आवडतो मज अफाट सागर

आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे ७०% पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याने, महासागरांच्या विस्ताराने व्यापले आहे.
goa
goaDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. संगीता साेनक

समुद्राची गाज ऐकली की मन प्रसन्न होते. किनार्‍यावरील चंदेरी वाळूचा पायांना होणारा मऊमऊ स्पर्श, दूर क्षितिजावर सागराचे आकाशाशी होणारे नयनरम्य मिलन, खवळलेल्या समुद्राच्या लाटांचा कानावर पडणारा आवाज, खार्‍या पाण्यातून आणि हवेतून किंचित येणारा मासळीचा खारट दर्प, आणि या मासळीच्या दर्शनाने, खरे तर नुसत्या आठवणीनेच, गोंयकारांच्या तोंडाला सुटणारे पाणी. कुठल्याही गोंयकाराची पंचेंद्रिये तृप्त करणारा हा सागर. ह्या सागराच्या दर्शनाने हर्षित न होणारा गोंयकार विरळाच.

माझ्याबरोबरीच्या इतर अनेक गोंयकारांसारखेच मलाही समुद्राचे आकर्षण लहानपणापासून होते.

समुद्रकिनार्‍यावरील वाळूत किल्ले बांधत आणि वाळूतील सुंदर शंख शिंपल्यांनी त्यांना सजवत आम्ही लहानाचे मोठे झालो. किनार्‍यावर एक-दोन लांब फेर्‍या टाकून, पाण्यात थोडेसे पाय बुडवून झाल्यानंतर शांत किनार्‍यावरील (तेव्हाच्या) वाळूत बसून सूर्यास्त पाहणे हा किती सुखद अनुभव असायचा. वसुंधरा आणि रत्नाकराची ही मिलनरेषा. पांढर्‍याशुभ्र वाळूचा रेशीमस्पर्श आणि आभाळात उधळल्या जाणार्‍या रंगांचे मनोहारी दृश्य. अशा सूर्यास्ताचे विहंगम दृश्य दररोज बघू शकणारे आपण गोंयकार किती भाग्यवान.

नुकत्याच, म्हणजे 8 जून रोजी, झालेल्या जागतिक महासागर दिनानिमित्त जगातील अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले गेले. त्या आधी ५ जूनला वसुंधरादिन साजरा केला गेला. दोन्ही दिवशी चर्चासत्रे झाली, किनारा स्वच्छता मोहिमी झाल्या. त्या निमित्ताने झालेले कार्यक्रम बघत असतानाच मनात अनेक आठवणी घर करत होत्या. माझ्या लहानपणी मी पाहिलेला समुद्र आठवत होता. गोपाळकृष्ण भोबेंनी आपल्या ‘मासे आणि मी’ या पुस्तकात वर्णन केलेला समुद्र आपल्या पिढीने पाहिला नाही.

त्यांनी केलेले तेव्हाच्या ‘केगदी वेळे’चे वर्णन वाचले की आताचा समुद्र किती बदललाय हे लक्षात येते. हे पुस्तक आम्हाला भेट दिल्याबद्दल दत्ताभाईंचे मी अनेक वेळा आभार मानते. वेगवेगळ्या ठिकाणांवरून आलेली गलबते आणि त्यांनी सजलेला किनारा. त्यावेळचा तो समुद्र आणि आपल्या लहानपणी आपण पाहिलेला गोव्यातील पारंपरिक नुस्तेकारांची घरे असलेला, त्यांच्या छोट्या छोट्या होड्या, वेगवेगळ्या प्रकारची जाळीं पसरलेला सुंदर समुद्र व त्याचा तो किनारा. तेव्हाही खूप बदल झालेला. आताचा किनाराही खूप वेगळा आहे. पर्यटकांची गजबज, त्यांच्या सोयींसाठी बांधलेली हॉटेले आणि उपहारगृहे, जलक्रीडांची मौज चाखणार्‍या लोकांचा गोंधळ आणि सेल्फी घेणारे युवक, युवती. आताचा बदल चिंताजनक आहे. पर्यावरणाला आणि जीवसृष्टीला हानिकारक आहे आणि मुख्य म्हणजे फार जलद गतीने होत आहे. म्हणूनच जागतिक स्तरावरील पर्यावरण क्षेत्रातल्या संस्थांनी जगात सर्वत्र होणार्‍या या बदलाची दखल घेतली आहे.

