Goan Heritage: दवरणे - विस्मृतीत गेलेला गोमंतकीय वारसा

डोक्यावर, पाठीवर ओझे घेऊन जाताना ओझे उतरवून ठेवण्यासाठी जो दगड असे त्याला ‘दवरणे’ म्हणतात.
Goan Heritage
Goan HeritageDainik Gomantak

सुशीला सावंत मेंडीस

पूर्वी जवळपास प्रत्येक गावी असलेला आणि गोमंतकीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला ‘दवरणे’ (ओझे उतरवून ठेवण्यासाठीचा दगड) मध्यंतरी विस्मृतीत गेला होता. पण, रोमी मध्ये लेखाच्या शीर्षकाशी साधर्म्य असलेल्या नावाचे पुस्तक या आठवड्यात प्रकाशित झाले आहे. त्यामुळे, दवरणेविषयीची उत्सुकता आणि कुतूहल पुन्हा जागृत झाले आहे.

‘दवरणे’ या संकल्पनेशी माझी पहिली ओळख, ‘अनरिव्हीलिंग हिस्ट्री - द व्हिलेज ऑफ आरोशी’ या पुस्तकाचे लेखक थेमिस्टोक्लस डी’सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली आरोशीत फेरफटका मारताना झाली. ‘दवरणे’चा उच्चार विविध भागांत विविध पद्धतीने केला जातो. डोक्यावर, पाठीवर ओझे घेऊन जाताना विश्रांती घेण्यासाठी थांबायचे झाल्यास ओझे उतरवून ठेवण्यासाठी जो दगड असे त्याला ‘दवरणे’ (शब्दश: अर्थ उतरवून ठेवणे) म्हणतात.

खेड्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या कोणत्याही गोमंतकीयाला विचारल्यास त्याला गावातील मोक्याच्या ठिकाणी असलेली ‘दवरणी’ नक्कीच आठवेल. माझ्या असोळणा गावात आंबेलीच्या सीमेवर लांब पसरलेल्या शेतांनंतर एक आणि असोळण्याच्या प्रवेशद्वारापाशी एक दवरणे आहे.

अशीच एक रचना बाळ्ळी चार रस्ता जंक्शन येथे पाहायला मिळते. दोन किंवा अधिक रस्ते जिथे एकमेकांना छेद देतात त्या ठिकाणी किंवा जिथे दत्ततळी वा पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात असलेला तलाव असेल, मोठ्या वृक्षाची सावली असेल त्या जागी साधारणत: दगडी रचना उभी केली जात असे.

या जागी ओझे घेऊन येणारे प्रवासी थांबत, पाणी पिऊन थोडावेळ विश्रांती घेत आणि मग पुढल्या प्रवासाला निघत. आरोशीतले चार प्राचीन पाषाण, कोमुनिदाद भातशेतीमधून जाणाऱ्या आरोशी ते कुएली या जुन्या पायवाटेवर आहेत.

डिसिल्व्हा यांच्याकडे बार्देशमधील कामुर्लीत अजूनही दिसणाऱ्या दवरण्याची छायाचित्रे आहेत. बार्देशमध्ये अनेक ठिकाणी त्यावर पाथर टाकून बसण्याची सोय करण्यात आली आहे. त्यांनी असे मत मांडले आहे की, अशा मेगालिथिक रचना डोल्मेनॉइड सिस्ट किंवा ग्रेव्ह मार्कर सारख्या असतात. गोव्यात सामान्यतः या प्रागैतिहासिक वास्तू लॅटराइट दगडांनी बांधलेल्या आढळतात आणि वापरल्या जातात. साधारणपणे पाच फुटांपेक्षा जास्त लांबीच्या या रचना गावकऱ्यांच्या सहसा लक्षात येत नाहीत.

६ जानेवारी रोजी कपॅलमध्ये आयोजित ‘थ्री किंग्ज फेस्ता’ला वर्षातून एकदा त्यांची आठवण होते. कुएली येथील टेकडीच्या माथ्यावर असलेल्या कपेलमध्ये दरवर्षी बायबलमधील कथेचे प्रातिनिधिक नाट्यरूप सादरीकरण होते. यावेळी आरोशी, कासावली आणि कुएली येथील मूळ गावकर घराण्यातील तीन मुले राजेशाही पोशाख परिधान करून जुन्या पायवाटेने संगीतकारांच्या बँडसह वाजत गाजत मिरवणुकीत चालतात आणि येथे भेटतात.

