पिसुर्ले कोणी पिसुडले?

पिसुर्ल्याचे आजचे चित्र पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले नाही.
Goa Mine
Goa Mine Dainik Gomantak
Published on
Updated on

कमलाकर द. साधले

‘पिसुर्लेच्या शेतकऱ्यांचे खाण कंपन्यांविरुद्ध आंदोलन’ या मथळ्याची ठळक बातमी गेल्या आठवड्याच्या वृत्तपत्रांत वाचली आणि माझ्या 15-20 वर्षांपूर्वीच्या स्मृती जाग्या झाल्या. पिसुर्ल्याला नवीन खाण सुरू करण्यासाठी सरकारकडे अर्ज आला होता. त्यासंबंधी सरकारने मर्यादित सुनावणी पणजी येथे ठेवली होती. त्यात मला आणि पर्यावरण क्षेत्रातील काही लोकांना बोलावले होते. मला आठवते त्याप्रमाणे डॉ. क्लॉड आल्वारिस, सरकारी अधिकारी, खाण कंपनीचे अधिकारी असे 15-20 लोक होते. मला आठवते, दामोदर मंगलजी कंपनीचे हरिश नावाच्या तरुणाने या प्रस्तावाचे सादरीकरण केले. सुरुवातीला कळेना, हे गृहस्थ खाण कंपनीचे आहेत, की पर्यावरण क्षेत्रातील?

ते म्हणाले, ‘खाण उद्योग हा गोव्याच्या (Goa) भूमीचा नाश करणारा सर्वांत मोठा घटक बनून राहिला आहे. खाणींचा परिसर हा गोव्याचा भाग नव्हेच, असे वाटावे इतका हा भाग उद्ध्वस्त झालेला आहे.’ मग ते किंचित धिम्या आवाजात म्हणाले, ‘पण हा उद्योग सोडून देता येत नाही. कारण गोव्याच्या अर्थकारणाचा तो कणाच बनून राहिला आहे. यावर प्रश्न असा निघतो, की हा विनाश टाळता येत नसेल तर तो कमी करणे आणि त्याची भरपाई निसर्गाच्या पुनर्बांधणीद्वारे साध्य करणे शक्य नाही का? आहे, निश्चित आहे. मग ते का केले जात नाही? याला बरीच कारणे दिली जातात. त्यातील बरीचशी खरी आहेत. एक म्हणजे हे पर्यावरणाचे विचार पूर्वी नव्हते. सरकारची तशी बंधनेही नव्हती. त्यामुळे खाणमालकांनी आपले उत्पन्न आणि खर्च यांचा हिशोब मांडताना पर्यावरणीय खर्चाची वजावट विचारात घेण्याचे कारण नव्हते.

म्हणूनच जुन्या खाणींबाबत हे नवे निकष राबवणे कठीण होत असल्याचे सांगितले जाते. आणखीही एक वास्तव म्हणजे, जी पिढी हा उद्योग चालवत आली आहे, त्यांची हयात जुन्या पद्धतीतच रुळलेली आहे. त्यांना हे सर्व अनावश्यक वाटते. आज आमची खाण उद्योजकांची नवी पिढी पुढे येत आहे. त्यांना या पर्यावरणीय प्रश्नांची जाण आहे. या भूमीचे भविष्य सांभाळणे म्हणजे आमच्या पुढच्या पिढीच्या भविष्याचा पाया घालणे आहे. खाण धंद्यात पर्यावरण सांभाळण्याचाच प्रश्न नाही, तर ते सुधारण्याचे व्रत घेऊन पुढे जाण्याचे आव्हान आहे आणि ते स्वीकारण्याची आम्हाला उमेद आहे. पिसुर्ल्याचे आजचे चित्र पर्यावरणाच्या दृष्टीने चांगले नाही. आर्थिक दृष्टीने तर नाहीच. आज तेथे खाणीशिवायचे जे प्रश्न आहेत, तेही निपटण्याचा अंतर्भाव या योजनेत असेल. उदा. आज तेथे एक ओढा आहे. पण त्याच्या बाजूच्या शेतात गाळ येऊन त्या शेतजमिनीची पातळी ओढ्याच्या पाण्याच्या वर आली आहे. त्यामुळे उन्हाळी पीक येता येत नाही. खाणकामाची मोठी मशीनरी येईल, तेव्हा तिचा वापर करून हा प्रश्न फार खर्चाशिवाय सोडविता येईल. आज तेथील परिसर भकास आहे, तो हिरवागार करण्याचा प्रस्ताव या योजनेत आहे.’

