Book: ‘चांगल्याची अपेक्षा ठेवा, पण प्रतिकूलतेसाठी तयार राहा’, अशा अर्थाची एक म्हण इंग्रजीत आहे. ती मानवी आयुष्याला किती तंतोतंत, किती बेमालूम, किती अचूक लागू पडते नाही? कारण, पुढच्या क्षणी आपल्या आयुष्यात काय घडणार आहे, त्याचा थांगपत्ता कोणालाच नसतो. तरी आपण, पुढच्या अनेक वर्षांत काय करणार आहोत, याचे झकास बेत रंगवत असतो.
अर्थात, तसे बेत रंगवल्यामुळेच जीवनाला खरा अर्थ येतो, जगण्याची खोलवर इच्छा मनात तरतरून फुलते, लक्ष्यप्राप्ती करता झगडता येतं.. हो, हेच व असंच सगळं घडत होतं, समीर भिडेंच्या आयुष्यात. त्यांचे बालपण, मुंबईत अतिशय छानपणे गेले, मग महाविद्यालयीन शिक्षणाकरता ते अमेरिकेला गेले. अनेक भारतीय तरुण मुलांप्रमाणेच, तिथेच नोकरी, ग्रीन कार्ड, लग्न, मुले व बस्तान. अशी सुरळीत जीवनशैली होती त्यांची. ‘व्यावहारिक असणे’, ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद होती.
त्यापायीच निर्व्यसनी राहून, उत्तम नियोजक बनणे त्यांना जमले. पण देवाला सर्व गाडे सुरळीत चालत असलेले कुठे पाहवतात? समीर यांना अचानक जबरदस्त पक्षाघाताचा झटका आला. तेव्हापासून, ते बरे होण्यापर्यंतचा, त्यांचा जो प्रवास आहे, तो त्यांनी, ‘एक दिवस अचानक.....’ या पुस्तकात मांडलाय.
अगदी तळमळीनं व उत्कटतेनं. तेसुद्धा या आकस्मिक दुर्घटनेकरता, शारीरिक किंवा मानसिकरीत्या तयार नव्हतेच! फक्त ह्या प्रचंड तोडमोडीतून, स्वत:ला सावरत उभे राहण्याकरता, त्यांना जे अनेक प्रकारचे धडे शिकावे लागले, तसे ते इतरांना शिकत बसावे लागू नयेत, मानसिक वा शारीरिकरीत्या कोणत्याही बदलांना, समर्थपणे तोंड देता यावे, नवीन आयुष्याला/बदलांना पूर्णपणे स्वीकारून, शहाणपणाने प्रत्येक क्षणाचा आनंद घेता यायला हवा, म्हणून ही ‘बरे होण्याची’ कहाणी समीर भिडे ह्यांनी वाचकांना सांगितली आहे. सुनीता लोहकरे यांनी याचा अनुवाद केला आहे. नवनवीन विषय तथा पुस्तकांच्या प्रकाशनाकरता ख्यातनाम असलेल्या ‘राजहंस’ प्रकाशनाने प्रकाशित केला आहे.
खरे तर लेखकाच्या सद्य शारीरिक परिस्थितीत लेखन करणे शक्यच नव्हते. पण अमेरिकेत असताना ‘काही’ घोस्ट राईटरच्या मदतीने ते शक्य झाले व भारतातही. ‘नशीबवान म्हणून यातून वाचलो’ असे एकीकडे म्हणतात व दुसरीकडे, घटना-प्रसंगांची उजळणी केल्याने, भावनांचे विरेचन होण्यास मदत झाल्याचेही सांगतात. भारत व अमेरिकेतील शेकडो सहृदयांप्रति व्यक्त केलेली कृतज्ञता व्यक्त करता आली, या जगात अजूनही चांगुलपणा कायम आहे यावर विश्वास बसला, असेही ते आवर्जून नमूद करतात.
अचानक एके दिवशी, लेखकाला डाव्या डोळ्याखाली असलेल्या सायनस पॉइंटवर प्रचंड वेदना होऊ लागल्या, भोवळ-घाम येणे-डोकेदुखी ही लक्षणे सुरू झाली. पण, तातडीने रुग्णालयात भरती केल्या गेल्याने व विशिष्ट डॉक्टर उपलब्ध असल्याने, निदान होऊ शकले. लहान मेंदूतील रक्तवाहिन्या फुटल्याने, त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. तीस-चाळीस दिवस बेशुद्धावस्थेत काढल्यानंतर, वेगवेगळ्या ऑपरेशन्सची सुरुवात झाली.
