी शंका व्यक्त केली जात होती.

पण जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याने जो जोर पकडला आहे तो आज पंधरवडा उलटला तरी कायम आहे. तो इतका की जूनच्या शेवटच्या टप्र्यातच केवळ नव्हे तर जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सरासरी गतवर्षी पेक्षा कमी आहे असे म्हणणारे आता गतवर्षीपेक्षा जादा पाऊस पडला असे सांगताना दिसत आहेत.

गेल्या आठ दहा दिवसात तर असा काही पाऊस कोसळला की वयोवृध्द व्यक्तीही आपण आपल्या आयुष्यात असा पाऊस पाहिलेला नाही असे सांगताना दिसत आहेत. गेल्या रविवारी-सोमवारी उत्तर गोव्यात पडलेल्या पावसाने तर नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

ढगफुटी म्हणजे काय याचा प्रत्यय त्या दिवसांत गोव्याच्या अनेक भागांत आला. यापूर्वी म्हणजे 2012 मध्ये काणकोणात आलेला महापूर हा घाटावर झालेल्या ढगफूटीमुळे होय असे तज्ज्ञांनी म्हटले होते. संपलेल्या आठवड्याच्या प्रथमार्धांत उत्तर गोव्यात व विशेषतः बारदेस -तिसवाडीत व पेडणेच्या काही भागात आलेले पूर अशा ढगफूटीमुळेच असल्याचे दिसून येते.

गेली अनेक वर्षे तज्ज्ञ मंड़ळी वातावरण बदल व तपमान वाढीबाबत दिलेल्या इशा-यांकडे सरकारच केवळ नव्हे तर प्रत्येक व्यक्तीने गंभीरपणे पहायला हवे हेच यंदांचा पाऊस सांगत आहे. पण कोणीच ते गांभिर्याने घेत नाही व त्यांतूनच ही परिस्थिती निर्माण होत आहे. देशाच्या उत्तर भागांत उत्तराखंड व शेजारील राज्यात कोसळत असलेल्या पावसाने तेथील जनजीवन विस्कळित तर करून सोडले आहेच पण मानवी बळीही घेतलेले आहेत.

गोव्यात तसे पाहिले तर जून ते ऑगस्ट व सप्टेंबरचा पहिला पंधरवडा असा पाऊस पडत होता पण हल्ली त्याचा मुक्काम ऑक्टोबर पर्यंत असतो. अनेकदा नोव्हेंबर व डिसेंबरातही तो पडताना आढळतो. पण त्याची गंभीरपणे नोंद ना सरकार घेते ना आपण त्यामुळे अनेकदा सगळेच फशी पडताना दिसतात. यंदाच्या पावसात गोव्यात प्रथमच पाच मानवी बळी गेले आहेत ते भिंती कोसळून त्या खाली चेंगरून. त्यावरून पावसाची तीव्रता लक्षात येते.

त्यातील एका घटनेत माय-लेकाचा बळी गेला तो डोंगरी येथे तर कुंडई औद्योगिक वसाहतीत संरक्षक भींत कोसळून तीन कामगार मरण पावले. मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर झाली तर डोंगरी येथील घर पुन्हा बांधून देण्याची हालचाल आता यंत्रणेने सुरु केली आहे. पण गेलेले जीव काही परत येणार नाहीत हे तेवढेच खरे आहे. काहींनी या प्रकरणाचे राजकारण करण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येते.

मुद्दा तो नाही तर अशा अस्मानी संकटाचा सामना करण्यास आपण सक्षम नाही हेच यंदांच्या पावसाने दाखवून दिले आहे. पावसाळी आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सरकारने जिल्हा स्तरावर आपत्कालीन यंत्रणा तैनात केलेली आहे पण तीसुध्दा अशा संकटाला तोंड देण्यास पुरेशी नाही हेच यंदांच्या पावसाने दाखवून दिले आहे.

उत्तर गोव्यात उभारलेल्या नव्या राष्ट्रीय महामार्गाच्या कडा कोसळून जागोजागी हा रस्ता बंद करावा लागला तर राज्याच्या अनेक भागांतील सबवे पाण्याखाली गेल्याने तेथेही वाहतुकीचा खोळंबा झाला. गोमेको जवळील बांबोळी येथील सबवे तसेच मडगावांतील पेडा येथील सबवे मध्ये गेली अनेक वर्षे ही समस्या आहे. पेडा येथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविलेला असतानाही पाण्याची समस्या कां निर्माण होते याचे उत्तर मिळत नाही.

सुरावली, नावेली, नुवे सारख्या भागांतही हीच समस्या दिसून आली. त्यामुळे सबवेचे नियोजन सदोष आहे का असा प्रश्न पडतो, तसे असेल तर वेळीच त्यावर उपाय कां योजला जात नाही याचे उत्तर आपत्कालीन यंत्रणेने शोधायला नको का? पण ते शोधले जात नाही या वरून या यंत्रणा कागदो पत्रीच दाखविल्या जात तर नाही ना अशी शंका येते.

रविवारी ढगफूटी प्रमाणे पाऊस कोसळला हे खरे आहे. पर्वरी-म्हापसा मार्गावर गिरी येथील महामार्गाला नदीच्या प्रवाहासारखे आलेले रुप तसेच पणजीत अटल सेतूच्या खाली जुन्या मांडवी पुलावर तुंबलेले पाणी या मुळे खरे तर साबांखाने दुस-या दिवशीच कार्यरत व्हायला हवे होते पण तसे दिसले नाही.

वास्तविक रस्त्यांवर पाण्याची समस्या कुठे निर्माण होते ते तपासण्यासाठी संबंधित विभा्गाचे पथक असा धुवांधार पाऊस पडत असताना पहाणी करायला हवी होती पण तशी ती कुठेच दिसली नाही. मग ही मंडळी या समस्येवर उपाय कशी शोधणार. सतत दोन दिवस पाऊस कोसळत असूनही या लोकांना ते सुचले नाही यावरून काय ते लक्षात येते.

दक्षिण गोव्यात मडगाव केपे रस्ता पारोडा येथे अशा मुसळधार पावसांत पाण्याखाली जातो. ही हल्लींची नव्हे तर गेल्या अनेक वर्षांची समस्या आहे. खरे तर हे का होते याचा अभ्यास साबांखा व जलश्रोत खात्याने करायला हवा पण प्रत्यक्षात तशी हालचाल अजून झालेली नाही, यंदा तर जांबावलीकडील रस्ता तसेच काणकोण तालुक्यात अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेल्याची उदाहरणे आहेत.

पण त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मडगावलगत मुंगूल, तळेबांध, बाणावली हे भाग नेहमीच पुराच्या समस्येने भेडसावलेले असतात. यंदा साळ नदींतील गाळ उपसा करूनही समस्या ओढवली. तिच्या कारणांचा शोध घेण्याची गरज आहे. तेथील रहिवासी पश्चिम बगलरस्त्याकडे बोट दाखवत आलेले आहेत. त्याकडे दुर्लक्ष न करता अशा प्रश्नांच्या मूळाशी जाणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com