खाद्यभ्रमंती : कैरीचा महिमा

कैरीचे लोणचे बरणीत भरून झाल्यानंतर पातेली बोटांनी चाटून स्वच्छ करणे, ही वेगळीच गंमत आहे. पातेल्याला लागलेला मसाला संपतो, आठवणी तशाच राहतात.
mango pickle
mango pickleDainik Gomantak

कैरी’ असे उच्चारताच तोंडाला पाणी सुटते ना! उन्हाळ्याच्या सुट्टीत तहान भूक हरपून कधी जांभळाच्या तर कधी आंब्याच्या झाडाखाली आमचा दिवसभर मुक्काम असायचा. कैरी पिकू देण्याइतकादेखील दम आमच्यात नसायचा. दगड मारून कैरी पडणे, मग लपून हळूच कुणाच्या घरून मीठ आणि तिखट आणून ती आंबट कैरी खाणे सुरू असायचे. कैरी इतकी खायचो की दात आंबून जायचे.

आजोळी फलटणला आजीच्या घरापलीकडे मोठे टेनिस कोर्ट होते आणि त्याला लागून भले मोठं जांभळाचे झाड होते. सुट्टीसाठी फलटणला गेल्यावर याच झाडाखाली खूप वेळ जायचा. त्या जांभळांची गोडी आजही आठवते. जांभूळ - कच्ची कैरी खाऊन दिवसभर यांचा सुवास नाकात भरून राहायचा, दुसऱ्या पदार्थांची चवदेखील कळायची नाही. या दिवसांत खायला दुसरे काही नको असायचे. काय सुंदर दिवस होते ते!

वैशाखातील ऊन हे वणव्यासारखे असते. या उन्हात ’वाळवण’ जास्त चांगले होते आणि म्हणूनच उत्तरेच्या भागांत या काळात फक्त वाळवणाचे पदार्थच नाही तर, हिवाळ्यात वापरल्या जाणाऱ्या गरम कपड्यांना, स्वेटर्स लावून देण्याचा वार्षिक कार्यक्रम महिला करतात. या दिवसांत भारतभर वेगवेगळ्या भागांत महिलांचा एक सामान कार्यक्रम सुरू असतो तो म्हणजे लोणचे बनवण्याचा. या शिवाय वैशाख साजरा केल्यासारखा वाटत नाही.

लोणच्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि आता तर कशाचे म्हणून लोणचे बनवले जात नाही! गाजर, मटार, फ्लॉवर, कांदा, वांगी, तोंडले यासारख्या भाज्यांपासून ते वेगवेगळ्या फळांचंदेखील लोणचे बनू लागलेय. लोणच्याचे कितीही प्रकार येऊ देत, पण सर्वांत भाव खाऊन जाते ते कैरीचे लोणचेच. या लोणच्याला कसलाच पर्याय नाही.

लोणच्याचा इतिहास आपल्या जेवणाच्या ताटात हवामान - ऋतू यांच्यानुसार पदार्थ बदलत असतात, पण ताटात हक्काचे स्थान पटकावलेय ते लोणचे या प्रकाराने. बघा ना हिवाळा- उन्हाळा असो की पावसाळा कोणत्याही ऋतूत तोंडी लावायला आपल्याला लोणचे हवेच.

भारतीय खाद्यसंस्कृतीत लोणचे हा बऱ्यापैकी जुना पदार्थ असून कवी त्रिविक्रम भट्ट यांनी इ. स. ९१५ला संस्कृतमध्ये लिहिलेल्या ’नालाचंपू’ या महाकाव्यात लोणच्याचा उल्लेख आढळतो. त्याने या महाकाव्यात लोणच्याबद्दल लिहिताना त्यात वापरल्या जाणाऱ्या घटकांचादेखील उल्लेख केला आहे.

कैरी, हिरवी मिरी, मोठी काळी मिरी, कच्ची वेलची, लिंबू, आवळा आणि सुवासासाठी त्यात तमालपत्र घातल्याचे लिहिले आहे. कवी त्रिविक्रम भट्ट पूर्वी तमिळमधील अति प्राचीन परंपरा असलेल्या ’संगम’ साहित्यातदेखील लोणच्याचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ असा की आपल्या अनेक पदार्थांचा उगम होण्यापूर्वीपासून लोणच्याचे अस्तित्व होते आणि म्हणूनच आजही आपल्या ताटात लोणच्याचे स्थान अबाधित आहे.

मावशी -आईच्या हातचे लोणचे आणि चटणी भारतीय लोकजीवनात आणि विशेषतः भारतीय खाद्यजीवनात कैरीला अतिशय वेगळे महत्त्व आहे. महिला बाजारात कैरी येण्याची अगदी आतुरतेने वाट बघत असतात. तिचे आगमन होण्यापूर्वी काय काय बनवायचे याची यादी मनात तयार असते.

