अंटार्क्टिका सहल : भारताचा ध्वज फडकवला...

काही क्षण खरेच खूप विलक्षण असतात. अंटार्क्टिका सहलीत भारताचा तिरंगा ध्वज फडकवण्याचे स्वप्न पूर्ण झाले, तो क्षण यांपैकीच एक.
Antarctica
AntarcticaDainik Gomantak
Published on
Updated on

अजय करमली

‘ड्रेक शेक’ होत असताना आपण नीट, सरळ रेषेत डेकवरून चालूही शकत नाही याचा अनुभव आम्ही सर्वांनी घेतला. कॅम्पिंग आणि कयाकिंग याविषयी आम्हांला प्रत्यक्ष सत्रात जाऊन घ्यावी लागली. कारण त्याचे प्रक्षेपण कॅबिनमध्ये केले जात नव्हते आणि निवड करण्यासाठी सत्रात सहभागी होणे आवश्यक होते.

आम्ही तिघांनीही कॅम्पिंगसाठी नावनोंदणी केली, परंतु राइडसाठी फक्त मी आणि राधाने नोंदणी केली. कारण मायाला कयाकवरून राइड जाण्याची भीती वाटत होती. कयाकिंग हे गटांमध्ये केले गेले आणि सहभागींची निवड सोडत काढून करण्यात येते. नशिबाने आमची साथ दिली नाही. त्यामुळे, कॅम्पिंग हाच पर्याय शिल्लक होता. आम्हांला दुसऱ्या दिवशी सकाळी कॅम्पिंगसाठी तयार झालो. कयाकिंग करता आले नाही याचे दु:ख होण्याऐवजी काही युरो वाचले यात आनंद मानला.

आम्हांला बोटींच्या सुरक्षिततेविषयी अनिवार्य सत्रालादेखील उपस्थित राहावे लागले आणि एव्हीयन फ्लूच्या मुळे आम्ही पेंग्विनपासून पाच मीटर अंतर ठेवावे अशी शिफारस करण्यात आली. विविध समुद्रपर्यटन आणि लँडिंग मोहिमांसाठी एकूण बारा गट तयार केले गेले होते.

सत्र संपल्यावर आम्ही सहाव्या, सातव्या, दहाव्या आणि अकराव्या डेकवरही फिरून पाहिले. सातव्या आणि अकराव्या डेकवर जास्त वेळ थांबता आले नाही कारण ते उघडे होते आणि बाहेर गोठवणारी थंडी होती. या थंडीमुळे आम्हांला बाल्कनीत जास्त वेळ उभे राहणे किंवा बसणे शक्यच नव्हते. ड्रेक पॅसेजमधून प्रवास चालू राहिला आणि एव्हाना आम्हांला ड्रेक शेकची सवय होऊ लागली.

आम्हांला सांगण्यात आले की, १५-१८ फूट उंच लाटा उसळत आहेत. तरीही त्यांच्या मते हे ड्रेक खूपच शांत आहे. समुद्राचे हे रूप ‘शांत’ म्हणायचे तर मग रौद्र रूप कशाला म्हणतात असा विचार मनाला हेलकावून गेला. या आधीच्या मोहिमांमध्ये कॅबिनच्या काचा फुटणे, भांडी अस्ताव्यस्त होणे आणि जीवितहानीच्या कहाण्याही ऐकल्या.

प्रत्यक्ष हेलकावे बसत असताना, आधीच्यापेक्षा सौम्य आहेत याचे समाधान मानावे की, भीती बाळगावी याचा कोलाहल मनात सुरू होता. पण, मनाची दुर्दम्य इच्छाशक्ती धीर देत होती. आम्ही नेलेल्या दुर्बिणीतून काही अल्बाट्रॉस पक्षी थोडे जवळून पाहिले.

ड्रेक शेक चालू असताना, आम्ही व्हेल पाहण्याचा आनंद लुटत होतो. कॅम्पिंगची माहिती देताना प्रथम स्वतःला कसे झाकायचे, बर्फावर तंबू कसा बसवायचा आणि त्यात कसे जायचे याबद्दल सांगण्यात आले. मोहिमांसाठी काही ठरावीक योग्य साइट्स आहेत आणि त्या साइट्सवर कॅम्प घालण्यासाठी त्यांच्याकडे पूर्वपरवानगी असणे आवश्यक असते.

दुर्दैवाने, ४-५ दिवसांच्या कालावधीत खराब हवामानामुळे कॅम्पिंगचा थरार प्रत्यक्षात अनुभवता आला नाही. थोडे निराश झालो, पण ६६ अंश अक्षांश ओलांडून अंटार्क्टिक झोनमध्ये प्रवेश केल्याची घोषणा आम्ही ऐकली आणि निराशा कुठल्या कुठे विरली. दुपारच्या वेळी आम्ही दक्षिण गोलार्धातील सर्वांत प्रतिष्ठित समुद्री पक्षी पेंग्विनवरील व्याख्यानाला उपस्थित राहिलो. केवळ पेंग्विनच नव्हे तर इतिहासाविषयी आणि आपली ज्यांच्याशी गाठ पडू शकते अशा प्रजातींबद्दल माहिती देण्यात आली.

