चौदा वर्ष गोव्याचा प्रश्न शांततापूर्ण आणि वैध मार्गाने सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न

इकडे नेहरूंच्या टीकाकारांनी हाकाटी सुरू केली, "जोपर्यंत नेहरू आहेत तोपर्यंत गोवा पोर्तुगालच्याच ताब्यांत राहील."
Pandit Jawaharlal Nehru
Pandit Jawaharlal Nehru Dainik gomantak
Published on
Updated on

भारत गोव्याच्या बाबतीत बळाचा वापर करणार नसल्याचे नेहरूंनी सांगितले असले तरी 17 एप्रिल 1957 रोजी त्यांचे संरक्षणमंत्री बनलेले कृष्ण मेनन आपले सहकारी म्हणजे सीआरपीचे जी. के. हंडू, आयबीचे बी.एन. मलीक आणि सेना मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ ब्रीजमोहन कौल नेहरूंच्या नकळत बळाचा वापर करून गोवा (goa) ताब्यात घ्यायची योजना आखू लागले होते. ( ब्रीजमोहन कौल याना इतरांचे ज्येष्ठत्व डावलून बढती देण्यात आली होती, चीनविरुद्धच्या युद्धांत झालेल्या पराभवानंतर त्यांची गच्छंती करण्यात आली.)

न्यू यॉर्क टाइम्सचे पुत्नाम वेलॅस हँगन याच काळात नॅशनल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश करून नवी दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून काम पाहात होते. 'कृष्ण मेनन यांनी गोव्याच्या विरोधात केलेली घाणेरडी खेळी' या मथळ्याच्या लेखात ते लिहितात, ''भारताच्या सीमा दलाची एक तुकडी गोव्यात पाठवली जाणार होती. त्यातील काही पोर्तुगीजांकडून पकडले जातील आणि राहिलेले माघारी येऊन वर्दी देतील. पकडल्या गेलेल्या आपल्या साथीदारांच्या मुक्ततेसाठी सैन्याची मोठी तुकडी गोव्यात शिरून पोर्तुगीजांशी (Portuguese) दोन हात करील आणि आपल्या मनुष्यबळाच्या जोरावर गोवा काबिज करील, अशी योजना शिजत होती.''

Pandit Jawaharlal Nehru
पोर्तुगीजांविषयी पसरलेल्या भयगंडाला पहिला तडा दिला 'पिंटोंच्या बंडाने'

नेहरूंना मेनन यांच्या या कारस्थानाचा सुगावा लागला. त्यानी मेनन व त्यांच्या कंपूला बोलावून घेतले व आपल्याला कल्पना न देता असा काही बेत शिजवत असल्याबद्दल त्यांची कानउघाडणी केली. मात्र मेनन यांच्याकडून दबाव येतच होता. हँगन लिहितात, ''जी. के. हंडू यांच्यासारख्या आपल्या निवडक चेल्यांकरवीं मेनन यांनी गोव्यांतील पोर्तुगीजांच्या विरोधात घातपाती कारवाया सुरू केल्या. भारतीय सीमा दल घातपाती कारवायांसाठी मनुष्यभरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रांसह गोव्यात पाठवी. पोर्तुगीजांचे सीमेवरले वर्तन चिथावणीखोर असल्याचे खोटेच वृत्त भारतीय प्रसारमाध्यमांना पद्धतशीररित्या पुरवले जाई.''

त्या काळी एकमेव भारतधार्जिणे पाश्चिमात्य लेखक म्हणून ओळखले जाणारे प्रो. आर्थर रुबिनॉफ यांच्या मते या आग्रहामुळेच भारत गोव्यात बलप्रयोगाचा विचारही करू शकत नव्हता. '' अन्य राष्ट्रांना शांततेची तान आळवण्यास सांगण्याच्या धोरणामुळे अन्य कोणत्याही देशापेक्षा भारताला आपल्या सशस्त्र दलाचा वापर करणे कठीण बनले होतें. ''

डचांनी 1947 साली इंडोनेशियांत बलप्रयोग केला तेव्हा संयुक्त राष्ट्रातील भारताचा प्रतिनिधी तारस्वरांत विचारत होता, ''कोणताही देश अशा प्रकारे संवादाचे माध्यम सोडून शक्तीचा वापर कसा करू शकतो? प्रत्येक देशाने अशाच प्रकारे मनमानी वर्तन केले तर मग संयुक्त राष्ट्रसंघ असण्याचे औचित्य ते काय? या संघटनेला कोणतीच प्रतिष्ठा व अधिकार राहाणार नाहीत आणि ती अशीच लुप्त होत जाईल.''

Pandit Jawaharlal Nehru
इतिहासाच्या पाऊलखुणा वीरांगना सुधाताई जोशी

18 डिसेंबर 1961 रोजी अमेरिकेच्या प्रतिनिधीने याच शब्दांत भारताच्या गोवा कारवाईची परतफेड केली.

