खाते तर खोलले, पण...

BJP has opened an account in the district panchayat elections
BJP has opened an account in the district panchayat elections

भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत सांकवाळ मतदारसंघात बिनविरोध उमेदवार निवडून आणत खाते खोलले आहे. या यशामुळे भाजपचा आनंद द्विगुणीत झाला आहे, तर कॉंग्रेस पक्ष तोंडघशी पडला आहे. विरोधकांनी भाजपला शह देण्याचे मनसुबे आखले आहेत. पण त्यांच्यात एकवाक्‍यता नाही. परस्परांविरुध्द दोषारोप करत आणि एकमेकांना फशी पाडण्यातच हे विरोधक वेळ घालवत आहेत. त्याचा फायदा भाजप करून घेण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु भाजपमधील महिलांनी केलेली बंडखोरी आणि अन्य काही मतदारसंघातील भाजपमधील कार्यकर्त्यांत असलेली चढाओढ पाहता भाजपसमोर विरोधकांपेक्षा पक्षांतर्गत आव्हानच मोठे आहे...

जिल्हा पंचायत निवडणुकीतील लढती बऱ्याच चुरशीच्या होणार आहेत. भाजपने उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीवर आपलीच सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. तर भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनीही कंबर कसली आहे. कॉंग्रेस पक्ष आणि मगो पक्षाची युती होईल, असे चित्र दोन्ही पक्षाच्या काही नेत्यांनी निर्माण केले होते. परंतु ऐन रणधुमाळीत दोन्ही पक्षांनी आपली ताकद स्वतंत्रपणे आजमावणेच पसंत केले आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानेही प्रथमच उमेदवार उतरवले आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानेही काही मतदारसंघात उमेदवार दिले आहेत. या निवडणुकीत एकाही पक्षाला सर्व मतदारसंघात उमेदवार देता आलेले नाहीत. उमेदवार ठरवताना भाजपला यावेळी बरेच कष्ट पडले. काही मतदारसंघात तर पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरांनी शड्डू ठोकले आहेत. यामुळे भाजपच्या मतांची विभागणी होऊन त्याचा लाभ विरोधकांना होऊ शकतो. सांकवाळ मतदारसंघातून अनिता थोरात या बिनविरोध निवडून आल्याने भाजपने आपले खाते खोलले आहे. पंचायतराज मंत्री माविन गुदिन्हो यांचा यामुळे भाव वाढला आहे. जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडीत माविन यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. उत्तरेत आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांचे किती समर्थक निवडून येतात यावरही उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड ठरू शकते. विरोधकांनी मतदारसंघ आरक्षण जाहीर होताच भाजपने आपल्या सोयीप्रमाणे आरक्षण ठेवले असा आरोप केला. त्याचा फायदा भाजपला किती होणार हे २३ रोजी कळणार आहे. तूर्त तरी भाजपला काही मतदारसंघात विरोधकांबरोबरच स्वपक्षातील नाराजांचा सामना करावा लागत आहे. कॉंग्रेस पक्षातून भाजपमध्ये आलेल्या आमदारांच्या समर्थकांना उमेदवारी देताना झुकते माप दिले गेल्याने पुन्हा एकदा निष्ठावान कार्यकर्त्यांना प्रामाणिक कार्याची किंमत मोजावी लागली आहे. राजकारणात वर्तमान स्थिती काय आहे त्याला महत्त्व आहे. त्यामुळे भाजपनेही त्या प्रवाहाप्रमाणेच व्यूहरचना केली आहे. यातून नवे आमदार दुखावणार नाहीत, याची काळजी घेतली आहे. पण पक्ष वाढवण्यासाठी मेहनत घेतलेल्या कार्यकर्ते, नेत्यांकडे दुर्लक्ष करणे हे भविष्यात महागात पडू शकते. काही माजी आमदारांनाही या निवडणुकीपासून चार हात लांब ठेवले गेले आहे. केवळ प्रचारात सामावून घेतले म्हणून ते समाधानी आहेत असे नाही. त्यांच्या समर्थकांना उमेदवारी डावलली त्याची नाराजीही आहेच. असे असले तरी संघटन सचिव सतिश धोंड यांनी अनेक ठिकाणचे बंड शमवण्यात बऱ्यापैकी यश मिळवले आहे. जिथे शक्‍य झाले नाही तिथे पक्षाच्या उमेदवारामागे सारी ताकद लावायचा निर्णय भाजपने घेतला आहे.

