पोर्तुगीजकालीन गोव्यातील गणेशोत्सव

कष्टकऱ्यांत असलेली गणपतीसारख्या दैवतांवरती असलेली अपार श्रध्दा, भक्तिभाव नष्ट करणे त्यांना जमले नाही.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्रDainik Gomantak

धार्मिक विध्वंसाचे सत्र सक्रिय करून पोर्तुगीजांनी आपल्या धर्माधिकाऱ्यांखातर गोव्यातल्या जनतेचे सक्तीने धर्मांतरण आरंभले. मंदिर पाडली, मूर्तिभंजन केले, सण उत्सवांवरती बंदी घालणारे कायदेशीर कडक निर्बंध लागू केले. त्यामुळे जुन्या काबिजादीतल्या हिंदू मंदिरांचे उच्चाटन करून, त्याजागी ख्रिस्तीधर्मियांच्या भव्य प्रार्थना मंदिरांची उभारणी करण्यात आली. ख्रिस्तीकरण केलेल्या धर्मांतरितांसाठी त्यांना आपल्या मूळ धर्म, संस्कृतीपासून कायमचे परावृत्त करण्याचे षडयंत्र पोर्तुगीजांनी नियोजनबध्द आरंभले. 1585 साली पाठवलेल्या एका पत्रात फिलीप सासेती या इटालियन व्यापाऱ्याने पोर्तुगीजांनी स्थानिकांवर केलेल्या धर्मांतराच्या सक्तीचा तसेच त्यांच्यावरती धार्मिक संस्कार करायला व धर्मशास्त्राची पुस्तके वाचायला जी बंदी घातली होती त्याचा उल्लेख केलेला आहे.

जेझुईट संघाचा धर्मप्रसारक असणाऱ्या फ्रेंच पाद्री एतिएन -द-ला- क्रुवा यांनी सेंट पीटरचे पुराण या ग्रंथात गोव्यातल्या लोकमानसात गणपतीसारख्या दैवतांची विलक्षण थट्टा, उपहास व विपर्यास केलेला आहे. 1634 सालच्या या ग्रंथात गजमुखी दैवताच्या स्वरूपावरती विडंबन केले असले तरी इथल्या कष्टकऱ्यांत असलेली गणपतीसारख्या दैवतांवरती असलेली अपार श्रध्दा, भक्तिभाव नष्ट करणे त्यांना जमले नाही.

संग्रहित छायाचित्र
देवते पाव गे ! शांतादुर्गा माता की जय!

तिसवाडीतल्या दीपवती बेटावरच्या नावेली गावाचे आराध्य दैवत असणाऱ्या आणि गोवा कदंब राजवटीपासून इथल्या जनतेत प्रिय असणाऱ्या महागणपतीचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न पोर्तुगीजांनी केला. परंतु नावेलीवासीयांनी प्रारंभी खांडेपार आणि कालांतराने खांडोळ्यात महागणपतीची प्रतिष्ठापना करून, आपला भक्तिभाव चिरंतन राखला. कालांतराने जेव्हा पोर्तुगीजांनी नव्या काबिजादीतल्या प्रातांवरती आपले वर्चस्व प्रस्थापित केले तेव्हा छत्रपती शिवाजी, संभाजी आणि मराठा साम्राज्याच्या दबदब्यामुळे धर्मसमीक्षण संस्थेला पूर्वीसारखे महत्त्व देण्याची आपली कृती नियंत्रित केली. त्यामुळे कालांतराने येथील स्थानिकांमार्फत पारंपरिक सण-उत्सव साजरे करण्यात येऊ लागले. पोर्तुगीज धर्माधिकाऱ्यांची वक्रदृष्टी चुकवून भाद्रपद गणेश चतुर्थीला गणपतीचे कागदावरती चित्र रेखाटून पूजन करण्याची परंपरा चालूच राहिली. व्यापार, उद्योगधंद्यानिमित्त स्थायिक झालेल्या गोमंतकीयांनी कालांतराने कागदावर चित्र रेखाटून गणेश चतुर्थीदिवशी पूजा करण्याची परंपरा पोर्तुगीजांनी काही अंशी धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असतानाही कायम ठेवली, त्याचे दर्शन गोवा मुक्तीनंतरही पहायला मिळते.

1892 साली भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांंनी पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सार्वजनिक स्तरावरती गणेशोत्सवाच्या आयोजनाला राष्ट्रभक्तीविषयक संस्काराची सांगड 1893 साली घातली. महाराष्ट्रात आणि गोव्यात गणेशोत्सवाची परंपरा शिवकाळापासून सुदृढ झाली आणि गणेशाचे भक्त असणाऱ्या पेशव्यांच्या राजवटीत तिला आणखी वाव मिळाला असे मानले जाते. गोव्यात श्री गणेशाची उपासना प्राचीन काळापासून प्रचलित होती, त्या परंपरेला बदामी चालुक्याच्या राजवटीत विशेष ऊर्जा लाभली. गोवा- कोकणाच्या प्रांतांवरती विविध राजघराण्यांची सत्ता आली तरीसुध्दा ही परंपरा अखंडित राहिली. दिल्लीच्या अलाउद्दीन खिलजीचा सरदार मलिक कफूर आणि बहामनी साम्राज्याच्या काळात व्यापक प्रमाणावरती मूर्तिभंजन आणि मंदिरांचा विध्वंस करण्यात आला, परंतु असे असताना गणपतीच्या मूर्तींचे पूजन करण्याची परंपरा चालू राहिली.

