मर्मवेध : स्वैराचार..!

पर्यटनाची आपली ढासळती प्रतिमा सावरण्यासाठी गोवा काही नवीन प्रतीकांच्या शोधात असला तरी राज्याला लागलेले मद्य, अमलीपदार्थ व वेश्यांच्या अड्ड्यांचे डाग सहजासहजी पुसून निघणार नाहीत. त्यासाठी कठोर उपायांची आवश्यकता आहे. आजच्या घडीला गोव्याने पाच हजारांवर निष्पाप मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचे वृत्त धक्कादायक आहे.
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

सूर्य मावळतीला गेलाय, परंतु कळंगुटमध्ये दुकाने आणि आसपासची हॉटेले, इमारतींवर झगमगाट कायम आहे. किंबहुना रात्र वाढतेय तशी ही स्वप्ननगरी अधिकच उजळते आहे, अधिक उल्हसित होतेय...लोकांची गर्दी उसळली आहे.

बियर आणि मद्याचे फेसाळते पेले एकामागोमाग रिचवले जाताहेत. पर्यटकांवर धुंदी चढली आहे, त्यात आबालवृद्धही सामील आहेत.

अल्पवयीन मुलींच्याही हातात फेसाळते पेले आहेत आणि हास्याची लकेर संपूर्ण वातावरणात घुमत आहे, डोळ्यावरची धुंदी, ओठावरचे हास्य, हातवारे, पेहरावाचा काहीच मागमूस नाही...

कळंगुट, बागा, वागातोर, हणजूण या संपूर्ण पट्ट्यात ही धुंदी फेसाळते आहे. पाऊस उतरतीला लागलाय, परंतु अधूनमधून सरी चालूच आहेत, मात्र किनारपट्टीवर वातावरणातील उष्मा वाढतोच आहे.

त्यात मिसळून गेलेल्या ओठांवर लाली चढवलेल्या आणि तोकड्या कपड्यातील मुलींनी अधिकच धुंदी वाढवली आहे.

अमलीपदार्थांचा घमघमाट सुटला आहे. किनाऱ्याबाहेरील चिंचोळ्या गल्ल्यांमध्ये अक्षरशः धक्काबुक्कीसारखी गर्दी पसरली आहे. त्यातही दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा सुळसुळाट आहे. कोणीतरी येऊन विचारतो, ‘साहब आपको कुछ चाहिए?’

तरुणांचा एक घोळका हेरून त्यांच्याजवळ विचारणा केली जाते, ‘साब मजा करना है क्या? आमच्याकडे मुली आहेत’. या भागातील बहुतेक हॉटेले अशा मुलींचा अड्डा बनली आहेत.

काही ठिकाणी तरुणांना बेसावध पकडून त्यांच्या खिशातील पैसे काढून घेतले जातात, काही ठिकाणी तृतीयपंथीयांना त्यांच्यापुढे उभे केले जाते. परंतु बहुसंख्य ठिकाणी मुलींचा अक्षरशः बाजार सुरू आहे.

एका गल्लीत एक दलाल हातात आल्बम घेऊनच उभा आहे. एका मध्यमवर्गीय माणसाने जीन्स घातली आहे, डोळ्यांवर रेबॅनचा चष्मा व डोक्यावर हॅट. तो अाल्बम चाळतो आहे, ‘मुली याच्यापेक्षा तरुण आहेत, कॉलेज तरुणी पाहिजे आहेत का?’, असे त्याला विचारले जाते.

गोव्यातील बहुतेक किनारे सध्या वेश्यावस्तीचे कुख्यात अड्डे बनत असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. केवळ किनारपट्टीच नव्हे तर महत्त्वाच्या शहरांमध्ये चांगल्या लोकवस्तीतही फ्लॅट भाड्याने घेतले जाऊन तेथे वेश्याव्यवसाय सुरू करण्यात आला आहे.

किनारपट्टी पर्यटनाला सगळीकडेच लागलेले हे कटू फळ मानले पाहिजे. ‘अर्ज’ संस्थेचे प्रमुख अरुण पांडे सांगत होते, ‘तुम्ही स्वस्त मद्य देता म्हटल्यावर अशाच प्रकारचा विकृत पर्यटक राज्यात येणार. गोव्यात स्वस्त मद्याबरोबरच अमलीपदार्थही खुले आम विक्रीला आहेत. आता या जोडीला वेश्या व्यवसाय उभा राहणारच’.

