Switzerland: स्वित्झर्लंडचा चिरतरुण निसर्ग

शेकडो वर्षांपूर्वी हा निसर्ग असाच होता. आजही असाच आहे. शेकडो वर्षानंतरही असाच राहील.
Switzerland
SwitzerlandDainik Gomantak

Switzerland खरे म्हणजे स्वित्झर्लंडला विशेषणाची गरजच नाही. स्वित्झर्लंड हेच मुळी विशेषण आहे. निसर्गाचे सर्वांगसुंदर दर्शन स्वित्झर्लंडमध्ये घडते. या सौंदर्यात ताजेपणा आहे. कौमार्य आहे. तारुण्याचा टवटवीतपणा आहे.

स्वित्झर्लंडमध्ये काळ-वेळ स्थगित होतो. स्वित्झर्लंड हे एक घड्याळांचे दुकान आहे. घड्याळांच्या दुकानात अनेक घड्याळे असतात. प्रत्येक घड्याळ वेगवेगळी वेळ दाखवते. त्यामुळे घड्याळाच्या दुकानात खरा वेळ कळतच नाही.

स्वित्झर्लंडमध्ये पहाटेला तिन्हिसांजेचा भास होतो. दुपारी सांजवेळचा भ्रम होतो. स्वित्झर्लंडच्या भूमीवर पाय ठेवताच हातातले घड्याळ फेकून द्यावे आणि स्वित्झर्लंड सोडता सोडता एक सुंदर स्वीस घड्याळ विकत घेऊन स्वित्झर्लंडला निरोप द्यावा.

स्वित्झर्लंड हा घड्याळांचा देश आहे. इथल्या लाकडी कुकु क्लॉकची उपयोगिता फारशी राहिली नाही. पण हे सुरेख कुकु क्लॉक हा स्वित्झर्लंडचा सोव्हिनेअर बनला आहे. रॉलेक्स, फावर लुबा, ओमेगा, टिसोट, टॅग हेअर, पटेक फिलीप, कार्टियर, लॉजिन्स, राडो, स्वॉच या स्वीस घड्याळांत जगभरचे लोक वेळ पाहतात.

अचूकता, कार्यक्षमता, सौंदर्यदृष्टी ही स्वीस समाजाची वैशिष्ट्ये स्वीस घड्याळात प्रतिबिंबित होतात. ‘यू नेव्हर ओन अ पटाक फिलीप. यू मिअरली लूक आफ्टर इट फॉर नेक्स्ट जनरेशन’, हे तर पटाक फिलीप घड्याळाचे घोषवाक्य आहे.

स्वित्झर्लंडची राजधानी बर्नच्या पेटंट ऑफिसमध्ये नोकरी करताना अल्बर्ट आइनस्टाइनला अवकाश-काळाच्या चतुर्मितीची संकल्पना सुचावी यात नवल नाही. आइनस्टाइनच्या मते ‘द डिस्टिक्शन ऑफ पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर इज ओन्ली अ स्टबर्नली पर्सिस्टंट इल्यूजन’.

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ (या संकल्पना) हा अट्टहासाने सतत जोपासलेला भ्रम आहे. पॉल क्ली नावाचा चित्रकारही म्हणतो, ‘द एलेमेन्ट ऑफ टाइम मस्ट बी एलिमिनेटेड. येस्टर्डे अँड टुडे आर सायमल्टेनिअस इव्हेन्ट्स’ विश्वाची कालातीतता पाहता काल आणि आज या संकल्पनांना अर्थच नाही.

स्वित्झर्लंडची भूमी हा त्याचा पुरावा आहे. स्वित्झर्लंडमध्ये काळ गोठून गेला आहे. स्वित्झर्लंडमधल्या एखाद्या निवळशंख, निळ्या पाण्याच्या नदीप्रवाहाकडे पाहावे किंवा ताज्या हिमकणांनी सुस्नात झालेल्या हिमशिखरांकडे पाहावे किंवा आरस्पानी सलिल-जलाने ओथंबून गेलेल्या इथल्या हिमवंतींच्या सरोवरांकडे पाहावे - त्यांना काळ - भान नाही. शेकडो वर्षांपूर्वी हा निसर्ग असाच होता. आजही असाच आहे. शेकडो वर्षानंतरही असाच राहील.