पेनिसिल्वानिया विद्यापीठाचे प्राध्यापक नॉर्मन पाल्मर ( हे अमेरिकेतील फ्रँडस ऑफ इंडिया कमिटीचे अध्यक्षही होते.) यांचे एक निरिक्षण प्रसिद्ध आहे. ते लिहितात, ''जेव्हा नेहरू काही निर्णय घेतात तेव्हा ते भारताचे पंतप्रधान म्हणून घेतलेले आहेत की पक्षाचे नेते म्हणून की आपणच सर्वेसर्वा असल्याच्या थाटांत घेतलेले आहेत, हे कळणे कठीण होऊन बसते. ते अनेक प्रकारच्या टोप्या परिधान करतात आणि अनेक खुर्च्यांत बसतात, पण कुठल्याही खुर्चींत बसून त्यानी कुठलीही टोपी घातलेली असली तरी तेच निर्विवादपणे भारताचे सर्वोच्च निर्णयकर्ते आहेत.''

भारत चौदा वर्षे गोव्याचा प्रश्न शांततापूर्ण आणि वैध मार्गाने सोडवण्याचा आटोकाट यत्न करत होता. मुत्सद्देगिरी, सत्याग्रह, आर्थिक कोंडी, अनौपचारीक चर्चा, त्रयस्थाचा हस्तक्षेप, संयुक्त राष्ट्रे, असे सर्व पर्याय वापरले गेले. पण सालाझार ढिम्म होता. नेहरूना हुकुमशहांचा तिरस्कार वाटायचा. पण त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहिर अशी झाली होती. भारताने बहिरेपणाचे सोंग आणणाऱ्या हुकुमशहाशी चर्चा करत बसायचे की शांततेची तान आळवण्याचे सोडून- व दांभिक असल्याचा आरोप सहन करून- बलप्रयोग करायचा?

तेंही 'सर्वेसर्वा' नेहरूच ठरवणार होते.

सालाझार नेहरूंच्या या शृंगापत्तीचा गैरफायदा घेत होता. गोव्यावर हल्ला करून क्षुल्लक लाभासाठी नेहरू आपल्या आंतरराष्ट्रीय कीर्तीला बट्टा लावणार नाहीत, याची खात्री त्याला वाटत होती. सैन्याच्या बळावर पोर्तुगालला गोवा राखता येणार नाही हे सालाझार जाणून होता. मात्र नेहरुंच्या शांततावादाला भारतात होऊ घातलेल्या निवडणुकांचे व देशी राजकारणाचे कुंपण असल्याची जाणीव त्याला नव्हती.

इकडे नेहरूंच्या टीकाकारांनी हाकाटी सुरू केली, "जोपर्यंत नेहरू आहेत तोपर्यंत गोवा पोर्तुगालच्याच ताब्यांत राहील."

पंडित नेहरू हे भारतातील एका गर्भश्रीमंत घराण्यात जन्मलेले काश्मिरी पंडित होते. असे सांगतात की त्यांचा परिवार आपले कपडे धुण्यासाठी पॅरिसच्या लॉंड्रींत पाठवत असे आणि संपूर्ण देशाला महिनाभर अन्न पुरवू शकेल इतकी संपत्ती त्यांच्याकडे होती. परदेशांत उच्च शिक्षण घेतलेल्या बहुश्रुत नेहरूंनी भारताचे सदैव हितच चिंतिले. मात्र दुर्दैवाने गोव्याच्या बाबतीत त्यांना योग्य तो सल्ला देणारे कुणीही जवळपास नव्हते. तरीही जेव्हा त्यांना देवाज्ञा झाली तेव्हा " एक स्वप्न उद्ध्वस्त झाले, एक गीत मुके झाले आणि एक ज्योत अनंतात निमाली. ते स्वप्न होते भूक आणि भयविरहित जगाचे. ते गीत होते गीतेचा अंतर्नाद आणि गुलाबाचा सुगंध असलेल्या महाकाव्याचे आणि ती ज्योत होती रात्रभर जळणाऱ्या दिव्याची, जिने अंधाराचा प्रतिरोध केला, वाटेवर प्रकाशाची पखरण केली आणि एका प्रातःकाली निर्वाण प्राप्त केले... आज भारतमातेचे हृदय विदिर्ण झाले आहे; तिने आपला प्रिय युवराज गमावला आहे. आज मानवताही दुःखी आहे; तिचा परमभक्त तिच्यापासून दुरावला आहे. आज शांतता अस्वस्थ आहे; तिचा संरक्षक आता तिच्यासोबत नाही!'' असे उद्गार राज्यसभेत दि. 27 मे, 1964 रोजी काढले होते पंडित नेहरूंचे राजकीय विरोधक अटल बिहारी वाजपेयी यांनी.

वाल्मिकी

फालेरो

सर्वेसर्वा नेहरू

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com