आपल्याला माहीतच आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागाचे ७०% पेक्षा जास्त क्षेत्र पाण्याने, महासागरांच्या विस्ताराने व्यापले आहे. महासागर पृथ्वीच्या हवामान प्रणालींचे नियमन करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात, जागतिक पर्यावरणावर यांचा खोल प्रभाव असतो. सागरी भवताल विविध प्रकारच्या जीवसृष्टींनी भरलेला आहे. यातील प्रत्येक जीव सागरी परिसंस्थेचे नाजूक संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

तथापि, महासागरांना विविध मानवी क्रियाकलापांमुळे गंभीर धोक्यांचा सामना करावा लागत आहे. नैसर्गिकरीत्या सागरी किनारा अस्थिर (dynamic) असतो, किनारी परिसंस्थांचे स्थैर्य कमी असते. किनार्‍यांवर होणारा बदल आपण बघतच आहोत. मिरामारचा किनारा वाढत आहे. दर पावसाळ्यात येथे खूप वाळू रस्त्यावर साचते. लहानपणी मिरामार बीचवर असलेल्या फिशचे आम्हा मुलांना फार आकर्षण असायचे. या फिशवर चढून खाली वाळूत उड्या मारणे, त्याच्या तोंडात शिरून पोटातून बाहेर येणे हा आमचा आवडीचा उद्योग असायचा. हा मासा अनेकदा वाळूखाली जातो. ही वाळू उपसून त्याला मोकळे करावे लागते. याउलट कांपालचा दीपस्तंभ आता पाण्याखाली गेला आहे. तेथील किनारा झिजत आहे.

आजकाल मानवी हस्तक्षेप आणि आणि हवामानबदल यामुळे जगातील अनेक सागरी परिसंस्था आणि जीवसृष्टी धोक्यात आहेत. समुद्रातील तापमानवाढ, आम्लीकरण, समुद्र पातळी वाढणे आणि वादळांची वाढती वारंवारता व तीव्रता हा मानवी हस्तक्षेपाचा परिणाम आहे. विविध मानवी स्त्रोतांपासून होणारे प्रदूषण, उपचार न करता थेट समुद्रात किंवा पाण्यात टाकलेले सांडपाणी यामुळे सागरी जीवनास हानी पोहोचू शकते. प्रखर मासेमारीमुळे माशांची संख्या आणि आकारमान कमी झालेले आहे. माशांच्या काही प्रजाती आपल्याला आता दिसत नाहीत. सागरी संसाधनाचे अतिशोषण झाल्यामुळे सागरी परिसंस्थांवर परिणाम होत आहे. विशेषतः प्रवाळ या परिसंस्थेवर याचे परिणाम अतिशय तीव्रपणे जाणवत आहेत.

महासागराच्या दुर्लक्षित झालेल्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकणे आवश्यक आहे. सागर म्हणजे केवळ खार्‍या पाण्याचा मोठा जलाशय नव्हे. तर अनेक जीवनदायी सुविधा हे सागर प्रदान करतात. पृथ्वीवरील जीवसृष्टीची उत्पत्ती समुद्रात झाली असावी असे तज्ज्ञ मानतात.

आपण अंतरिक्षात भरारी घेतली पण महासागराची खोली अजूनही आपण पूर्णपणे समजू शकलो नाही. आपल्या मनाची खोली जागृत करून नवीन धोरणे स्वीकारण्याची आज गरज आहे. सागरी संपदेविषयी जनजागृतीची आवश्यकता आहे. म्हणूनच हे दशक सागरी दशक म्हणून यू.एन.ने मान्यता दिली आहे. जागतिक महासागर दिवस आपल्यासाठी महासागरांचे मूलभूत महत्त्व आणि त्यावर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीचे स्मरणपत्र आहे.

जागतिक स्तरावर महासागरांचे महत्व आज तीव्रतेने जाणवत आहे. त्यांचे जतन करण्याची गरज आज भासत आहे. यासाठी लोकजागृती करणे आवश्यक आहे. आपल्या पिढीने ज्या समुद्राचा आनंद घेतला तो पुढच्या पिढींसाठी राखून ठेवणे जरूरी आहे. नवीन धोरणे स्वीकारण्यात आपल्या गोव्याने अनेकदा इतरांना मार्गदर्शन केले आहे. आपला किनारा आणि समुद्र सुंदर, सोबीत ठेवणे आपल्या हातात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com