‘हालचाल’ ही अशक्यप्राय गोष्ट झाली व शरीराला वेगवेगळ्या कामांकरता असंख्य नळ्या जोडल्या गेल्या. साठ दिवसांच्या रुग्णालयातील वास्तव्यानंतर जेव्हा घरी जायची परवानगी मिळाली, तेव्हा लेखक वॉकरच्या साहाय्याने एक दोन पावले चालायचा. व्हीलचेअर कायमची मागे लागली. फिजिओथेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, ह्यांची मदत ‘मस्ट’ झाली. शेवटी अमेरिकेतील भरमसाठ खर्चाच्या उपचारपद्धतीच्या तुलनेत, गुजराथमधील ‘निंबा’ येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार सुरू झाले.
तिथल्या समग्र उपचार पद्धतीमुळे, त्यांच्यात लक्षणीय फरक दिसू लागला. वेगवेगळी तेलं वापरून केलेले मसाज, क्षीण पडलेल्या डाव्या बाजूची ताकद वाढवण्यास अधिक परिणामकारक ठरले. शब्दोच्चार स्पष्ट झाले, डोकेदुखी कमी झाली. मोबाइलचा वापर करता येऊ लागला. वर्तमानपत्रातले मथळे वाचता येऊ लागले. अमेरिकेत परतल्यावर सर्व चाचण्या परत झाल्या व भारतातील उपचार चालू ठेवण्याचे ठरले.
अन् परतल्यावर आयुष्याला एक कलाटणी मिळाली. बायको मोनिका व समीरने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अतिशय संयमाने व सुजाण समंजसपणाने, लेखकाने ह्या अतिशय वेदनादायक परंतु अपरिहार्य निर्णयाबद्दल लिहिलंय. मुलांचा विचार करून, मित्रत्वाच्या भावनेने व शांतपणे ते वेगळे झाले. अर्थातच हे वृत्त, मित्रपरिवार व नातलगांसाठीही धक्कादायकच होते.
या शांतपणे विचार करण्यामुळे व आहे त्याचा स्वीकार करण्यामुळेच लेखक नैराश्यात जाण्यापासून वाचला. ‘जे आहे, ते आहे’ हे वचन त्यांचा मित्र बनले. त्याच काळात त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला, वेगळ्या फ्लॅटमधे सोयी करून राहायला लागले. स्मूदीज, सॅण्डविच, सलाड, कांदेपोहे असे पदार्थ करायला ते शिकले. वॉशिंग मशीनमध्ये कपडे टाकून धुणे वाळत टाकणे जमायला लागले, भोवळ येण्याचा त्रास मात्र चालूच होता.
जेव्हा, भोवळ - डोकेदुखी व तोल जाणे यांचा त्रास प्रचंड वाढला, तेव्हा लेखकाने मृत्यूपत्र तयार केले. खांद्याच्या ऑपरेशनची वेळ येताच, भारतात आई व बहिणीकडे जाण्याचे त्यांनी ठरवले, चार महिन्यांसाठी. लेखक भारतात पोहोचले व अमेरिकेत कोरोना पसरला. लॉकडाउनपायी, लेखक भारतात अडकत गेले, अडकतच गेले.
यशापयशाची ही साखळी अशीच चालू आहे. तरी कोरोनाचा दरम्यान डायरीतल्या नोंदी, ईमेल, मॅसेजेस ह्या सर्वांच्या मदतीने लेखकाने जमेल तसे जमेल तितके पुस्तक लिहून घेऊन संपवत आणले. ‘सकारात्मकतेनं कसं जगावं’ याचा उत्तम वस्तुपाठ म्हणजे हे पुस्तक. अगणित संकटे व त्यातूनही मार्ग काढत असलेला एक रुग्ण. सहनशक्ती, धीर, संयम, आशावाद यांची पराकाष्ठा म्हणजे हे पुस्तक. गरजूंनाही ह्यातून प्रेरणा मिळो व हे पुस्तक लिहिण्यामागचा लेखकाचा हेतू सफल होवो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.