Goa Cashew: पोर्तुगीजांबरोबर ख्रिस्तीधर्माचा प्रचार करण्यासाठी आलेल्या धर्मगुरूंनी गोव्यात काजूची लागवड केली

Goa Cashew: अकोर्जावरून फ्रेंच भाषेत काजूला कॅश्‍यू हे नाव लाभले आणि तोच शब्द इंग्रजी भाषेत स्वीकारला गेला.
cashew
cashewDainik Gomantak

राजेंद्र पां. केरकर

गोव्यात काजू वृक्षाचे आगमन १५७० च्या आसपास झालेले असले तरी त्याचे इथल्या आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातले महत्त्व इथल्या लोकांना एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उमजले.

पोर्तुगीजांबरोबर गोव्यात ख्रिस्तीधर्माचा प्रचार करण्यासाठी जे धर्मगुरू आले होते त्यांनी इथे ब्राझिलहून काजूची रोपे आणून, वनीकरण आणि मृदा संरक्षण करण्यासाठी त्यांनी काजूची लागवड केली होती. काजूचा समावेश सदाहरित वृक्षात होत असून, आज बागायती पीक म्हणून त्याची लागवड गोवा कोकणात मोठ्या प्रमाणात होत असल्याकारणाने त्याचा गंभीर धोका इथल्या स्थानिक वृक्षसंपदेवरती होऊन, बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत.

सरकारी पातळीवरती काजू महोत्सवाचे आयोजन करून, त्यांच्या लागवडीसाठी राजाश्रय प्रदान केलेला आहे. हुर्राक आणि फेणी या मद्याची निर्मिती काजू बोंडूच्या रसापासून करण्याच्या दृष्टीने गोमंतकीय लोकमानसाचे योगदान महत्त्वाचे ठरलेले आहे. इथल्या जातीजमाती भेरली माड, शिंदी वृक्षापासून मद्यनिर्मिती करायचे. कालांतराने गोव्यात माडाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यावर माडाच्या सुरीपासून मद्यनिर्मिती होऊ लागली. काजूबोंडच्या रसापासून जेव्हा मद्यनिर्मिती करतात याची जाणीव इथल्या लोकमानसाला झाली तेव्हा काजूच्या लागवडीचे महत्त्व वृध्दिंगत होत गेले.

आज नगदी पिकांपैकी काजूगराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने वाढती मागणी असल्याने देशभर काजूची लागवड करण्याकडे लोकांचा कल, वाढत चाललेला आहे. आणि त्यामुळे पश्‍चिम घाटाच्या पर्वतरांगा, तेथील वन्यजीव आणि वृक्षसंपदेच्या नैसर्गिक अधिवासासमोर मोठे आव्हान निर्माण झालेले आहे. वनस्पतीशास्त्राच्या परिभाषेत काजूवृक्षाला ॲनाकार्डियम ऑक्सिडेंटेल नाव लाभलेले असून, मूळ पोर्तुगीज भाषेत त्याला काजू शब्द वापरला जातो.

आणि हाच शब्द मराठी आणि कोकणीत लोकमान्य झालेला आहे. ब्राझीलमध्ये काजूला ‘अकौजा’ म्हटले जाते. अकोर्जावरून फ्रेंच भाषेत काजूला कॅश्‍यू हे नाव लाभले आणि तोच शब्द इंग्रजी भाषेत स्वीकारला गेला. काजूवृक्षाला लागणारा बोंडू हे मुख्य फळ नसून ते आभासी असून त्याच्याशी संलग्न असणारे मूत्रपिंडाकृती हे त्याचे खरे फळ आहे. काजू बोंडूचा आंबट, गोड व तुरट रसापासून खरे फळ आहे. काजू बोंडूचा आंबट, गोड व तुरट रसापासून मद्यनिर्मिती करताना प्रथम हुर्राक पेय तयार केले जाते आणि त्यानंतर फेणीची निर्मिती होते.

हुर्राक आणि फेणी ही दोन्ही पेये त्यांच्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक घटकांमुळे इथल्या मद्यपींसाठी आकर्षण ठरलेली असून, त्याच्या सेवनाची गोडी लागलेल्या मद्यपींच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण झालेले असले तरी गोवा सरकारने त्याला राज्याचे वारसा पेय म्हणून सन्मानित केलेले असल्याकारणाने तसेच त्याची विक्री करण्यासाठी ठिकठिकाणी मद्यालये खोलण्यास प्रोत्साहन दिलेले असल्याने फेणी आणि हुर्राक या दोन्ही पेयांची मागणी गोव्यात आणि गोव्याबाहेर वाढत चालली आहे.

आज ही दोन्ही पेय, गोव्याची ओळख म्हणून सरकार सातत्याने सांगत असल्याने, मद्यालय सुरू करणे आणि त्याची जास्तीत जास्त विक्री करणे पैसा, प्रतिष्ठा कमावण्याचे महत्त्वाचे माध्यम म्हणून ओळखले जाते. काजूच्या बोंडूपासून सरबत, सायरप करणे शक्य असताना आणि शेजारच्या महाराष्ट्रात त्या रसापासून आल्हाददायक पेयाची निर्मिती केलेली असताना, गोव्यात हुर्राक आणि फेणीच्या निर्मितीचे प्रस्थ निर्माण झालेले आहे.

काजूच्या मौसमात बोंडूच्या रसापासून हुर्राक आणि फेणीची निर्मिती करण्याच्या इथल्या व्यवसायाला गेल्या पाऊण शतकापासून गती लाभलेली आहे. त्यामुळे इथल्या लोकजीवनात तसेच धर्म-संस्‍कृतीत हुर्राक आणि फेणीला पूर्वापार स्थान लाभलेले आहे.

