Caves in Goa : साकोर्ड्यातील शैवपंथीय गुंफा

निसर्गाची समीपता, पाणी, कंदमुळे आणि जगरहाटीपासून दूर असल्याने भाविकांना ध्यानधारणा करण्यासाठी या शिल्प शैलगृहाचा वापर करत. खनिज उत्खननाला कायदेशीररित्या निर्बंध घातल्याने साकोर्ड्यातल्या संचितांचे दर्शन घडू लागले.
Caves in Sacordem Goa
Caves in Sacordem GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Caves in Goa : दक्षिण गोव्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेला धारबांदोडा तालुक्यातील साकोर्डा गाव. इथे लोहखनिजाचे उत्खनन करणाऱ्या खाणी सुरू होण्यापूर्वी हिरव्यागार जंगलाचे वैभव मिरवत होता. एका बाजूला फोंडा तालुक्यातले बोंडला अभयारण्य आणि दुसऱ्या बाजूला वर्धमान महावीर अभयारण्याच्या कुशीत वसलेला हा गाव प्राचीन काळापासून ‘सुजलाम सुफलाम’ होता.

गोव्याची जीवनदायिनी म्हादई नदीच्या परिवारात समाविष्ट होणाऱ्या रगाडो आणि तिच्या असंख्य नाल्यांमुळे जलसमृद्ध असणारा हा गाव शेती आणि बागायतीची समृद्धी अनुभवत होता. त्यामुळे इथल्या वृक्ष-वेली आणि पशु-पक्षी यांच्याशी सख्य राखत वास्तव्यास असणाऱ्या नानाविध जाती-जमातींनी साकोर्डा गावाच्या उन्नतीत वेळोवेळी महत्त्वाचे योगदान दिले होते. साकोर्ड्याची सीमा ज्या तांबडी सुर्ल गावाला भिडते, तेथूनच ‘राणीची पाज’ एकेकाळी अस्तित्वात होती. गोवा कदंब नृपती शिवचित्त पेरमाडी देवाची पट्टराणी कमलादेवी घाटमाथ्यावरच्या हळशी या राजधानी शहरात ये-जा करण्यास गोव्यातल्या तांबडी सुर्लहून कर्नाटकातल्या विरंजोळमार्गे खानापूरला जाण्यासाठी डोंगर आणि जंगलातून जाणाऱ्या या मार्गाचा उपयोग करत असावी. त्यामुळेच हा मार्ग ‘राणीची पाज’ म्हणून ओळखला जातो.

रगाडो नदीच्या डाव्या काठावर काळ्या दगडांचा अत्यंत कल्पकतेने वापर करून शिल्पकलेने युक्त अशा महादेवाच्या मंदिराला राणी कमलादेवी भेट देत असावी. जुन्या काळी घाटमार्गावर वसलेल्या साकोर्ड्यात त्यामुळेच विविध प्रांतांतून स्थलांतरित झालेल्या जाती-जमातींचे वास्तव्य होते. आजही तांबडी सुर्ल, साकोर्डा या गावांत, जंगलात मंदिर आणि अन्य वास्तूंचे भग्नावशेष पाहायला मिळतात. शेकडो वर्षांचा इतिहास आणि संस्कृतीशी ऋणानुबंध सांगणाऱ्या भग्नावशेषांतून गतवैभवाचे दर्शन अनुभवायला मिळते. सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावरून उगम पावणारे ओहोळ, नाले, नद्यांतून वाहत येणाऱ्या पाण्याला शेतात, बागायतीत खेळते ठेवून मुबलक अन्नधान्याची पैदास इथे केली जायची. त्यामुळे शेती, बागायतीबरोबर व्यापार, उद्योगाला चालना मिळाली होती. कलाकार, कारागीर अशा बारा बलुतेदारांचे इथे वास्तव्य होते. दख्खनच्या पठारावरून मार्गक्रमण करून या परिसरात आलेल्या क्षात्र धर्मियांनी वर्चस्व प्रस्थापित करून रगाडो नदीच्या काठावरती बारा भूमिका देवीचे मंदिर उभारले होते.

रगाडो नदीच्या काठावरती अश्मयुगापासून आदिमानवाचा संचार होता. पेयजल, रानातून उपलब्ध होणारी कंदमुळे आणि फळेफुले यामुळेच अश्मयुगीन आदिमानव या परिसरात वावरत होता, त्याची प्रचीती देणारी दगडी आयुधे, शस्त्रे येथे आढळतात. अश्मयुगापासून आदिकाळापर्यंत या परिसरात मानवी समाजाची वस्ती होती. त्यामुळे विविध कालखंडातल्या संस्कृतींचे अवशेष आजही इथल्या जंगलात पाहायला मिळतात. आपले वर्चस्व टिकवण्यासाठी शूर वीरांनी कैक लढाया लढल्या आणि काही वेळा लढता लढता वीरगती प्राप्त केली, अशा पुरुषांशी संबंधित वीरगळ, सतीपाषाणे आणि देवदेवतांच्या भग्न मूर्ती ठिकठिकाणी आढळल्या आहेत. त्यावरून साकोर्डा आणि परिसरातल्या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घडते.

गोवा मुक्तीपूर्वी साकोर्ड्यातल्या लोहखनिजाचे उत्खनन करण्यास ज्या खाणी सुरू झाल्या, त्यांनी मुक्तीनंतर शिखर गाठले. लोहखनिज उत्खनन, वाहतूक, निर्यातीसाठी सर्वसामान्य जनतेला अक्षरशः वेठीस धरून हा व्यवसाय फोफावत गेला. हवा, पाणी, ध्वनी, मृदा प्रदूषणाने निसर्गसंपन्न गावाच्या सौंदर्याला विस्कळीत करून टाकले. नैसर्गिक संचिताबरोबर इथल्या पुरातत्वीय, सांस्कृतिक वारशाची, खाण व्यवसायाने धूळधाण केली. त्यामुळे साकोर्डा गावाचा वारसा विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर होता.

