Goa Wedding: गेल्या 50 वर्षांत गोव्यातील लग्न पद्धतीत काय बदल झाले?

पन्नास वर्षांआधी गोव्यातील हिंदू समाजात एवढी श्रीमंती व सधनता नव्हती जेवढी आज आहे. त्यामुळे हिंदू लग्न सोहळे, श्रीमंत कुटुंबातसुद्धा एकदम साधेपणाने व काटकसरीने होत असत.
Wedding
WeddingDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: साधारण पन्नास वर्षांआधी गोव्यातील हिंदू समाजात एवढी श्रीमंती व सधनता नव्हती जेवढी आज आहे. श्रीमंती फक्त मोजक्याच व निवडक घराण्यात असायची. उच्चभ्रू सारस्वत समाजातसुद्धा हीच परिस्थिती होती. कोण मोठे जमीनदार भाटकार किंवा खाण उद्योगाशी संलग्न असलेली हीच ती श्रीमंत घराणी.

त्यामुळे हिंदू लग्न सोहळे, श्रीमंत कुटुंबातसुद्धा एकदम साधेपणाने व काटकसरीने होत असत. पण, जरी सोहळ्याचा खर्च नसला तरी हुंड्याचा होता, जो मुलीला सोन्याचे दागिने घालून फेडला जायचा. त्यामुळे मुलीचे लग्न करणे म्हणजे गरीब बापाच्या डोक्याला मोठा ताणच होता.

सोहळ्याला एखादेवेळेस भरपूर पाहुणे बोलावले जात असत, पण पैशांचा अनाठायी चुराडा करण्याच्या सध्या असलेल्या एकशे एक पद्धती तेव्हा प्रचलित नव्हत्या. तसेच जबाबदार मुली पण आपल्या जेमतेम आर्थिक परिस्थितीची जाणीव असल्याकारणाने कसलाही हट्ट करायच्या नाहीत.

या पार्श्वभूमीवर मला एक घटना आठवते. आम्हाला कोणी तरी सांगितले की, एक अतिशय भारदस्त असा लग्न सोहळा शहराच्या प्रसिद्ध मोकळ्या क्लबमध्ये आयोजित केलेला आहे व तिकडे केलेली रोषणाई, दारूकाम एकदम प्रेक्षणीय आणि बघण्यासारखे आहे.

ही जवळपास पन्नास वर्षांपूर्वीची घटना आहे. ताबडतोब आम्ही सगळे तिकडे रवाना झालो. ते लग्न (रिसेप्शन) होते एका बिगर गोमंतकीय खाण मालकाचे. तेव्हा ती केलेली रोषणाई एकदम नवलाईची. ती बघून आमच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आत सगळे उंची पेहराव केलेले पाहुणे मेजवानीचा आस्वाद घेत होते. त्यांना वेटर सगळे खाद्यपदार्थ व दारू त्यांच्या टेबलावर नेऊन देत होते (त्या काळचा एकदम ना भूतो असा सोहळा).

जाळीदार कुंपणाच्या बाहेर उंचवट्यावर राहून आम्ही सगळा सोहळा बघत होतो. आमच्यासारखे रोषणाई बघायला आलेले शेकडो लोक होते. ते कधीही न बघितलेली रोषणाई, दिव्यांची उघडझाप होत फिरणारी नर्तकीची व वेगवेगळ्या आकाराची विशाल चित्रे अचंबित होऊन बघतानाचे प्रसंग मला अजून आठवतात.

त्या मानाने गोव्याच्या पूर्ण हिंदू समाजात एवढा सोहळा करून पैशांची उधळपट्टी करायची पद्धत नव्हती. लग्न ठरल्यास एक साखरपुडा, जो घरच्या घरी एकदम जवळच्या नातलगांना बोलावून केला जात असे. साखरपुडा हा सोहळा हिंदूंच्या शास्त्रात नाही.

पण हा सोहळा एकदम उपयोगाचा आहे, कारण नवरा नवरीच्या कुटुंबांची व दोघांच्या नातेवाईकांची इथे चांगली तोंडओळख व गाठभेट होऊ शकते. त्यानंतर एकदम व्हायचा विवाह सोहळा (गोव्यात लग्न नोंदणीकृत करणे एकदम सक्तीचे आहे व पोर्तुगिजांनी गोव्याला दिलेली ही एक चांगली भेट आहे).

जास्तीत जास्त सोहळे देवळाच्या आवारात होत असत, कारण आजच्यासारखी मंगल कार्यालये उपलब्ध नव्हती. लग्नाच्या आदल्या दिवशी घरच्याघरी देवकारे (देवकार्य), लग्नाच्या दिवशी पूर्वी तेल समारंभ (फक्त सारस्वत समाजात) व शेवटी साधा विवाह सोहळा. बाहेर वाजंत्री जी त्यावेळची सगळ्यांत अद्ययावत हिंदी गाणी वाजवीत असत. मुहूर्ताला फटाके फोडले जात. आलेल्या पाहुण्यांना प्लेटमध्ये घालून फरसाण व खाद्यपदार्थ व पेयाची एक बाटली देत असत. हुंडा म्हणजे सोन्याचे दागिने. ‘दोट्टी घोट’ म्हणजे चांगल्यापैकी हुंडा, तर ‘वज्राची वेडी’ फारच मोजक्या लोकांना परवडू शके.

हल्लीच्या काळात या विवाहसोहळ्यात एक आमूलाग्र बदल झालेला आहे. आज प्रत्येक सोहळा हा एक इव्हेंट म्हणून केला जातो व त्याचे धार्मिक महत्त्व एकदम न्यूनतम झालेले आहे. सगळा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंटच्या अंतर्गत ठरवलेला असतो.

