बारावंश

खरंतर वरवंट्याचा हा प्रवास अनाकलनीय असाच आहे. विशाल वाढलेल्या एखाद्या वटवृक्षाला त्याच्या मूळ मातीपासून हुमटून काढून दुसऱ्या ठिकाणी आणून रोपण करणे ही कृती…ते क्षण साधेसुधे नाहीत.
goa
goaDainik Gomantak

प्रा. पौर्णिमा केरकर

तोगाव घोडेस्वारांचा…युद्धात पराक्रम गाजविणाऱ्या शूर वीरांचा…इतिहास संस्कृतीचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या मातीचा!सण ,उत्सव, परंपरा, रूढी,रिवाज,कुलाचार यांचे पालन करीत दैनंदिन जीवन व्यवहारात समरस होत साधंसुधी,सहज जीवनशैली अंगिकारून प्रवास करणाऱ्यांचा….

.गोवा कदंब राजघराण्याशी नाते सांगणारी गजलक्ष्मीची पाषाणी मूर्ती आढळली तोही हाच गाव! शिमगोत्सव तर या गावचा आत्माच म्हणावा लागेल… असा हा सह्याद्रीच्या पर्वतरांगांत विसावलेला…काळ्या गुण्याकडे,सरकारचो घरवंदार,तळयेकडे,ढोलाची राय, जामाची राय हे जागे म्हणजे गावचे रक्षणकर्ते…समृद्ध भात शेती,घनदाट जंगल,देवराया,खोल खोल…तळ ही न दिसणाऱ्या गूढरम्य कोंडी…आणि आकाशालाही गवसणी घालू पाहणारे मोठ मोठे वृक्ष…हे या गावचे वैभव…हा गाव म्हणजे सत्तरी

तालुक्यातील गुळ्ळे गाव.तीन दशकांपूर्वी अंजुणे धरण प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या पणसुले, केळवडे,अंजुणे आणि गुळ्ळे या चार गावांपैकी एक महत्त्वपूर्ण गाव.आज जरी या चारही गावांचे पुनर्वसन वेगळ्या ठिकाणी झालेले असले तरीही या गावांनी आपल्या मूळ संचिताशी जोडलेले नाते आजही कायम टिकविलेले आहे.या चार गावांमधील गुळ्ळे गावाची शेकडो वर्षांपूर्वीची गोष्ट आहे…..

कर्नाटकातील बैलूड गावची ती माहेरवाशीण. लग्न करून सत्तरीच्या गुळ्ळे गावच्या राऊत घराण्याची सासुरवाशीण बनली. नव्या नवलाईचे दिवस भुर्रकन उडून गेले. घरचे बाहेरचे काम करता करता काही वर्षे अशी सहजच गेली.तिला एक मुलगा झाला.पुढे काही दिवस गेले आणि अचानक तिच्या आयुष्याची उलथापालथ करणारा तो क्षण तिच्या जीवनात आला आणि तिचा संसारच उद्ध्वस्त झाला.

नवऱ्याच्या अकाली मृत्यूने ती पुरती उन्मळून पडली.तिची ती अवस्था तिच्या आईवडिलांना पहावली नाही.मनाचा निर्धार करून त्यांनी तिला तिच्या छोट्या बाळासोबत माहेरी बैलुडला घेऊन गेले ते कायमचेच. इकडे गुळ्ळे गावालाही तिचा तसा विसरच पडला होता.वर्षे भराभर निघून जात होती.त्याकाळी शेतीसाठी चांगले धष्टपुष्ट बैल हवे असतील तर शेतकऱ्यांना बैलुड गाव आठवायचा. चोरला घाट हा त्यासाठी महत्त्वाचा दुवा होता.

सगळा प्रवास चालतच व्हायचा. गुळ्ळे गावचे लोक बैल आणण्यासाठी बैलुडला रवाना झाले. वाटेत खाण्यापिण्याची काहीच सोय नव्हती.त्यांनी आपल्या घरातील तांदूळ पेज शिजविण्यासाठी घेतले. पोहोचायला त्यांना बराच उशीर झाला होता. पोटात भुकेचा जाळ पडला होता.आग पेटवून पेज शिजवावी असा विचार करत असता त्यांना एक घर दिसले.कडेवर मुलाला घेऊन एक महिला उभी असलेली त्यांना दिसली.

त्यांनी तिला विचारले, ‘‘आमच्याकडे पेज्जेचे तानुळ आसत,घरात पेज शिजोवन दिता?”दारावर आलेल्या अतिथींना देव मानणारे ते दिवस होते.तिने पटकन होकार दिला.चुलीवर पेज शिजवली. अतिथींना वाढली…आणि थोड्याशा पेजेची स्वतः चव चाखली.तिला ती चव ओळखीची वाटली.

तिने लगेचच त्याना विचारले,तुमी गुळ्ळे गावातल्यान इल्यात?त्यांना आश्चर्य वाटले. आम्ही गुळ्ळे गावचे आहोत हे हिला कसे कळले असावे? याचा ते विचार करीत असता तिनेच सांगितले की, पेजेची चव माझ्या जिभेवर आजही आहे. आपण गुळ्ळे गावची सासुरवाशीण आणि मग तिने स्वतःची करुण कथा कथन केली.त्यांनी तिला विचारले, तू तुझ्या मुलासकट गावात येशील का? वडिलांनी संमती दिली आणि तीही हर्षभरे पुन्हा एकदा सासरी जाण्यास तयार झाली.