या पर्यटनाला लागलेल्या कटू फळांच्या ओढीने गुन्हेगार आणि अतिरेकीही आश्रयाला येऊ शकतात. गोव्याची किनारपट्टी कुटुंबवत्सल पर्यटकांसाठी शिवाय शांततेच्या ओढीने येणाऱ्या नागरिकांसाठी धोकादायक असल्याची सूचना एखादा देश जारी करतो, तेव्हा गोव्यातील सुबुद्ध नागरिकाला ते पचवणे कठीण जाते.

सरकारलाही अशा सूचनांची ताबडतोबीने दखल घ्यावी लागते. परंतु अशा प्रश्नांची दखल घेणे म्हणजे त्या नाकारणे नव्हे. गोव्यात मद्य प्राशनाला धरबंध राहिलेला नाही. येथे अल्पवयीन मुलेही मद्याच्या ओढीने येतात.

अमलीपदार्थ हे तर गोव्यात डान्स आणि रेव्ह पार्ट्यांचे प्रमुख आकर्षण असते. सनबर्नला गोव्यानेच प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. त्यामुळे आपल्याकडे असे कारनामे चालत नाहीत, असा दावा करणे हास्यास्पद आहे.

मग पर्यटनाला लागलेले हे काळे डाग कसे धुऊन काढणार? त्याचे स्पष्ट आणि सरळ उत्तर हेच आहे, पर्यटनाची अमर्याद वाढ रोखावी लागेल, गजबज, गदारोळ आटोक्यात आणून बेधुंद स्वैराचारावर नियंत्रण आणणे भाग आहे.

Goa Tourism
Gomantak Editorial: उपेक्षितांचे शब्दरंग

गेल्या आठवड्यात ‘अर्ज’ संघटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी तिचे प्रमुख अरुण पांडे यांच्याशी बातचीत करीत होतो. समाजशास्त्रामध्ये पीएचडी करण्यासाठी पांडे ‘टीस’च्यावतीने देशभर फिरत असता गोव्यात येऊन पोहोचले.

वेश्या व्यवसाय आणि तिचा समाजव्यवस्थेवर होणारा परिणाम अभ्यासत असता अरुण पांडे यांना गोव्यातील भीषण परिस्थितीचा अंदाज आला. गोव्यातील गलिच्छ वस्तीमध्ये अभ्यासासाठीही जायला स्थानिक माणूस धजावणार नाही.

गोव्याच्या बायणा येथे गोवा मुक्तीपूर्व काळापासून या वस्तीने ठाण मांडले. पांडेंनी त्या भागात काम केले. ‘बाजारू लैंगिक शोषणाविरुद्धचा योद्धा’ अशी आज त्यांची गोव्यात प्रतिमा आहे. या व्यवसायातील केवळ वास्तव आणि भयानकताच त्यांनी अनुभवली नाही तर या दलदलीतील मुलींना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना पुनर्प्रतिष्ठा देण्यासाठी प्रयत्न चालविले.

ही वस्ती म्हणजे गोव्याच्या प्रतिमेला डाग समजून तिच्याकडे पूर्ण काणाडोळा करण्यात गोवेकर धन्यता मानत होते. परंतु मनोहर पर्रीकरांनी आपल्या सुरुवातीच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत या वस्तीवर दंडुका हाणला.

त्या कारवाईला विरोधही झाला, त्यातून कदाचित वास्को शहर किंवा बायणा उकिरडामुक्त बनले असेल, परंतु सध्या हा रोग गोवाभर पसरला आहे.

अरुण पांडे यांच्यासारख्यांचे मत असे, ‘बायणा वस्ती ही गोव्याला लागलेली कीड होतीच. परंतु तिचे उच्चाटन कसे करता येईल, यासाठी या भागात काम करणाऱ्या सामाजिक संघटनांची चर्चा अपेक्षित होती.

या लोकांना मदतीचा हात देणे आवश्यक होते. त्यांना तेथून हाकलून देऊन बायणाचा प्रश्न आम्ही सोडविला अशी हाकाटी पिटण्यात काही मतलब नाही. या व्यवसायातील महिला मागास, अनुसूचित जमाती व आदिवासी समाजातून आल्या आहेत.

या दुर्लक्षित महिलांचा विचारही राजकारण्यांनी कधी केला नाही. उलट त्यांना तेथून ‘सोडविण्या’ऐवजी हाकलून लावले तर प्रश्न सुटेल असे मानले गेले’.