माझ्या माहेरी सगळ्याजणी नोकरदार महिला. आई, मावशी, आत्या, काकू सगळ्याजणी नोकरी करणाऱ्या. पण व्यग्र दिनक्रमातून उन्हाळ्यात वेळ काढून कैरीचे लोणचे बनवायच्याच. यात सर्वांत जास्त उत्साहमूर्ती माझी मोठी मावशी, प्रेमामावशी. एकापेक्षा जास्त मावश्या असल्यामुळे मोठी - छोटी- मधली असे म्हणायची पद्धत. तर उन्हाळा आणि आमची प्रेमामावशी हे आमच्यासाठी घट्ट समीकरण बनले. बाजारात कैरी आली का, हे बघण्यासाठीदेखील बाजारात तिच्या अनेक फेऱ्या व्हायच्या. चिंचवड गावातल्या गांधी पेठेतल्या गजानन सायकर यांच्या दुकानात कोणीतरी लोणच्याच्या कैऱ्या फोडून देणारा बसायचा. तुम्हांला हव्या असलेल्या आकारात तो कैरीचे तुकडे करून द्यायचा.

आमच्या मावशीबाई त्याच्याकडे जाऊन कैऱ्या फोडून त्याचे तुकडे करून आणायच्या. मग लोणचे घालण्याचा मोठा सोहळा सुरू व्हायचा. फक्त लोणचे करून ती थांबायची नाही. मग अजून कैरी खरेदी करून गुळंबा, साखरांबा, आंबट-तिखट-गोड चुंदा बनवण्यात तिचा हातखंडा आहे. हे सगळे खावे तर ते तिच्याच हातचे. सुट्टीत कधी तिच्याकडे गेल्यावर गरम गरम पोळीसोबत गुळंबा, साखरांबा त्यावर तुपाची धार घालून ती आम्हांला द्यायची.

मला गुळंबा, साखरांब्याऐवजी तिच्या हातचा आंबट -तिखट -गोड चुंदा जास्त आवडायचा. तिच्याकडे जेवताना पानात किती तरी पर्याय असायचे. उन्हाळ्यात जास्त मसालेदार भाज्या नको वाटतात आणि उन्हाळ्यात ताज्या भाज्यादेखील मिळत नाहीत. अशा वेळी गुळंबा, साखरांबा, चुंदा, झटपट बनवलेले लोणचे हेच उपयोगी पडते.

गुळंबा, साखरांबा तर जसजसा मुरत जातो तशी त्याची चव पक्की होत जाते. या दिवसांत रात्रीच्या जेवणासाठी पोळी गरम करत असताना प्रेमामावशीच्या हातचे कैरीचे हे सगळे पदार्थ आठवतात. यात कैरीच्या आणखी एका पदार्थाचा उल्लेख केलाच पाहिजे तो म्हणजे आईच्या हातची कैरीची चटणी.

कैरीची चटणी खूप वेगवेगळ्या प्रकारांनी बनते. पण माझी आई कैरी उकडून, त्याचा गर काढून त्यात चवीला गूळ, मीठ घालून त्याला मेथ्या -हळद -तिखट -हिंग -मोहरीची खमंग फोडणी देते. आईच्या हातची उकडलेल्या कैरीची चटणी म्हणजे ’चार चांद’. ही चटणी गरम गरम वरण भातासोबत, गरम पोळी (चपाती)सोबत किंवा कोणत्याही पराठ्यासोबत, एवढेच काय तर पाव -स्लाईस ब्रेडला लावून खायलाही छान लागते. ही कैरीची चटणी खाताना इतक्या वेगवेगळ्या चवींचा अनुभव एकाच वेळी येतो. आंबट -तिखट-गोड चवीबरोबर मध्येच दाताखाली येणाऱ्या मेथ्यांची कडवट चव फार आवडते. याशिवाय तिच्या हातचे ताज्या कैरीचे झटपट केलेले लोणचेदेखील अप्रतिम असते.

एरवी वेगवेगळ्या प्रदेशात तऱ्हेतऱ्हेची लोणची बनवली जातात. लोणचे बनवण्याची लोकप्रियता बघता कैरीचे लोणचे बनवणे हा भारतीय महिलांचा ‘राष्ट्रीय कार्यक्रम’ बनून गेला आहे असेच वाटते. बाजारातून कैऱ्या आणायच्या, मग त्या फोडून घ्यायच्या, हळद - मीठ लावून उन्हात ठेवायच्या, लोणच्याचा मसाला तयार करून हळद मीठ लावून सुकवलेल्या कैऱ्यांचे एका काचेच्या बरणीत भरून त्या कैरीच्या फोडीमध्ये मसाला- तेल घालून ती परत उन्हात ठेवली जायची.

एखादे कॉटनचे जुने कापड फाडून ते त्या बरणीच्या झाकणावर घट्ट बांधले जायचे. हा क्रम ठरलेला असायचा. लोणचे बरणीत भरून झाले की पातेल्याला चिकटलेला लोणच्याचा मसाला बोटांनी घेऊन हळूहळू तो चाखण्यात मजा असायची. कधी याच मसाल्यात भात कालवला जायचा, तर कधी गरम गरम पोळीचे तुकडे यातून घोळून काढून खाल्ले जायचे. या अतिशय क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी. पण चवीचा एक वेगळा आनंद देणाऱ्या आहेत. उन्हाळा सुसह्य होतो तो याच गोष्टींमुळे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com