Goa Mankurad Mango: भौगोलिक संकेतप्राप्त मानकुराद

Goa Mankurad Mango: देशभरात दसरी, चौसा, लंगडा अशा आंब्याच्या प्रजाती नावारूपाला आलेल्या असल्या तरी गोव्यातल्या मानकुरादाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. गोव्यातल्या अल्फान्सो आंब्याचा स्वीकार महाराष्ट्राने केला आणि त्याला जगभर लौकिक मिळवून दिलेला आहे.
Goa Mankurad Mango:
Goa Mankurad Mango: Dainik Gomantak

गोव्याची छोटेखानी भूमी संपूर्ण जगामध्ये आंब्याच्या वेगवेगळ्या प्रजातीसाठी नावारूपाला आलेली आहे.

गोव्यातल्या स्थानिक आंब्यावरती पोर्तुगीजांनी कलमे केल्याने नवीन प्रजाती निर्माण झाल्या.म्हणून आज ही भूमी मधुर रसाने युक्त अशा आंब्यासाठी प्रसिद्धीस आली. सोळाव्या शतकात गोव्यात ज्या आंब्याच्या नवीन प्रजाती निर्माण झाल्या त्यांची चव आणि सुगंध सर्व दूर पसरला.

इथल्या आंब्यांना देश-विदेशात विशेष मागणी लाभली. गोव्यात सध्या आंब्याचे दिवस असून मानकुराद हा आंबा गोव्याचे राज्य फळ म्हटले तर वावगं ठरणार नाही. ऑगस्ट 2023 मध्ये मानकुराद आंब्याच्या प्रजातीला भौगोलिक संकेत प्राप्त झाला, आणि गोव्याच्या लौकिकात मानाचा तुरा खोवला गेला.

मानकुराद या आंब्याची चव न्यारी आणि पौष्टिक गुणधर्माने युक्त असल्याने जेव्हा मानकुराद आंबा बाजारात येतो तेव्हा त्याची किंमत जवळपास सात हजार रुपये डझन अशी असते. एवढी किंमत झाली तरी खवय्ये मानकुरादाचा आस्वाद घेण्यासाठी अत्यंत उत्सुक असतात. गोव्यात मोंसेरात,फर्निदाद, नीलम पायरी, भिश्म, हिलारियो अशा आंब्याच्या विविध प्रजाती असून आज महाराष्ट्रात वेंगुर्ला, देवगड आणि रत्नागिरी हापूस या नावाने ओळखला जाणारा आंबा मूळचा गोव्यातला अल्फांसो या नावाने परिचित असलेला.

गोव्याचा हा आंबा वेगुर्ल्याला गेला आणि महाराष्ट्रात हापूस आणि कोकणचा बापूस म्हणून नावारूपाला आलेला आहे.

गोव्यात मानकुराद आंब्याच्या वैविध्यतेत काही बागायतदारांनी भर घातलेली आहे आणि त्यामुळे कार्डोज,कॉस्ता, गावस आमराल या नावाने हे आंबे ओळखले जातात. आंब्याची बागायत सेंद्रिय पद्धतीने करून इथल्या बागायतदारांनी आपल्या वृक्षावरच्या मानकुरादाला विशेष लौकिक मिळवून दिलेला आहे.

दोन वर्षापूर्वी भारतीय कृषी अनुसंशोधन केंद्राने शिवोली मानकुराद आंब्याची नवीन प्रजाती शोधून नावारुपाला आणलेली आहे. पेडणे ते काणकोण पर्यंत गोव्याच्या भूमीत मानकुराद आंब्याचा दरवळ त्याच्या सुगंधाने आणि चवीने निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे पोर्तुगीज राजवटीत निर्माण झालेला त्याचा दबदबा गोवा मुक्तिनंतरही कायम राहिलेला आहे.

मानकुराद आंब्याला भौगोलिक संकेत प्राप्त झाल्याने त्याची वैशिष्ट्ये प्रकर्षाने जगासमोर आलेली आहेत.‘‘आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो” असे आंब्या संदर्भात इथल्या लोकगीतात उल्लेख आढळतात. धालोत्सवाच्या मांडावरती कष्टकरी महिला “दारातलो आमो गे बाई तवरानी डोले गे” असे आम्रमंजिरीला पाहून म्हणतात.

भौगोलिक संकेतांद्वारे एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता स्पष्ट होऊन व्यापार आणि उद्योगाला चालना मिळत असते. त्यामुळे आपल्या उत्पादित वस्तूला भौगोलिक संकेत मिळवण्यासाठी उत्पादकांची आजच्या काळात धडपड चालू असते.

गोव्यात काणकोण तालुक्यातल्या खोलच्या मिरचीला भौगोलिक संकेत प्राप्त झालेला असून गोवा सरकारतर्फे देश-विदेशात चवीला मधुरता, पौष्टिकता आणि रसदारपणासाठी प्रसिद्धीस पावलेल्या मानकुराद आंब्याला भौगोलिक संकेत मिळवण्यासाठी चेन्नई येथील केंद्रीय कार्यालयाकडे १४ डिसेंबर 2020 रोजी गोवा राज्य विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेने प्रस्ताव सादर केला होता.