बायणाचा प्रश्न आता संपूर्ण गोव्यात तेवढ्याच तीव्रतेने उभा ठाकला आहे. गोव्यातील वेश्या व्यवसाय खात्रीने गंभीर आहे, सध्याची पर्यटन नीती हा वेश्या अड्डा बनविण्यास हातभारच लावते आहे. पर्यटनानेच त्या महिलांना ‘सेक्स वर्कर’ बनविले.

पर्यटकांची लैंगिक भूक भागविण्यासाठी त्या स्वतःच्या मर्जीने त्या व्यवसायात आल्याच नाहीत. उलट, लैंगिक हौस भागविण्यासाठी कुणीतरी त्यांना खोटी आमिषे दाखवून त्यात ढकलले. त्यांचा बळी देण्यात आला.

केवळ ‘अर्ज’ संघटना सांगते किंवा अरुण पांडे यांचे मत तसे आहे म्हणून नव्हे तर अनेक राष्ट्रीय अभ्यासातून गोव्याच्या पर्यटनाला वेश्या व्यवसायाची नवी कटू फळे लागल्याचे निष्कर्ष निघाले आहेत.

देशभरातील २५ राज्यांमधून वेश्या व्यवसायासाठी ४००च्या वर मुली गोव्यात आणल्या जात असल्याचे हा निष्कर्ष सांगतो. ही एक संघटित गुन्हेगारी आहे. कोणतीही मुलगी स्वतः चालत वेश्या व्यवसायात घुसत नाही.

कोणीतरी तिला हाताला धरून घेऊन येतो, कोणी बळजबरीने किंवा आणखी कोणते आमिष दाखवून तिच्यासमोर सुंदर भविष्याचे स्वप्न उभे करून तिला या धंद्यात ओढले जाते.

तज्ज्ञ म्हणतात, ‘बहुसंख्य मुलींना धाकदपटशाच्या मार्गानेच या व्यवसायात ओढले जाते आणि परत जाण्याचे मार्ग त्यांच्यासमोर नसतातच. त्यांनी येथे खितपत पडावे आणि येथेच मरावे.‘

गोव्याच्या अधिकृत आकडेवारीनुसार गोव्यात किमान पाच हजार मुली शरीरविक्री व्यवसायात आहेत. गोवा राज्य एड्स सोसायटीची ही अधिकृत आकडेवारी आहे. वेश्या व्यवसायातील मुलींना मोफत कंडोम देण्याच्या व्यवस्थेनुसार एड्स सोसायटीने ही नोंदणी केलेली आहे.

परंतु या अधिकृत आकडेवारीपेक्षाही प्रत्यक्ष स्थिती वेगळी आणि भयानक आहे. कारण बायणातून पळून गेलेल्या मुली आता केवळ एका वस्तीत मर्यादित राहिलेल्या नाहीत, त्या अनेक शहरांमध्ये फ्लॅट भाड्याने घेऊन चालवल्या जाणाऱ्या छोट्या-मोठ्या वेश्या अड्ड्यात पाठवल्या गेल्या आहेत किंवा किनारपट्टीवरील लोकांत मिसळून त्या गिऱ्हाईक पटवीत असतात.

दुसऱ्या बाजूला लोकवस्तीमध्ये भाड्याने घेतलेल्या घरांमध्ये अनेक वेश्यांचे अड्डे सुरू करून तेथे नित्यनियमाने आठवडा किंवा पंधरवड्यासाठी मुली आणल्या जातात.

गोव्यामध्ये आंतरराज्य व्यवस्थेबरोबरच आंतर्देशीय नेटवर्कही उभे करण्यात आले आहे. गोव्यात येणाऱ्या मुलींमध्ये सर्वाधिक महाराष्ट्राहून ३१ टक्के, पश्चिम बंगाल (२२ टक्के), दिल्ली (११ टक्के), उत्तर प्रदेश (६ टक्के) हे प्रमाण असून गोव्यातील मुलींचे या व्यवसायातील प्रमाण ७.०१ टक्के एवढे वाढले आहे.

येथे नेपाळ, बांगलादेशमधून मुली येतातच शिवाय आता रशिया, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, कझाकिस्तान, तुर्कस्तान, केनिया, नायजेरिया व आफ्रिकेतील इतर देशांमधून मुली आणणारी नवी यंत्रणाच तयार झाली आहे.

