घोडगावयलो

कोणे एके काळी तिसवाडीच्या दिवाडी बेटावरील, नार्वेहून नाईक गावकर कुटुंबीय येऊन स्थयिक झाले. हा परिसर त्यांना भावला
Goa Temple
Goa TempleDainik Gomantak

प्रा. पौर्णिमा केरकर

आता गाव बराच ऐसपैस पसरला आहे….अजूनही वाढणार.. वाढत जाणार…झाडापेक्षा…डोंगर..पशु पक्ष्यांपेक्षाही माणसांच्या सिमेंट काँक्रीटच्या घरांची दाटी आणि उंची वाढू लागलेली आहे.

त्यामुळे एकेकाळी इथे देवराया होत्या, त्यात कोकम,काजरो,घोटींग सारखी देशी उपयुक्त झाडे होती असे कोणी सांगितले तरीही विश्वास बसणार नाही.आता सर्वत्र इमारतींचे जंगल वाढलेले आहे. त्यात अल्पप्रमाणात असलेल्या झाडांचा श्वास गुदमरू लागला आहे.तरीही ही अशी पवित्र वने त्या तिथे होती.

जी गावाची राखण करायची.घोटींग सारख्या वृक्षाने तर संपूर्ण गावचे रक्षण करण्याचे व्रतच घेतले होते…मात्र त्याचेही रूपांतर एका सिमेंट काँक्रीटच्या घुमटीत झालेले आहे.ही घुमटी प्रतीक आहे,एकेकाळच्या या परिसरातील वैभवशाली परंपरेची!शेता भाटानी,माडापोफळीनी … आणि सुजलाम सुफलाम अशा खाजनानी भरलेला हा खांडोळा गावचा परिसर.इथे कोणे एके काळी तिसवाडीच्या दिवाडी बेटावरील, नार्वेहून नाईक गावकर कुटुंबीय येऊन स्थयिक झाले.हा परिसर त्यांना भावला…आपलासा वाटला.

कायमस्वरूपी आपला गाव सोडून याच खांडोळा गावाशी त्यांनी नाळ जोडली. ज्या जागेत त्यांनी स्वतःसाठी घर बांधायचे ठरवले ती जागा घोडगावयल्या जागेकाराच्या अखत्यारीत येत होती. त्यामुळे त्याला सांगणे करूनच घराचे बांधकाम सुरू झाले.

नाईक गावकर घराण्याच्या मुख्य व्यक्तीने “तुझ्या छत्रछायेत माझी पिळगी येऊन राहणार आहे, तेव्हा तिला सर्व क्षेत्रात मान सन्मान दे. आमचे घराणे तुझा योग्य मान राखणार..त्यांना सुखी ठेव…काही चुकलं माकलं असेल तर मानून घेऊन नेहमीच कृपादृष्टी ठेव.”या कुटुंबियांनी घर बांधून आपले बस्तान बसवले.

पडवीत दोन्ही बाजूला दोन सोपे बांधले .त्यातील डाव्या बाजूचा सोफा त्यांनी खास घोडगावयल्या साठी त्याला शब्द दिल्याप्रमाणे राखून ठेवला. ज्या जागेत त्यांनी घर बांधले होते त्या परिसरात घोडगावयल्याची फेरी होत असे.

यांनी आपल्या घरात खास त्याच्यासाठी सोफा राखून ठेवला. घरच्या माणसांना…शेजाऱ्यापाजाऱ्यांना नातेवाईकांना त्या जागेचे पावित्र्य जतन करण्याविषयी सांगितले. शिवाय त्या जागी कोणीही बसता कामा नये… झोपता कामा नये… मध्यरात्रीच्या निरव शांततेत तो फेरी मारतो…कोठे कोणी संकटात तर नाही ना या विषयी दक्ष राहातो…

आणि मग या सोफ्यावर येऊन विश्रांती घेतो. त्यामुळे ती जागा त्याची आहे. .ती स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांचीच असेल असा नियमच त्या घराने वर्षोनुवर्षे स्वतःला घालून घेतला. घोडगावयल्याने या कुटुंबीयांना आपल्या कक्षेत सामावून घेतले… एवढेच नाही तर त्यांची भरभराट केली. ग्रामसंस्थेवर प्रशासनाचा सन्मान त्याच्याच आशीर्वादामुळे त्यांच्या घराण्याला लाभला.

ही सगळी घोडगावयल्याची कृपा आहे ही कृतज्ञता या कुटुंबीयांनी नेहमीच बाळगली. एकदा मात्र गावकारांच्या घरी आलेल्या पाहुण्याला रात्री घोडगावयल्या साठी राखून ठेवलेल्या सोफ्यावर झोपण्याची हुक्की आली. रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून तो मुद्दामहून त्याच सोफ्यावर झोपला.