एकत्रितपणे पर्वतावर चढून कपॅलमध्ये जाण्यापूर्वी टेकडीच्या पायथ्याशी विश्रांतीसाठी थांबतात. येथील पाषाणावर भेटवस्तू ठेवल्या जातात.

कुएलीच्या पायथ्याशी पडलेला दवरणे आहे. ध्वजवाहक क्षणभर थांबतात आणि 10 ते 12 फूट लांब ध्वजाच्या खांबांना गोलाकार गतीने फिरवण्याचा विधी करतात. या प्राचीन दगडांवर फेणी ओतण्याचीही प्रथा होती, ती आता बंद झाली आहे.

त्यांच्या मृत आदिवासी नेत्यांचा, शेताचे रक्षक म्हणून या दगडांना प्रतीक रूपाने सन्मान करण्याचे विशेष महत्त्व आहे. हे दगड आजपर्यंत टिकून राहिले असावेत कारण स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांची आदरयुक्त भीती बाळगली आहे आणि ही परंपरा कुएलीमधील ध्वज वाहक, छत्रीधारक, फेस्ताच्यादिवशी ढोलकी वाजवणारे आणि वारसा हक्क असलेल्या आदिवासी कुळांनी जिवंत ठेवली आहे.

डिसिल्वांच्या म्हणण्यानुसार कुएली येथे त्याच टेकडीच्या माथ्यावर ओलिझारी नावाचे मंदिर होते, ज्याची जागा तीन राजांच्या कपॅलने घेतली. टेकड्यांवर आणि पायथ्याशी मंदिरे बांधली जाणे खूप सामान्य होते. कारण या भागात सांतेरी, महादेव, क्षेत्रपाल आदींची मंदिरे आहेत - आलदई द केळीच्या फराळ द सालसेत 1567 नुसार शेताचे आवडते संरक्षक - या भागात आढळतात.

ख्रिस्तीकरणापूर्वी सणाच्या प्रसंगी, हिंदू देवतांच्या मूर्ती रात्रीच्या वेळी मिरवणुकीत नेल्या जात होत्या किंवा त्याच पायवाटेने अंत्यसंस्कारासाठी प्रेत वाहून नेले जात असावेत आणि ते या दगडी बांधकामांवर ठेवले जात असावे. तिन्ही राजांनी कुएली टेकडीवर किंवा कुशस्थळी (कुठ्ठाळी) येथील प्राचीन मंगेशी मंदिरापर्यंत, डोंगर ओलांडून गेलेली तीच पायवाट.

या पाषाणाच्या सभोवतालची भाताची शेते या प्रदेशात सर्वांत सुपीक आहेत. कारण कुएली, नागवा आणि वेर्णाच्या जवळच्या टेकड्यांमधून नदीचे झरे वाहतात जे दक्षिण वाहणाऱ्या साळ नदीच्या प्रमुख फाट्याच्या सुरुवातीस एकत्र येतात. आणखी एक पाषाणदेखील भग्नास्थेत कासावली-वेर्णा मार्गावर, ‘काथयां तळें’ नावाच्या तलावाजवळ आहे. काळाच्या ओघात ही पाषाणे नक्की का उभारली जात असावीत, याची कारणे लुप्त झाली.

जवळपास पंचवीस वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या, सत्यवान के. नाईक यांच्या ‘गोवाज लूजिंग हॅरिटेज : अ डाइंग कॅडेन्स’ या पुस्तकात ‘डोक्यावरील ओझे उतरवण्याची जागा’, असा उल्लेख या पाषाणांबद्दल आढळतो. या बांधकामांचे श्रेय त्यांनी सम्राट अशोक यांना दिले आहे. प्राचीन भारतातील जवळजवळ प्रत्येक रस्त्याच्या जोडणीमध्ये या रचना होत्या.