आमच्या हाती असलेल्या एक राष्ट्रीय अभ्यासात म्हटले आहे की, गोव्यात बांगलादेशमधून आणल्या जाणाऱ्या मुलींचे प्रमाण सर्वाधिक ४२ टक्के असून नेपाळमधून २५ टक्के, तर उझबेकिस्तानमधून १६ टक्के मुली आणल्या जातात. या मुलींसाठी खोटी ओळखपत्रे, वास्तव्याचे परवाने तयार करणारी एक टोळीच वावरते.

बांगलामधून मुली प्रथम मुंबईत आणल्या जातात व तेथून त्या गोव्यात पुरवल्या जातात. ही एक मोठी अर्थव्यवस्था असल्याचे अरुण पांडे सांगतात. महिन्याकाठी ५० हजार गिऱ्हाईक मिळविण्याचे उद्दिष्ट हे दलाल बाळगू लागले आहेत.

एक हजारपासून दहा हजारपर्यंत सेवाशुल्क आकारले जाते. एका मुलीकडे दिवसाकाठी चार ते पाच ग्राहक पाठवले जातात. या व्यवसायातील उलाढाल प्रचंड आहे, त्यातील बरेचसे हप्ते पोलिसांना जात असतात, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

पर्यटन क्षेत्रातील ही कीड संपूर्ण गोव्याला आपल्या कवेत घेऊन व राज्याच्या सामाजिक प्रतिमेला काळिमा फासू लागली आहे. ही मोठी चिंतेची बाब असल्याचे अरुण पांडे सांगतात.

एकेकाळी बायणा व काही शहरातील मोजक्या भागांमध्ये वेश्याव्यवसाय चालू होता. परंतु आज तो हॉटेले, लॉज, मसाज पार्लर येथेच मर्यादित राहिलेला नाही. तर उच्चभ्रू निवासी वसाहतींमध्येही तिने शिरकाव केला आहे.

अनेक लोकांनी गुंतवणुकीसाठी घरे आणि फ्लॅट्स खरेदी करून ठेवले आहेत. हे फ्लॅट्स दलालांमार्फत भाड्याने दिले जातात, तेथे काय चालते याची जाणीव घरमालकाला नसते. परंतु मुली नित्यनियमाने ये-जा करतात आणि ग्राहकही चांगल्या पेहरावात येत-जात राहतात.

बऱ्याच काळानंतर संशय आलाच तर लोक तक्रारी करू लागतात, परंतु तोपर्यंत हे दलाल मुलींना दुसरीकडे नेऊन सोडतात. ‘अर्ज’ संघटनेच्या मते चांगल्या गृहनिर्माण वसाहतीमध्ये हा व्यवसाय सुरू झाला आहे, ही निश्चितच चिंतेची बाब आहे.

वास्तविक पर्यटन क्षेत्रामध्ये चालू असलेल्या वेश्या व्यवसायाकडे अधिक गांभीर्याने पाहिले पाहिजे. पर्यटन खाते व त्याच्या जोडीला पंचायतींना नवीन कायद्यांमध्ये अशा प्रवृत्तीविरुद्ध कारवाई करण्याचे अधिकार प्राप्त झालेले आहेत.

गोव्यात वेश्या व्यवसायाविरुद्ध पोलिस ढिम्म कारवाई करणार नाहीत, हे सर्वांनी सध्या गृहीत धरले आहे. याचे कारण प्रत्येक अधिकाऱ्याला कळंगुट, कांदोळी, बागासारख्या भागातच पोस्टिंग हवे असते.

सरकारी आकडेवारीनुसार वेश्याव्यवसायावरील सर्वांत अधिक धाडी अजूनपर्यंत कळंगुटमध्येच टाकण्यात आल्या (त्या जरी कमी असल्या तरी) व त्या खालोखाल अंजुणेचा क्रमांक लागतो. उत्तर गोवा वेश्याव्यवसायाच्या बाबतीत आघाडीवर आहे.

आता हा व्यवसाय डिचोली, वेर्णा, वास्को, मडगाव व फोंडा या भागांकडेही सरकला आहे. प्रचंड पैसा घेऊन पोलिसांच्या बदल्या जेव्हा या भागात केल्या जातात, सरकारचा त्यांच्याकडे संपूर्ण काणाडोळा असेल, हे गृहित धरलेले आहे.

