Books: 'शब्दांकन' पुस्तकांच्या साहित्यप्रकारातील परकाया प्रवेश

Blog: 'शब्दांकित' आणि 'माझं क्षितिज' या दोन पुस्तकांच्या या उंच झोक्यांवर वाचकांना झुलायचे भाग्य केवळ डॉ. नितीन आरेकर यांच्या लेखणीच्या ताकदीने मिळालं.
Books | Shabdankit | Maze Kshitij
Books | Shabdankit | Maze KshitijDainik Gomantak
Published on
Updated on

विविध साहित्य प्रकारांमध्ये रमून जाऊन, वाचणाऱ्यांना मुलाखती हा प्रकारसुद्धा खूप प्रिय असतो कारण तिथे सर्व काही ‘खरंखुरं’ व प्रत्यक्ष ज्याला ‘फ्रॉम हॉर्सेस माऊथ’ म्हणतात, तसे वाचायला मिळते. तिथे कल्पना विश्वाला, त्यातील प्रतिभाविलासाला, चमत्कृतीपूर्ण शैलीला जरी मज्जाव असला तरी, मुलाखत घेणारा जर नामी असेल, मुलाखत देणाऱ्याला फुलवत फुलवत मजकूर हस्तगत करणारा असेल तर ती मुलाखत वाचताना निःसंशयच खूप मजा येते.

मुलाखतीचे चुलत भावंड म्हणजे शब्दांकन. विषयाची पूर्ण तयारी करून अबोल मुलाखत देणाऱ्याला बोलते करून माहिती घ्यायची व चक्क ती अशा रीतीने सादर करायची की वाचकांना वाटते की जणू काही तीच व्यक्ती बोलते आहे. प्रत्यक्षात समोर बसून!! प्रथमपुरुषी एक वचनात मांडलेला हा मजकूर म्हणजे चक्क परकाया प्रवेश असतो.

लिखाण संपेपर्यंत केलेला. लिखाण यशस्वी मानायचे जेव्हा त्यात कुठेही लेखनिक झळकत नाही. तरीही त्याने त्याच्या अत्युच्च प्रतिभेला, लिखाणात स्वैर उधळू दिलेले असते. तिथे ‘शब्दांकन’ ह्या मुलाखत प्रकाराला अस्तित्व लाभते. महनीय व्यक्तीच्या अंतर्मनात डोकावण्याची संधी मिळते व वाचकाच्या पदरात, खळाखळा सोन्याच्या मोहरा पडतात.

अशाच मोहरा वेचता वेचता आज आपण दमणार आहोत - डॉ. नितीन दत्तात्रेय आरेकर लिखित दोन पुस्तकांच्या संदर्भात. पैकी पहिले आहे ‘शब्दांकन’ व दुसरे आहे ‘माझं क्षितिज’. लोकसत्ताच्या ‘चतुरंग’ पुरवणीकरता घेतलेल्या या खास मुलाखती ‘शब्दांकित’ मध्ये येतात. यात डॉ. अमोल कोल्हे, वैशाली पाटील, उस्ताद तौफीक कुरेशी, श्रीधर फडके, शंकर महादेवन, नितीन देसाई, गौरी केन्द्रे, ऐश्वर्या नारकर, रेखा भारद्वाज, अन्नु कपूर, रामदास कामत,मनोज जोशी, भालचंद्र पेंढारकर, नीलाक्षी जुवेकर, संजय जाधव, बेगम परवीन सुलताना, जॉनी लिव्हर, प्यारेलाल शर्मा, आनंदजी, दिलशाद खाँ, विरेन प्रधान इतकी मंडळी येतात. शिवाय शेवटाला स्वतः डॉ. आरेकर यांचा ‘शब्दांकन : वैशिष्ट्यपूर्ण साहित्यप्रकार’ हा विस्तृत लेख येतो.

Books | Shabdankit | Maze Kshitij
Xi Jinping: चीनचे अध्यक्षांच्या सौदी अरेबिया दौऱ्यामागचा नेमका हेतू काय? द्विपक्षीय की राजकीय

या पुस्तकात शब्दांकित केलेले, एकूण एक लेख अत्यंत सरस उतरले आहेत एखादी कथा नाहीतर कादंबरी वाचतोय, असे वाटावे इतपत सरस. आपल्या आवडीचे अनेक कलाकार असतात. अनेकांच्या कला सामर्थ्याने आपण मोहून, भारून गेलेलो असतो. पण अशा कलाकारांच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आपल्याला विशेष काही माहिती नसते.

खास करून त्यांचे बालपण, त्यांनी त्या कलेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी घेतलेले अपार कष्ट, त्यांचे कौटुंबिक जीवन, त्यांना साधक- बाधक ठरलेले प्रसंग, व्यक्ती ही सर्व तहान हे लेख भागवतात. नुसते भागवतच नाहीत तर प्रत्येक लेख वाचून संपल्यानंतर, एक विलक्षण अशी भारून गेल्याची प्रतीती येते. त्या मुलाखती घेणे कधीच सोपे असत नाही. कलावंताच्या लहरी, अडचणी, तब्येत, दुःखानंदाचे क्षण, सर्व संभाळत त्याला बोलते करावे लागते.

काही कलाकार मोकळ्या स्वभावाचे असतात व खूप बोलतात त्यातील काय घ्यायचे काय नाही, कसे संपादित करायचे कसा अग्रक्रम लावायचा हे मुलाखतकाराला ठरवावे लागते. कधी कलाकार, भावनेच्या भरात, कोणाबद्दल काहीतरी कठोर उद्गार बोलून जातात, त्याला किती प्रमाणात अधोरेखित करायचे व किती सौम्य बनवून - त्याचा निर्णय घ्यावा लागतो. काही नामवंत, विलक्षण अबोल असतात.