वाक्या-वाक्याला टाळ्या पडाव्यात, अशा प्रकारे प्रस्तावना करून त्यांनी खाण योजनेचा मास्टर प्लॅन सादर केला. हिरवाईने नटलेला प्रस्तावित खाणीचा आराखडा. झाडे लावण्याचाच हा प्रस्ताव असावा, असे वाटण्याजोगा हिरव्या रंगाचा भरपूर शिडकावा केलेला होता, तोही तसाच खुलवून सांगितला. मी म्हणालो, ‘कागदावर वाटेल ते रंगविता येते. त्या जागेची पाहणी केल्याशिवाय आम्ही काहीच बोलू शकत नाही. थोड्याशा नाराजीने आमची पाहणीची मागणी मान्य करण्यात आली. बाकीच्यांना त्यात आस्था नव्हती. मी आणि क्लॉड तेथे गेलो. आम्हा दोघांपैकी कुणीच तो परिसर पाहिला नव्हता. त्यामुळे गावाची व्याप्ती, गावाच्या लोकांचे जीवनस्रोत कोणते, याचा अंदाज असल्याशिवाय मत नोंदवणे अशक्य होते. पण तो परिसर पाहिल्यानंतर त्यांनी कागदावर दाखविलेली हिरवी स्वप्ने ते किती प्रमाणात साकार करू शकतील, याची शंकाच वाटली. जागेवरचे संदर्भ दाखवून तेथील समस्यांची सोडवणूक कशी करणार, याविषयीची त्यांची उत्तरेही समाधानकारक नव्हती. मी खाण विषयाचा अभ्यासक नव्हे. (डॉ. क्लॉड यांचा अभ्यास होता.) पण मला खाणवाल्यांच्या कार्यपद्धतीचा थोडा अनुभव होता. हायकोर्टाने नेमलेल्या खनिज वाहतुकीसंबंधीच्या एका समितीवर मी सदस्य होतो. डॉ. क्लॉड आल्वारिसही होते. खाणवाल्यांची बनवाबनवी आम्ही पाहिली होती. त्यामुळे येथे काही वेगळे घडेल, असे वाटले नाही. म्हणून आम्ही दोघांनी या प्रस्तावाला नकार दिला. पण कालांतराने कळले, की बहुमताच्या जोरावर आमचा नकार डावलून पिसुर्लेच्या (Pissurlem) खाणकामाला परवानगी दिलीय.

त्या खाणीचे (Mine) काम सुरू झाले का, झाल्यास तो हिरवा मास्टरप्लॅन कितपत अंमलात आणला गेला, याचीही मी चौकशी केली नाही. पण गोव्यात (Goa) अशी अनेक गावे उद्ध्वस्त झालेली आम्ही पाहिली आहेत. दीड-दोन दशकांपूर्वीची खाणवाल्यांची पिढी पर्यावरणाविषयी एवढी सजग असती तर एवढी गावे ‘पिसुडली’ गेली नसती. परवाच्या पिसुर्ल्याच्या बातमीवरून वाटते, की खाणवाल्यांनी अजून आपली चाल सुधारलेली नाही. दीड-दोन दशकांपूर्वीची खाणवाल्यांची पिढी पर्यावरणाविषयी (Environment) एवढी सजग असती तर एवढी गावे ‘पिसुडली’ गेली नसती. परवाच्या पिसुर्ल्याच्या बातमीवरून वाटते, की खाणवाल्यांनी अजून आपली चाल सुधारलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com