मध्यरात्री मात्र त्याला कसल्यातरी अनामिक भीतीने घडबडून जाग आली.. पाहातो तर काय…? खांद्यावर कांबळ,हातात दांडा आणि डोक्याला फेटा अशा पेहरावात त्याची ती आकृती दिसल्याचा भास झाला. त्याने एकदम आजूबाजूला बघितले..त्याला दरदरून घाम फुटला…मी तर झोपताना सोफ्यावरच झोपलो होतो…मग आता असा खाली कसा काय ..?

हा असा विचार मनात येतो ना येतो तोच खरा प्रकार त्याच्या लक्षात आला… त्याची दमछाक झाली. त्याने मनोमन जागेकराची क्षमा मागितली….घोडगावयल्याला खोटं बोललेलं आवडत नाही. तो प्रामाणिक माणसांच्या वाटेला ही जात नाही.चुकल्या माकल्याना क्षमा करतो. खांडोळाची ग्रामदेवी सातेरीच्या सान्निध्यात गावकारांनी नार्वेहून येताना आणलेल्या वेताळालाही सामावून घेतले.

पोर्तुगीजांनी जेव्हा हळदोणच्या ग्रामदेवी भगवतीच्या मंदिराला उध्वस्त केले तेव्हा ही देवी सुद्धा घोडगावयल्याच्या छत्रछायेत स्थिरावली. फाल्गुन महिन्यात जेव्हा भगवतीची माल्याची जत्रा संपन्न होते तेव्हा ती मिरवणूक घोडगावयल्याच्या मुख्य जागे जवळून जाते.मात्र त्यापूर्वी जत्रेसाठी वाजत गाजत मिरवणूक काढताना घोडगावयल्याच्या जागेकडे पोहोचण्यापूर्वी देवी भगवती त्याला श्रीफळाचा सन्मान देते.

हा सन्मान दिला गेला नाही तर मात्र जागेकार तिची मिरवणूक अडवून ठेवतो, असे लोक सांगतात.मोडको व्हाळ जवळच असलेल्या पालसरे केरी,तामसुली गावकरवाडा आणि नंतर म्हादईशी एकरूप होतो.

घोडगावयल्याला कोंबड्याचे रक्त नको.त्याला हवी आहे प्रामाणिक वर्तणूक. शेतातील धान्याची पेणके असू देत अथवा भाजीपाल्याने भरलेला मळा…घोडगावयल्याची नजर या सर्वांवर असते,अशी लोकांची धारणा आहे. घोडगावयल्याचा धाक या परिसराला आहे.त्यामुळेच शेता भातात…घर शिवारात कधी चोरी झाल्याचे ऐकिवात नाही..ती त्याचा गावावर असलेल्या आशीर्वादामुळे. पूर्वी घोडगाच्या विशाल वृक्षात लोकमनांनी त्या अनाकलनीय तत्वांचा निवास अनुभवला होता.

कठीण प्रसंगी तर तोच आश्वासक प्रेरणा देत असे. खांडोळा भूमी ही देवदेवतांची भूमी.खाजन शेतीची सुपीकता असो अथवा पावसाळी…वायंगणी शेती असो इथल्या सुपीक भूमीने कष्टकरी जीवांच्या कष्टाचे नेहमीच चीज केलेले आहे. लोकमनाला याविषयीची कृतज्ञता आहे. त्याच्यासाठी रॉट अर्पण केले जाते.भाताची पहिली कणसे त्याच्याच साठी असतात.घोडगाचे झाड बहुगुणी …औषधी गुणधर्मामुळे ते आयुर्वेदात महत्वाचे मानले गेले आहे.

त्रिफळा चूर्णात त्याला महत्वाचे स्थान लाभलेले आहे.बेहेडा म्हणून हा वृक्ष सर्वाना ज्ञात आहे.त्याची फुले,फळे जीवसृष्टीला आकर्षित करतात. फळातील गर मुले..मोठी माणसे खातात.लोकमानसानी या वृक्षाचे बहुगुणी…औषधी गुणधर्म हेरले असावेत.त्यासाठी त्यांनी त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीनेच जागेकारांच्या रुपात त्याला अजरामर केले असावे. सभोवतालचा निसर्ग…जैवविविधता….पाणी राने वनेच माणसाला जगण्यासाठी मोकळा श्वास देतात.रोजच्या जगण्यात आनंद समाधानाची पेरणी करतात.

हे वैभव टिकाव…रुजावं.. परंपरेने प्रवाहित ठेवावं याचसाठी ही लोकसंचिते..धार्मिक.. आध्यात्मिक अनुभूतीने मानवी जगण्याला व्यापून राहिली आहेत….हे अनाकलनीय.. निराकार तत्व.. निराशलेल्या मनात आशेचा अंकुर उगवतो.. उरात अभंग श्रद्धा आणि पावलांना बळ देते.तो आहेच मला सावरायला…वाट चुकलीच तर ती दाखवायला.. असा त्याच्यावरील विश्वासच जगण्याची..संकटांना भिडण्याची नवी उमेद देतो…

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com