भारताला स्वातंत्र मिळून ७५ वर्षाचा काळ लोटलाय. या काळात आपल्या देशातील अनेक राज्ये अशी आहेत ज्यांना देशाच्या स्वातंत्रानंतरही अनेक वर्ष स्वातंत्र्यासाठी लढावं लागल. त्यातीलच एक राज्य म्हणजे गोवा. भारतीय सेनेने १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा, दमण आणि दीव हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील ऊर्वरित प्रदेश पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त केला.
१९६१ च्या युद्धानंतर भारतभूमीवरील उरलेसुरले पोर्तुगीज (Portuguese) अधिपत्य समाप्त झाले. आणि गोवा (Goa) पूर्णपणे मुक्त झाला. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला गोवा १९ डिसेंबर रोजी पारतंत्र्यातून मुक्त झाला आणि भारतात त्याचा समावेश झाला. या चळवळीत महाराष्ट्रातील अनेकांचा महत्वाचा सहभाग होता. गोवा मुक्ती चळवळीसाठी पुण्यातील केसरीच्या कार्यालयात सर्वपक्षीय बैठक पार पडली होती. या बैठकीत गोवा विमोचन साह्यक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या माध्यमातून एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ लिमये, सेनापती बापट, पीटर अल्वारीस, प. महादेव शास्त्री जोशी, केशवराव जेधे, मधू दंडवते, जयवंतराव टिळक, वसंतराव तुळपुळे यांच्यासह अनेक महिलांचा (Women) देखील यात समावेश होता.
गोवा मुक्तीसाठी (Goa Liberation) या सर्व मंडळींचा मोलाचा वाटा होता. यातीलच एक म्हणजे राजकीय नेते, माजी केंद्रीय रेल्वे मंत्री आणि अर्थमंत्रीपद भूषवलेले नेते मधू दंडवते (Madhu Dandavate) हे होय. मधू दंडवते यांना कोकण रेल्वेचे (Railway) शिल्पकार म्हणून ओळखले जाते. ते मूळचे अहमदनगरचे मात्र कोकणला त्यांनी आपली कर्मभूमी मानली आणि याच भावनेतून उदयास आली कोकण रेल्वे. त्यामुळे मधू दंडवते यांच्या कार्याचा गौरव करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने सरकारने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. भाजपचे नगरमधील प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदा देवगावकर यांच्या यासंदर्भातील पाठपुराव्याने राज्य सरकारने संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या दृष्टीने प्रस्ताव अंतिम होण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेमधील एका रेल्वेला ‘दंडवते एक्सप्रेस’ असे नाव देण्याबाबत गृहविभागाला, तसेच मधु दंडवते यांचे स्मारक उभारण्याबाबत ग्रामविकास आणि नगरविकास विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. दंडवते यांच्या नावाने एखादी योजना सुरू करण्याबाबत नियोजन विभागाने आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी रा. सु. वडनेरकर यांनी दिली आहे. या आदेशाची प्रतही त्यांनी देवगावकर यांना पाठवली आहे. दंडवते यांच्या बद्द्दल सांगायचं झालं तर त्यांनी कोकणातील राजापूर मतदारसंघाचे अनेक वर्षे संसदेत प्रतिनिधीत्व केले.
केंद्रीय रेल्वे मंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद तर योजना आयोगाचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषविले. कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय त्यांचेच आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाने एखादी रेल्वे एक्सप्रेस, स्मारक आणि विशेष योजना सुरू होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोकण रेल्वेचे जनक, समाजवादी विचारसरणीचे, अजातशत्रू प्रा. मधु दंडवते यांचा जन्म 21 जानेवारी 1924 रोजी अहमदनगर येथे झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 1945 मध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेनंतर अनेक गुणवंत-नामवंत लोकांची नेमणूक केली त्यापैकी प्रा. मधु दंडवते एक होते. संस्थेच्या मुंबई येथील सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्टस अँड सायन्सेसमध्ये भौतिकशास्त्र विभागप्रमुख आणि प्रभारी प्राचार्य म्हणून त्यांनी काम केले होते. साधी राहणी व उच्च विचारसरणीचे म्हणून दंडवते सर्वश्रुत होते. 1942 मध्ये त्यांनी भारत छोडो आंदोलनात भाग घेतला आणि त्यांनी त्यावेळी तुरुंगवासही भोगला. गोवा मुक्ती आंदोलन (Goa Liberation Movement) तसेच संयुक्त महराष्ट्र आंदोलनातही त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे गोवा मुक्तीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे याचीच दखल घेऊन राज्य सरकार कोकण रेल्वेमधील एका रेल्वेला ‘दंडवते एक्सप्रेस’ असे नाव देणार असून दंडवते यांचे स्मारक उभारण्याबाबत ग्रामविकास आणि नगरविकास विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. दंडवते यांच्या नावाने एखादी योजना सुरू करण्याबाबत कार्यवाही देखील सुरू करण्यात आली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.