भाजपला शह देण्यासाठी विरोधक खटाटोप करीत आहेत. तरीसुध्दा भाजपसमोर मोठे आव्हान अजूनही निर्माण करण्यात विरोधक अपयशी ठरले आहेत. भाजपला पक्षातील बंडखोरांचेच आव्हान अधिक आहे. विरोधक भाजपला खिंडित गाठण्याची भाषा करीत असले तरी रणांगणांत हेच विरोधक एकमेकांना पाण्यात पाहत आहेत. परस्परांवर दोषारोप करताना कॉंग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड आणि आप तसेच राष्ट्रवादी पक्षही स्वत:ची ताकद दाखवण्याचा आटापिटा करीत आहेत. यातून भाजपचा फायदा होणार आहे. एकूण ५० जागांसाठी २०३ उमेदवार रिंगणात आहेत. सरासरी ४ उमेदवार एका मतदारसंघात आहेत. पण काही ठिकाणी दोन, तीन उमेदवारांत थेट लढत आहे. भाजपने ४१, कॉंग्रेस ३८, मगो पक्ष १७, आम आदमी पक्ष २१, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ६ असे प्रमुख पक्षांचे उमेदवार आहेत. पण बऱ्याच मतदारसंघात राष्ट्रीय पक्ष असलेले भाजप आणि कॉंग्रेस यांच्यात तुल्यबळ लढती आहेत. भाजपला बंडाळीची झळ बसत आहे. कॉंग्रेसमध्ये यावेळी उमेदवारी मिळवण्यासाठी फारशी चुरस दिसली नाही. विरोधात असल्याने आणि संघटनेचे कामही रोडावलेले असल्याने असे झाले असावे. मगो पक्षात मात्र एक दोन ठिकाणी बंडखोरी दिसून आली आहे. विधानसभा निवडणुकीत नशीब आजमावले असता हाती भोपळा आलेल्या आम आदमी पक्षाने (आप) जिल्हा पंचायतीत प्रथमच प्रवेश करण्यासाठी विशेषत: कॅथलिक मतदारांची संख्या अधिक असलेल्या सासष्टी तालुक्‍यात भर दिला आहे. त्यामुळे सासष्टीकडून "आप'ला मोठी अपेक्षा आहे. हा तालुका एखाद दुसरी जागा आपल्या पदरात घालेल, असा विश्‍वास "आप'च्या नेत्यांना आहे.

मगो पक्षानेही यावेळी निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांना सरकारमधून बाहेरचा रस्ता दाखवल्याने मगो पक्षात भाजपबाबत प्रचंड नाराजी आहे. त्याचा वचपा जिल्हा पंचायत निवडणुकीत काढायचा निर्धार मगोने केला आहे. त्यामुळे भाजप उमेदवारांना लक्ष्य करत तिथे विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणार आहेत. बऱ्याच जागांवर मगोचे उमेदवार भाजप उमेदवारांची डोकेदुखी वाढवणार आहेत. भाजपचे राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर यांचे मेहुणे असलेले प्रदीप देसाई यांना मगोने पक्षात प्रवेश देऊन धारबांदोडा तालुक्‍यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोला त्याचा किती फायदा होतो हे कळून येणार आहेच.

भाजपला या निवडणुकीत विजय मिळवायचा असेल तर सर्व शक्ती पणाला लावावी लागणार आहे. म्हादईचा प्रश्‍न किचकट बनत चालला आहे. केंद्र सरकारच्या कर्नाटकधार्जिण्या भूमिकेमुळे गोव्याचे नुकसान होत आहे. खाणी सुरू करणे, सीएए कायद्यामुळे विरोधकांनी पसरवलेला असंतोष दूर करणे ही मोठी आव्हाने भाजपसमोर आहेत. या सर्वांत मोठा मुद्दा चर्चेत राहणार आहे तो म्हणजे सरकारी नोकऱ्या. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांना नोकऱ्यांचे आश्‍वासन हवे आहे. सरकार सर्वांनाच नोकऱ्या देऊ शकत नसले तरी आश्‍वस्त तरी करू शकते. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासाठी २०२२ साली होणारी विधानसभेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. त्यासाठी दोन्ही जिल्हा पंचायती ताब्यात असायलाच हव्यात. कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीत सत्ता मिळवता आली नाही तर त्यांचे काही नुकसान होणार नाही. पण भाजपला सत्ता संपादनासाठी काही जागा जरी कमी पडल्या तरी विरोधकांची ताकद वाढणार आहे, हे भाजपने लक्षात घ्यायला हवे.

