खाद्यभ्रमंती : ब्याऐंशी प्रकारच्या आंब्यांची गोडी

82 प्रकारच्या आंब्यांची विविधता जपणाऱ्या गोव्याबद्दल तुम्हालादेखील कौतुक वाटायला हवे. गोव्यातील आंबा पुराण असे नुसते वाचून उपयोग नाही त्याची चव घ्यायला हवी.
Mango
MangoDainik Gomantak

उन्हाळ्याच्या सुट्टीतील असंख्य आठवणींमध्ये ’आंबा’ खाण्याबाबत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आठवणी असतील. उन्हाळ्याची सुट्टी ज्यांनी आजोळी घालवली असेल त्यांच्या आठवणी जरा विशेष असतील. आजी -आजोबा, मामा मामीच्या गावी जाण्याचे हे हक्काचे दिवस आणि या दिवसात आंब्यासोबतच्या आठवणींमुळे तर त्याला अधिक गोडवा मिळतो.

दगड मारून झाडावरच्या कैऱ्या - आंबे, जांभळे पडणे हा ठरलेला उपक्रम असायचा. रणरणत्या उन्हाचा विचार न करता, रोजच्या त्याच त्या जेवणाला सुट्टी देऊन आंब्यांसोबत जांभूळ- करवंद, बोरे यानेच पोट भरून जायचे. शिवाय या सुट्टीत आलटूनपालटून कधी हापूस, कधी तोतापुरी तर कधी रायवळ-पायरी याप्रकारचे आंबे घरी खायला मिळायचे. प्रत्येकाची चव, सुगंध, आकार वेगवेगळा.

हापूस - तोतापुरी हे चिरून खायचे आंबे तर पायरी हा चोखून खायचा आंबा. पायरी आंबा चोखून खाताना हमखास त्याची कोय हळूच उडी मारून कपड्यावरून जमिनीकडे झेप घ्यायची. आंब्याच्या फोडीपेक्षा ’कोय’ वर सर्वांचा डोळा असायचा.

आंबा खाण्यात पटाईत असणारे आपल्याला मिळालेल्या फोडी खाऊन दुसऱ्यांच्या वाटीतली कोय देखील गट्टम करायचे. घरात अनेक बच्चे मंडळी असतील तर आंब्याच्या फोडींची समान वाटणी करणे हे मोठं कटकटीचे काम असायचे. यात कुणीन कुणी असमाधानी आत्मा असायचाच. पण सर्वांसोबत वाटून खाण्यात एक वेगळी मजा होती.

गोव्याची ओळख अनेक गोष्टींपासून बनते त्यात काजू महत्त्वाची भूमिका बजावतात. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांमध्ये असलेलं काजूचे आकर्षण लपून राहत नाही पण गोमंतकीय लोकजीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेले ’आमो’ - ’आंबे’ मात्र यासगळ्यापासून दूर असतात. तुम्हांला वाटेल की आंब्याचे कौतुक करण्यासारखं काय आहे? परत हे हंगामी फळ म्हणजे वर्षातले फक्त काही महिने मिळणारे आणि ’हापूस’ पुढे गोव्यातला आंबा तो असा काय विशेष असणार! काही वर्षांपूर्वी माझं देखील हेच मत होतं.

ही गोवेकर मंडळी सगळ्याच गोष्टी खूप वाढून -चढवून सांगण्यात पटाईत असतात. मासळीचे नाव काढा ’हॅ नदीतले मासे कसले ते, आमचे दर्यातले मासे खाऊन बघा. आयुष्यात तुम्ही अशी मासळी खाल्ली नसेल,’ असे लगेच तुम्हांला अस्सल गोमंतकीयांकडून ऐकायला मिळेल. तुम्ही पर्यटक म्हणून आला तर तुमच्या कानावर हे असे फार पडणार नाही पण जर तुम्ही जास्त काळासाठी इथे मुक्काम केला तर मात्र असे ऐकायची सवय करावी लागेल.