संग्रहित छायाचित्र
Ganesh Festival 2021: गणेश चतुर्थीचे हे पाच दिवस गाळशिरेवासीयांसाठी खास आनंदाचे क्षण असतात

पोर्तुगीजांनी धर्मसमीक्षण सक्रिय असताना नवख्रिस्ती समाजाला त्यांच्या परंपरागत धर्म- संस्कृतीपासून तोडण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना पूर्णतः यश लाभले नाही. याचा प्रत्यय 1886 साली प्रकाशित झालेल्या लॉपिस मेंडिस यांच्या ‘ए इंडिया पोर्तुगेझा’ या ग्रंथातल्या एकंदर वर्णनातून कळते. गोव्यात हा उत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न होत असून, गणेशाची प्रतिमा स्थापन करून मूल्यवान दागिने आणि सभोवताली प्रकाशाची व्यवस्था करून, फुलाफळांनी अलंकृत केली जात असल्याचे म्हटलेले आहे. सुपारीच्या फळांनाही सजवण्यासाठी वापरले जायचे. गजमुखी आणि लंबोदर स्वरूपातला हा देव चतुर्हस्त पूजला जात असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. गणपती विसर्जनासाठी त्याकाळी रायबंदर येथील मूर्ती होड्यात घालून, किनाऱ्यापासून दूर जेथे नदीचे पाणी खोल असेल तेथे आणल्या जात असल्याचे चित्र सदर ग्रंथात प्रसिध्द करण्यात आलेले आहे. त्यावरून गणपती विसर्जनाचा सोहळा शंभर वर्षांपूर्वी पोर्तुगीज अमदानीतसुध्दा उत्साहात संपन्न होत असल्याचे स्पष्ट होते. गणपती हा पार्वतीपुत्र असून, देवी जेव्हा आपल्या शयनकक्षात होती, तेव्हा तिने त्या पुत्राला दारावरती उभा करून, प्रवेश बंदी करण्यास सांगितले होते.

श्रीशंकर देवीच्या कक्षात येण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा तिच्या पुत्राने त्यांना रोखले. यावेळी झालेल्या युध्दात श्रीशकंराने बालकाचा शिरच्छेद केला. तेव्हा पुत्र हत्येनं व्यथित पार्वतीचे सांत्वन करण्यासाठी शिवगणाने हत्तीचे मस्तक बालकाच्या धडावरती प्रस्थापित केले आणि त्यामुळे गजानन रूप समूर्त झाले ही पारंपरिक लोककथा या ग्रंथात नमूद केलेली आहे.

लॉपिस मेंडिस यांच्या ग्रंथानंतर पोर्तुगीज राजवटीत न्यायाधीश म्हणून कार्यरत असणाऱ्या ब्रागांझ परेरा यांनी 1940 साली गोवा, दमण आणि दीव येथील लोकजीवन आणि संस्कृतीचा विविधांगी पैलूंचे वेध घेणारा जो पोर्तुगीज भाषेत ग्रंथ प्रकाशित केला त्यात गणेश चतुर्थीचे विस्तृतपणे वर्णन केलेले आहे. त्यात भाद्रपदातल्या चतुर्थीत गोव्यात मृण्मयी गणपतीच्या सुबक मूर्तीची घरोघरी प्रस्थापना करून, हा उत्सव कसा साजरा केला जातो त्याविषयी सांगितलेले आहे. गणपतीसाठी कशारीतीने मखराची सजावट करून, मूर्तीच्या माथ्यावरती मौसमी फळे कशाप्रकारे बांधतात त्याची माहिती दिलेली आहे. दिवे पेटवून कण्हेर, जाई आणि जास्वंदी फुलांनी गणपतीची मूर्ती कशी सजवली जाते. गणपतीला दुर्वा, मोदक अर्पण केले जातात. आरतीचे गायन, फटाके आणि दारुकामाची आतषबाजी केली जाते आणि सागर, नदी, विहिरीत गणपतीच्या मूर्तीचे कसे विसर्जन केले जायचे त्याविषयीचे वर्णन करण्यात आलेले आहे.

लग्नसोहळे, यज्ञोपवित विधी, दैनंदिन प्रार्थनेवेळी सिध्दिविनायक, गजानन, एकदंत, गणपती आदी नावांनी आवाहन केले जाते. भाद्रपदातल्या तृतियेला गौरी आणि महादेवाच्या कागदावर चित्रित केलेल्या प्रतिमांचे पूजन केले जायचे याविषयीचे वर्णन करण्यात आलेले आहे. गोवा ही कृषिप्रधान भूमी असून, उंदरासारखा प्राणी धान्याची नासाडी करतो आणि अशा उंदरावरती विराजमान होणाऱ्या गणपतीला त्यासाठी अन्नधान्यांचा रक्षणकर्ता देव म्हणून पूजला जातो त्याविषयीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. गणेश चतुर्थीच्या उत्सवप्रसंगी कष्टकरी स्त्रिया फुगडीचे नृत्य सादर करतात त्याचा संदर्भ आलेला आहे. सोळाव्या शतकात गोव्यातल्या हिंदू धर्मियांच्या सण, उत्सवांच्या परंपरा खंडित करण्यासाठी पोर्तुगीज धर्मांधिकारी, सरदार यांनी जंगजंग पछाडले, जाळपोळीचे सत्र आरंभले. धर्मांतरणाचा विरोध करणाऱ्यांचे हातपाय तोडले, त्यांना कालांतराने आपली सत्ता टिकवण्यासाठी स्थानिकांसमोर तडजोड करावी लागली, त्याची प्रचिती नंतरच्या काळात प्रकाशित झालेल्या ग्रंथाद्वारे आलेली आहे. गणपती या लोकदैवताचे सर्वसमावेशक अशा स्वरूपासमोर त्यामुळेच हिंदूबरोबर धर्मांतरित झालेल्या ख्रिस्तीधर्मियांत आदराची भावना रूढ झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com