जाताना तिच्या आईने लेकीला रिकाम्या हाताने कसे पाठवायचे म्हणून लेकीसाठी तांदूळ पीठ आणि मिरसांग वाटण्यासाठी“फातरीचो गुणो”(पाट्यावरचा वरवंटा) भेट म्हणून दिला.कडेवर मूल आणि डोक्यावर टोपली …त्या टोपलीत आईने दिलेल्या वस्तू …त्या वस्तूमधील वरवंट्याचे तिला ओझे होत होते. बैलुड ते गुळ्ळेपर्यंतचा प्रवास पायी करायचा होता.तोपर्यंत हे ओझं तिला झेपणार नव्हते म्हणून तिने वाटेत बऱ्याच वेळा त्यातील वरवंटा खाली काढून ठेवण्याचा प्रयत्न केला. तसा तो तिने खाली ठेवलाही.

परंतु जेव्हा पुन्हा टोपली घेऊन चालायची तेव्हा मात्र तो वरवंटा परत तिच्या टोपलीत दिसायचा.असे बऱ्याच वेळा झाले….शेवटी प्रवास करीत करीत सर्वजण गावाच्या सीमेवर पोहोचले. तिथेच असलेल्या चारही गावच्या सीमेवर वड,पायरी यासारख्या वृक्षांच्या सान्निध्यात तिने तो वरवंटा मनोभावे काढून ठेवला. हात जोडून सांगणे केले…

आणि त्यावेळेपासून तो वरवंटा सीमेवरचा राखणदार बारावंश म्हणून जनमानसात स्थिरावला.संकट प्रसंगी त्याला हात जोडले की तो हाकेला पावतो अशी लोकांची धारणा झाली…त्याच्याविषयीच्या अढळ श्रद्धेने कष्टकरी जीवनाला संकट झेलण्याचे…संघर्षाला सामोरे जाण्याचे बळ मिळाले. कालांतराने चारही गाव धरणामुळे विस्थापित झाले.

एका सीमेने बांधले गेलेल्या गावांपैकी केळवडे गाव वेगळा पडला…उरलेल्या तीन गावांच्या सीमेवर गाव उठताना देवत्व लाभलेल्या या वरवंट्याची गुण्याची स्थापना करण्यात आली.

बैलुड ते गुळ्ळे या प्रवासात राऊत घराण्याच्या सुनेने टोपलीत डोक्यावर घेऊन जसा हा वरवंटा आणला होता त्याचीच पुनरावृत्ती करीत राऊत घराण्यातील सुनेला हा सन्मान देत पूर्वीचा, धरणाच्या पाण्याखाली गेलेल्या गावातून हा वरवंटा नवीन स्थलांतरित झालेल्या गावच्या सीमेवर वाजत गाजत आणून स्थापन करण्यात आला.

टोपलीत ठेवलेला..तो देवत्व लाभलेला वरवंटा…त्याला डोक्यावर घेऊन चालत प्रवास करणारी ती सासुरवाशीण…तिच्या आगेमागे असलेले गावचे लोक आणि वाजत गाजत अभूतपूर्व उत्साहाने नवीन गावात येऊन प्रतिष्ठापित केलेला तो वरवंटा…!

खरंतर वरवंट्याचा हा प्रवास अनाकलनीय असाच आहे. विशाल वाढलेल्या एखाद्या वटवृक्षाला त्याच्या मूळ मातीपासून हुमटून काढून दुसऱ्या ठिकाणी आणून रोपण करणे ही कृती…ते क्षण साधेसुधे नाहीत.ज्या पिढीची हयात मूळ गावात गेली तिला तर स्थलांतरित होताना काय वाटले असेल?असे एका वेगळ्या मातीत त्याच संस्कृती, निसर्गाच्या संचितासह रुजून येणे शक्य होते का?हे असे जीवन न पेलणारे…त्यावेळी त्यांच्या मनाची झालेली घालमेल… आकांत… हृदयाची तळमळ…

तगमग सारे सारे सहनशक्ती पलीकडचे होते. ही अस्वस्थता पहिली ती त्या अढळ वरवंट्याने…या गावांनी दगडातच देवत्व शोधले…त्याचीच स्थिरता मनाला उभारी देण्यासाठी आत्मसात केली…हृदयावर दगड ठेवून मूळ मठी सोडली… मंदिरे, घरे, मूर्ती, वारसास्थळे…सारे सारे पाण्याखाली गेले…मात्र आठवणी आहेत …त्या आठवणींची श्रद्धा “फातरीचो गुणो”मात्र त्यांची सोबत आजही प्रत्येक प्रसंगात करीत आहे.त्या दगडाची स्थिरता…आणि अढळपणानेच तर या गावाला पुन्हा उभारी दिली…हे गूढत्व…अनाकलनीय तत्त्व बारावंशच्या रूपाने मनामनाची श्रद्धा बनली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com