मडगावमध्ये कदंब बसस्टँडसमोर (KTC Bus Stand) छत्रपती हॉटेल अॅण्ड स्नॅक्स सेंटर (Chhatrapati Snacks Center) मध्ये मुंबई पध्दतीचा अतिशय चविष्ट वडापाव (Fast Food) मिळतो. गरम गरम बटाटावडा सोबत पाव आणि कांदा लसणीची सुकी चटणी, तळलेली हिरवी मिरची दिली जाते. या दिवसात हा छत्रपती स्नॅक्स सेंटर हे खवय्यांसाठी एकदम हॉटस्पॉट बनलं आहे.
वडापाव'ला कायम गरीबांचा आवडता पदार्थ म्हणून हिणवण्यात आलं. पण याच वडापावच्या जोरावर अनेकांनी आपला व्यवसाय भरभराटीला आणल्याची देखील असंख्य उदाहरणे आहेत. मुंबई चालते ती वडापाववर असं म्हणलं जातं ते एका अर्थाने खरंच आहे. वडापावचा जन्म झाला तो मुंबईतच. मुंबईत दादर रेल्वे स्टेशनबाहेर अशोक वैद्य नामक गृहस्थांचा खाद्यपदार्थांचा गाडा होता. या गाड्यावर ते भाजीपोळी आणि काही घरगुती पदार्थ विकायचे. असं म्हणतात की 1966 च्या सुमारास अशोक वैद्य यांनी पहिल्यांदा बटाटावडा बनवला. चवीला उत्तम होता त्यामुळे आपल्या गाड्यावर त्यांनी तो विकायला ठेवला. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या-जाणाऱ्यांची कायम गर्दी असते. याच गर्दीतल्या लोकांना अशोक वैद्य यांनी बनवलेल्या बटाटावड्याची चव अतिशय आवडली. सुरुवातीला नुसताच बटाटावडा विकला जायचा. तेव्हा त्याच्यासोबत पाव नव्हता. अशोक वैद्य यांच्या स्टॉलवर येणारे अनेकजण बटाटावडा पोळीबरोबर खायचे. पण पोळीबरोबर खाताना बटाट्याची भाजी खातोय असंच वाटायचं. याच काळात कधीतरी बटाटावडाची जोडी पावाबरोबर जमली. लोकांना बटाटावडा पावाबरोबरच आवडायला लागला. याच काळात मुंबईतच सुधाकर म्हात्रे यांनी देखील वडापावचा गाडा सुरू केला आणि अतिशय कमी अवधीत तो प्रचंड लोकप्रिय झाला. हळूहळू मुंबईत सर्वत्र वडापाव विकला जाऊ लागला. वडापाव ही मुंबईची ओळख झाली असली तरी आता जगात सगळीकडे वडापावने आपलं स्थान भक्कम केलं आहे. अगदी स्वित्झर्लंड- लंडनपासून ते भारतात वेगवेगळ्या राज्यांतदेखील वडापाव मिळू लागलाय.
मागे मी एकदा केरळमध्ये मुन्नारला गेले होते. तर मुन्नारला देखील मला उत्तम वडापाव मिळाला. तेव्हा खूप मोठं आश्चर्य वाटलं होतं. पण आता अश्चर्य वाटावी अशी परिस्थिती राहिली नाही. जगभर वेगवेगळ्या रेस्टॉरंटमध्ये वडापाव मिळू लागलाय. 'बॉम्बे बर्गर' अशी एक वेगळी ओळखदेखील प्रस्थापित झालीय.
गोव्यात तर गावागावात बटाटवड्याला वेगळंच महत्त्व आहे. संध्याकाळी चारनंतर गावातील अनेकांची पावलं गावातल्याच टपरीवजा छोट्याशा हॉटेलकडे वळतात. त्या छोट्याशा हॉटेलचा मालक किंवा मालकीण बटाटावडा तळत असते आणि इथे जमलेल्या लोकांची राजकारण ते समाजकारणावरील चर्चादेखील रंगलेली असते. या चर्चेला अधिक रंगत येते ती गरमगरम बटाटावड्याने. संध्याकाळी गावातल्या या छोट्याशा गाड्यावरील-हॉटेलमधील गरम गरम बटाटावडा आणि चहा पाहिल्याशिवाय दिवस संपत नाही असे अनेकजण आहेत. सोबत त्या दिवशी घडलेली एखादी घटना चघळायला असतेच. गोव्यात गावागावात हे चित्र अगदीच परिचयाचं आहे.