त्याचाच परिणाम म्हणून असेल, परंतु आता मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नईच्या वेश्या सर्किटचा गोवा भाग बनू लागला आहे. ठराविक अंतराने या भागातून मुली गोव्यात आणण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. या मुलींची संख्या वाढत चालली, हा चिंतेचा भाग आहेच परंतु ‘अर्ज’च्या म्हणण्यानुसार संपूर्ण गोव्यालाच वेश्या अड्ड्याचे स्वरूप प्राप्त होण्याची भीती आहे.

इम्मोरल ट्रॅफिकिंग प्रिव्हेन्शन अ‍ॅक्टचे (आयटीपीए कलम १८) दात अधिक घट्ट बनवून ते अधिक तीव्रतेने चावा घेऊ शकतील, अशी व्यवस्था असतानाही कारवाई का होत नाही? नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याचे अधिकार सरकारला आहेच, शिवाय आता दलाल या क्षेत्रात येणाऱ्या मुली यांच्याबरोबरच ग्राहकांविरुद्धही कारवाई करण्याची कलमेही कायद्याला जोडण्यात आली आहेत.

वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई होताना जिल्हादंडाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांना आता मसाज पार्लर, हॉटेले सील करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. बऱ्याच काळासाठी हे जागे बंद राहिले तर वेश्या व्यवसायाला निर्बंध घालणे शक्य होईल, असा त्यामागचा हेतू आहे.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या कायद्याखाली गोव्यातील एकही हॉटेल किंवा मसाजपार्लर बंद झाल्याची माहिती नाही. वास्तविक सरकारी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसारच आयटीपीए कायद्यात सुधारणा करण्यात आली. या अनधिकृत अशा मुलींच्या शोषणावर आधारित व्यवसायावर हातोडा पडावा व त्याची जबाबदारी निश्चित व्हावी, या हेतूनेच हॉटेले सील करण्याची तरतूद केलेली असताना गोवा सरकारला त्याबाबत हालचाल करावीशी वाटत नाही, हे दुर्दैवाचे आहे.

गोवा सरकारनेच केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहिल्यास सरकार किती उदासीन आहे हे लगेच लक्षात येते. २०१५ ते २०२३ या कालावधीत किती मुलींची सुटका करण्यात आली त्याचा तपशील आमच्याकडे आहे. या काळात केवळ २०१८मध्ये १०२ मुलींची सुटका करण्यात आली होती.

२०१५मध्ये ८० मुलींची सुटका झाली, परंतु त्यानंतर गेल्या चार वर्षांत हे प्रमाण घटत गेले आहे. गेल्या तीन वर्षांत सुटका करण्यात आलेल्या मुलींचे प्रमाण केवळ १७-१८ असे आहे - याचा अर्थ धाडीच टाकल्या जात नाहीत! पर्यटन क्षेत्रातील ही कीड कायमची ठेचून काढण्यासाठी कायद्याचा आधार घेऊन धाक निर्माण व्हावा, असे सरकारला वाटू नये, हे दुर्दैव नव्हे तर काय! जगभर या अवैध धंद्यात ओढल्या जाणाऱ्या मुलींना वाचविण्यासाठी अतोनात प्रयत्न चालले असता गोवा त्यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतो हे अश्लाघ्य तर आहेच, अशोभनीयही आहे, असा निष्कर्ष राष्ट्रीय सर्वेक्षणातून करण्यात आला आहे.

आयटीपीएच्या कायद्यातील नव्या तरतुदींनुसार ग्राहकालाही लैंगिक गुन्हेगार संबोधण्याची तरतूद आहे. यापूर्वी मुली पकडल्या जात, त्यांचे दलाल शिक्षा भोगीत, परंतु ग्राहक तेथून निसटून जात असत. जास्तीत जास्त पोलिसांच्या हातावर काही टेकवले तर त्यांची सुटका होत असे.

परंतु ग्राहक हेसुद्धा मुलींच्या शोषणाचा एक भाग मानला गेल्याने, ‘मागणी तसा पुरवठा’ या तत्त्वानुसार ग्राहकसुद्धा गुन्हेगार मानण्याची नवीन पद्धती कायद्यात सामावून घेतली गेली. त्यामुळे पोलिस व जिल्हाधिकाऱ्यांना आता त्यांनी ठरविले तर वेश्या व्यवसायाचे मूळच उखडून काढणे शक्य आहे.