भाजपमधील महिलांनी यावेळी बंडखोरीचे अस्त्र उगारले आहे. काही मतदारसंघात महिला कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवाराविरोधात अर्ज सादर केला आहे. बोरी मतदारसंघातून पूनम सामंत या अपक्ष लढत आहेत. तोरसे मतदारसंघात भारती सावळ, शिवोली मतदारसंघात पल्लवी दाभोलकर, कोलवाळ मतदारसंघात थिवीचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी आव्हान उभे केले आहे. त्यांच्या पत्नी कविता कांदोळकर यांनी अपक्ष अर्ज दाखल करून भाजप उमेदवाराची डोकेदुखी वाढवली आहे. हरमल मतदारसंघात रंगनाथ कलशावकर, मये मतदारसंघात माजी सभापती अनंत शेट यांचे बंधू प्रेमेंद शेट यांनीही भाजप उमेदवार आहेत तिथे अपक्ष अर्ज भरला आहे. असे आणखी काही मतदारसंघातही झालेले आहे. त्याचा फटका भाजप उमेदवाराला निश्‍चितच बसणार आहे. भाजपचे नेते यावर कोणता तोडगा काढतात हे पाहावे लागेल. रिवणमधून भावेश जांबावलीकर यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देत अपक्ष अर्ज सादर केला होता. मात्र त्यांनी पक्षशिस्तीच्या चौकटीत राहत माघार घेतली. अन्य ठिकाणी पक्षाच्या नेत्यांना बंडखोरांची मनधरणी करण्यात यश आले नाही. भाजपमधील ही खदखद कॉंग्रेस, मगोच्या पथ्यावर पडणार काय, आम आदमी पक्ष खाते खोलणार काय, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसच्या किती आमदारांना त्रासदायक ठरणार, मगो पक्ष गेल्यावेळेइतक्‍या जागा मिळवणार काय, या सर्व प्रश्‍नांची उत्तरे २३ मार्च रोजी मिळणार आहेत.

सासष्टी तालुक्‍यातील नऊ जिल्हा पंचायत मतदारसंघात भाजपला मर्यादित यश मिळेल. तिथे भाजपमध्ये आलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांनी आपल्या समर्थकांना अपक्ष रिंगणात उतरवण्यातच धन्यता मानली आहे. यातील कितीजण निवडून येतात आणि त्यातील कितीजण आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे नंतर भाजपची साथ देतील हेही पाहावे लागेल. कॉंग्रेसच्या उमेदवारांना निवडणुकीत निधीची चणचण भासू शकते. मात्र भाजप सत्तेत असल्याने भाजपच्या उमेदवारांना पक्षाकडून सर्व तऱ्हेची मदत मिळणार आहे. काही जणांसाठी जिल्हा पंचायती या विधानसभेत जाण्यासाठीची पहिली पायरी आहे. त्यामुळे त्यांनी ही निवडणूक फारच गांभीर्याने घेतली आहे. त्याचा धसका काही विद्यमान आमदार, मंत्र्यांनी तसेच माजी आमदारांनीही घेतला आहे.

जिल्हा पंचायत निवडणुकीत गावा फॉरवर्ड पक्षाने मात्र अंतर राखले आहे. पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी या निवडणुकीत रस दाखवला नाही. त्यांच्या मतदारसंघात फारसा फरक पडत नसल्याने त्यांनी निवडणुकीपासून नामानिराळे राहणे पसंत केले आहे. पण शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर आणि साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी सुध्दा थेट आपले उमेदवार रिंगणात न उतरवता कॉंग्रेसच्या तसेच आपल्या समर्थकांना अपक्ष उमेदवार म्हणून पुढे केले आहे. निकाल काहीही लागला तरी "झाकली मूठ सव्वा लाखाची' म्हणायला हे आमदार मोकळे. पर्वरी मतदारसंघात अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना मात्र जिल्हा पंचायत सदस्य निवडून आणण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यात त्यांना यश आले नाही तर मात्र पुढील विधानसभा निवडणूक खंवटे यांच्यासाठी जड जाईल, याविषयी कोणी भविष्य सांगण्याची सुध्दा आवश्‍यकता नाही.

कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी भाजपला शह देण्यासाठी केवळ स्वप्ने पाहून चालणार नाहीत तर प्रत्यक्षात रणांगणात उतरून आपल्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवे. जिल्हा पंचायत निवडणुकीत सांकवाळ मतदारसंघात भाजपच्या महिला उमेदवार थोरात या बिनविरोध निवडून येण्याची किमया साधतात. यावरून भाजपने ही निवडणूक किती गांभीर्याने घेतली आहे हे लक्षात येते. याउलट कॉंग्रेस पक्षाला साधा उमेदवारसुध्दा देता येत नाही. यावरून कॉंग्रेसचे नेते निवडणूक व्यवस्थापनात कच्चे आहेत, हेच स्पष्ट होते. कोणतीही निवडणूक भाजप फार गांभीर्याने घेतो. म्हणूनच भाजप यशाला गवसणी घालण्यात यशस्वी ठरतो. कॉंग्रेसमध्ये तसे होत नाही. त्याचा फटका मग निकालावर बसतो. या निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात हे लवकरच दिसून येणार आहे.
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com