त्यांचे आवडते विषय हेरून, त्यांना बोलते करायची खुबी, मुलाखतकाराकडे असावी लागते. एकूणच अशा प्रकारच्या लेखनात जी दृष्यात्मकता असावी लागते, ती पुरेपूर उतरली आहे. त्यामुळे वाचक, कधी या तर कधी त्या अशा नऊही रसांत आकंठ पोहत राहतो. अमोल कोल्हेंबरोबर भावुक होत शिवाजी राजा जगून येतो. दिलशाह खाँजींची झगमगती शैक्षणिक वाटचाल ऐकून नवलाने तोंडात बोटे घालतो.

या पुस्तकाकरता खास लेख लिहिलेल्या विरेन प्रधानांच्या मालिका, चित्रपट, नाटकांच्या झेपेबरोबरच मराठी भाषिकांवर जिथे तिथे होणाऱ्या अन्यायाने व्यथित होतो. प्यारेलाल, आनंदजींबरोबर स्वरसागरात डुबक्या मारतो. संजय जाधव यांची पूर्ण वाटचाल, डोळ्यांतील पाणी अडवीत, श्वास रोधीत वाचतो. भालचंद्र पेंढारकर, अन्नू कपूर, मनोज जोशींची अभिनय कारकिर्दीची हसऱ्या चेहऱ्याने, कौतुक भरल्या नजरेने पारायणे करतो.

Books | Shabdankit | Maze Kshitij
Goa Corona Update: पूर्वानुभव विचारात घ्‍या, चुकांची पुनरावृत्ती टाळा!

कारण त्या कारकिर्दीचे आपण पंचाहत्तर टक्के साक्षीदारच असतो. नीलाक्षी जुवेकर, रामदास कामत, रेखा भारद्वाज, शंकर महादेवन, श्रीधर फडके, जॉनी लिव्हर हे आपले रोजच्या जगण्यातले आधारस्तंभ असतात. त्यांच्या आयुष्यातील घडामोडी आपल्याला खूप खूप हळवे करून जातात. ऐश्वर्या नारकर, गोरी केन्द्रे यांच्या वाटचालीतील टप्पे, वैशाली पाटीलच्या टप्प्याहून कमी महत्त्वाचे नसतात. या उंच झोक्यांवर वाचकांना झुलायचे भाग्य केवळ डॉ. नितीन आरेकर यांच्या लेखणीच्या ताकदीने मिळते.

वाचकांना भावनेत वाहायला ‘माझं क्षितिज’ हे आणखी एक त्यांनीच लिहिलेले पुस्तक शब्दांकनांचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. वाचकाला किती प्रमाणात हळवे व सैरभैर करायचे याच्या सर्व सीमा, हे पुस्तक तोडून टाकते. या पुस्तकात दहा लेख आहेत. आठ शब्दांकने व दोन व्यक्तिचित्रणे आहेत. सर्वच लेख जवळच्या व्यक्तीशी गप्पा मारून लिहिलेले आहेत. लेखकाच्या म्हणण्यानुसार, त्यांना त्या लेखांपायी अंतर्मनात डोकावण्याची संधी मिळाली.

यातील सर्व महनीय व्यक्तींचा लेखकाला आलेला अनुभव जसा अतिशय आनंददायी व समृद्ध करणारा वाटतो, तसाच आणि तितकाच तो वाचकांकरताही ठरतो. पद्मभूषण झाकीर हुसेन, बेगम परवीन सुलताना, विनोदवीर जॉनी लिव्हर, तालवाद्यवादक तौफिक कुरेशी, नितीन देसाई, मनोज जोशी, शंकर महादेवन या सर्वांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगितल्या आहेत. तर परवीन सुलतानाजींनी दुसरा लेख स्वतःच्या मुलीवर लिहिलेला आहे. अर्थातच डॉ. नितीनजींचे जबरदस्त शब्दांकन या सर्व लेखांना लाभले आहे.

या पुस्तकातले स्वतः नितीनजींनी आई व आजीवर लिहिलेले लेख म्हणजे पुस्तकाचा ‘मेरूमणी’ ठरतील. त्यातही आईवरचा लेख केवळ भारावूनच टाकत नाही, तर त्यांच्या आईच्या (विलासिनी निमकर ऊर्फ आरेकरच्या) प्रचंड पांडित्याने संमोहित करतो. एक उत्कृष्ट लेखिका, शिक्षिका, अनेक विषयांची बक्षिसे, शिष्यवृत्त्या पटकावलेली तत्त्वनिष्ठ आई/ बायको/ काकी/सून, अफाट वाचक, उत्कृष्ट अभिनेत्री अशा स्वरूपातले हे आईचे शब्दचित्र, वाचकांना मंत्रमुग्ध करून टाकते.

या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशक आहेत डिंपल प्रकाशनचे अशोक मुळेजी. देखणी मुखपृष्ठे सतीश भावसार यांची आहेत. सुबक, सुरेख मांडणीपायी पुस्तके आकर्षक तर झालीच आहेत, त्याशिवाय त्यातील दर्जेदार मजकुरापायी अत्यंत मनोवेधकही झाली आहेत. सतत नवनव्या विषयांवरची पुस्तके प्रकाशित करून, दिवसेंदिवस आपला डंका प्रकाशन व्यवसायात गर्जत ठेवणाऱ्या प्रकाशकाचे, लेखकांबरोबरच अभिनंदन.!!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com