Coronavirus Update: चला, पुन्हा एकदा आपला ‘हिंदी चिनी भाई भाई’वाला चीन आपली भाऊबंदकी दाखवायला सज्ज झालाय तर. मला एक कळत नाही, या चीनकडे जेव्हा कोविड बीएफ.7 किंवा बीएस 7, ओमायक्रोन असले विषाणू अवघ्या जगाचे डोळे विस्फारत असताना, आपले मिचमिच्या डोळ्यांचे सैनिक हा चीन इतर देशांत का घुसवत आहे? सगळे सारखेच दिसत असल्यामुळे किती मेले, याची संख्या चीनलाही मोजता येत नाही!
पुन्हा एकदा ‘हिंदी चिनी भाई भाई’ हा मंत्र म्हणत कबुतरे उडवायची की, चिनी सैनिक उडवायचे? कशाला उगाच? जाऊ द्या! शेवटी उडते हुए पंछी के पर गिनना हमारे भाग्य(श्री) मे नही...राहता राहिला प्रश्न या नवीन विषाणूचा, तर हा पूर्वीप्रमाणेच वुहानसारख्या एका शहरातील अनियंत्रित प्रयोगशाळेतून चुकूनमाकून जगप्रवासाला निघाला असेल, तर माझे सर्वांना मुख्यमंत्र्यांप्रमाणे (शेवटी तेही डॉक्टर आणि मीही डॉक्टरच) एकच सांगणे आहे; भिवपाची गरज ना! गेल्या खेपेला तुम्हांला कदाचित वरील वाक्य पटले नसेल, पण आता मी उदाहरणांसह पटवून देण्याचा प्रयत्न करतो.
कतार: नुकत्याच झालेल्या जगप्रसिद्ध फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचेच उदाहरण पाहूया. कतारसारख्या छोट्या शहरामध्ये एकाच जागी हजारो लोक जमले, नाचले, ओरडले, किंचाळले, एकमेकांना मिठ्या मारल्या, हर्षोल्हासाने फुप्फुसे फासळीतून बाहेर येईस्तोवर हसले आणि रडले (प्रिन्स क्रिस्टिआनोंपेक्षा जरा कमीच).
तेही चक्क मास्क न घालता. आणि असे असूनसुद्धा, एकही व्यक्ती कोविडबाधित झाली नाही. अखिल पृथ्वीवरील काळजाला भिडणाऱ्या, सर्वांत रोमांचक क्रीडाप्रकारात हजारो-लाखोंच्या उपस्थितीत एकही नको असलेला विषाणू (ख्रिस्तिआनो वगळून) नव्हता.
चीन: हा एकपक्षीय निरंकुश सत्ता (जिचे अनुकरण करणे भक्तांना आवडते) असलेला हुकूमशाही देश आहे. तेथील सत्ताधीश यांना डॉक्टरांचे, शास्त्रज्ञांचे, विचारवंतांचे म्हणणे (‘फेस्टिवल ऑफ आयडियाज’) अजिबात कानामनावर घ्यायचे नसते. अगदी विज्ञान काय सांगते, याचेही ज्ञान नसते.
त्यामुळे, त्यांनी कमी दर्जाच्या स्थानिक लशी लोकांना टोचल्या, आंतरराष्ट्रीय मदत नाकारली, नागरिकांना कोंडून ठेवले आणि सर्वांत वाईट म्हणजे एकूण लोकसंख्येच्या फक्त 30 ते 40 टक्के लोकांचे लसीकरण केले. तेथील वृद्ध भाजीपाल्याचा चोथा, मढ्याच्या टाळूवरील लोणी लावून खातात. अचानक चीनने आपली बंदिस्त पोलादी भिंत उघडी केली आणि सक्तीच्या संन्यस्त वृत्तीने जगणाऱ्या कोविड विषाणूला प्रजोत्पादनाचे नवे मार्ग जगभर सापडले.
स्वभावत: सांसर्गिक असलेल्या ओमायक्रोनला मिठी मारण्यासाठी जगभरातील लोक आतुर झाले. संपूर्ण वुहानलाच 2019साली बंदीशाळा करणाऱ्या शी जिनपिंग मास्तरांनी, दरवाजा उघडला आणि कोविड विषाणूच्या आनंदाला पारावार उरला नाही. या ‘साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी अफळ अपूर्ण’ गोष्टीचे सार हे आहे की, लोकशाही लोकांचे जीव वाचवते आणि हुकूमशाही आपल्या भक्तांनाही सोडत नाही.
भारत: लोकशाहीच्या मुळावर उठलेल्या नेतृत्वाविषयी माझे मत फारसे चांगले नाही. तरीही सरकार आणि लस बनवणारी संस्था (विशेषत्वाने पूनावाला) यांनी चाचणी केलेल्या जागतिक दर्जाच्या लशी आम्हांला टोचण्यासाठी घेतलेल्या कष्टांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. 2021 सालच्या सहामाहीत मोठ्या प्रमाणात नापास करणारी दुसरी लाट वगळता इतर सर्व लाटांतून आपण व्यवस्थित तरलो आणि तगलो आहोत.