काही श्रीमंत आईवडील असले इव्हेंट करून बाकीच्या समाजाला पायंडा घालून देतात. त्यांना आपल्याकडे विनावापर पडलेले पैसे खर्च करायचे, तसेच अतिमहनीय व्यक्तींना आमंत्रण देऊन, आपले संबंध कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, हे दाखवण्याची एक जबरदस्त हौस असते. मग मध्यमवर्गीय आईवडिलांची मुले हे बघून, ‘हम भी कुछ कम नही’ पद्धतीने त्यांचे अनुकरण करण्याचा हट्ट धरतात व त्यांचे चोचले पुरवता पुरवता पालक कर्जबाजारी होऊन जातात. ही आजची वस्तुस्थिती आहे.

हल्ली साखरपुडा हा एक मोठा सोहळा असतो. पुष्कळ जण तो पंचतारांकित हॉटेलांमध्ये करणे पसंत करतात. पाचशेच्या वर पाहुणे बोलावलेले असतात. संगीत, नृत्य वगैरे प्रकार असतात, महागडी दारू व मांसाहारी जेवणे असतात. पैसा पाण्यासारखा खर्च केला जातो. याचाच खर्च दहा लाखाच्या वर असावा.

नंतर येतो लग्नसोहळा. आता लग्नसोहळा म्हणजे चार दिवसांचा भन्नाट कार्यक्रम असतो. आता लग्नाच्या आधी ‘प्री वेडिंग शूट’ करण्याची नवी प्रथा आलेली आहे. इकडे नवरा नवरी लग्नाच्या पूर्वी समुद्र किनारा किंवा काही अफलातून जागांवर जाऊन वेगवेगळ्या आकर्षक पद्धतीने फोटोसेशन करतात.

त्यानंतर असते मेहंदी. इकडे नवरीला मेहंदी घालायला खास व्यावसायिक येतात व त्याचा चित्रपटांत दाखवतात तसा मोठा सोहळाच आयोजित केला जातो. नंतर येते संगीत. हा सोहळा एकच असू शकतो किंवा दोन वेगळे. व्यावसायिक वाद्यवृंद आणून संगीताची बरसात केली जाते. यात दारू व भोजन आलेच.

Wedding
Goa: राज्यातील किमान तापमानात वाढ

शेवटी लग्नाचा शाही सोहळा इथे सगळे अतिशय नाट्यमय कसे करायचे हे कार्यक्रम व्यवस्थापक (इव्हेंट मॅनेजर) दिग्दर्शित करीत असतो. पंजाबी प्रथा, म्हणजे नवरा घोड्यावर बसून येतो, नवरी डोलीत बसून येते. डोली पकडायला चार मामांचा हातभार लागतो. वेगवेगळ्या नवलाईचा क्लृप्त्या काढून लोकांना अचंबित करून सोडणे किंवा दुसऱ्यावर कुरघोडी करणे हा एकमेव उद्देश.

पुष्कळ लग्ने एकदम महागड्या स्थळांवर होतात. उंची मद्य व मांसाहारी खाण्याची एकदम रेलचेल असते. मध्ये विदूषक, कसरत करणारे खास व्यावसायिक, न थांबता सतत बडबड करणारा सूत्रसंचालक हे सगळे आलेच.

या प्रत्येक सोहळ्याला फोटोग्राफर व वेगळा व्हिडिओग्राफर हा असतोच. त्यात नवरा नवरींचे व त्यांच्या आप्तेष्टांच्या कपड्यांचा खर्च काही लाखांत जातो, जे कपडे कधीच परत वापरले जात नाहीत. शेवटी प्रत्येक पाहुण्याला महागडी भेटवस्तू दिली जाते.

या पूर्ण सोहळ्याला लग्नस्थळ, सजावट, रोषणाई, कपडे, मद्य, खाद्यपदार्थ, जेवण, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, वाद्यवृंद, गायक, भेटवस्तू, इतर करमणुकीचे साधने व व्यावसायिक धरून वीस ते तीस लाख खर्च येतो. यात दागिन्यांचा खर्च धरलेला नाही, कारण त्या खर्चाला काही मर्यादा असत नाही. सध्याच्या काळात एकच हिऱ्यांचा हार सहज पंचवीस लाखापर्यंत जाऊ शकतो.

मुंबई वगैरे मोठ्या शहरांत मोठे नट किंवा नट्या पाहुणे म्हणून बोलावले जातात. त्यांनी स्टेजवर जाऊन नवरा आपला कसा जिवलग मित्र आहे, याचे पाच दहा मिनिटे भाषण ठोकायचे, शेवटी वीस मिनिटे नृत्य करून एक ते दोन कोटी घेऊन सटकायचे. ही पद्धत अतिशय महागडी असल्याने गोव्यात अजून रूढ झालेली नाही.

पण, शेवटी या सगळ्यांत भरडले जातात ते सर्वसाधारण मध्यमवर्गीय पालक. कारण एवढा खर्च करण्याची त्यांची कुवत नसते. पण मुले हट्टाला पेटतात. शेवटी नातेवाईकांसमोर हात पसरावे लागतात. कारण कायदेशीर कर्ज मिळण्याची परिस्थिती नसते.

असा सोहळा करून ते एकदम कर्जबाजारी होतात. कमीत कमी सोन्याचे दागिने व जडजवाहीर संपत्ती म्हणून कायम राहते व वाईट काळात गरजेला येऊ शकते. पण, कर्ज काढून केलेला हा सोहळा तीन दिवसांनी सगळे पाहुणे विसरून जातात ही वस्तुस्थिती आहे व एकदम कटू सत्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com