जेव्हा एखाद्या घटकाला भौगोलिक संकेत लाभतो तेव्हा व्यापाराच्या दृष्टीने वस्तूच्या गुणवत्तेची आणि वैशिष्ट्याची हमी मिळते.वस्तूला संरक्षण लाभल्याने कोणताही अन्य उत्पादक या समान उत्पादनाच्या वस्तू बाजारात आणून त्या नावाने विकू शकत नाही. बौद्धिक मालमत्ता अधिकाराद्वारे सदर वस्तू संरक्षित असते आणि त्याच प्रजातीच्या वस्तूची विक्री केल्यास व्यापाऱ्यावरती कायदेशीर कारवाई करता येते.

महाराष्ट्र राज्याने आजतागायत पुणेरी पगडी, पैठणी साडी, घोलवडचे चिकू, जळगावची केळी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, नाशिकची द्राक्षे, कोल्हापूरचा गूळ आणि पुण्याच्या आंबेमोहर तांदळाला पुणे येथील गणेश हिंगमीरे यांनी नियोजनबद्ध ऐतिहासिक आणि विज्ञाननिष्ठ पुरावे सादर करून भौगोलिक संकेत मिळवलेले आहेत.

200८ साली त्यांनी पुणेरी पगडीला भौगोलिक संकेत यशस्वीपणे मिळवला. महाराष्ट्राच्या तुलनेत गोवा राज्य छोटे असले तरी कृषी नैसर्गिक व उत्पादनाची वैविध्यपूर्ण आणि समृद्ध अशी परंपरा लाभलेली आहे. गोव्याला गेल्या कित्येक शतकापासून फळांची, धान्याची, समृद्ध परंपरा लाभलेली असून त्यात आंब्यासारख्या फळाचे वैविध्य अचंबित करण्यासारखे आहे.

१५६३ साली गार्सिया द ऑर्तापासून १६५३ मध्ये निकोलाव मानूची १७२७ मध्ये अलेक्झांडर हॅमिल्टन सारख्या ज्ञानवंताने गोव्यातल्या आंब्याचे वैभव आणि गुणवत्ता स्पष्ट केलेली आहे. पुण्याच्या पेशवे दरबारात राजदूत म्हणून कार्यरत असणाऱ्या विठ्ठलराव वालावलकर यांनी कोणी सोम्या गोम्या उठून गोव्यातल्या आंब्याची गुणवत्ता आणि महत्त्व याची दखल न घेता बाजारात त्यांची विक्री करत असल्याबाबत सरकारला लक्ष देण्यास सांगितले होते.

गोव्यातल्या आंब्याच्या चवीला नवा साज देण्यात पोर्तुगीजांबरोबर आलेल्या जेजुईट पंथीयानी महत्त्वाचे योगदान केलेले आहे. देशभरात दसरी, चौसा, लंगडा अशा आंब्याच्या प्रजाती नावारूपाला आलेल्या असल्या तरी गोव्यातल्या मानकुरादाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. गोव्यातल्या अल्फान्सो आंब्याचा स्वीकार महाराष्ट्राने केला आणि त्याला जगभर लौकिक मिळवून दिलेला आहे. गोवा सरकारने इथल्या आंबे ,काजू , कोकमापासून अन्य घटकांना भौगोलिक संकेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

त्याचा फायदा इथल्या शेतकरी बागायतदारांना यशस्वीरित्या मिळू शकतो. वेंगुर्ला काजू, रत्नागिरी कोकम, सांगलीचे बेदाणे यांना भौगोलिक संकेत मिळून महाराष्ट्र राज्याने आपली घोडदौड कायम ठेवलेली आहे.आज गोव्यातल्या अल्फान्सो आंब्याचे हापूस नामकरण करून महाराष्ट्र राज्यातल्या आंबा उत्पादकाने आपली आगेकूच आंबा व्यापार क्षेत्रात प्रभावीरीत्या आरंभिलेली आहे.

Goa Mankurad Mango:
Indian Super League: एफसी गोवा आणि मुंबई सिटी यांच्यात आज होणार चुरशीची लढत

पोर्तुगीज अमदानीत गोव्यात दक्षिण अमेरिकेतून काजू, अननस, पेरू, सीताफळ यासारखी फळ फळावळ आली. सत्तरीतल्या सेंद्रिय काजूगराने आपला दर्जा आणि गुणवत्ता कायम राखलेली आहे. चव, माधुर्य आणि पौष्टिकता या दृष्टीने गोव्याच्या मानकुराद आंब्याचा लौकिकसुद्धा पूर्वीपासून सुप्रतिष्ठित आहे.

मांडवी- म्हापसा या नद्या आणि खाड्यांच्या पाण्याने वेढलेल्या चोडण बेटाला आंब्याच्या वैभवाने चुडामणी म्हणून नावारूपाला आणले होते. चोडण,मये येथील उत्पादकांनी रासायनिक खते, जंतुनाशके तसेच घातक घटकांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने आंब्याचे संगोपन केलेले आहे आणि त्यामुळे त्यांच्या आंब्याचा गोडवा आणि दरवळ शब्दापलीकडची ठरलेली आहे.

मानकुरादचा गोडवा टिकवण्याबरोबर त्याच्याशी निगडित बागायतदारांना व्यापारातून कसा जास्तीत जास्त फायदा मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न होणे काळाची गरज आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com