तर आंब्याबाबत पहिल्यांदा मी हा सूर ऐकला तेव्हा मला देखील इतरांसारखं ’हे जरा अति होतंय हं’ असे वाटलं. जेव्हा बाजारपेठेत असंख्य प्रकारचे स्थानिक आंबे बघितले आणि माझा विश्वास बसला नाही. हापूस, पायरी, रायवळ, तोतापुरी, केशर, लंगडा हे एवढेच प्रकार इतके दिवस मला माहीत होते पण इथे तर आंब्यांचा मोठा खजिनाच माझ्यासमोर होता. एकेकाची माहिती घेण्यात मोठा वेळ गेला. गोवा निसर्गाच्या दृष्टीने खरंच खूप संपन्न आहे याच उदाहरण आंब्याच्या रूपाने माझ्या डोळ्यांसमोर होतं.

आंब्याचा मोठा खजिना हाताच्या बोटांवर मोजता येईल इतक्या आंब्यांचे प्रकार आजवर माहीत होते. पण या छोट्याशा गोव्यात ८२ प्रकारचे आंबे आहेत आणि याची पुष्टी ओल्ड गोव्यातील भारतीय कृषी आणि संशोधन केंद्राने देखील केली आहे म्हटल्यावर गोव्याच्या आणखी एका वेगळ्या बाजूनं मला आश्चर्यचकित केलं.

८२ प्रकारचे आंबे म्हणजे केवढी मोठी संपन्नता आहे या मातीत. एकेकाळी म्हणे शंभरहून अधिक प्रकारचे आंबे गोव्यात होते. पण आता त्यातील काही आंब्यांचे वाण अस्तित्वात नाही. भारतीय कृषी आणि संशोधन केंद्राकडे गोव्यातील आंब्याचे ८२ प्रकारचे वाण आहे. गोव्याची ही भूमी मला कायमच आश्चर्याचे धक्के देत असते. हा तर आश्चर्याचा ’गोड’ धक्का होता. गोव्याचे वेगळेपण अशाच उदाहरणांमधून सतत पुढे येत राहतं.

इथल्या या आंब्यांची नावं आणि त्यामागचा इतिहास मोठा रंजक आहे. मानकुराद, कुलास, बिशप, मांगीलाल (हिलारिओ), फर्नांडिन, झेवियर, मालगेश, मुसरत (मन्सेरात) अशी भली मोठी यादी असून यातील प्रत्येक आंब्याची चव वेगळी आहे हे देखील मोठं आश्चर्य. मानकुराद बघून इथे येणाऱ्या प्रत्येकाचे हापूस प्रेम आपोआप गळून पडते.

माझं हापूस प्रेम कधीच संपलं होतं. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांनी हापूस कसा आरोग्यासाठी आणि पर्यावरणाच्या दृष्टीने वाईट आहे यावर ’गतिमान संतुलन’ या त्यांच्या मासिकात वारंवार लिहिलं आहे. इंजिनिअर असणारे दिलीप कुलकर्णी आपली सुस्थितीतील नोकरी सोडून ’पर्यावरणीय जीवन’ जगण्यासाठी कोकणात स्थायिक झाले. त्यांच्या हापूस संबंधातील विचारांचा मी आदर करते आणि यामुळेच माझ्या मनात हापूसबद्दल प्रेम कधीच नव्हते.

पण समस्त गोवेकरांची ’हापूस विरुद्ध मानकुराद’ ही चर्चा ऐकताना फारच मनोरंजन होतं. विशेषतः या दिवसात ही चर्चा छान रंगते आणि मानकुराद म्हटले की कशी गोवेकरांची ’अस्मिता’ जागृत होते. मग या मानकुरादचे भलं मोठं वर्णन ऐकायला मजा येते. गमतीचा भाग सोडा. खरंच मानकुराद पुढे हापूसची चव फिकी पडते. आकाराने देखील मानकुराद केवढा मोठा असतो! एक मानकुराद खाल्ला की पोट भरतं.