Caves in Sacordem Goa
IFFI Goa Controversy : इफ्फीत गोमंतकीयांना मानाचं स्थान कधी मिळणार?

सध्या खनिज उत्खननाला कायदेशीररित्या निर्बंध घातल्याने साकोर्ड्यातल्या संचितांचे दर्शन घडू लागले. त्यामुळे येथील इतिहासप्रेमी गिरीश नाडकर्णी यांच्या नजरेत ग्रामदैवत सातेरी, महादेवाच्या मुख्य मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या काजुले या जंगल परिसरात नैसर्गिकरित्या उभा असलेल्या जांभ्या शिलाखंडात खोदलेली गुंफा दृष्टीस पडली. गोव्यात शेकडो वर्षांपासून शैव पंथाद्वारे आपले आराध्य दैवत असणाऱ्या शिवाचे पूजन शिवलिंगाच्या रूपात करण्याची परंपरा असून शिवोपासक तांत्रिकांबरोबर नाथपंथीयांनी शिवलिंगाच्या पूजनाला प्राधान्य दिले आहे. रामनाथ, शिवनाथ, नागनाथ, सिद्धनाथ अशा नावांनी नाथपंथीयांनी ध्यानधारणा करण्यासाठी ठिकठिकाणी निसर्गात जो जांभा शिलाखंड उपलब्ध झाला, तेथे गुंफा खोदल्या. पश्चिम घाट आणि पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात वावरणाऱ्या शैवपंथीयांनी अशा जांभ्या दगडांना अचूकपणे हेरून आपल्या आराध्यांचे प्रतीक स्थापन करण्यासाठी गुंफा खोदल्या.

गुंफा कोरण्यासाठी कारागीर कोणतीही चीर, स्तर पांढऱ्या रेषा आणि तडे न गेलेल्या खडकाची निवड करत. जांभ्या दगडात स्थापत्य करणाऱ्या कारागिरांना भूगर्भशास्त्राचे ज्ञान असायचे. अशा दगडात गुंफा खोदणे आणि त्यात कोरीव काम करणे ही कारागिरांसाठी आव्हानात्मक बाब होती. स्थापत्यकाराचे मन, हृदय आणि हात यांच्या एकीने व सौहार्दाने काम करून साकोर्डा गावातल्या काजुले या जागी ही गुंफा खोदलेली आहे. डॉ. नंदकुमार कामत यांच्या मते, ही गुंफा अकरा ते तेराव्या शतकाच्या कालखंडात खोदली असून, तांत्रिक पंथियांनी तिचा वापर शिवपूजनासाठी केला होता. निसर्गातील धातूचे संपादन करण्याची कला अवगत असणाऱ्या या तांत्रिकांनी काजुले येथील वाहत्या ओहोळाच्या काठी उभ्या जांभ्या दगडातल्या निर्दोष वाटणाऱ्या एकसंध पाषाणाची निवड करून धातूच्या धारदार आयुधांनी त्यात खोदकाम करून शिवलिंगाची प्रतिकृती त्याच पाषाणाशी संलग्न कोरलेली आहे. या शैलगृहात प्रवेश करण्यासाठी आयताकृती प्रवेशद्वार खोदले असून, आतल्या शिवलिंगाचे भजन, पूजन करून भाविकाला आसनस्थ होऊन ध्यान धारणा करण्याची योजना आहे. उभा कातळ कोरून निर्माण केलेल्या या शैलगृहात आसनस्थ भाविकाचे ऊन, पाऊस, वारा यांच्यापासून रक्षण व्हायचे.

निसर्गाची समीपता, वाहत्या पाण्याची उपलब्धता, खाण्यास कंदमुळे आणि जगरहाटीच्या दैनंदिन कोलाहलापासून दूर असल्याने भाविकांना ध्यानधारणा आणि मनाची एकाग्रता साध्य करण्यासाठी या शिल्प शैलगृहाचा वापर करता येत होता. घनगर्द वृक्षराजी, त्याच्या जोडीला पशुपक्ष्यांचे सान्निध्य यांमुळे निरामय शांततेची अनुभूती देणाऱ्या या स्थळी भाविकाला दिव्यत्वाची प्रचीती आली नाही, तरच नवल मानावे लागेल. आज काजुले येथील ही मानवनिर्मित गुंफा जंगलात असल्याने सुरक्षित राहिली आहे. गोव्यात अशा प्रकारची शैलगृहे शैवपंथियांनी बऱ्याच ठिकाणी खोदली असून, बोंडला अभयारण्यात जाताना गांजा, त्याचप्रमाणे सत्तरीतल्या मलपणच्या जंगलात अशाच स्वरूपाची शैलगृहे खोदली आहेत. या शैलगृहांचे खोदकाम, आतले लिंग आणि अन्य कोरीव कामाचे कौशल्य पाहताच, धातूच्या आयुधाने खोदकाम केल्याचे स्पष्ट होते. शैवपंथातल्या तांत्रिकांनी या धार्मिक, सांस्कृतिक कलावैभवाची निर्मिती केली असून हे शैलगृह जंगलात असल्याकारणाने, काळाच्या ओघात ते दृष्टीआड झाले होते.

-राजेंद्र पां. केरकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com