.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नारायण देसाई
आपल्या देशात सार्वत्रिक निवडणुकांची धुळवड संपून आता दीड महिना झाला. निकाल लागून महिना होता होता जागतिक राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या किंवा इतिहासाचा विचार करता प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या दोन देशांच्या - ब्रिटन आणि फ्रान्स या देशात निवडणुका झाल्या. यांचा आपल्याशी जवळचा संबंध दिसतो.
फ्रेंच राज्यक्रांतीने जी तत्त्वे सुमारे १४० वर्षांमागे जगासमोर पुरोगामी विचारसरणीच्या स्वरूपात ठेवली, त्यांचा पाया आपल्या राज्यघटनेने स्वीकारला आहे आणि तो प्रास्ताविकेत स्पष्टपणे येऊन ताज्या निवडणुकीत समाजाच्या तळागाळापर्यंत गेलेला दिसतो. ब्रिटिशांनी तर आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले, आधुनिकतेच्या मार्गावर संस्थात्मक रचनांद्वारे देशाला पुढे नेले.
मुख्य म्हणजे आपण स्वीकारलेली संसदीय पद्धतीची प्रातिनिधिक लोकशाही ही आपण त्या परकी शासकांकडूनच अनुभवली आणि गरजेचे बदल करून तशी बांधणी स्वतंत्रपणे करून घेतली आहे. म्हणजेच, या दोन्ही देशांच्या व्यवस्था, विचार आपल्याला परिचित आहेत, हाच तो संबंध.
दीड-दोन महिन्यांच्या फरकाने या तीनही देशांच्या निवडणुका होऊन त्यांचे निकाल आले, त्यातही वर्तमानाच्या संदर्भात काही साम्यस्थळे दिसतात. ५७७ सदस्यांची फ्रेंच संसद, ६५० सदस्यांची ब्रिटिश ‘हाउस ऑफ कॉमन्स्’ आणि भारताची ५४५ सदस्यांची लोकसभा यांच्या निकालांतील लक्षात येणारा भाग म्हणजे मतदारांनी कौल देताना सत्ताधारी पक्षाला नाकारणे किंवा ‘दस फार ऍण्ड नो मोअर’ (Thus far and No more) असा संदेश देणे यापैकी एक काहीतरी घडले आहे.
लोकशाही, व्यक्तिस्वातंत्र्य, न्याय, समता यांना महत्त्व देणारे भारतीय नागरिक म्हणून या तीन महान देशांच्या निवडणुकांकडे आणि आलेल्या निकालांकडे डोळसपणे पाहाणे अप्रासंगिक ठरणार नाही.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान भारतीय वंशाचे होते. त्यांच्या पक्षाने चौदा वर्षांची सत्ता पाच पंतप्रधानांच्या माध्यमातून भोगली, ती या वेळी घालवली तीही खूपच नामुष्कीचा पराभव पत्करून. आता सत्तेत आलेल्या मजूर पक्षाच्या ४१२ जागांच्या तुलनेत सत्ता गमावलेल्या टोरीची स्थिती १२१ जागा अशी आहे, तर उदारमतवादी लोकशाही (लिबरल डेमोक्रॅट) ने ७१ जागांवर विजय मिळवला.
तिथे विविध राजकीय पक्ष असूनही द्विपक्षीय लोकशाहीचीच पद्धत प्रभावी ठरली आहे. भारताला या वेळी तो प्रयोग अर्थपूर्ण लोकशाहीच्या रक्षणासाठी आघाडी बनवून करणे भाग पडले.
फ्रान्समध्ये सत्तेसाठी आवश्यक स्पष्ट बहुमत कुणालाच लाभले नसले तरी वामपंथी आघाडीने सर्वाधिक जागा (१८२) जिंकल्या,तर सत्ता गमावलेल्या मध्यममार्गी इमान्युएल मॅक्राँच्या पक्षाला १६८ आणि दक्षिणपंथीयांना १४३ अशा जागा मिळाल्या. वामपंथी आघाडीत सामावलेले समाजवादी, साम्यवादी आणि पर्यावरणवादी या पक्षांनी अतिदक्षिणपंथी शक्तींना रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जगात दक्षिणपंथीयांच्या सत्तांचा अनुभव घेत त्यांना शह देण्याच्या प्रयत्नांच्या साखळीत भारतीय निवडणूक निकालाचाही समावेश होतो.
ब्रिटिश आणि फ्रेंच संसदीय निवडणुका मुदतपूर्व होत्या आणि सत्तेत असलेल्या त्या त्या पक्षांनी जनक्षोभ अनुभवल्यानंतरच मतदारांना सामोरे जाण्याचे ठरवले. भारतात मात्र मुदत संपताना, महिनाभर आधी निवडणुका सुरू झाल्या तरी त्या सात टप्प्यांत दीड महिना चालल्या.
त्यामागील गणित सत्ताधारी पक्षाच्या सोयीचे असल्याचे मत सतत कानी पडत राहिले. संवैधानिक संस्था, शासकीय यंत्रणा यांचा खुला गैरवापर, आचारसंहितेचे बेधडक उल्लंघन, आक्षेपार्ह शिवराळ भाषेचे जाणूनबुजून मुक्त रोपण असे सारे उघडपणे अवलंबण्यात आले.
एक मोठा फरक म्हणजे हे दोन्ही अन्य देश प्रत्येकी साडेसहा-पावणेसात कोटी लोकसंख्येचे, तर आपला भारत १४४ कोटींचा. आपली मतदारांची संख्या त्यांच्या तुलनेत किमान दहापट. एकूण व्यापच प्रचंड. आणि या संख्येसाठी मतदान यंत्रांची भलावण, तर त्या दोन विकसित देशांतील मतदान मतपत्रिकांद्वारे.
यापुढचा एक मुख्य फरक आहे तो वृत्तीचा. मतदारांनी दिलेला कौल स्वीकारून विरोधी पक्षांच्या कामगिरीला दाद देण्याची मानसिक तयारी दारुण पराभवानंतरही ब्रिटिश प्रधानमंत्री सुनक यांनी दाखवली आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता न आल्याबद्दल क्षमायाचना केली. फ्रान्सच्या मॅक्राँनेही तो मोठेपणा दाखवला.
इथे आपल्याकडचे चित्र वेगळेच होते. दावा ‘चारशे पार’ चा असूनही प्रत्यक्ष कामगिरी साठ टक्केच झाली, एकहाती बहुमत हुकले तरी जनतेने आपल्यालाच सत्तेत आणले ही शेखी मिरवण्याचा प्रकार भारतीयांनी पाहिला.
मुळात राजेशाहीचेच गुणगान ऐकत घडल्या-वाढल्यानंतर, पंचाहत्तरी पार केलेल्या समर्थ लोकशाहीत दोन दशकांपेक्षा जास्त काळ सत्ता भोगूनही उमद्या लोकशाही वृत्तीचे लक्षण तर नाहीच, ते शिक्षणही कमीच पडले याबद्दलचा विषाद मानण्यापलीकडे , नागरिक म्हणून आपण तरी काय करणार! देश महान, संस्कृती समृद्ध पण मनाचे मोठेपण? ते लोकशाही मनोमन मानली तरच यायचे, हेच खरे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.