पुण्या-मुंबईत मिळणारा बटाटावडा आणि गोव्यात मिळणारा बटाटावडा यात बराच फरक आहे. मुंबईत मिळणारा वडापावमधील बटाटावडा आकाराने चपटा असतो तर गोव्यातला बटाटावडा छान गोल गरगरीत असतो. बटाटावड्याच्या सारणावरील बेसनपीठाच्या आवरणामध्येदेखील बराच फरक आहे. मुंबईत मिळणाऱ्या बटाटावड्याचं आवरण जरासं पातळ असतं. त्यामुळे बटाटावडा अधिक कुरकुरीत बनतो. पण गोव्यात मिळणाऱ्या बटाटावड्याचं आवरण जाड असतं. मुंबईतला वडापाव हा व्यावसायिकदृष्ट्या अधिक सुटसुटीत कसा असू शकतो यावर अनेकांनी काम केलं. त्याच्या आकारापासून ते तो देण्याच्या पध्दतीत अनेकांनी त्यात बरेच बदल केले. गोव्यात तसं अजून स्ट्रीट फूड म्हणून वडापावला मान्यता मिळाली नाही. गोव्यातले पावदेखील इथे बनणाऱ्या बटाटावड्यासाठी योग्य नाहीत, असं वाटतं.
गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी मिळणाऱ्या बटाटावड्याला आजही तसं व्यावसायिक रूप देण्यात आलेलं नाही. इथे तुम्ही कुठेही बटाटावडा खा, त्याच्यासोबत तुम्हाला एखादी छानशी चटणी मिळत नाही की चवीला लावायला तळलेली हिरवी मिरची मिळत नाही. बटाटावड्याबाबत हे काही छोटेसे बदल करणं काळाची गरज आहे. लोकांना कमीत कमी पैशांमध्ये आपण अधिक काहीतरी खाल्लंय असं हवं असतं. ते त्यांना वडापावच्या निमित्ताने मिळतं.
मडगावमध्ये कदंबा बसस्टँडसमोर 'छत्रपती हॉटेल अॅण्ड स्नॅक्स सेंटर' मध्ये मुंबई पध्दतीचा अतिशय चविष्ट वडापाव मिळतो. गरम गरम बटाटवडा, सोबत पाव आणि कांदा लसणीची सुकी चटणी, तळलेली हिरवी मिरची दिली जाते. शिवाय पावाच्या मध्यभागी कापून त्याला वाटलेली हिरवी चटणी लावून त्यात बटाटावडा घालून खायला दिला जातो. या दिवसात हा छत्रपती स्नॅक्स सेंटर हे खवय्यांसाठी एकदम 'हॉटस्पॉट' बनलं आहे. ज्यांना पावाबरोबरच बटाटावडा खायला आवडत नाही त्यांना कांदा-लसूण चटणीबरोबर खायला आवडू शकतो. छत्रपती स्नॅक्स सेंटर अगदी अल्पावधीत लोकप्रिय झालं.
आता छत्रपती स्नॅक्स सेंटरच्या मडगाव-फातोर्डा भागातच अजून दोन शाखा उघडल्या आहेत. इथला फक्त वडापावच नाही तर मिसळ, पोहे, भाजी, चपाती आणि मटकीची उसळ असे वेगवेगळे पदार्थ प्रसिद्ध आहेत. गोव्यात वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तर मिसळच्या नावाखाली काहीच्या काही दिलं जातं. पण या छत्रपती स्नॅक्स सेंटरमध्ये एकदम खात्रीशीर मिसळ मिळते. एकदम चवीनं खाणारी मंडळी इथे मुद्दाम वडापाव - मिसळ खायला येतात. स्ट्रीटफूडचेच पदार्थ असल्यामुळे इथे येणारे लोक उभ्यानेच वडापाव खातात. बसून खाण्याची छोटीशी व्यवस्थादेखील त्यांनी केली आहे. शिवाय झटपट पार्सल घेऊन आपल्या वाहनात बसूनदेखील तुम्ही खाऊ शकता. कधी मडगाव भागात असाल आणि मुंबई पध्दतीचा वडापाव आणि कोल्हापूरची मिसळ खायची इच्छा झालीच तर अवश्य छत्रपती स्नॅक्स सेंटरमधील वडापाव आणि मिसळ खाऊन बघा.
मनस्विनी प्रभुणे-नायक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.