हुर्राक आणि फेणी या मद्यांची ओढ ज्याप्रमाणे इथल्या कष्टकऱ्यांना आहे, त्याचप्रमाणे अदृश्‍य रूपात वावरणाऱ्या देवचारांनादेखील असल्याकारणाने, वर्ष पध्दतीनुसार ठराविक दिवशी अशा देवचारांना सोरो (मद्य) आणि रोट अर्पण करण्याची लोकपरंपरा आहे.

शिगम्याच्या लोकोत्सवावेळी हुर्राक आणि फेणीचा आस्वाद मद्यपीबरोबर अन्य मंडळी घेतात आणि रोमटामेळातल्या लोकगीतांचे उत्स्फूर्तरित्या गायन करण्यात धन्यता मानतात. एकेकाळी माडांच्या सुरीपासून मद्यनिर्मिती करण्याला गोव्यात प्राधान्य लाभलेले होते. परंतु आज सुरीऐवजी काजू बोंडूपासून काढण्यात येणाऱ्या रसाला विशेष महत्त्व लाभलेले आहे आणि त्याच्यापासून तयार केल्या जाणाऱ्या हुर्राक फेणीचे प्रस्थ त्यामुळे दिवसेंदिवस वृध्दिंगत होत असल्याचे पहायला मिळत आहे.

पट्टीचे मद्यपी विदेशी रम, विस्की, बियर, ब्रॅन्डीसारख्या कमी नशा आणि झिंग आणणाऱ्या पेयांऐवजी हुर्राक फेणीला जास्त प्राधान्य देत असतात. गोव्यातला मद्यपी ज्या शिताफीने हुर्राक आणि फेणीचे प्राशन करून, त्यांना सहजपणे पचवते. त्याप्रकारे बिगर गोमंतकीयांना सुरुवातीला या पेयांचे प्राशन करताना लोटांगण घालण्याची पाळी येते.

हुर्राक आणि फेणीच्या प्राशनाने मद्यपीच्या आरोग्याचा खेळखंडोबा झालेला असला तरी या पेयांना राजाश्रय देण्याचे प्रयत्न मद्यव्यावसायिकांनी पूर्वापार चालवलेले आहे. आणि त्यामुळे २००९साली फेणी या मद्याला भौगोलिक मानांकन प्राप्त झाले तर त्याउलट पौष्टिकता, रुचकरपणा यांनी समृध्द असलेल्या काजूगराला भौगोलिक मानांकन मिळवण्यास २०२३ पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. पोर्तुगीज अामदनीत सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात काजूची लागवड गोव्यात ख्रिस्ती धर्मगुरूद्वारे करण्यात आली तरी काजू हे बागायती पीक आणि विदेशी चलन मिळवून देणारा घटक होण्यासाठी चक्क अडीचशे वर्षे वाट पहावी लागली.

काजूचे उत्पादन वाढण्यासाठी गोव्यातल्या पारंपरिक कुमेरी शेतीवरती येथील पोर्तुगीज सरकारने जे निर्बंध लादले ते कालांतराने कारणीभूत ठरले आणि मुक्तीनंतर आपल्या उपजीविकेसाठी इथल्या कष्टकऱ्यांनी काजू पिकाला प्राधान्य दिले.

त्यामुळे पेडणे ते काणकोणपर्यंत राज्यात काजूच्या लागवडीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झालेला पहायला मिळत आहे. गोव्यातील काजूर हे ग्रामनाम असो अथवा काजूमळ, काजूवाडा ही स्थळनामे इथे असलेल्या काजूच्या प्रस्थाची प्रचिती आणून देतात.

गोव्यातील काजूगराची चव आणि त्यातल्या एकंदर पौष्टिक घटकांची प्रचिती देशविदेशात परिचित असल्याने इथल्या काजूगरांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. १९२६ साली गोव्यात व्यावसायिक तत्त्वावर काजूकारखान्यांची सुरुवात झाली. १९३० साली काजूगरांची निर्यात विदेशात करण्याला प्रारंभ झाला.

डिचोलीतील गणेश महादेव प्रभू झांट्ये यांनी काजू भाजून, त्यातल्या गराची निर्यात मुंबई आणि कराचीच्या बाजारपेठेत करून झांट्ये कुटुंबाच्या काजू व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर काजूच्या नियमित निर्यातीच्या व्‍यवसायाला चालना देण्याच्या दृष्टीने प्रभु झांट्ये यांनी विटा पॅक कॉर्पोरेशन या अमेरिकन कंपनीची मदत घेऊन आपल्या व्यवसायाला नवा आयाम मिळवून दिला. त्यानंतर १९४२-४३ पासून काजू व्यवसायाने नवी भरारी घेण्यास प्रारंभ केला.

आज बदलत्या काळानुसार आणि इथल्या काजूला जी मागणी आहे, त्यानुसार पुरवठा करण्यासाठी व्यावसायिक वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवत आहेत. आगामी काळात गोव्याच्या काजूची ओळख टिकवण्याचे मोठे आव्हान इथल्या व्यावसायिकांवरती आहे.

पेडणे ते काणकोणपर्यंत राज्यात काजू लागवडीचा प्रसार दिसतो. गोव्यातील काजूर हे ग्रामनाम असो वा काजूमळ, काजूवाडा ही स्थळनामे इथल्या काजूच्या प्रस्थाची प्रचिती आणून देतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com