स्वित्झर्लंडचा निसर्ग सरळ रेषा, लघुकोन, काटकोन, विशालकोन या भूमितीय कोष्टकात बसवता येणार नाही. इथले डोंगर - उतार कलते आहेत.

इथल्या नद्या वक्रमोडी आहेत. इथली झाडे कुठल्याच प्रमाणबद्ध सिमेट्रीत बसत नाही. स्वित्झर्लंडच्या निसर्गाचे हे कलनशास्त्र, हा कॅलक्युलस मोठा मोहक आहे.

ऋतुसंहारात कालीदास म्हणतो

द्रुमाः सपुष्पाः सलिलं सपद्मं ।

स्त्रियः सकामाः पवनः सुगन्धिः ।

सुखाः प्रदोषाः दिवसाश्च रम्यः ।

सर्व प्रियं चारूतरं वसन्ते ।

फुलांनी फुल्ल कुसुमित झालेली झाडे, कमळांनी ओसंडून जाणारी तळी, फुलांच्या सुंगधाने गंधीत झालेला वारा, सुरम्य दिवस, सुखद सांजवेळा यामुळे स्वित्झर्लंड हा प्रियदर्शनीय देश झाला आहे.

रानातल्या आणि पावसातल्या कविता लिहिणारे महानोर स्वित्झर्लंडमध्ये जन्मते तर त्यांनी बर्फातल्या कविता लिहिल्या असत्या. बर्फ हा शब्द तसा अरसिक आहे. त्यापेक्षा ’स्नो’ हा बर्फाचे कोवळेपण दाखवणारा शद्ब अधिक सुंदर आहे.

इस्किमो लोकांच्या भाषेत स्नो, स्न्लोफ्लेक्स, स्नाइस(स्नो आणि बर्फ यामधली अवस्था) फ्रॉस्ट असे बर्फाशी संबंधित 70 शब्द आहेत. साडेसहा लाख वर्षातील सात हिमयुगात साठलेला हा जगभरातला बर्फ वितळला तर पृथ्वीवरच्या समुद्राची पातळी 230 फुटांनी वाढेल.

स्वित्झर्लंडमध्ये एकाहून एक सुंदर अशी 1500 सरोवरे आहेत. लुझेर्न, झुरीक, जिनिव्हा या शहरात सरोवरे नसती तर ही शहरे रूक्ष, शुष्क झाली असती.

Switzerland
लहानपणीच्या गोष्टी

लुझेर्न शहरातील विस्तिर्ण सरोवरच्या पाण्याचा प्रवाह लुझेर्न शहराच्या मध्यभागातून वाहतो. ह्या प्रवाहावरचा पुरातन चॅपेल ब्रीज पूर्णतः लाकडी आहे. लाल, पिवळ्या, गुलाबी, निळ्या, जांभळ्या फुलांच्या परड्या दोन्ही खांद्यावर घेऊन हा पूल उभा आहे. या रंगीत फुलांच्या सान्निध्याने चॅपेल ब्रीज रमणीय बनला आहे.

इराणच्या राजधानीत तेहरानमध्ये तबियत नावाचा अनोखा पूल बांधणारी आर्किटेक्ट लैला अराधीयन एकदा मला भेटली. ती म्हणाली, ‘पूल हे दोन काठांना जोडणारे स्थापत्य नाही. पूल ही एकामेकाना भेटण्याची जागा आहे.‘

पुलावर प्रियकर, प्रेयसी भेटतात. हॉलंडमधल्या ऍमस्टॅरडॅममध्ये प्रेमी युगुले पुलाच्या लोखंडी जाळ्याना कुलूप लावतात. चावीने ते बंद करतात आणि त्याची चावी पुलाखालच्या पाण्यात फेकून देतात. यामुळे प्रेम चिरंतन राहते अशी त्यांची श्रद्धा आहे.

Switzerland
Ganesh Chaturthi: मोदक आणि करंजी

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com