Goa: कुंभारजुव्‍यावर अनेकांचा डोळा; संधी नक्की कुणाला?

पांडुरंग मडकईकरांच्‍या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष, अनेकजण उमेदवारीच्‍या शर्यतीत
Cumbarjua politics
Cumbarjua politicsDainik Gomantak

पणजी: कुंभारजुवा मतदारसंघात आमदार पांडुरंग मडकईकर यांच्या आजारपणाची संधी साधत अनेकांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी जोरदार तयारी चालवली आहे. भाजप उमेदवारीवर डोळा ठेवून काही जण वावरत आहेत, मात्र मडकईकर यांनी आपण अजूनही स्पर्धेत आहे असे सांगून आपल्याला कोणी गृहित धरू नये, असा इशारा दिला आहे. यामुळे केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिध्देश यांना भाजप उमेदवारी देणार काय, असा प्रश्‍न आहे. शिवाय काँग्रेसही भाजपमधील हालचालींवर लक्ष ठेवून असल्याने हा मतदारसंघ चर्चेत राहणार आहे.

कुंभारजुवा मतदारसंघावर 1989 पर्यंत महाराष्ट्रवादी गोमंतक (मगो) पक्षाचा दबदबा होता. 1994 च्या निवडणुकीत कृष्णा कुट्टीकर यांनी हा मतदारसंघ पहिल्यांदाच कॉंग्रेसला मिळवून दिला. 1999 साली निर्मला सावंत यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर हा मतदारसंघ जिंकून या मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान पटकावला. त्यानंतर मात्र पांडुरंग मडकईकर यांनी सातत्याने सलग चार वेळा या मतदारसंघावर आपले प्राबल्य सिध्द केले. तेही विविध पक्षांच्या उमेदवारीवर. 2002 साली पहिल्यांदा मडकईकर हे मगो पक्षाच्या उमेदवारीवर कुंभारजुवेत विजयी झाले. मात्र त्यानंतरच्या 2007 व 2012 च्या निवडणुका त्यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर जिंकून आपल्याला कुंभारजुवेत पर्याय नाही हे दाखवून दिले. २०१२ साली भाजपने उमेदवार उभा न करता अपक्ष राहिलेल्या निर्मला सावंत यांना पाठिंबा दिला होता तरी मडकईकर 1575 मतांनी जिंकले. 2017 ची निवडणूक त्यांनी भाजपच्या उमेदवारीवर लढवली व जिंकून आले.

राजेश फळदेसाई व गोरखनाथ केरकरही सक्रिय

कुंभारजुवेत कॉंग्रेसची पारंपरिक मते आहेत. मात्र मजबूत उमेदवार नाही. जुने गोवेचे पंच असलेले विशाल वळवईकर यांच्यासह पणजीचे माजी उपमहापौर रुद्रेश चोडणकर यांनी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर दावा केला आहे. भाजपने मडकईकर यांना डावलले तर स्वत: पांडुरंग मडकईकर किवा त्यांच्या पत्नी जेनिता मडकईकर या कॉंग्रेसच्या उमेदवार ठरू शकतात, अशी चिन्हे आहेत. दुसरीकडे खोर्ली पंचायतीवर पकड असलेले गोरखनाथ केरकर हे आम आदमी पक्ष (आप) चे उमेदवार असणार आहेत. त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीत बऱ्यापैकी मते मिळवली होती. या व्यतिरिक्त या मतदारसंघात गेली पाच वर्षे सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले युवा नेते राजेश फळदेसाई यांचा जनसंपर्क व त्यांनी केलेली कामे पाहता तेही निवडणुकीत आव्हान उभे करणार आहेत. समील वळवईकर व रोहन हरमलकर हेही येत्या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. त्यांचा प्रचारही आतापासून सुरू आहे.

Cumbarjua politics
Cumbarjua politicsDainik Gomantak

एक दृष्‍टिक्षेप...

विद्यमान आमदार पांडुरंग मडकईकर हे आजारी असल्याने फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र मडकईकर यांनी आपण पुन्हा निवडणुकीला उभे राहणार असल्याचे सांगितले आहे. जर पक्षाने आपल्या पत्नीला उमेदवारी दिली तर आपण तिला निवडून आणणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र जिल्हा पंचायत सदस्य सिध्देश नाईक यांनी भाजपच्या उमेदवारीवर दावा केला आहे. गेली चार वर्षे ते सातत्याने या मतदारंसघात कार्यमग्न आहेत. मडकईकर यांना डावलून सिध्देश यांना उमेदवारी मिळणार का, हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्यातच मडकईकर आणि सिध्देश यांच्यात शाब्दिक युध्द सुरू झाले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यात भर म्हणून इतर काही नेतेही भाजपच्या उमेदावरीवर दावा करीत आहेत. मडकईकरांना भाजपने डावलले तर ते कॉंग्रेसची उमेदवारी मिळवण्याचा पर्याय त्यांच्यापुढे असू शकतो, अशीही चर्चा सुरू आहे.

Cumbarjua politics
Cumbarjua politicsDainik Gomantak

गवंडाळी पूल होणे काळाची गरज

मतदारसंघात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. खोर्ली येथे औद्योगिक वसाहत असूनही तेथे बहुतांश उद्योग डबघाईला आलेले आहेत. त्यामुळे रोजगारपूरक उद्योगांची गरज आहे. परिसरातील रस्ते खराब झालेले आहेत. त्याचबरोबर दिवाडी पूल, गवंडाळी उड्डाण पूल होणे गरजेच आहे. भाजपच्या सरकारात वीजमंत्रीपदी असतानाच त्यांना अर्धांगवायुचा झटका आल्याने त्यांची हालचाल मंदावली व त्यांचे मंत्रीपदही गेले आणि मतदारसंघाचा विकास मंदावला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com