दुपारच्या जेवणानंतर आम्ही अंटार्क्टिकाच्या व्हेल आणि ऑर्कर्स या विषयावरील माहिती ऐकली. आणि त्यानंतर दक्षिण महासागरातील सीलविषयी खूप माहिती मिळाली. आम्ही काही वेळ दुर्बिणीतून पक्षी पाहण्यात घालवला. संध्याकाळी ढगांचे निरीक्षण करण्यासाठी आम्ही मोहिमेतील गटांत सामील झालो. इतके व्यग्र होतो की, आम्हांला एक मिनिटही कंटाळा आला नाही.

१२ तारखेला सकाळी सातच्या सुमारास डोळे उघडले आणि आम्हांला हिमखंड आणि हिमनद्यांचा अद्भुत नजारा पाहायला मिळाला. बर्फाचे अनेक छोटे तुकडे, ज्यांना क्रू मेंबर किंवा तिथे मोहिमेवर अनेकदा गेलेले लोक गमतीने ‘कपकेक’ म्हणतात ते तरंगताना पाहणे खूपच विलोभनीय होते.

यालौर बेटावर समुद्रपर्यटन आणि पीटरमन बेटावर लँडिंग करण्यासाठी झोडिएक बोटी सज्ज होत्या. आमचे समुद्रपर्यटन सर्व गटांमध्ये शेवटी होते. आम्ही ५/६ लेयर्स असलेले लाल पार्का वॉटरप्रूफ जॅकेट आणि लाइफ जॅकेट, वॉटरप्रूफ पँट, रबर बूट्ससह आम्ही अंतराळवीरांसारखे दिसत होतो. गंमत म्हणजे चालतही त्यांच्यासारखेच होतो!

आम्ही दुपारच्या सुमारास झोडिएक बोटीतून निघालो. कपकेक हिमखंडांवरून झोडिएकचे जाणे खूपच मनोहारी होते. उत्साहाच्या भरात काहींनी ते कपकेक हातीही घेतले. तो कपकेक आमच्या हातात धरून ठेवण्याची मजा आणि रोमांच काही वेगळाच होता. विविध आकार आणि प्रकार असलेले हिमनग, हिमखंड आणि हिमनद्या जवळून प्रत्यक्ष पाहण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरले होते. आम्ही जेंटू पेंग्विन पाण्यात पोहताना पाहिले.

काही ऍडेली पेंग्विन हिमखंडावर उभे असलेले दिसले. आमचे पहिले लँडिंग पीटरमॅन बेटावर झाले. झोडिएकमधून उतरताच आम्हांला बर्फातून चालणे सुलभ व्हावे यासाठी ‘वॉकिंग पोल्स’ देण्यात आले. वॉकिंग ट्रॅकवर झेंडे आणि ट्रॅफिक मार्कर कोन लावून जाण्याचा मार्ग चिन्हांकित केलेला होता. भारतीय ध्वज घेऊन पेंग्विन वसाहती पाहण्यासाठी चालत जाणे हा माझ्यासाठी कधीही न विसरता येण्यासारखा क्षण होता.

भारताचा ध्वज तिथे फडकवताना मन अभिमानाने भरून आले. आमच्या ध्वजारोहणात नंदूही सहभागी झाला. आम्ही ध्वज फडकवतानाचे क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केले. जेंटू पेंग्विनची वसाहतीतली अनेक ठिकाणे गुलाबी रंगात रंगली होती.

पेंग्विन गुलाबी रंगाचे ‘क्रिल’ मासे खातात. क्रिल हा कोळंबीसारखा लहान व गुलाबी रंगाचा मासा असतो. क्रिल हे पेंग्विनचे मुख्य अन्न आहे. आम्ही निसर्गाच्या निर्मळ सौंदर्यात फिरण्याचा आनंद घेतला.

आम्ही जहाजावर परतलो. आत जाण्यापूर्वी आमचे रबरचे बूट स्वयंचलित ब्रशने पूर्णपणे स्वच्छ करून ते जंतुनाशक द्रवामध्ये बुडवणे आवश्यक होते. जेणेकरून कोणत्याही जिवाणूचा संसर्ग जहाजावर होऊ नये.

परतल्यानंतर आम्ही आमच्या केबिनच्या बाल्कनीतून ‘न भूतो न भविष्यति’ असा सूर्यास्त पाहिला. सबंध क्रुझमध्ये आम्ही आमच्या समुद्रपर्यटनादरम्यान पाहिलेला तो विलक्षण देखावा होता. क्षणभर असे वाटून गेले की, कुठल्याही सहृदय आयुष्याचा अस्तही असाच देखणा व्हावा. स्वार्थपरायणतेशिवाय खऱ्या अर्थाने जगलेल्या क्षणांचे अर्घ्य त्या मावळत्या दिनकराला दोन्ही करांनी अर्पून, आम्ही करमली कृतार्थ झालो!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com