प्राचीन भारतात घोडे, पालखी आणि रथातून प्रवास करू शकणाऱ्या श्रीमंत लोकांशिवाय वाहतूक सुविधा फारच कमी किंवा जवळजवळ अस्तित्वातच नव्हत्या. एकाकी रस्त्यांवर, डोक्याचा भार असह्य झाला तर ते खाली ठेवणे कठीण होते आणि त्यामुळे त्याला पुन्हा उचलण्यासाठी मदत करायला दूरदूरवर कुणीच नसायचे.

म्हणून हे नियमित अंतराने बांधलेल्या विश्रांती स्तंभांसारखे होते. ज्यांना प्रजेच्या हिताची काळजी होती त्या उच्च आणि पराक्रमी राजांच्या उपकाराचे कौतुक केले पाहिजे. ज्यांना लांबचे अंतर पायीच कापावे लागे आणि तेही डोक्यावर ओझे घेऊन, अशांसाठी विशिष्ट अंतरावर अशा प्रकारचे विश्रांती स्तंभ उभारणाऱ्या राजांना त्यांची किती काळजी होती, ये यावरूनच दिसते. सामान्य जनतेविषयी हीच कळकळ आजच्या राज्यकर्त्यांना व सर्व राजकीय पक्षांना असली पाहिजे!

Goan Heritage
Government of Goa: मोरजीत अल्‍प प्रतिसाद; पंचच गैरहजर

त्या काळात गोवादेखील मौर्य साम्राज्याचा एक भाग होता. नाईक यांनी चार धावणींचा उल्लेख केला आहे. आंबोली अकमळ आणि गावकरवाडा येथे दोन, बाळ्ळी, केपेममधील चार रस्ता येथे आणि शेवटची धवतेवाडा, अडणे येथे. यातील शेवटची भग्नावस्थेत आहे.

जवळच झाडाच्या अगदी खाली, वृक्षकन्या किंवा अप्सरा किंवा झाडाची कन्या मानल्या जाणाऱ्या दोन कुलगती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवींच्या दगडी मूर्ती आहेत. हे बांधकाम सिमेंट किंवा प्लास्टर नसताना बांधले गेले होते, म्हणून दोन मोठे दगड, प्रत्येकी सुमारे एक टन वजनाचे दगड जमिनीत खोलवर घातले जातात आणि त्यांच्यावरच्या बाजूला हलक्या हाताने ठेवले जातात. महिलांना सोयीस्कर व्हावे म्हणून पायरीचा आणखी एक दगड जमिनीवर ठेवला आहे.

Goan Heritage
Goa Accidents: ओव्हरटेकिंग पडले महागात; थिवीत कारचा अपघात

आरोशीतील सेंट लॉरेन्स कपॅलच्या पूर्वेला आणखी एक पाषाण आहे, जे भग्नावस्थेत आहे. पवित्र स्थानाच्या जवळ असल्यामुळे या पाषाणाचा पांथिक भक्तीच्या ठिकाणांवर काही परिणाम झाला असावा. कुंकळ्ळीतील पालखीसोबत गेल्यास दगड, सिमेंट आदी वस्तूंनी बांधलेल्या दवरणेसदृश अशा अनेक वास्तू बघायला मिळतात.

काही भागातल्या ख्रिश्‍चनांनी (आगियार्स) वर्षातून एकदा निघणाऱ्या शांतादुर्गेच्या पालखीला विसावा देण्यासाठी अलीकडच्या काळात अशा प्रकारची बांधकामे केली आहेत. पालखी वगळता इतर वेळेस त्याचा वापर दवरणे म्हणूनच होतो. हिंदू देवीच्या सन्मानार्थ ख्रिश्‍चन भक्तांनी केलेले बांधकाम म्हणजे सांस्कृतिक समरसतेचे परिपूर्ण मिश्रण.

आज या वास्तू नष्ट झाल्या आहेत किंवा दुर्लक्षित झाल्या आहेत आणि तरुण पिढीला त्यांच्या अस्तित्वाबद्दल फारशी माहिती नाही. दवरणेंचे जतन करणे आवश्यक आहे. आज या दवरण्यांचे आज उपयुक्तता मूल्य नसेल, पण त्यांच्याकडे वारसा मूल्य खूप आहे!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com