दुर्दैवाने बहुतेक ग्राहक हे प्रतिष्ठित मंडळी असू शकतात किंवा पर्यटकांना दुखवू नये, अशी भूमिका असल्याने ग्राहकांना अटक करण्यात पोलिस यंत्रणेला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्णतः अपयश आले आहे.

एकेकाळी ग्राहकांचा मागमूस राहत नसे, परंतु आता मोबाईलवरून संपर्क होत असल्याने ग्राहकांचा ठावठिकाणा शोधून काढणे सोपे झाले आहे. त्यामुळे वेश्या अड्ड्यांचे ठावठिकाणे शोधून काढत असतानाच ग्राहकांनाही सापळ्यात अडकविणे सहज शक्य झाले आहे.

दुर्दैवाने २०१३मध्ये हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पोलिसांनी या प्रकारे अड्डे सील केले नाहीत, त्याचप्रमाणे मानवी लैंगिक अत्याचाराचा एक महत्त्वाचा धागा असलेल्या ग्राहकांवरही धाक निर्माण करण्यास यंत्रणेला अपयश आले.

स्वस्त मद्य, कॅसिनो, अमलीपदार्थ या जोडीला वेश्या व्यवसायाचे ग्रहण लागले असल्याने गोव्याचे किनारी पर्यटन कोणत्या दिशेने वाटचाल करते आहे, हे सहज ताडता येते. गोव्यात शिरताच कॅसिनोंचे होर्डिंग्ज दिसू लागतात.

‘सुरक्षित लैंगिक संबंधासाठी कंडोम वापरा’, असा फलकही पर्यटकांना दिसू लागल्यावर सरकारी खर्चानेच जुगार व वेश्या व्यवसायाची जाहिरातबाजी चालू असल्याचे पर्यटकांच्या लक्षात येणार नाही का? वास्तविक कंडोमच्या जाहिरातीखालीच अवैध वेश्या व्यवसायासाठी ग्राहकालाही तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो, असे त्यात नमूद करण्याची आवश्यकता होती.

अरुण पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण देशात दरडोई लोकसंख्येच्या तुलनेत गोव्यातील वेश्या व्यवसायातील मुलींचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण गोव्यात जरी एक टक्का असले तरी ते देशातील सर्वाधिक आहे आणि राष्ट्रीय गुन्हेगारी निर्देशांकानुसार तर गोव्यातील वाढता वेश्याव्यवसायाचा प्रश्न प्रतिदिनी गंभीर होत चालला आहे.

या पार्श्वभूमीवर किनारी पर्यटनावर निर्बंध घालून अंतर्गत ग्रामीण भागांत नवीन सुखसोयी निर्माण करण्याचे आव्हान सरकारने स्वीकारले पाहिजे. पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत गोव्यात आता पर्यटनाची नवी दिशा आखली जात असल्याचे जाहीर केले आहे.

वास्तविक सुविद्य आणि चांगल्या दर्जाचे पर्यटक गोव्यात यावेत, यासाठी त्यांना शांततापूर्ण गोव्याचा हरित चेहरा दाखविण्याची कधीपासूनची मागणी आहे. सर्वप्रथम गोव्याचे अतिगोंगाटाचे पर्यटन बंद झालेच पाहिजे. गोव्याची बलस्थाने काय होती, एकेकाळी आपले किनारे शांत, शीतल मानले गेले, त्यामुळेच हिप्पींना त्यांची ओढ लागली.

त्यांनीच हा गोवा जगाला दाखवला. दुर्दैवाने अतिपर्यटन व गोंधळ गजबजाटाने चांगल्या पर्यटकांनी गोव्याकडे कधीच पाठ फिरविली आहे. गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांची संख्या ८० लाख बनली आहे आणि नवीन विमानतळामुळे पर्यटकांची संख्या उतू जाणार असल्याचे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

या पर्यटनाला दिशा द्यायची असेल तर आम्हाला नक्की कोणत्या प्रकारचे पर्यटक हवे आहेत, यासंदर्भात निश्चित भूमिका ठरवावी लागेल. रया गेलेल्या बँकॉकसारख्या पर्यटन केंद्राची प्रतिकृती बनवायची असेल तर मात्र सध्याच्या पर्यटन नीतीला पर्याय नाही. परंतु त्यामुळे भविष्यात गोव्याच्या मुलींकडेही पर्यटक वेश्या म्हणून पाहू लागले तर नवल नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com