लसीकरणामुळे सांघिक प्रतिकारशक्तीतही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे, जगप्रवासाला निघालेला बीएफ. 7 भारतात आला तरीही आपण आपल्या परंपरेप्रमाणे, ‘अतिथी देवो भव’ म्हणत त्याचे स्वागत करू आणि व्यवस्थित पाणी पाजू.
आपल्या स्वागताची इतकी जय्यत तयारी पाहून त्याला रडू कोसळेल व तो थिजेल. अर्थात घरच्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घ्यायला विषाणू आलाच तर त्याला त्यांच्या जवळपासही फिरकू द्यायचे नाही. बाकी, हा विषाणू आणि अक्षय कुमारचे चित्रपट सारखेच! आपल्या जीवनात आणि अर्थव्यवस्थेत काहीच फरक पाडत नाहीत त्यामुळे गांभीर्याने घेण्याची अजिबात गरज नाही.
जग: माझ्यावर विश्वास ठेवा, लसींनी कोविडच्या सर्व लाटांना व्यवस्थित हाताळले आहे. कोविड ही पाश्चात्त्यांसाठी तातडीची समस्या नाहीच. कोविडपेक्षाही भयंकर, विनाशक समस्यांना त्यांना आधी तोंड द्यायचे आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर, झेलेन्स्की व युक्रेनची समस्या, ज्यो बायडेन यांचा स्मृतिभ्रंश वगैरे अशा अनेक समस्या आहेत.
इंग्लंडची अर्थव्यवस्था जाग्यावर आणण्यासाठी ऋषी सुनक यांना त्यांच्या सासऱ्यांकडून कदाचित कर्ज काढावे लागेल. ‘व्हाल द व्हॅम्पायर’ अजूनही रक्त पीत आहे. हल्लीच ख्रिस्टिआनो रोनाल्डो बेरोजगार झाला आहे, त्या बिचाऱ्याला फुटबॉलला पाय लावणार तर न क्लब आहे, ना देश. त्याला पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी बहुतेक गोवा एफसीत यावे लागेल असे वाटते. या अनेक महत्त्वाच्या संकटांपुढे कोविडला कुणी विचारेनासे झाले आहे. त्यामुळे, त्याला स्वत:चीच लाज वाटू लागली आहे.
तर कोविड आणि कोविडबद्दलची ही माहिती व्हॉट्सअॅप व फेसबुकवर फिरणारी, नसली तरी खूपच खरी वाटणारी आहे. त्यामुळे, आभासी जगात थोडे जास्त लाइक्स मिळतील, पण वास्तवातील जगात हे वायफळ काही फलद्रूप होणार नाही.
ताजाकलम-
आपल्यातील बहुतेक डॉक्टर (माझ्यासकट) बूस्टर डोस वगैरे घेण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. या बूस्टर डोसच्या अनुषंगाने हृदयविकाराचे झटके, फुप्फुसांना व रक्तवाहिन्यांना रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होणे आम्ही पाहिले आहे.
आम्हांला अजून खूप जगायचे आहे. तसेही ते डेल्टा संस्करणासाठी तयार केले गेले असल्याने त्यांचा फायदा आता होईल. माजी इंग्लिश कर्णधार, अॅलन शिअररने ‘भव्यदिव्य खेळाचा भव्यदिव्य खेळ’ असे अतिशय तेजस्वीपणे वर्णन केलेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर एक विचार मनात आला.
मेस्सीने जिंकावे अशी आम्हा सर्वांची इच्छा होती, यात शंकाच नाही, परंतु ज्या सज्जन व्यक्तीने ही इच्छा प्रत्यक्षात आणली, तो मेस्सी नव्हताच. मेस्सीनेच हे स्वप्न साकारले असते, तर अंतिम सामना रंगतदार झाला नसता. अंतिम सामना हा ‘अंतिम सामना’ आहे असे वाटायला भाग पाडले ते पुनरागमन केलेल्या किलियन एम्बापेने!
तसेच लोकशाहीच्या खेळातही सर्वोच्च नेताच जिंकतो. फक्त त्याने प्रतिस्पर्ध्याला बिनदिक्कतपणे खेळू दिले पाहिजे आणि पंच तटस्थ असला पाहिजे. ‘हमे भी राहुलही जिताता है’ असे म्हणणाऱ्या मोदींनी ‘भारत जोडो’ यात्रा विनासायास पूर्ण होऊ दिली पाहिजे.
भारत जोडण्याच्या नादात आपले जोडे झिजवणारे राहुल गांधी, पार बीजिंगला पोहोचेपर्यंत तरी या यात्रेला मोदींनी आडकाठी आणू नये. कारण, लोकशाही हा फुटबॉलपेक्षाही खूप महान, मनोरंजक आणि मायाळू (पायाळू) खेळ आहे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.