Breast Cancer: भीषण वास्तव

Breast Cancer: गोव्यात स्तन कर्करोगाविरुद्धचा लढा याच तीव्रतेने चालू ठेवला तर या जीवघेण्या आजाराला नियंत्रणात आणणे आपल्याला शक्य होणार आहे.
Breast Cancer
Breast CancerDainik Gomantak

Breast Cancer: गोवा राज्य स्तन कर्करोगासाठी देशातील प्रमुख महानगरांशी स्पर्धा करतेय, हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य खात्याने येथे विशेष मोहीम राबवून १ लाख महिलांची स्तन चाचणी केली, ही वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. या घटनेची केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मानदेविया यांनीही दखल घेतली.

Breast Cancer
Fish In Goa: चणकचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न

एक काळ असा होता, देशातील चार प्रमुख महानगरांच्या बरोबरीने राज्यातील स्तन कर्करोगाचे प्रमाण वाढले होते. ते आज सारख्याच प्रमाणात देशभर पसरले व सध्या एकूण कर्करोगामध्ये या प्रकारच्या जीवघेण्या आजाराने घेतलेली झेप फारच चिंतनीय आहे. त्यामुळे अनेक राज्ये काहीना काही उपाय योजताना आढळतात.

तज्ज्ञांच्या मते भारतीय महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे व दर चार मिनिटांत एका महिलेला स्तन कर्करोगाचा प्रादुर्भाव होत असतो. त्यातही चिंतनीय बाब म्हणजे स्तन कर्करोगाचा दंश झालेल्या महिला बचावण्याचे प्रमाणही आपल्या देशात अत्यल्प असून, अगदी सुरुवातीच्या टप्प्यात त्याचे निदान झाल्यास काही वैद्यकीय उपाय योजता येतात.

दुर्दैवाने देशातील वैद्यकीय व्यवसायिकांनाही या आजाराचे फारच कमी ज्ञान आहे. बऱ्याच शहरी तसेच ग्रामीण भागातही अद्याप तशा पायाभूत सुविधा उभ्याच झालेल्या नाहीत. त्यामुळे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य खात्याने स्तन कर्करोगाच्या मोहिमेवर लक्ष केंद्रित केले व अत्यंत वेगाने एक लाख महिलांची चाचणी घेण्यात आली.

अशा प्रकारची धडाडी सरकारी खात्यात कमीच. त्यामुळे त्यांचे विशेष अभिनंदन केले पाहिजे. या प्रकारच्या कर्करोगाची चाचणी इस्पितळांमध्ये मेमोग्राफीद्वारे करण्यात येते. काही वर्षांपूर्वी आरोग्य खात्याने काही खास वाहने मेमोग्राफी यंत्रणेने सुसज्ज बनविली होती. परंतु या यंत्रणांचे संवेदनशील स्वरूप अशाप्रकारची मोहीम चालवण्यात अडसर ठरली.

त्यानंतर प्रशिक्षित आरोग्य सेविकांची भरती करून शहरी व ग्रामीण भागात त्यांना पाठवण्यात आले. त्यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन महिलांची तपासणी केली आहे. ही पद्धत सोपी असली तरी तिची कार्यवाही योग्यपद्धतीने झाली आहे.

सध्या स्तन कर्करोगाबद्दल बरीच जागृती झाली असली तरी आपल्या शारीरिक अवयवांची स्वत:च तपासणी करून आजार हुडकून काढण्याची सवय मागच्या पिढीला नाही. स्तनामध्ये गाठी निर्माण होत असल्यास, स्पर्शानेच त्या शोधून काढता येतात. त्यानंतर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायचा असतो.

परंतु विविध कारणांमुळे महिला स्वतः पुढे येत नाहीत. त्यामुळे गाठ तयार होईपर्यंत थांबणे हे धोक्याचे ठरते. कर्करोगावर मात करण्यासाठी पहिल्या टप्प्यात तो हुडकून काढणे आवश्‍यक आहे. त्यासाठी जनरल प्रॅक्टिशनर्सनाही प्रशिक्षण आवश्‍यक आहे. तशी मोहीम हाती घ्यावी लागेल.

Breast Cancer
Fish In Goa: चणकचे उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न

दुसरी बाब म्हणजे एक लाख महिलांमध्ये २,५०० महिलांना गाठी आढळल्या, त्यातील ५५ महिलांना स्तन कर्करोग जडलाय. त्यांच्यावर आता वेगाने उपचार आवश्‍यक आहे. त्याचप्रमाणे उर्वरित महिलांना गाठी आढळल्या, त्यांच्यावर काय उपचार चालू आहेत व या इलाजाचा परिणाम काय दिसून आला आहे, याकडे आरोग्य खात्याने सातत्याने पाठपुरावा करावा. स्तनाचा कर्करोग जीवनशैलीमुळे होतो.

उशिरा झालेली लग्ने, उशिराने मुले होणे, स्तनपानाबद्दलची अनुत्सुक्तता, शिवाय आरोग्य बिघडवणारा आहार व अनुवांशिकता ही या आजाराची कारणे मानली जातात व अजूनही त्याबाबत जगात संशोधन चालू आहे. डॉक्टरांमध्ये जनजागृती, इस्पितळांमध्ये पायाभूत सुविधांचे निर्माण व ग्रामीण महिलांच्या घरापर्यंत जाऊन त्यांची तपासणी करणाऱ्या मोहिमा या कर्करोगाला नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. राज्य सरकारने आपल्या मोहिमेची तीव्रता आणखी वाढविली तरच हा लढा जिंकणे आपल्याला शक्य होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com