रंग, चव, आकार यामध्ये हापूस मानकुराद पुढे टिकू शकत नाही. या स्थानिक आंब्यांमध्ये मला सर्वांत जास्त आवडतो तो ’मांगीलाल’ आंबा. यालाच ’हिलारिओ’ देखील म्हटले जाते पण मांगीलाल हे नाव कसे कानाला मधुर वाटते. मांगीलाल आंबा देखील चवीला अतिशय मधुर लागतो. मांगीलालबद्दल अगदी कोणाचीही शप्पथ घेऊन सांगते की असा साखरेसारखा गोड आंबा मी यापूर्वी कधी खाल्ला नाही.

मांगीलालचे मूळ नाव ’हिलारिओ’ आणि याचीही एक गोष्ट आहे असे म्हणतात की शिवोली गावातील ’हिलारिओ फर्नांडिस’ यांनी या आंब्याचे पाहिलं वाण तयार केलं. त्यांच्या अंगणात याचे पाहिलं रोप लावलं गेलं आणि पुढे त्यांच्याच नावाने हा आंबा ओळखला जाऊ लागला. गोमंतकीय संस्कृती अभ्यासक विवेक मेनिझीस यांनी देखील त्यांच्या लेखात याचा उल्लेख केला आहे.

मानकुराद इतकाच हा आंबा देखील तेवढाच प्रसिद्ध आहे. आता या ’हिलारिओ’ चे ’मांगीलाल’ कसे झालं आहे हा शोधाचा विषय आहे. तसा हा रसाचा आंबा नाही कापून खायचा आंबा आहे. पण मांगीलालचा गोडपणा बघून याचा आमरस बेस्ट होणार. का ते माहीत नाही, इथे आमरस तेवढ्या चवीनं खाल्ला जात नाही असे माझं निरीक्षण आहे. आमरस खाण्यापेक्षा त्याची खिल्लीच जास्त उडवली जाते.

’आंबा खाण्याची गोष्ट आहे त्याचा रस काढून कसले ओरपतात तुम्ही?’ असे म्हणत मला आमच्या घरी चिडवलं जातं. पण मी याकडे साफ दुर्लक्ष करते आणि मला पाहिजे तसा आमरस बनवते. तर मांगीलालच्या रसात अजिबात साखर घालावी लागत नाही. रंग पण एकदम झक्कास येतो. मानकुरादचा आमरस करायला गेले तर कदाचित मला फासावरच चढवतील. कारण मानकुराद भाव ’सोन्याच्या’ भावासारखा असतो. अशा सोन्यासारखा भाव असणाऱ्या मानकुरादचा आमरस करणे म्हणजे गुन्हा करण्यासारखंच आहे.

६००० रुपये डझन हा यावर्षी मानकुरादचा भाव होता. एप्रिल महिना संपत आलं अजून तरी मानकुरादचे दर्शन झालं नाही. कितीही महाग असो पण महिला आपलं पाककौशल्य दाखवल्या शिवाय थोड्याच राहतात. घोटाच सांसव, अमलेची उड्डमेथी, आंब्याचे ’मेल’ (जाम) करतात. यासाठी मुसरत (मन्सेरात) जातीचा आंबा वापरला जातो. बार्देश तालुक्यात मुसरत आंब्याची जास्त झाडं आहेत.

ज्या व्यक्तीने आंब्याचे वाण तयार केलं त्याला त्याचे नाव देण्यात आलं. बिशप आंबा, मग कुलास नावाचा आंबा अशी असंख्य नावं घेता येतील. एवढ्या प्रकारच्या आंब्यांमध्ये हापूस हरवून जातो. गोमांकीय खवय्ये आपलं वेगळंपण जपून ठेवतात. आंब्यांमध्ये देखील ते मागे राहत नाहीत. त्यांच्या या वृत्तीचे कौतुक वाटते. ८२ प्रकारच्या आंब्यांची विविधता जपणाऱ्या गोव्याबद्दल तुम्हांला देखील कौतुक वाटायला हवे. गोव्यातील आंबा पुराण असे नुसते वाचून उपयोग नाही त्याची चव घ्यायला हवी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com